सह्याद्री - माझा गुरु

  • September 05, 2016
  • By Shantanu Paranjape
  • 0 Comments

तेलबैला 
     ५ सप्टेंबर!! संपूर्ण महाराष्ट्रात गणेश चतुर्थी मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते आहे. त्याचबरोबर शिक्षक दिनाचे सुद्धा काही मेसेज फिरत आहेत. म्हणून मग आजचा लेख गणपती वर ना लिहिता एखाद्या गुरु वर लिहावा असा विचार मनात आला!! शालेय जीवनापासून ते कॉलेज लाईफ पर्यंत अनेक गुरु मिळाले. काही मित्रांच्या स्वरूपात तर काही शिक्षकांच्या रूपाने. पण  सर्वांपेक्षा निराळा आणि कदाचित माझ्या आयुष्यात सर्वात वरचे स्थान असलेला गुरु म्हणजे 'सह्याद्री'. सखा सह्याद्री!! स्तुती करायला शब्द कमी पडतील असा माझा व माझ्या सारख्या इतरांचा  सह्याद्री!!

     सह्याद्री ने मला खूप काही दिले. सह्याद्रीने मला प्रेम करायला शिकवले. सह्याद्रीने मला द्यायला शिकवले. सह्याद्रीने मला भव्यपणा शिकवला पण त्याचबरोबर सह्याद्रीने मला सतत जमिनीवर राहायला शिकवले. आज मी जो कोण आहे किंवा जे काही थोडंफार आयुष्यात कमावलंय यात या सह्याद्रीचा भरपूर वाटा  आहे. कदाचित इतरांच्या दृष्टीने तो बेसाल्ट मध्ये बनलेला आणि ज्वालामुखीच्या उद्रेकाने तयार झालेला केवळ पर्वत असेल पण माझ्यासारख्या भटक्याच्या नजरेतून बघाल तर सह्याद्री हा बेलाग आहे, सुंदर आहे व त्याचबरोबर कसलीही अपेक्षा ना ठेवता केवळ देणारा गुरु आहे, मित्र आहे.

महाड येथील सोनगड वरून दिसणारा राजगड 

      मला अजूनही आठवतंय आम्ही लोहगड-विसापूर ला गेलो होतो. बऱ्याच भटक्यांप्रमाणे हा सुद्धा माझा तसं  बघायला गेलं तर पहिलाच ट्रेक स्वतंत्रपाणे केलेला. वाट चुकणं हे काय असते याचा अनुभव मी याठिकाणी घेतला. तसाच अनुभव महाड जवळील सोनगड आणि साताऱ्यानजीकचे चंदन-वंदन याठिकाणी सुद्धा मिळाला. पण वाट चुकल्यावर पुन्हा नव्या जिद्दीने नवीन वाट शोधून पुन्हा योग्य मार्गावर यायला पण सह्याद्रीनेच शिकवले. आणि गंमत म्हणजे सह्याद्रीत वाट चुकण्यात पण एक वेगळीच मजा आहे. चुकलेल्या वाटेवर सुद्धा सह्याद्री हा केवळ देतंच असतो. कधी नवीन भूप्रदेश दाखवतो तर कधी आपल्या पोतडीतील निसर्गाचा खजिना असा मुक्तपणे उधळतो.

      पुण्यामध्ये असताना पक्षीनिरीक्षणाची आवड किंवा व्यसन कधी लागले ते कळलचं नाही. त्यातून अनेक नवीन मित्र मिळाले. आणि या आवडीमधूनच नंतर Planet Untamed/ Alive ची निर्मिती झाली ती गोष्ट वेगळीच. पण सह्याद्रीने या आवडीनिवडीला फार हातभार लावला!! कुरवंडे घाटातील उंच उडणारा गरुड असो, सह्यपठारांवरची फुले असो किंवा मध्येच पाचोळ्याची सळसळ करून गेलेला वायपर असो!! अनेक नवीन गोष्टी सह्याद्रीने दाखवल्या आणि गंमत म्हणजे दर वेळी वेगळ्या गोष्टी दाखवल्या. श्रावणातील फुलांची जगण्याची कसरत या सह्याद्रीने दाखवली तर रायगडाला प्रदक्षिणा घालताना काटकश्या  कारवीतील भक्कमपणा पण याचा सह्याद्रीने दाखवला. यातून एक गोष्ट शिकायला मिळाली की कोणत्याही क्षणाला घट्ट पाय रोवून उभं  राहिलं  की तुम्ही आपोआप परिपक्व आणि खंबीर होत जाता.

रोहिडा येथील Single leaved habenaria

Bamboo Pit Viper

     सह्याद्रीमुळे मी भरपूर फिरलो, वेगवेगळ्या ठिकाणच्या प्रदेशातील वेगवेगळ्या स्वभावाची माणसे त्यानिमित्ताने भेटली. काही वाईट अनुभव सुद्धा आले, आणि मी ते नाकारणार नाही पण चांगल्या अनुभवांच्या तुलनेत वाईट अनुभवांची संख्या अगदीच नगण्य! सह्याद्रीने माणसे जोडायला शिकवली. वेगवेगळ्या माणसांशी वेगवेगळ्या क्षणी कसे वागायचे हे सुद्धा याच सह्यादीने शिकवले. माणुसकी धर्म काय असतो हे मी इथेच शिकलो.

    सह्याद्रीने माणसांसोबतच निसर्गाची सुद्धा अनेक रूपे दाखवली. "धबाबा लोटती धारा, धबाबा तोय आदळे' या समर्थांच्या उक्तीला सार्थ ठरवणारे प्रचंड धबधबे, धडकी भरवणारे सह्यकडे, कुठेतरी तटबंदीचे शेलापागोटे चढवून दिमाखात शिवशाहीच्या भव्य साम्राज्याचा दाखले देणारे दुर्ग आणि त्या काळ्या कभिन्न कातळावर शोभून दिसणारे ते कोरीव लेण्यांचे दागिने!! अहाहा!! अहो एखाद्या सुंदरीला सुद्धा लाजवेल असा माझा सह्याद्री!! सह्याद्रीने सौंदर्य दिले, सह्याद्रीने बेलागपणा दिला, आयुष्यभर साथ देणारी माणसे सह्याद्रीने मला दिली. बस और क्या चाहिये जिंदगी मे!

 भुलेश्वर येथील नंदीच्या पाठीवरील दागिने  

नारायणेश्वर मंदिरातील सुंदर कलाकृती 
    बरं या सह्याद्री रूपी शाळेत कसलीही बंधने नाहीत, कसलाही ताण नाही काही नाही. इथे यायचे आणि फक्त घेत जायचे. इथल्या शाळेला फी नाही, हजेरीचे बंधन नाही पण एकदा एक इथे प्रवेश घेतला की तो माणूस आयुष्यभर याच शाळेत येत जातो! असा हा सह्याद्री!!!
      अजून लिहायला खूप आहे, सांगायला खूप आहे पण वेळ कमी आहे त्यामुळे इथेच थांबतो!!


                                                        !!गणपती बाप्पा मोरया!!


राजगड वरून दिसणारा सिंहगड़ 

You Might Also Like

0 comments

$(document).ready(function(){ $('#mscontent').css('opacity','0'); });