Wednesday, 16 August 2017

लोकमान्य टिळक, भाऊ रंगारी आणि गणेशोत्सव

हल्ली बराच चर्चेत असणारा विषय त्यामुळे आपणही या विषयावर काहीबाही खरडावे असे वाटल्यामुळे हा छोटेखानी लेख!!

या लेखाचे दोन भाग आहेत एक म्हणजे उत्सव म्हणजे काय आणि दुसरे म्हणजे एखादा उत्सव हा कोणत्या कारणासाठी सुरु केला गेला. सर्वप्रथम 'उत्सव' या शब्दाची अशी ढोबळ व्याख्या करता येईल की 'उत्सव म्हणजे एखाद्या धार्मिक कार्यात जेव्हा संपूर्ण समाजाला सामायिक केले जाते, आणि जो साजरा केल्याने मनाला समाधान मिळते असा दिवस किंव क्षण.' एखादी गोष्ट मी स्वतापुर्ती मर्यादित ठेवली आणि ४ लोकांना एकत्र करून जर तो साजरा केला तर तो उत्सव होईल का यात थोडे मतभेद होऊ शकतात.

श्री. भाऊ रंगारी


हल्लीचा जो हॉट topic आहे तो म्हणजे गणेशोत्सव कुणी साजरा करायला सुरुवात केली??? एक- दोन पुस्तकात श्री. भाऊ रंगारी यांचा उल्लेख मिळतो की श्री. भाऊ रंगारी यांनी सुरुवात केली तर काही इंग्रजी लेखकांच्या पुस्तकात श्री. लोकमान्य टिळक यांनी या उत्सवाची सुरुवात केली असे लिहिलेले आढळून येते. इथे जर पाहायला गेलो तर श्री. भाऊ रंगारी यांचा असा उद्देश कुठेही दिसत नाही की या उत्सवाला लोकचळवळीचे स्वरूप द्यायचे म्हणून त्यामुळे फार फार तर घरातल्या गणपतीला दारात आणून बसवला असे या कृतीचे वर्णन करता येईल. लोकमान्य टिळकांनी हेच याला लोकचळवळीचे रूप दिले आणि त्यासाठी कोणतेही पुरावे द्यायची गरज मला तरी वाटत नाही!! काही जण यासाठी केसरीच्या एका लेखाचा पुरावा देतातमाझ्याकडे तो लेख नाही त्यामुळे त्यावर काही बोलणार नाही..

The Myth of the Lokamanya: Tilak and Mass Politics in Maharashtra- By Richard I. Cashman या पुस्तकात गणेशोत्सवाबद्दल बऱ्यापैकी लिहिलेले आढळून येते. या पुस्तकात "The Political Recruitment of God Ganpati' या नावाने चक्क काही पानेच खर्ची घातली आहेत. (पृष्ठ क्रमांक. ७५) या लेखाची सुरुवात करतानाच हा इंग्रजी लेखक केसरीच्या ८ सप्टेंबर १८८६ च्या पत्राचा दाखला देतो. "Why Shouldn't we convert large religious festivals into mass political rallies?" या प्रश्नातून टिळकांचे विचार लगेचच कळून येतात. या पुस्तकात अजून एक महत्वाचा उल्लेख दिसून येतो. लेखक म्हणतो की, "With the accession of Peshwa, Ganesha Enjoyed official Patronage, and in the reign of of Madhavrao (1761-72) the celebration became a lavish PUBLIC AFFAIR which lasted six days"
पेशवे यांच्या संदर्भाचा आपल्या मराठा कागदपत्रात कुठे उल्लेख येतो का हे पाहण्यासाठी सरदेसाई यांनी छापलेले पेशवे दफ्तर चाळून काढले तर त्यात एखा खंडात स्पष्ट उल्लेख मिळाला!! पेशवे दफ्तर खंड १८ मध्ये हे पत्र छापले आहे. यात स्पष्ट उल्लेख आहे की "श्रीगणपती उछाहाची बिदाई लोकांस.." यापुढे कोणत्या माणसांस किती बिदागी दिली याची यादी आहे.
पेशवे दफ्तरातील पत्र माधवराव पेशवे यांचा गणेश महाल


संदर्भ- १. पेशवे दफ्तर
२. The Myth of the Lokamanya: Tilak and Mass Politics in Maharashtra- By Richard I. Cashman

  

Thursday, 10 August 2017

अष्टप्रधान मंडळ

आपल्याला लहान असताना बरेच वेळा शिकवले जाते की शिवरायांची राज्यकारभाराची पद्धत ही प्रधान पद्धत होती आणि ते काही अंशी बरोबर सुद्धा आहे. शिवाजी राजांनी ही पद्धत मुसलमान शासकांकडून घेतली हे उघड आहे कारण पेशवा, मुजुमदार,वाकनीस,सुरनीस,डबीर इत्यादी अधिकाऱ्यांची नावे मुघल प्रशासनात बऱ्याच वेळेला येतात. हीच नावे राजांनी राज्यव्यवहारकोशात संस्कृत भाषेत देताना प्रधान, अमात्य,मंत्री,सचिव,सुमंत इत्यादी नावे दिली. पण येथे मुद्दा हा निराळाच आहे आणि तो म्हणजे नावाप्रमाणे खरोखर आठ प्रधान होते का??

आता तुम्ही म्हणाल की काहीही लिहितोस राव तू! नावात तर अष्ट आहे त्यामुळे प्रधानांची संख्या सुद्धा आठ असणार हे उघड आहे. माझेही मत सुद्धा पूर्वी तसेच होते पण काही पत्रांमध्ये येणारा उल्लेख जरासा वेगळा येतो! अष्टप्रधान म्हणजे आठ प्रधान हे विधान विविध ऐतिहासिक पत्रांच्या सहाय्याने खोटे ठरते आणि दिसून येते की ही संख्या आठ पेक्षा जास्त असावी. ही पत्रे ‘काव्येइतिहाससंग्रह’ या मासिकात तर  ‘काव्येइतिहाससंग्रहात प्रसिद्ध झालेले ऐतिहासिक पत्रे यादी वगैरे लेख’ या पुस्तकामध्ये छापली आहेत. 

यातील प्रथम पत्र आहे ते म्हणजे खेम सावंत याने लखमसावंत यांस २१/०६/१६७३ रोजी लिहिलेले. या पत्रात अष्टप्रधान मंडळाची कार्ये इत्यादी बद्दल माहिती दिलेली दिसून येते. पत्राचा मजकूर खालीलप्रमाणे –

श्री
कानूजाबता राज्याभिषेक शके १ आनंद नाम संवत्सरे ज्येष्ठ वद्य १३ त्रयोदशी भोमवासरे.

मुख्य प्रधान यांनी सर्व राजकार्य करावे. राजपत्रावर शिक्का करावा. सेना घेऊन युद्धप्रसंग व स्वारी करावी व तालुका ताबिनात स्वाधीन होईल त्याचा बंदोबस्त करून आज्ञेत वर्तावे. सर्व सरदार सेना [यांनी] याजबरोबर जावे. त्याणी सर्वांसमवेत चालावे. येणेप्रमाणे. मोर्तब. कलम १.

अमात्य यांनी सर्व राज्यातील जमाखर्च चौकशी करून दप्तरदार, फडणीस यांचे स्वाधीन असावे. लिहिणे चौकशीने आकारावे. फडणीसी, चिटणिसी पत्रांवर निशाण करावे. युद्धप्रसंग करावे. तालुका जतन करून आज्ञेत चालावे. मोर्तब. कलम १.

सचिव यांनी राजपत्रे शोध करून अधिक उणे अक्षर मजकूर शुद्ध करावा. युद्धप्रसंग करून तालुका स्वाधीन होईल तो रक्षून आज्ञेत वर्तावे. राजपत्रांवर चिन्ह संमत करावे. मोर्तब. कलम १.

मंत्री यांनी सर्व मंत्रविचार राज्यकारणे यांतील सावधतेने विचार करावे. आमंत्रण वाकनिसी त्यांच्या स्वाधीन. तालुका जतन करून युदधादी प्रसंग करावे. राजपत्रांवर संमत चिन्ह करावे. मोर्तब. कलम १.

चिटणीस यांनी सर्वराज्यातील राजपत्रे लिहावी. राजकारणपत्रे उत्तरे लिहावी. सनदा, दानपत्रेवगैरे महाली हुकुमी यांचा जाबता फडणीसी अलहिदा त्याप्रमाणे लिहावी. हातरोखे नाजूकपत्रे यांच्यावर मोर्तब अथवा खास दस्तक मात्र. वरकडांचा दाखलाचिन्ह नाही. चिटणीसांनीच करावे. मोर्तब. कलम १.

किल्ले, कोट, ठाणी, जंजिरे येथील कायदे करून दिले त्याप्रमाणे हवालदार, सुभेदार , कारखानीस, सबनीस, सरनोबत, तटसरनोबत लोक यांचे जाबते करून दिल्हे त्याप्रमाणे सावधतेने स्थळे रक्षावीत. तगिरी बदली हुजुरून व्हावी. बेजमी नेमणूक तालुकेदार यांच्याकडे दरवाजा, किल्ल्यावर हवालदार यांचा हुकुम, शिक्के त्यांच्या नावाचे, कारखानिसी, सबनीसी, जाबता अलहिदा असे. मोर्तब. कलम १.

आठरा कारखान्यांचे अधिकारी यांनी खाजगीचे अधिकारी यांच्या इतल्यात चालून दफ्तरी हिशेब गुजरावे. मोर्तब. कलम १.

आबदारखाना चिटणीस यांच्याकडे सरफखाना सुद्धा अधिकार सांगितला. मजालसी विडे, अत्तरगुलाब व हारतुरे, फळफळावळ खूषबई खरेदी, जमाखर्च यांनी करून हिशेब दफ्तरी गुजरावा. मोर्तब. कलम १.
पागा जुमलेदार, सरदार यांनी कैद करून दिली त्याप्रमाणे चालून सेनापती व प्रधान यांच्या समागमे कामकाजे करावी. मोर्तब. कलम १.

सेनापती यांनी सर्व सैन्य संरक्षण करून युद्धप्रसंग स्वारी करावी. तालुका स्वाधीन होईल तो रक्षून हिशेब रुजू करून आज्ञेत वर्तावे. फौजेच्या लोकांशी बोलणे बोलावे. सर्व फौजेचे सरदार यांनी त्याजबरोबर चालावे. मोर्तब. कलम १.

पंडीतराव यांनी सर्व धर्माधिकार, धर्म अधर्म पाहून शिक्षा करावी. शिष्टांचे सत्कार करावे. आचार, व्यवहार, प्रायश्चित पत्रे होतील त्याजवर संमत चिन्ह करावे. दानप्रसंग, शांति, अनुष्ठान तत्काळ करावे. मोर्तब. कलम १.
न्यायाधीश यांनी सर्व राज्यांतील न्याय, अन्याय मनास आणून बहुत धर्मे करून न्याय करावे. न्यायाची निवडपत्रे यांजवर संमती चिन्ह करावे. मोर्तब. कलम १.

सुमंत यांनी परराज्यातील विचार करावा. त्यांचे वकील येतील, त्यांचे सत्कार करावे. युद्धादी प्रसंग करावेत. राजपत्रांवर चिन्ह संमत करावे. मोर्तब. कलम १.

फौजेचे सबनीस,बक्षी यांनी सर्व फौजेची हजेरी चौकशी करावी. यादी करून समजवावे. रोजमुरा वाटणे, सत्कार करावा. युद्धादी प्रसंग करावा. मोर्तब. कलम १.

सेनाधुरंदर यांनी बिनी करावी, आघाडीस जावे फडफर्मास करावी, लूट करणे, मना करणे, चौकशी ताकीद, त्यांजकडे, पुढे असून सेना रक्षण करावी. मोर्तब. कलम १.

सुभे मामले तालुकेदार यांस त्यांजकडे जे नेमले त्यानी ते जाबत्या प्रमाणे चालावे. हुजूरचे दरखदार चिटणीस, फडणीस, मुजुमदार यांच्या इतल्याने चालून हिशेब गुजरावे. मोर्तब. कलम १.

*बारा महलचे अधिकारी यांनी आपापले काम दुरुस्त राखून हिशेब आकारून दफ्तरात गुजरावे. मोर्तब. कलम १.

दरुणी महालाचे कामकाज दिवाण नेमून दिले त्याणी सर्व पाहून करावे. चिटणीस, फडणीस यांनी आपापले दरखाचे कागद लिहावे. त्यांजवर निशाणचिन्ह दिवाणानी करून त्यांस समजून मोर्तब समक्ष करावे. मोर्तब. कलम १.

पोतनीस यांनी पोते जमाखर्च लिहिणे करावे. नजरपेशकशी जमा करावी. पोतदार यांनी पारख करावी. मोर्तब. कलम १.

अष्टप्रधान यांजकडे पेटे व तालुके व स्वारीस जाणे त्यांस दरखदार सर्व हुजुरच्या नावे, त्यांच्या दाख्ल्यानी पत्रव्यवहार करावा. स्वारीस जावे त्यांस मुतालिक करून दिल्हे त्याणी सर्व व्यवहार चालवावा. हुजूर राहावे. कलम १ मोर्तब.
एकूण कलमे वीस मोर्तब.

बारा महाल:- पोते-कोठी-पागा-दरजी-टंकसाल-सौदागिरी-इमारत-हवेली-पालखी-थट्टी-चौबिना-शेरी महाल)

आता वरील पत्रात मुख्य प्रधान, अमात्य, सचीव, सेनापती, पंडीतराव, न्यायाधीश, मंत्री, चिटणीस, सुमंत, बक्षी, सेनाधुरंदर अशी अकरा नावे दिसून येतात. यातील बहुतांश लोकांना इतर कामे आणि वेळेप्रसंगी युद्ध अशी कामाची वाटणी केलेली दिसून येते. परंतु या पत्राच्या शेवटी अष्टप्रधान असा उल्लेख केलेला दिसून येतो. तो कदाचित संख्यावाचक नसावा असेच या पत्रावरून कळून येते तर तो समूहवाचक असावा. यापत्राव्यतिरिक्त दुसरे शिवकालीन पत्र सापडत नाही जे या तर्कास बळकटी देईल.    

पत्रे यादी वगैरे याच पुस्तकातील दहावे पत्र हे संभाजी राजांच्या (कोल्हापूर) वेळेस इ.स. १७१७ मध्ये लिहिलेले आहे. या पत्रात प्रधानांची यादी दिसून येते. यात पंत प्रधान, सेनापती, पंत अमात्य, पंत सचीव, पंत सुमंत, पंत मंत्री, पंडीतराव, न्यायाधीश, पंत रायाज्ञा अशी ९ नावे दिसून येतात. 


श्री. उदय कुलकर्णी यांच्या फेसबुक पेज वरून साभार (https://goo.gl/Ghy7Ek)


याव्यतिरिक्त शाहू महाराजांचे अष्ट प्रधान जे होते त्यांचे सुद्धा एक पत्र  उपलब्ध आहे आणि त्यात आठ नवे येतात. ती  म्हणजे धनाजी जाधवराव, नारोराम शेणवी, बहिरोपंत पिंगळे, आनंदराव, आबू राव, होनाजी अनंत, नारोशंकर, मुद्गल भट अशी टी नावे आहेत. अर्थात हा उल्लेख बाळाजी भट  पेशवे होण्याच्या आधीचा आहे हे सांगयला नको !                              


हा उल्लेख माझ्या आठपेक्षा जास्त प्रधान असलेल्या तर्काला  छेद देतो हे मात्र खरे! 

 

Sunday, 9 July 2017

पावसाळ्यातील भटकंतीची हटके डेस्टीनेशन्स


सवतसडा धबधबा 

ज्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतात तो पाउस यंदा थोडा लवकरच आला! थोडा वेळ महाराष्ट्राच्या सीमेवर रेंगाळून त्याने आता मात्र संपूर्ण महाराष्ट्रात जोर धरला आहे. कोकणात मुसळधार पडणारा हा घाटावर येऊन थोडा शांत झालेला असला तरी तापलेल्या जमिनीला शांत करण्याचे काम त्याने चोखपणे निभावलेले आहे आणि आता सर्व जमीन हिरवागार शालू अंगावर लपेटू लागली आहे. अशा या मदहोश वातावरणात घरातून बाहेर पडून मस्त पैकी फिरस्ती करण्याचा मोह कुणाला होणार नाही. मात्र लोणावळा, मढे घाट, ताम्हिणी घाट यांसारख्या ठिकाणांवर होणारी प्रचंड गर्दी बघता, या पावसाचा आनंद घ्यायचा कसा आणि कुठे असा प्रश्न नक्कीच सर्वाना पडला असेल. नेहमीच्या भटक्यांना अशी ठिकाणे माहिती असली तरी सर्वसामान्य पर्यटक तिथपर्यंत माहितीअभावी पोहोचतच नाहीत. अशा काही नवीन पण पावसाचा धमाल अनुभव देणारी ही ठिकाणे नव्याने वर्षा सहलीची ठिकाणे म्हणून नक्कीच उदयास येऊ शकतात आणि प्रसिद्ध ठिकाणांवरील गर्दीचा ताण कमी व्हायला यांमुळे थोडीफार मदत होईल.

येलघोल लेणी 
येलघोल लेणी   

येलघोल- 

पुणे जिल्ह्यातील प्रेमात पडावी अशी अनेक लेणी आहेत. कार्ले, भाजे, बेडसे अशा प्रसिद्ध लेणीना अनेक पर्यटक भेट देतात परंतु अनगड जागी असलेल्या लेणीकडे क्वचितच पर्यटकांचे पाय वळतात. यापैकीच एक लेणे म्हणजे मावळ तालुक्यातील ‘येलघोल’ लेणे. ‘फिरस्ती महाराष्ट्राची’ या माझ्या पुस्तकात त्याबद्दल सविस्तर माहिती आहेच. मावळ तालुक्यात पावसाचे प्रमाण अधिक त्यामुळे येलघोल लेणीच्या अगदी शेजारी असणारा धबधबा कोसळू लागतो. खेड्यातील जीवन, मस्त मातीचा रस्ता आणि लेणीतील शांतता हा अनुभव घ्यायचा असेल तर मावळ तालुक्यातील येलघोलला नक्की भेट द्या!

जायचे कसे- पुणे ते येलघोल हे अंतर साधारणपणे ६० किमी असेल. पुणे-कामशेत-कडधे-आर्डव-येलघोल हा एक मार्ग किंवा पुणे-पौड-तिकोनापेठ-कडधे-आर्डव-येलघोल असे सुद्धा जाऊ शकतो. पण पुणे-पौड हा मार्ग थोडा लांबचा पडतो आणि रस्ता खराब असल्याने वेळ सुद्धा जातो.

   
पळू सोनावळे लेणी समूह 

पळू सोनावळे  लेणी समूह आतून  (फोटो- गुगल ) 

     'पळू सोनावळेअर्थात 'गणपती गडद' लेणी  


   बऱ्याचदा भटके गोरखगडाला भेट देतात तेथे जाऊन सह्याद्रीचे रूप न्याहाळतात परंतु त्याच्या जवळच असलेले ‘गणपती गडद’ हे लेणे आजही उपेक्षित आहे. गणपती गडदला जाताना शक्यतो स्वतःचे वाहन न्यावे. पुण्याहून गाडी काढून ऐतिहासिक जुन्नरमार्गे जाताना शिवनेरीचे दर्शन घेऊन माळशेज घाटाचा रस्ता पकडावा. मजल दरमजल करत ठाणे जिल्ह्यातील धसई धरणा शेजारून गोरख-मछिंद्र गडांचे दर्शन घेत आपण सोनावळे या पायथ्याच्या गावी पोहोचायचे. याच गावामधून सुरु होतो गणपती गडदच्या लेण्यांचा आडवाटेवरचा अत्यंत सुंदर ट्रेक. गणपती गडद हा सात क्षुद्र लेण्यांचा समूह आहे त्यातील मधल्या लेण्यांमध्ये सुंदर गणेशमूर्ती आहे. पळू सोनावळे येथील लेणी ही दुय्यम दर्जाची असल्याने आपल्याला फारसे कोरीव काम या लेण्यामध्ये दिसून येत नाही मात्र यातील मुख्य लेण्यामधील खांब हे अलंकृत आहेत त्यावर व्यवस्थित नक्षीकाम केलेले आपल्याला दिसते. सकाळी या लेण्यांमधून धुक्याची चादर पांघरलेला सह्याद्री न्याहाळणे म्हणजे स्वर्गच.

जायचे कसे- पुणे ते सोनावळे जायचे असल्यास सर्वात सोपा मार्ग ठरतो तो माळशेज घाट मार्गे. पुणे ते सोनावळे माळशेज घाटातून अंतर आहे १५५ किमी तर लोणावळा-कर्जत मार्गे अंतर आहे १७५ किमी.

कुर्डूगड- 

पावसाळ्यात अनेक लोकं ताम्हिणी घाटात भिजायला किंवा ट्रेकला जातात. मात्र जर घाटातील गर्दी टाळायची असेल तर ताम्हिणीच्या पायथ्याशी असणारा कुर्डूगड हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. किल्ल्यावर जायचे असेल तर प्रथम पायथ्याशी असणारे उंबर्डी गाठावे लागते. विळे-निजामपूर रस्त्यावरील शिरवली गावातून उंबर्डीला जाता येते. उंबर्डी गावातूनच कुर्डूगडला जाण्याचा रस्ता आहे. खाली गावात कुर्डाई देवीचे मंदीर आहे तसेच एक भग्न शिवमंदीर सुद्धा आहे. कुर्डूगड हा एक सुळकाच आहे मात्र याचे मुख्य आकर्षण म्हणजे नैसर्गिक रित्या तैय्यार झालेली कोकण खिडकी. येथून कोकणाचा अतिशय सुंदर नजरा दिसतो. पावसाळ्यात इथला वारा अंगावर घेणे म्हणजे एक स्वर्गीय अनुभवच.

जायचे कसे- पुणे-मुळशी-ताम्हिणी-विळे-उंबर्डी असे किंवा मुंबई वरून आल्यास पाली मार्गे विळे गाठून पुढील प्रवास करता येतो. पुणे ते उंबर्डी हे अंतर साधारणपणे ११० किमी आहे तर मुंबई ते उंबर्डी हे अंतर १५० किमी आहे.

रायरेश्वरगड  
 स्वप्नवत रायरेश्वर 

   रायरेश्वर-

  
   पावसाळ्यात पुण्यातील भोर तालुका म्हणजे भटकंतीचा स्वर्गच. धुव्वाधार पाउस पडणाऱ्या या तालुक्यात भटकंतीची एक से एक ठिकाणे आहेत. रोहीडा, वरंध घाट, रायरेश्वर, मांढरदेवी  ही त्यापैकीच काही. सर्वच उपेक्षित!! अशा वेळी आपली गाडी मस्त भोर वरून रायरेश्वरकडे वळवावी. कोर्ले या गावापासून रायरेश्वराची चढण सुरु होते. हल्ली रस्ता झाल्याने गाडीअर्ध्या रस्त्यात जाते मात्र खरी पावसाची मजा घ्यायची असल्यास पायगाडीचा रस्ता पकडावा. साधारण ५-६ किमी अंतर चालल्यानंतर काही शिड्या चढून आपण रायरेश्वराच्या पठारावर येऊन पोहोचतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी याच रायरेश्वराच्या मंदिरात सोळाव्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली असे सांगण्यात येते. साधारण १५-१६ किमी लांब असलेले हे पठार धुक्याच्या दुलईमध्ये बुडालेले असते. मध्येच ऊन-पावसाचा खेळ सुरु झाल्यावर वरून जे दृश्य दिसते त्याला तोड नाही. धोम धरणाचा विस्तीर्ण जलाशय तसेच जवळचा केंजळगड डोळ्याचे पारणे फेडतो. पुण्यापासून अगदी जवळ आणि फारशी गर्दी नसलेले हे ठिकाण आवर्जून भेट द्यावे असेच आहे.

   जायचे कसे- पुणे-भोर-कोरले-रायरेश्वर हे अंतर साधारणपणे 80 किमी आहे.

   भोरगिरी- 

   धो धो कोसळणाऱ्या पावसात भीमाशंकरच्या जंगलात फिरणे म्हणजे बेअर ग्रील्स सारखा अनुभव घेण्यासारखे असते परंतु भाविकांची असलेली गर्दी आणि जंगलात हरवण्याचा धोका असल्याने दुसरे जवळचे ठिकाण कोणते असा प्रश्न पडतो. या प्रश्नाचे उत्तरही जवळच सापडते आणि ते म्हणजे भोरगिरी. निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या या छोट्याश्या गावात आहे भोरगड नावाचा एक छोटेखानी किल्ला. किल्ल्यावर फार काही बांधकाम नसले तरी किल्लाच्या पोटात असणाऱ्या गुहेतून समोरच्या हिरव्यागार निसर्गाचा आस्वाद घेत मस्त पैकी वेळ जाऊ शकतो. भोरगिरीपासून केवळ ६ किमी अंतरावर भीमाशंकराचे मंदीर आहे. सर्व ट्रेकर मंडळीत भोरगिरी ते भीमाशंकर हा जंगल ट्रेक फारच प्रसिद्ध आहे. अशा या जंगलात वसलेल्या किल्ल्याला पावसाळ्यात नक्की भेट द्यायला हवी.

   जायचे कसे- पुणे-रांजणगाव-चाकसमान- वाडा-शिरगाव हे अंतर साधारणपाने ७०-८० किमी आहे. तसेच पुणे-मंचर मार्गे भीमाशंकरला जाताना सुद्धा भोरगिरीचा फाटा लागतो.

   
पाटेश्वरमधील काही मूर्ती  

पाटेश्वर वरून दूरवर वसलेले सातारा आणि परिसर 
   पाटेश्वर-

   सहकुटुंब वर्षासहल करायची आहे का? आणि ते सुद्धा गर्दी नसलेल्या ठिकाणी? तर तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे आणि तो म्हणजे पाटेश्वर. सातारा शहरापासून रहिमतपूरच्या दिशेने निघाले की काही अंतरावर पाटेश्वरला जाण्यासाठी फाटा फुटतो. तिथून पुढे एक छोटासा घाट चढून गेल्यानंतर एके ठिकाणी हा रस्ता थांबतो. इथून पुढे मात्र भटकंती ही पायीच करावी लागते. थोडे अंतर चालल्यानंतर लगेचच काही पायऱ्या लागतात. तिथेच उजव्या हाताला गणपती विराजमान झालेले दिसतात. इथून पाटेश्वरचे मुख्य देवस्थान अर्ध्या तासाच्या चालीवर आहे. पण सोबत असलेले घनदाट जंगल, घोंगावणारावारा आणि पक्ष्यांचे गोड आवाज यांमुळे ही चाल सुखाची ठरते. हे ठिकाण प्रसिद्ध आहे ते येथील विविध आकाराच्या शंकराच्या पिंडींमुळे. पाटेश्वरमधील विविध आकाराच्या शंकराच्या कोरलेल्या पिंडी पाहून तोंडात बोटे गेल्याशिवाय राहत नाही. सहस्त्रलिंगी पिंड, चतुर्मुख शिवलिंग, नवग्रह शिवलिंग, लेणीत भिंतीवर असलेली शिवलिंगांची माळ, खांबांवर असलेली नागाची शिल्पे सारेच अद्भुत! अभ्यासकांच्या मते हे कोरीवकाम साधारणपणे दहाव्या शतकातील असावे. हे सर्व बघण्यास किमान ४-५ तास तरी हवेत. पाटेश्वरची भटकंती कधी संपते ते कळतच नाही. सहकुटुंब येण्यासारखी ही जागा!! दोन दिवसांच्या सवडीने आल्यास सातारा शहर, अजिंक्यतारा, ठोसेघर धबधबा, सज्जनगड, पाटेश्वर आणि जवळ असलेले जरंडेश्वर असा बराच मोठा परिसर पाहता येईल. 

   जायचे कसे- पुणे-सातारा-देगाव-पाटेश्वर हे अंतर अंदाजे १२० किमी आहे.

तैलबैल वरून घनगड आणि परिसर 

तैलबैल 
तैलबैल-

     पुणे जिल्ह्याच्या मावळतीला आणि निसर्गाच्या सानिध्यात असणारा तैलबैल आणि शेजारचा घनगड हा प्रदेश म्हणजे पावसाळ्यातील नंदनवन. जुलै ते सप्टेंबर इथे पावसाची संततधार चालू असते. अशा वेळी धुके आणि घोंगावणारा वारा अनुभवायचा असेल तर इथल्या पठारासारखी जागा नाही. सतत असणारे धुकं काही वेळाने बाजूला जाते तेव्हा दिसणारा नजरा तर अवर्णनीय!! पावसाळ्यातील एखाद्या उन्हाच्या दिवशी इथे जाण्याचा योग आला तर तुमच्या कॅमेराचे आणि मनाचे मेमरी कार्ड भरलेच म्हणून समजा! घाट आणि कोकण यांचे अप्रतिम दर्शन जर घ्यायचे असेल तर यासारखी दुसरी जागा नाही. लोणावळ्यावरून गाडी आंबे व्हॅली वरून सालथर खिंडीच्या दिशेने निघते आणि सालथर खिंड उतरून जेव्हा आपण तैलबैल फाट्यापाशी पोहोचतो तेव्हा पश्चिमेकडे दोन खणखणीत कातळभिंती आपल्याला खुणावत असतात, तोच तैलबैलचा डोंगर. तैलबैल गावातूनच वर जाण्यासाठी वाट आहे. खालून जी V आकाराची खच दिसते तिथपर्यंतचा आपला प्रवास अवघ्या २० मिनिटांमध्ये होतो. खरी मजा ही त्या खाचेत बसल्यावर येते. खालचे कोकणाचे विहंगम दृश्य, अजस्त्र पसरलेला सुधागड, मागच्या बाजूला दिसणारा घनगड आणि एकदम टोकाला दिसणारा ताजमहाल म्हणजेच नवरा नवरीचे सुळके!! हे दृश्य वाचण्यापेक्षा तिथे जाऊनच प्रत्यक्ष अनुभवलेले जास्त उत्तम!

  जायचे कसे- लोणावळा-सालतर-तैलबैल आणि दुसरा म्हणजे पुणे-पौड-मुळशी-निवे-भांबुर्डे-तैलबैल. कोणत्याही मार्गाने गेल्यास रस्ता तितकाच खराब आहे. पण खरा पाऊस अनुभवायचा असेल तर मुळशी मार्गे जावे. लोणावळा मार्गे आणि मुळशी मार्गे अंतर साधारण १०० किमी पडते. मुळशी मार्गे गेल्यास पौड नंतर पेट्रोल मिळत नाही त्यामुळे पौडलाच पेट्रोल भरून घेणे. 

 तर ही होती पावसाळ्यातील भटकंतीची काही हटके ठिकाणे. याव्यतिरिक्त अनेक अनगड ठिकाणे सह्याद्रीमध्ये किंवा महाराष्ट्रात आहेत परंतु विस्तारभयास्तव सर्वांची माहिती देणे शक्य नाही. कुठेही भटकायला जा मात्र आवश्यक ती काळजी घेऊन जाणे हे अत्यंत आवश्यक आहे. अतिआत्मविश्वास आणि हलगर्जीपणाने भटकले की त्याचा परिणाम भयंकर होतो हे ध्यानात ठेवले की पावसाळी भटकंती ही आनंददायी ठरेल स्वतःलाही आणि दुसऱ्यांनाही. 

ट्रेकिंगला जाताना काही आवर्जून फॉलो करावेत असे नियम  प्रत्येक जण स्वतःच्या बाबतीत स्वतंत्र आहेच परंतु एक सुजाण नागरिक म्हणून जर या नियमांचे पालन केले तर उत्तम प्रकारे त्या पर्यटनाची मजा येऊ शकते.