अक्षी येथील गद्धेगळ (भाग-2) [Ass- Curse stone Akshee part-2]
- November 04, 2016
- By shantanu paranjpe
- 1 Comments
मागील भागात सोमेश्वराच्या इथे असणाऱ्या गद्धेगळ बाबत माहिती घेतली, तेव्हा आता हा लेख अक्षी गावात असणाऱ्या दुसऱ्या गद्धेगळ बाबत...
'Gazetteer of Bombay
Presidency Kolaba' याचा उल्लेख
आपल्याला आढळून येतो तो असा,
” Akshï
has two temples, one of Kâlkâbôrvâ Dêvï and the
other of Sômésvara Mahâdëva About twenty-five paces from the Dëvî's temple, on
the road, to the left of the house of one Râma Nâik, is an inscribed stone, 4'3" long by
1 '
broad Above are the Sun and Moon followed by the ass-curse; then comes a roughly cut writing of nine lines m Dèvanâgari character,
and below the writing, a second representation of the
Sun and Moon”
सध्या
हाच लेख, सोमेश्वर मंदिरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पंचायतीच्या
इमारतीशेजारी जमिनीत रोवून ठेवला आहे. अर्थात अपेक्षेप्रमाणेच हाही गद्धेगळ तसा
उपेक्षेलाच होता कारण त्यावरील शिलालेख वाचण्यासाठी आम्हाला पार अगदी धूळ-बीळ साफ
करायला लागली आणि इतके कष्ट घेऊन सुद्धा तो शिलालेख सध्या वाचण्याजोगा नाही आहे.
तसं पाहायला गेलं तर आधीच्या गद्धेगळ पेक्षा या गद्धेगळवरील लेख हा अजून प्राचीन
असून, देवनागरी लिपी मधला केशीराज शिलाहाराचा सर्वात प्राचीन कोरीव लेख म्हणून या
लेखाचे महत्व अनन्य साधारण आहे.
गद्धेगळचे
नेहमीप्रमाणेच भाग पडले आहेत. वरच्या भागात चंद्र सूर्याची आकृती आहे, मधल्या
भागात यावेळी मात्र गद्धेगळची आकृती कोरण्यात आलेली असून खालील भागात लेख कोरण्यात
आला आहे. लेखाच्या खालील बाजूस सुद्धा चंद्र सूर्य आहेत असे पुस्तकांवरून समजते
परंतु सद्यस्थितीला तेथे काहीच आढळत नाही. लेख हा मराठी व संस्कृत अशा मिश्र भाषेत
कोरलेला आहे. ९ ओळींच्या या लेखाला सध्याच्या चालू वर्षात १००४ वर्षे पूर्ण झाली.
गेली १००० वर्ष हा लेख तसाच उन वारा पाउस या त्याच्या नेहमीच्या दोस्तांच्यासंगे
आयुष्य काढत होता.
लेखाचे वाचन-
या लेखाचे वाचन
सर्वप्रथम तुळपुळे यांनी केले व ते आपल्या प्राचीन मराठी कोरीव लेख या पुस्तकात
प्रसिद्ध केले. त्यानंतर डॉ. दीक्षित यांनी या लेखावर अधिक प्रकाश टाकण्याचा
प्रयत्न केला. प्रतुत लेख हा ९ ओळींचा असून सध्या त्यातील एकही अक्षर वाचता येत
नाही.
प्राचीन मराठी कोरीव लेख या पुस्तकातील या लेखाचे
वाचन जसेच्या तसे आपणासमोर देत आहे-
१.
सी सुष सतू पासीमस-
२.
मुद्रधीपती स्री कोंकणा चक्री-
३.
वर्ती श्रीकेसीदेवर(रा)य महाप्रधा-
४.
न भइर्जू सेणुइ तसीमीनी क(का)ले
५.
प्रव्रतम(मा)ने सकू सवतु ९३४ प्रधा
६.
वी संवत्सरे अधीकू दिवे सुके बौ-
७.
लु भइर्ज्जुव त[था] बोडदम त[भ] नउ-
८.
करली अधोर प्रधानु मह[हा]लषु-
९.
मिची वआण लुनया कचली ज
![]() |
थोड़ीफार अक्षरे दिसत असलेला शिलालेख |
लेखाचा अर्थ काढायला गेलो तर तो खूपच सोपा आहे,
’कोकणाचा
चक्रवर्ती केशिदेवराय याचा प्रधान भइर्जू हा सेनापती असताना म्हणजेच शके ९३४ मध्ये,
ज्येष्ठ मासातील द्वितीय पक्षातील शुक्रवारी बोडणासाठी ९ कवली (धान्याचा प्रकार)
मोजून दिले. (हे दान कुणी मोडेल त्यास) महालक्ष्मीची आण. लुनया कचली याने कोरली.
जगात सुख असो!'
उत्तर कोकणातील शिलाहार राजवटीमधील राजा
केशिदेवराय याचा प्रथम शिलालेख म्हणून यास महत्व आहे. इतर लेख समजायला खूपच सोपा
आहे. लेखात दुसरे नाव हे येते ते भइर्जू या प्रधानाचे आणि सेणुइ याचा अर्थ सेनापती
असा होतो. तिसरे नाव हे लेखाच्या शेवटी येते ते म्हणजे लुनया हे लेख खोदणार्याचे
नाव आहे आणि कचली म्हणजे खोदणे. अशा प्रकारची खोदणार्याची नावे बर्याच लेखात
सापडली आहेत.
बऱ्याच
लोकांच्या मते श्रवणबेळगोळ येथील लेख या मराठी भाषेतील प्रथम लेख आहे परंतु त्या
लेखात कालाचा उल्लेख नसल्याने नक्की पहिला लेख कोणता हा मुद्दा वादग्रस्त राहतो.
पण अक्षी येथील लेखात ९३४ शके हे स्पष्टपणे दिल्याने हा प्रथम लेख असावा असे
म्हणायला पुष्टी मिळते. अर्थात आपल्याला त्या वादात पडायचे नाही, निष्कर्ष इतकाच
की इतका प्राचीन लेख आज उपेक्षेलाच आहे. अर्थात प्रत्येकालाच या गोष्टीमध्ये रस
असतोच असे नाही परंतु अक्षीच्या समुद्रकिनार्यावर जाताना या दोन लेखांकडे नजर जरी
टाकली आणि थोडीशी माहीती घेतली तरी तो खोदणारा लुनया कृतकृत्य होईल.
1 comments
ऑगस्ट १७ मध्ये हरिश्चंद्राची पहिलीच वारी झाली. तेव्हा तेथील वीरगळ पाहताना गद्धेगाळचा प्रथम उल्लेख कानी आला. त्या अनुषंगाने तुझ्या या लेखांची लिंक मिळाली. दोन्ही लेख आणि गद्धेगाळवरचा पहिला लेख देखील छान.
ReplyDelete