जर्षेश्वर- एक निवांत भटकंती (Jarsheshwar)

  • October 29, 2016
  • By Shantanu Paranjape
  • 0 Comments

जर्षेश्वराचे मंदिर 
      मध्यंतरी जुलै महिन्यात नीलकंठेश्वरला गेलो होतो आणि तेव्हा जर्षेश्वर करायचा बेत होता पण कदाचित शंभूदेवाला ते मान्य नसावे म्हणून त्यावेळेला जाता आले नाही म्हणून सप्टेंबर महिन्यात बेत आखला. ओसरलेला पाउस, फुललेली रानफुले आणि निळ्या आकाशात उठून दिसणारे पांढरेशुभ्र ढग. फोटो काढण्यासाठी अगदी उत्तम वातावरण होते अर्थात जर्षेश्वर एवढे भन्नाट निघेल याची कल्पना मला अजिबात नव्हती त्यामुळे एक २-३ तास निवांत जातील असा अंदाज होता. पण काही ठिकाणे आणि जातानाचा प्रवास हे तुम्हाला भुरळ घालतात आणि जर्षेश्वर हे त्यातलेच एक ठिकाण.     पुण्यापासून साधारण ३० किमी च्या अंतरावर, खडकवासला धरणाच्या अगदी मागे डोंगरावर वसलेले असे हे पुरातन शिवमंदीर. मला मुळातच शिवमंदिरे फार आवडतात याला अनेक कारणे आहेत.
१. आम्ही भटके रानावनात जाणारे आणि आमचा देव शंकर हाही तसा भटक्याच, त्यामुळे तो फार जवळचा वाटतो. २. भारतातील बहुतांश शिवमंदिरे ही पुरातन आहेत आणि त्यातील बहुतेक ही हेमाडपंथीय बांधकामशैलीतील असल्याने या मंदिरांवर कलाकुसर मोठ्या प्रमाणात केलेली असते.
३. शंकराच्या मंदिराच्या गाभाऱ्यात गेल्यावर मिळणारी शांतता!! अवर्णनीय, अविश्वसनीय आणि अनाकलनीय!!
असो!! थोडेसे विषयांतर केले.. तर, जर्षेश्वर हे ठिकाण डोंगरावर वसले आहे आणि वरून सिंहगड, राजगड, तोरणा व पुरंदर असे किल्ले सहज नजरेस पडतात आणि जर्षेश्वरच्या डोंगरावरील सर्वोच्च स्थानावरून संपूर्ण पुण्याचा एक उत्तम नजारा मिळतो. थोडक्यात काय तर ४-५ तासांची छोटेखानी भटकंती करायची असेल तर यासारखे ठिकाण शोधून सापडणार नाही.


वर चढून आल्यावर दिसणारे दृश्य 
    त्यात जर्षेश्वरला जाणे हे अगदीच सोपे आहे आणि रस्ता म्हणाल तर आहाहाहा!! स्वर्गच!! पोटातल्या पाण्याचा थेंब सुद्धा हलणार नाही इतका गुळगुळीत आणि एकदा काचेबाहेर बघायला सुरुवात केली की पुन्हा डोकं आत घालणार नाही इतका सुंदर!! जर्षेश्वरला दोन बाजूनी जाता येते ते म्हणजे वारजे- NDA रोड- कुडजे- मांडवी- जर्षेश्वर हा सरळ रस्ता किंवा सिंहगड रस्त्याने गेल्यास खडकवासला धरणाच्या आधी उजवीकडे वळून, धरणाच्या भिंतीखाली असणाऱ्या पुलाखालून पुढे डावीकडे वळून मग कुडजे-मांडवी-जर्षेश्वर. जाणारा रस्ता हा खडकवासला धरणाच्या अगदी शेजारून जातो त्यामुळे खाली धरण आणि समोर सिंहगड, सारखे दिसत असतात.

   मांडवी बुद्रुकच्या थोडं पुढे गेल्यावर उजवीकडे जर्षेश्वरला जाण्यासाठी घाट रस्ता सुरु होतो. जर्षेश्वर ही सध्या खाजगी मालमत्ता असल्याने खाली नोंद करावी लागते आणि नोंद केल्यावर सुरु होतो तो स्वर्गीय घाट रस्ता!! इतका गुळगुळीत घाट मी कधी पहिलाच नाही. दुपदरी कॉंक्रीटचा रस्ता, व्यवस्थित असलेली झाडी, कडेला असणारे मोठ मोठे बंगले (ज्यातल्या बर्याचश्या बंगल्यामध्ये टेनिस कोर्ट वगैरे आहे) आणि खाली दिसणारा नजारा!! मी जितक्या जितक्या लोकांना फोटो दाखवले त्यातले जवळपास सगळे म्हणाले की हा रस्ता आणि परिसर भारतामधला नाही!! कुठेतरी स्वित्झर्लंड मध्ये गेल्यासारखं वाटते आहे म्हणून!!वाटेतल्या एका बंगल्याचे दार
घाटाच्या सुरुवातीला असणारे साईन  बोर्डस    साधारण ३-४ किमीचा घाट संपवून आपण गाडी लावून मंदिराकडे जायला निघतो!  सध्या मंदीराचे नुतनीकरणाचे काम चालू आहे त्यामुळे मंदीर फारच मोठे दिसते पण जुने मंदीर हे प्रत्यक्ष्यात फारच छोटे आहे. मंदिराच्या बाहेर आवारात काही शिवलिंगे, विरगळ, नंदी, ओबडधोबड अश्या मूर्तींचे अवशेष आणि एक पाण्याचे टाके खोदलेले आपल्याला आढळून येते.

मंदिराच्या बाहेर असणारे शिवलिंग 


काही ओबढ धोबड मूर्ती 


    त्यामुळे हा परिसर पुरातन असणार याची खात्री पटते. मंदिराच्या आत गेल्यावर, हे मंदीर यादवकालीन म्हणजे साधारण ८ व्या शतकातील असावे हे मंदिराच्या खांबांवरून आणि त्यांच्यावरील असणाऱ्या नक्षीवरून लगेच कळून येते. गाभाऱ्याच्या बाहेर, गणपती, भैरोबा, हनुमान, देवी यांच्या मूर्ती ठेवलेल्या दिसतात! मंदिराचा गाभारा हा सुंदर आहे! गाभाऱ्याच्या दरवाज्यावर कमळपुष्प कोरलेले आपल्याला दिसून येते! शंकराची पिंड ही स्वयंभू आहे पण नुकताच वज्रलेप केल्यामुळे अगदी आत्ता आता बसवल्यासारखी वाटते. पिंडीच्या मागच्या बाजूला ३ मूर्ती ठेवल्या आहेत. डावीकडील उजव्या सोंडेच्या गणेशाची, मधली सरस्वतीची आणि डावीकडील अजून एका देवीची.


मंदिराचा खांब 

मंदिराच्या कळसाचा आतील भाग 

सरस्वती 

उजव्या सोंडेचा गणपती 

महाकाली 

छतावर असणारे कमलपुष्प 

मंदिरातील नंदी 

गणेश 

भैरोबा 

  जर्षेश्वर मंदिराला थोडाफार इतिहास सुद्धा आहे, तो म्हणजे शिवाजी महाराजांनी जेव्हा शाहिस्तेखानाची बोटे कापून सिंहगडाकडे पोबारा केला तेव्हा आधी समोर असलेल्या जर्षेश्वराचे दर्शन घेतले होते. अर्थात हा इतिहास ऐकीव आहे आणि कदाचित तसे घडले सुद्धा नसेल पण कुणाकडे काही वेगळी माहिती असेल तर नक्की मला सांगा, त्याप्रमाणे मी ब्लॉग अपडेट करेन. असो!! तर जर्षेश्वरला महाशिवरात्रीला मोठी जत्रा भरते तेव्हा शेजारील गावातील बरेसचे भाविक येथे दर्शनाला येतात. हा परिसर सध्या पुण्यातील कोण्या एका नामवंत राजकारण्याने आणि बांधकाम व्यावसायिकाने विकत घेतला असल्याने कदाचित दुसरे छोटे लवासा येथे होईल की काय एवढी भिती मात्र वाटते. हा डोंगर म्हणजे एक विस्तीर्ण पठार आहे. १५-२० घरांची वस्ती सुद्धा इथे आहे. मंदिराव्यतिरिक्त ३ अजून गोष्टी येथे बघण्यासारख्या आहेत, त्याम्हणजे दगडी बांधलेला एक जुना पाण्याचा चौकोनी तलाव, लव-कुश यांनी बांधलेले शिवमंदीर (होय रामायणातील लव-कुश) आणि तिसरे म्हणजे त्या नामांकित राजकारण्याचे helipad?!!!!! (एवढ्या गुळगुळीत रस्त्यावरून गाडीने वर यायचे सुद्धा कष्ट नको आहेत त्या माणसाला!!


तलाव 


सगळ्यात उंच भागातून दिसणारे पुणे शहर    तलावाकडे जाणारा रस्ता हा मंदिरच्या मागच्या बाजूने जातो. तलाव हा बर्यापैकी मोठा असून संपूर्ण दगडाने बांधून काढला आहे. या तलावाशेजरूनच पुढे गेल्यावर समोरच्या टेकडीवर ते शंकराचे मंदीर आहे. मंदीर हे छोटेसेच आहे पण त्याजागेवरून अतिशय सुंदर असे दृश्य बघायला मिळते. आम्ही गेलो तेव्हा हवा अतिशय स्पष्ट असल्याने, समोरचा सिंहगड मग उजवीकडे राजगड आणि डावीकडे तोरणा व दूरवर आपले अस्तित्व दाखवणारा पुरंदर हे सहजपणे बघायला मिळाले. कात्रज-सिंहगडचा मार्ग सुद्धा सहज ध्यानात येत होता. याच ठिकाणावरून अवाढव्य पसरलेले पुणे आणि खाली या शहराला पाणी देणारे खडकवासला हे दृश्य अगदी मन मोहून टाकते. एवढे बघून होईस्तर उन डोक्यावर आलेले असते आणि निघायची वेळ सुद्धा त्यामुळे पुन्हा नक्की येणार असे मनाशी ठरवतच आपण परतीच्या मार्गाला लागलेलो असतो ते एक नवीन ठिकाण गवसल्याचे समाधान मनाशी बाळगतच!


भेट देण्यासाठी चांगला काळ- पावसाळा आणि सप्टेंबर ते डिसेंबर (फुले, फुलपाखरे, पक्षी यांच्यासाठी)
खायची सोय- वर काहीच नाही, त्यामुळे घेऊन गेलेले जास्त चांगले

सोबत काय करू शकता- १.सिंहगड आणि जर्षेश्वर हे सोबत होऊ शकते किंवा २.निलकंठेश्वर आणि जर्षेश्वर हे सोबत होऊ शकते पण हे दोन्ही ठिकाणे एकमेकांच्या विरुद्ध बाजूला असल्याने उगाच प्रवासाचे अंतर वाढेल. त्यामुळे गुपुचूप जर्षेश्वर करून घरी येणे उत्तम..


    या भटकंती दरम्यान अनेक प्रकारची जैवविविधता बघायला मिळाली, अनेक प्रकारची फुले, फुलपाखरे, पक्षी दिसले. त्यापैकी ज्यांचे फोटो काढले ते इथे आहे. 

crested lark

Hairy Smithia


shoo-fly Plant

You Might Also Like

0 comments

$(document).ready(function(){ $('#mscontent').css('opacity','0'); });