सफर वसई आणि अर्नाळ्याची- भाग एक


माणिकगड ट्रेक नंतर काही दिवस आराम करायचे ठरवले, पण तेवढ्यात बाबांनी मुंबई दर्शन या घरघुती सहलीचे बुकिंग करून टाकले. त्यात Elephanta caves, थोडी फार मुंबई आणि मग विरारची जीवदायिनी देवी असा कार्यक्रम ठरला.. पण विरार नाव ऐकताच माझे डोळे चकाकले.. आणि माझ्यातला ट्रेकर जागा झाला.. २ नावे झरकन डोळ्यासमोर आली, ती म्हणजे किल्ले वसई आणि किल्ले अर्नाळा!!!! उत्तर कोकणातले दोन बुलंद किल्ले.! एक जमिनीवरचा तर एक फेसाळणाऱ्या दर्यात भक्कम पाय रोऊन उभा असणारा.. एक पोर्तुगीजांच्या सामर्थ्याची आणि चिमाजी अप्पांच्या अजोड शौर्याची गाथा सांगणारा तर दुसरा पुण्यातील शनिवारवाड्याची आठवण करून देणारा!!
ठरलं, या सहलीत सुद्धा २ किल्ले पदरात पाडायचे आणि मग हो, नाही करता करता जीवदायिनी cancel करायचे ठरवले...

मुंबई दर्शनची सुरुवात तर झकास झाली, Elephanta caves आणि इतर स्थळे पाहताना २ दिवस मजेत गेले. आणि शेवटी तो दिवस उजाडला.. तारीख होती २१ मे.. मुंबईची ती दमट हवा आणि मे महिन्यातले भाजून काढणारे उन, पण वसई आणि अर्नाळा पुढे बाकी कोणत्याच गोष्टीचे काही वाटत नव्हते.. आम्ही वडाळ्याला गेस्ट हाउस वर राहात होतो.. सकाळी लवकर आवरून वडाळा स्टेशन वरून अंधेरी गाठले. सकाळची वेळ असल्याने आणि त्यात प्रवास उलटा असल्याने लोकलला अजिबात गर्दी नव्हती. अंधेरीवरून विरार लोकल पकडून वसई रोडला उतरलो.. वसई किल्ल्याला जाण्यासाठी हाच सोपा मार्ग आहे. वसई रोडला उतरल्यावर लगेचच बाहेर असणाऱ्या bus stop वर गेलो.. वसई किल्ल्याला जाण्यासाठी महानगरपालिकेच्या बसेस आहेत, त्या आपल्याला किल्लाबंदर येथे घेऊन जातात.. किल्लाबंदर म्हणजेच वसई किल्ला. त्या बस मध्ये बसून वसई किल्ल्यापाशी उतरलो. वसई रोड ते वसई किल्ला हे अंतर साधारणपणे १० किमी आहे. बसने आम्हाला अगदी किल्ल्याच्या पोटात नेऊन सोडले..
किल्ल्याच्या अगदी सुरुवातीला चिमाजी अप्पांचा त्वेश्पूर्ण आवेश असलेला अश्वारूढ पुतळा आहे.. वसईचा किल्ला ताब्यात घेण्यासाठी चिमाजी आप्पांनी दाखवलेल्या पराक्रमाचे ते प्रतिक आहे..
तो पुतळा पाहत असतानाच, मन १७३९ मध्ये पोहोचले. २ मे, १७३९.. किल्ल्यावर हल्ला चढवून २५ महिने होऊन गेलेले, पोर्तुगीज शरण येण्यास तयार नव्हते.. आणि त्या प्रकाराला वैतागून, “किल्ला हाती येत नसेल तर निदान माझे मस्तक तरी तोफेने उडवून ते किल्ल्यात जाऊन पडेल असे करा!” असे निर्वाणीचे उद्गार चिमाजी अप्पांनी काढले मात्र, आणि मराठ्यांनी निकराचा हल्ला करून 'sabastian' बुरुजाच्या बाजूने सुरुंग लाऊन व प्रचंड हातघाईची लढाई करून ४ मे १७३९ रोजी या बलाढ्य स्थानाचा ताबा मराठी सत्तेकडे आणला आणि अर्नाळा,वर्सोवा,धारावी याही ठिकाणी विजय मिळूवून पोर्तुगीजांचे या भागातून साफ उच्चाटन केले.
किल्ल्यात उतरल्यावर समोरच ही भली मोठी वास्तू दिसते.. आता या किल्ल्यातील सर्व वास्तू भव्य आणि दिव्यच आहेत त्यामुळे सतत सांगत बसत नाही.. या किल्ल्याच्या उभारणीला तब्बल ६५ वर्ष लागली आणि किल्ल्याचा दगड म्हणे गुजरात प्रांतातून आणला होता..असो! ही जी इमारत आहे ती त्याकाळी एक चर्च होतं आणि त्याचं नाव होते ‘चर्च ऑफ नोसा सेन्हेरा डा व्हिडा”(बापरे ही अशी नावे हिंदू मंदिरांना ठेवायला लागले तर कसे होणार.. आपले जिलब्या मारुती व चिमण्या गणपती बरे!!) पण जेव्हा इथे इंग्रजांच राज्य आले तेव्हा त्यांनी एका व्यापारी कंपनीला ही साखर कारखाना म्हणून भाडेतत्वावर दिली.. 
इमारतीचा आतील भाग पाहिल्यावर तिची भव्यता लक्षात येते.            शेजारीच एक वाट जाताना दिसली आणि म्हणून त्या बाजूला वळलो.


रस्त्या पासून पुढे गेल्यावर एक इमारत दिसली. ही इमारत कोरीव कामाचा एक उत्कृष्ठ नमुना होती.. वरती कोरीव खांब, खाली कमळ फुले आणि ३ वैशिष्ट्यपूर्ण चिन्हे..


३ चिन्हे जवळून पहिली असता त्यांचा अर्थ सहज लक्षात येतो.. सर्वात उजवीकडे पृथ्वीचे बोधचिन्ह आहे, सर्वात डावीकडे ख्रिश्चन धर्मियांचा क्रूस आहे आणि मध्ये पोर्तुगीज राजाचा मुकुट आहे..याचा अर्थ असा की, या पृथ्वीतलावर क्रूस आणि पोर्तुगीज साम्राज्य प्रस्थापित होवो.. आणि याच किल्ल्यात बसून वसई ते चौल या उत्तर कोकणच्या पट्यात सुमारे २०० वर्षे पोर्तुगीजांनी निर्विवाद सत्ता गाजवली..


वसई किल्ला म्हणजे दुर्गाशात्रातला एक उत्तम नमुनाच आहे. वसई किल्ल्याची भव्यता आणि दिव्यता, सारच डोळे दिपवून टाकणारे. बहुमजली इमारती आणि त्याला असणारे मोठे झरोके. बरसचे बांधकाम आता ढासळले असले तरी पूर्वीचा रुबाब तसाच कायम आहे.
वसई मध्ये अनेक चर्च आहेत त्यापैकी एका चर्च वर हा लेख कोरलेला दिसला! अर्थ काही समजला नाही, पण कदाचित बांधकाम वगैरे केल्याची तारीख किंवा उद्घाटनाची तारीख वगैरे असावी.

वसई किल्ल्यामध्ये एक अजून एक बघण्यासारखी वास्तू आहे म्हणजे चक्री जिना, या खालच्या चर्च मधल्या डाव्या बाजूला ज्या दोन खिडक्या दिसत आहेत त्या याच जिन्याचा भाग आहेत. तुम्ही गोल गोल करत अगदी वर पर्यंत पोहोचता आणि एक अप्रतिम दृश्य पाहायला मिळते.
वसई किल्ल्यामध्ये जाऊन एक गोष्ट आवर्जून करा, ती म्हणजे हे फळ खा! शिंदी का असंच काहीतरी नाव आहे, गर जरी कमी असला तरी चव मात्र अप्रतिम. वसई किल्ला जरी जमिनीवर असला तरी त्याचं एक तोंड खाडी भागाकडे आहे त्यामुळे आपसूकच त्याबाजूला दोन भक्कम दरवाज्यांची उभारणी केलेली दिसते!  


वसई किल्ल्यामधे अगदी सुरुवातीलाच शिरल्यावर नागेश्वराचे मंदीर दिसते. सुबक बांधणी आणि एक शांत स्थळ म्हणून याचे वर्णन करता येईल.. जवळच एक छोटा तलाव सुद्धा आहे..
     एकंदरच वसई किल्ला म्हणजे इतिहासकार,भटके, पक्षी निरीक्षक आणि घरघुती ट्रीप साठी अत्यंत उत्तम किल्ला आहे! त्यामुळे एक दिवस सवड काढून दिवस सत्कारणी लावण्यात काहीच हरकत नाही!! आता निघायची वेळ झाली होती, दिवसातले पहिले लक्ष्य पूर्ण झालं होतं अन आता पुढे होता समुद्रातला अर्नाळा!!! त्याबद्दल पुढच्या भागात!!! 

वसई किल्ल्याच्या अवशेषांचे काही फोटो!!

नागेश्वर मंदिरासमोर एक बांधकाम आहे, ते म्हणे कदाचित त्यावेळच न्यायालय असावे!


You Might Also Like

0 comments

$(document).ready(function(){ $('#mscontent').css('opacity','0'); });