शाळेत
असतानाची गोष्ट, बाईनी वर्गात प्रश्न विचारला कि मुलांनो सांगा बरं एकूण दिशा
किती? लगेच आमच्यामधील हुशार विद्यार्थ्यांनी उ ई पु आ द नै प वा!! असे म्हणून
शाबासकी मिळवली! म्हणजे उत्तर वगैरे या मुख्य दिशा आणि ईशान्य वगैरे या उपदिशा..
(ही शोर्ट फॉर्म वापरायची सवय तेव्हापासून लागलेली) जसे थोडे मोठे झालो तसे या
यादीत अजून दोन दिशांची भर पडली, ऊर्ध्व आणि अधर! खालची आणि वरची! अर्थात या दोन
दिशांचा वापर दैनंदिन जीवनात कधी झालाच नाही ती गोष्ट सोडा!! कारण मी तरी हा वारा
ऊर्ध्व दिशेकडून अधर दिशेकडे जात आहे अस ऐकलं नाही!
आता वाऱ्यांचा विषय निघालाच आहे तर, या दिशा
लक्षात ठेवणं तसे अवघड जायचं! वाऱ्यांच्या बाबतीत हा!! म्हणजे हा गरम वारा ईशान्येकडून
येऊन नैरुत्येकडे गेला मग तिकडून पूर्वेकडे फिरून पुन्हा पश्चिमेकडे गेला!! कधीकधी
हा वारा या सगळ्या दिशांना फसवून, सगळ्यांसोबत मजा मारत असावा असे वाटायचे!
त्यामुळे वारा आणि दिशा हे समीकरण माझ्या बाबतीत कधी फारसे जुळले नाही!! आता त्या
वाऱ्याला तसे फिरायचे असेल त्याला आपण काय करणार ना!
वारे झाले की मग तारे यायचे! अमुक अमुक माणसाने
जंगलात असताना ध्रुव ताऱ्याकडे बघून उत्तर दिशा कशी शोधून काढली याचेच कौतुक!
सूर्य पूर्वेला उगवतो आणि पशिमेला मावळतो, सप्तर्षी तार्यांचा समूह सुद्धा
उत्तरेलाच दिसतो, हे नक्षत्र दक्षिणेला, हे वायव्येला , हे इकडे ते तिकडे!! परत
कधी कधी, काय रे, आज सूर्य पशिमेला उगवला काय? असे सुद्धा म्हणतात! पुन्हा
confusion! त्यामुळे तारे आणि दिशा यांच्याशी सुधा माझा काही फार पटलं नाही!
तारे झाल्यावर आता भूगोलातील जागा यायच्या! या
देशाच्या पूर्वेला हे, त्या देशाच्या इकडे ते? असे असंख्य प्रश्न! जणू काही उत्तर
चुकलं तर तिसरं महायुद्धच होणार आहे! परत एक कुट प्रश्न विचारला जायचा की
भारताच्या पशिमेला पाकिस्तान असेल (खरे तर वायव्येला आहे पण सोयीसाठी पश्चिम
धरूया) तर पाकिस्तानच्या पूर्वेला काय? आमच्या मास्तरांना देखील असे प्रश्न
विचारून काय मिळत असे देव जाणे! आणि मग मुलांनी भारत असे उत्तर दिले की मास्तर
खुश!
इतकं भूगोलात छळून झाले तरी या दिशा काही आपली
पाठ सोडत नसत!! आता त्या त्यांचा मोर्चा विज्ञान या विषयाकडे वळवत! आधीच विज्ञान
हा विषय म्हणजे मानगुटीवर बसलेलं भूत वाटायचं! त्यात या दिशा अजून वजन वाढवीत असत!
अमुक अमुक चुंबकाची सुई दक्षिणोत्तर स्थिर राहते! म्हणजे आपण कितीही वळवायचा
प्रयत्न केला तरी ती ‘ मोडेन पण वाकणार नाही’ या बाण्याने पुन्हा तिचे तोंड उत्तर
दक्षिण का दक्षिण उत्तर करत असे! मग हा प्रयोग आम्हाला ते सुई हवेत टांगून करायला
सांगायचे, ते झाला की ते जमिनीवर ठेवून करायला सांगायचे!
तसे बाकी विषयात या दिशांनी काही त्रास दिला
नाही. कधीतरी गणितात यांचा उल्लेख यायचा पण तिथे फार काही फरक पडायचा नाही. शाळा
सुटल्यावर तर अभ्यासक्रमात यांचा संबंध कधी आलाच नाही कारण कॉमर्स मध्ये दिशा
पेक्षा पैसा याला जास्त महत्व!! पण आता कधीकधी असं वाटते की जर तेव्हा या १०
रीपुंवर जास्त भर देण्याऐवजी आयुष्यातल्या दिशा कश्या ठरवायच्या किंवा आयुष्य
कोणत्या दिशेने हाकलायचे हे शिकवले असते तर कदाचित आमची गाडी दाही दिशांना भरधाव
सुटली असती!! हली corporate जगात director
हा शब्द खूप वेळा वापरतात, म्हणेज दिशा दाखवणारा!! पण आमच्या आयुष्यात या नवीन
दिशा दाखवायला आमचे पालक सोडून दुसरा कुणी director भेटलाच नाही, त्यामुळे आजही
नेमक्या कोणत्या दिशेला जायचय हा प्रश्न भेडसावतच राहतो.
असो!! एक मात्र कळले की तेव्हा भूगोलातल्या
दिशा आम्हालाच शोधायला लागायच्या आणि आता आयुष्यातल्या दिशा सुद्धा आपल्यालाच
शोधायला लागणार आहेत!!