पत्र किल्ल्यांना- प्रतापगड

  • December 31, 2015
  • By Shantanu Paranjape
  • 1 Comments   (सर्वप्रथम सर्व वाचकांना इंग्रजी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! सरले वर्ष चांगले गेले असेल आणि येणारे वर्ष सुद्धा चांगलेच जाईल अशी अशा मी व्यक्त करतो..)

बरेच दिवस झाले पत्र किल्ल्यांना हि लेखमाला काढून आणि त्यात दर महिन्याला एक पत्र असेल असेही म्हणालो होतो तर कदाचित तुम्हाला वाटले असेल की विसरला की काय हा! तर तसं नाही आहे.. दुसरे पत्र भोरप्या डोंगरावरील प्रतापगड या निव्वळ शिवरायांच्या गडाला लिहिण्याचे ठरवले आणि लेखणी (कीबोर्ड) सरसावली..


  प्रिय प्रतापगड,

           तुझ्या प्रिय दोस्ताने तुला सांगितले की नाही मला माहिती नाही पण एक साधारण कल्पना देतो की मी असे पत्र लिहिण्याचा चंग बांधला आहे आणि याआधी नंदादिपास लिहिले आहे तर आता दुसरा नंबर तुझा येतो म्हणून हा खटाटोप..

    तुला आठवत असेलच तो दिवस, महाराज आणि मोरोपंतांची जावळीवरून नजर फिरताच एक बलाढ्य आणि सभोवताली केवळ ताशीव कडे असणारा डोंगर नजरेस पडला.. जावळीच्या भयाण जंगलात, वन्य श्वापदांच्या सहवासात असणाऱ्या त्या भोरप्या डोंगराचे महत्व महाराजांना ठळकपणे जाणवले आणि मोरोपंतास आज्ञा दिली की किल्ला बांधोनी काढावा... अन हळूहळू आकारास आलास तू.. दुर्गम,अवघड आणि महाबळेश्वर परिसरातील घाटवाटांवर नजर ठेवणारा एक बुलंद पहारेकरी.. महाराजांना नाव ठेवण्याची फार हौस होती त्यामुळे तुझे बारसे झाले किल्ले प्रतापगड.. कदाचित या गडावर घडणाऱ्या प्रतापाची त्यांना आधीच जाणीव झाली असावी..

   तुला मी भेट दिली ती साधारणपणे ६वी मध्ये असताना म्हणजे जवळपास ८ वर्षे झाली.. तेव्हाचा तू आणि आत्ताचा तू यात जमीन-अस्मानाचा फरक आहे बर का.. पण अर्थात याला तू कारणीभूत नसून तुझ्यावार जो रस्ता केलाय तो कारणीभूत आहे आणि अर्थातच तुझा जाज्वल्य इतिहास.. चौथी मध्ये वाचलेलं, “महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या शामियान्यात अफजलखानाचा वाघनखांनी पोट फाडून कोथळा बाहेर काढला...” या एका वाक्यात त्या संपूर्ण युद्धाचे महत्व घालवून टाकले रे!! काय करणार, बाहेरच्या देशात तुझे गुणगान गातात आणि आपल्याइथे उपेक्षा!!

    महाबळेश्वर वरून पोलादपूर कडे जाणाऱ्या रस्त्यावर तुझं रांगड रूप लगेच डोळ्यात भरते बघ.. तुळजापुरची भवानीचे पावित्र्य खानाने नष्ट केले म्हणून पुढे महाराजांनी भवानीची स्थापना गडावर केली हेतू इतकाच की पुन्हा त्या मूर्तीला धक्का लागू नये.. आणि त्यांचा तो विश्वास तू सार्थ ठरवलास..कारण त्यानंतर एकदाही त्या आदिमायेला धक्का सुद्धा लागलेला नाही..

   असो! तर तुला आठवत असेलच.. १० नोव्हेंबर १६५९, गुरुवार-मार्गशीष्ठ शुद्ध षष्ठीसह सप्तमी शके १५८१ रोजी महाराष्ट्र भूमीतील एक अद्वितीय राजकारण प्रतापगडी सफल झाले..!! महाराजांचा जयघोष सर्वत्र पसरला.. लेका तुझे भाग्यचं थोर रे.. खानाचा वध आणि राजांचा पराक्रम याची देही याची डोळा पाहण्याचे भाग्य तुला लाभले.. धन्य तो राजा आणि धन्य त्याचा गड! आता मी काय इतिहास वगैरे सांगत नाही.. ते तुला, मला आणि आख्या जगाला ठावूक आहे की नक्की काय घडले.. मात्र एक खरे आहे की रणदुल्लाखानाच्या तालमीत तयार झालेला आणि नंतर स्वकर्तुत्वाने पुढे आलेला अफजल आणि जेमतेम तिशी गाठणारा शिवाजी राजा यांचे युद्धकारण दक्षिणेच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणारे ठरले.

   मित्रा तुला माहितीच असेल की खानाच्या वधातून आदिलशाही संपूर्ण सावरण्याआधी चंदन-वंदन,वैराटगड,वसंतगड ईत्यादी ठिकाणे जिंकून कऱ्हाड,कोल्हापूर गाठून दुसरा तडाखा दिला.. इतकंच काय पण दक्षिणेचा स्वामी पन्हाळा पण स्वराज्यात दाखल झाला.. या सर्वाला साक्षी असणारा तू केवळ बुलंद अन बेलाग!! १६५९ ते १८१८ या कालावधीत १६८९ मधील काही महिन्यांचा कालावधी सोडला तर तू कधीही शत्रूकडे गेला नाहीस यातच तुझे स्थान अन तुझी दुर्गमता अन भक्कमपणा दिसून येतो!!

   जेव्हा मी तुला जाणून घ्यायला आलो होतो तेव्हा काहीच कळत नव्हते.. पण जसा जसा अभ्यास सुरु केला तसं तसं तुझ्या दुर्गामतेचे नवे पैलू उलगडू लागले.. सुरुवातीला वाटत होते की एवढा घनदाट जंगलात असणारा तू, तुझ्यावरून कितीसा परिसर दिसणार!!  पण चंद्रगड, मंगळगड उर्फ कांगोरी, मकरंदगड, हातलोट घाट, महाबळेश्वर, पल्याडचे महीपत,रसाळ आणि सुमार.. इकडे रायगड,राजगड,तोरणा आणि सोनगड.. बापरे!!! मोठाच परिसर दिसतो की रे!! नुकताच सोनगड वर जावून आलो आणि त्यावरून तुझे दर्शन झाले.. मनाला छान वाटले...

     तुझा इतिहास शिवकाळापासून सुरु झाला आणि अगदी तो आजपर्यंत चालू आहे..  खरं तर भयाण रानात असून सुद्धा तुझं नशीब फळफळले म्हणजे जेव्हा तुझ्यावर जाण्यासाठी वरपर्यंत सडक झाली तेव्हा!! काय करणार पंडित नेहरू येणार होते ना दर्शन घेण्यासाठी!! आणि तेव्हापासून तुझ्यावर जी वर्दळ चालू झाली ती आजपर्यंत कायम आहे.. महाबळेश्वर पाहायला येणारा प्रत्येक पर्यटक हमखास तुझे दर्शन घेवून जातो.. तेवढाच तुझा इतिहास जपला गेला आहे..

   जेव्हा मी तुझ्यावर आलो होतो, तेव्हा मला खाली अफजल खानच्या समाधीचे दर्शन झाले!! आणि क्षणभर अवाक झालो!! “कातीले मुतमर्रीदान व काफिरान, शिकंद ए बुनियादे बुतान” म्हणजे काफीरांची हत्या करणारा आणि मूर्तीचा विध्वंस करणारा हा आदिलशाही सरदार स्वताला ‘दीनदार कुफ्रकीशन, दीनदार बुतकीशन’ म्हणवून घेण्यात धन्यता मानत असे! आणि या खानाचे इथे स्मारक??!!! आधी जेव्हा नुसती कबर होती.. कबर असणे एकवेळ समजू शकतो पण आता तिथे मोठी कबर आणि शेजारीच सय्यद्बंडाची काल्पनिक कबर उभारण्यात आली आहे असे समजले.. इतकेच काय तर हा परिसर संगमरवरी फरसबंदी,कुराणातील वचने, उद-धुपाचा सुगंध यांनी मोठा नटवीला आहे.. म्हणे अफजल मेमोरिअल सोसायटी कडून याची देखभाल होते..(सद्य स्थिती मला माहिती नाही पण तू तुझ्या उत्तरात कळवशीलच) हे पाहून जेवढ्या वेदना एका शिवभ्क्ताला होतील, तितक्याच वेदना तुला झाल्या असतील हे मी शपथेवर सांगतो!! आपल्या देशातील लोकांचे देशप्रेम हे असे असते बघ.. मग त्यापेक्षा तुम्ही दगडात बांधलेले असून सुद्धा इमानी राहिलात शेवटपर्यंत!! क्या बात!!

        तुला सांगतो ही परिस्थिती अनेक ठिकाणी आहे.. आणि आम्ही हातावर हात ठेवून बसतो हे आमचे दुर्दैव आहे.. (मी सुद्धा हा ब्लॉग लिहून गप्पच बसणार आहे..) असो! तर मित्रा इतर किल्ल्यांपेक्षा तुझ्या वाट्याला जरा अधिक प्रसिद्धी आली पण आपल्या लोकांना त्याचा वापर करणे जमले नाही.. तू मात्र तसाच उभा आहेस.. उन,वादळ,पाउस कशाची तमा न बाळगता!! नेहमीप्रमाणे निश्चल, बुलंद आणि बेलाग आणि तुला सांगतो जरी अश्या अनेक घटना घडल्या तरी तुझे बेलागपण आणि तुझा पराक्राम कधीही इतिहासातून पुसला जाणार नाही.. याउपर अजून पुढे काय लिहिणे काही समजत नाही!!

   इथेच थांबतो!! लिहावसं खूप वाटतंय पण उगाच फाफड पसारा नको म्हणून आवरतोय!! मित्रा, भेट नक्की होणार आपली पुन्हा.. त्यादिवासाची मी नक्की वाट बघेन आणि जमल्यास तुही बघ!!

कळावे,  

                                                तुझा ,                                           

                                                                                        

ता.क.- म्हणल्याप्रमाणे लेख आधीच लिहून झालेला पण इतके दिवस इंटरनेट नसल्यामुळे तुला ते पाठवता आलं नाही पण नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी तुला ते पाठवतोय.. तुझी नव्या वर्षाची सुरुवात चांगली जाईल ही अपेक्षा!!


You Might Also Like

1 comments

  1. छान लिहिलंय.
    संपर्कासाठी तुमचा इमेल आयडी मिळू शकेल का?

    ReplyDelete

$(document).ready(function(){ $('#mscontent').css('opacity','0'); });