अक्षी येथील गद्धेगळ (भाग-१) [Ass- Curse stone Akshee part-1]
- November 01, 2016
- By Shantanu Paranjape
- 0 Comments
गद्धेगळ
वर वाचल्यानंतर बरेच दिवस आक्षीला जायचे मनात होते पण बेत काही जमत नव्हता, पण
दिवाळीच्या निमित्ताने तिकडे जाता आले आणि बर्यापैकी सुस्थितीत असलेली गद्धेगळ
पाहायला मिळाले. तर आजचा लेख हा त्याच गद्धेगळ वर!
सुरुवात करण्यापूर्वी अक्षी गावाची थोडी माहिती
सांगतो! अक्षी हे गाव अलिबाग-रेवदंडा रस्त्यावर, अलिबाग पासून साधारण ६ किमी
अंतरावर असलेले हे गाव ओळखले जाते ते त्याच्या सुंदर समुद्र किनार्यामुळे. शनिवार-रविवार
ओसंडून गर्दी असलेला हा परिसर इतर दिवशी मात्र शांत असतो. नारळ-पोफळीच्या वाड्या,
प्रेमळ माणसे आणि भरभरून इतिहास असणारा हा प्रदेश कोणत्याही भटक्याला भुरळ पडतो.
अक्षी गावात दोन जुनी मंदिरे आहेत. एक म्हणजे कालकाबोरवा देवी आणि दुसरे
म्हणजे सोमेश्वराचे मंदीर. याच सोमेश्वराच्या मंदिराच्या आवारात पहिला गद्धेगळ आहे.
अक्षी गावात गाडी शिरली की अगदी रस्त्यामधेच एक दगडी स्तंभ लागतो. दगडी स्तंभावरून
गाडी गावात शिरली की सोमेश्वराचे मंदीर लागते आणि तिथेच रस्त्याच्या डावीकडे हा
गद्धेगळ उभा करून ठेवला आहे. 'Gazetteer of Bombay Presidency-
Kolaba and Janjira, 1883', मध्ये याचा उल्लेख आपणास आढळतो तो असा, “About ten feet to the left of the
Someshvar temple is an
inscribed stone, 5' 5." long by l' 3" broad. Above are the sun and
moon followed by fifteen lines of writing in the Devanagari character
and below the writing is the ass-curse”. याच बरोबर, 'Revised list of
Antiquarian Remains in the Bomaby Presidency ' या पुस्तकात याचा उल्लेख झालेला दिसून येतो (page. 206).
साधारण ३ फूट असणाऱ्या या शिळेचे ३ भाग
पडतात. वरील भागात चंद्र आणि सूर्य यांच्या आकृती कोरलेल्या आहेत. मधल्या भागात साधारण
१५ ओळींचा लेख असून यातील केवळ ८-१० ओळींचेच वाचन झालेले आहे व खालच्या भागात गद्धेगळीची
आकृती कोरलेली आहे. या शिळेवरील आकृत्यांचे खोदकाम जरी चांगले झालेले असले तरी त्यावरचा
लेख मात्र सद्यस्थितीला वाचता येत नाही. उन,पाउस,वारा आणि कोणतेही संरक्षण न
मिळाल्यामुळे, लेख जवळपास नाहीसा झाला आहे.
लेखात आपल्या
नशिबाने सन कोरलेले असल्यामुळे हा गद्धेगळ कोणत्या काळात खोदला गेला याची माहिती
आपल्याला मिळून जाते. हा लेख शके १२१३ म्हणजेच इ.स. १२९१ मध्ये रामचंद्र यादवच्या
राजवटीत खोदला गेला. त्या काळात उत्तर कोकणावर या यादवची सत्ता होती हे यावरून
कळून येते.
मी यापूर्वीच गद्धेगळ म्हणजे काय हे सांगितले
आहे, त्यामुळे पुन्हा ते सांगत नाही. ज्यांनी ते वाचले नसेल त्यांच्यासाठी इथे
लिंक देत आहे (गद्धेगळ). शिळेच्या वरच्या भागात सूर्य आणि चंद्र यांच्या आकृती
कोरलेल्या आहेत. याचा अर्थ, जर कुणी दानाचा गैरवापर केला तर मिळणारा शाप हा
जोपर्यंत सूर्य-चंद्र आहेत तोपर्यंत टिकेल. सद्यस्थितीला सुद्धा या आकृती
स्पष्टपणे दिसून येतात. डाव्या भागात सूर्याची गोलाकार आकृती आणि उजवीकडे चंद्रकोर
असे याचे स्वरूप आहे.

लेखाचे वाचन-
१.
स्त्री सकु १२१३ खर संवछारे चैत्र सुध
२.
८ सुक्रे अद्येह स्त्रीमत्पौधीप्रतापचक –
३.
वर्त्ती स्त्रीरामचंद्रदेव विजयोदयी तत्पा
४.
दपद्मोपजीवी स्त्रीजाइदेव --- तेहाचे
स्त्री—इ
५.
स्वरदेव क्षत्रीय -------------------------
६.
त्रींबकानी स्त्री अक्षी का (लि) कादेवी
७.
ब्राह्मणासी प्रदेसु ----------- पुत्रे दत्त
मा
८.
गे तेआ ग? ------------------------
९.
-----------------------------------------
१०.
पूर्वे पस्मे ---------------------
११.
-------------------------------------------
१२.
------------------------------------------
१३.
---------------------------------- हे जो
१४.
लोपी तेहाचीये माएसी गाढौ घोडू झविजे
१५.
------------------------- शुभं भवतु
( संदर्भ- प्राचीन मराठी कोरीव लेख- श्री.
तुळपुळे)
वरील लेखात ज्या
ठिकाणी मोकळ्या जागा सोडलेल्या आहेत, त्याठीकाणच्या लेखाचे वाचन करणे जमले नाही.
अर्थ-
लेखाच्या ज्या भागाचा ठसा घेऊन तो लेख वाचता
आला त्याचा अर्थ हा तुळपुळे यांच्या पुस्तकातून जसाच्या तसा इथे देत आहे, “श्रीशक
१२१३, खर संवत्सर, चैत्र शुद्ध शुक्रवार, या दिवशी स्त्रीमत्पौधीप्रतापचकवर्ती श्रीरामचंद्रदेव
(यादव) याची राजवट असताना त्याचा पादपद्मोपजीवी श्रीजाइदेव याचा पुत्र श्रीईश्वरदेव
क्षत्रिय याने अक्षी (गावातील) श्रीकालिकादेवी (हिच्या) ब्राह्मणास १ गद्याण..
दिला. [यापुढील लेख वाचता न आल्यामुळे अर्थ लागत नाही परंतु पूर्वे व पस्मे या शब्दांवरून
कदाचित जमिनीच्या दानाचा उल्लेख असावा असे वाटते] शेवटी गद्धेगळ असून त्याचा अर्थ,
“हे (दान) कुणी नष्ट करील त्याच्या आईस गाढव व घोडा ही लागतील. शुभं भवतु.
आता या लेखातून अनेक प्रकारची माहिती कळून
येते ती म्हणजे, या लेखाचा काळ, शके १२१३ (इ.स. १२९१) असा उल्लेख लेखातच आल्यामुळे
लेखाच्या कालानिश्चीतीबद्दल वाद उद्भवत नाहीत. पुढे आलेल्या नावांवरून असे कळून
येते की, या काळात उत्तर कोकणावर रामचंद्र यादव याची सत्ता होती कारण तो स्वताचा
उल्लेख हा प्रौढप्रतापचक्रवर्ती असा करतो. जाइदेव हा निरोपी अधिकारी असल्याचे कळून
येते, तर हे दानपत्र ईश्वरदेव या जाइदेवाच्या मुलाचे असल्याचे कळून येते. या
ईश्वरदेवाने अक्षी या गावातील कालिकादेवीच्या उपासक ब्राह्मणास दान म्हणून १ गद्याण
दिले अशा आशयाचा हा लेख आहे. सध्या अक्षी मध्ये कालकाबोरवा हे देवीचे प्रसिद्ध
मंदीर आहे, कदाचित कालिकादेवी आणि सध्याचे कालकाबोरवा हे स्थान एकच असू शकते.
याच्या तिसऱ्या भागात एक स्त्री आणि गाढव/घोडा
यांचा प्रणय होतानाची आकृती रेखाटण्यात आलेली आहे. अर्थात ही आकृती रेखाटण्यामागे
इतकेच प्रयोजन असावे की ज्या लोकांना तो लेख वाचता नसेल येत त्यांना हा दगड
कशासाठी कोरला आहे हे कळेल आणि याची अवहेलना केली तर काय शासन होईल ते कळेल. गम्मत
म्हणजे अशा प्रकारचे दगड महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आहेत, पण त्यांची आज देव म्हणून
शेंदूर फासून पूजा केली जाते.
खरे
तर अक्षी मध्ये दोन लेख आहेत. दुसरा लेख हा पंचायतीच्या समोर असून तो सुद्धा गद्धेगळीचाच
आहे. प्रस्तुत लेख इ.स. १०१२ मधील पाहीला
कोकण शिलाहार केशिदेव याचा आहे. मराठीमधील प्रथम क्रमांकाचा लेख म्हणून त्याचा
नंबर लागतो म्हणून त्या लेखाचे महत्व या लेखापेक्षा जास्त आहे. त्या लेखाबद्दल
नंतर कधीतरी लिहेन. रामचंद्रदेव याच्या लेखाचे महत्व इतक्यासाठीच की, या लेखात
उल्लेख आलेले अक्षी हे गाव आणि सध्याचे अक्षी हे गाव यांच्या नावात काडीमात्र
सुद्धा फरक पडलेला नाही, ७३५ वर्षानंतर सुद्धा.
आज या लेखाला साधारण ७३५ वर्षे होऊन गेली.
पण पूर्वीचा इतिहास या लेखाच्या रूपाने का होईना आज सुद्धा शाबूत आहे. पण आपले
दुर्दैव हेच, की आपण हा वारसा गांभीर्याने कधीच घेत नाही. अक्षीला आलेले बरेसचे
पर्यटक हे समुद्रावर फिरायला म्हणून आलेले असतात. त्यानी दोन मिनिटे वेळ काढून हे
दोन गद्धेगळ नुसते पहिले तरी पुष्कळ होईल. आपल्या पूर्वजांनी लिहून ठेवले म्हणून
आपल्याला आज इतिहास कळला, हा आता आपल्यापैकी बरेच लोकं त्यांची पण नावे लिहून
ठेवतात की, कदाचित पुढच्या १००० वर्षांनी ती नावे वाचली जातील आणि त्यांची प्रेमकहाणी
तेव्हा कुणीतरी अभ्यासेल हा त्यांचा हेतू असेल. असो!! आपल्याला काही घेणं देणं
नाही. आता पुढच्या वेळेला अक्षीला जाल तेव्हा त्या दोन गद्धेगळ नक्की पहा म्हणजे
माझ्या लेखाचे सार्थक होईल.
References-
1.
Pracheen
Koreev lekh By S.G. Tulpule
2 2.
Gazetteer
of Bombay Presidency, kolaba and Janjira 3.
List
of Antiquarian Remains in the Bombay Presidency
0 comments