बाळाजी विश्वनाथ भट

  • January 12, 2017
  • By Shantanu Paranjape
  • 0 Comments

                                    बाळाजी विश्वनाथ पेशवे (फोटो-गूगल)                               

     खरं तर मी इतिहासाचा फारसा अभ्यासक नाही पण फेसबुकवर एके ठिकाणी बाळाजी विश्वनाथ यांच्या कर्तृत्वावर बोट ठेवले गेले म्हणूनच काही गैरसमज दूर करण्यासाठी हा प्रपंच!!  
  
   बाळाजी हा माणूस कोकणातील एक सामान्य भिक्षुकी करणारा माणूस आणि जंजीऱ्याच्या सिद्दीने घर बुडवले म्हणून घाटावर गेला आणि अचानक केवळ नशीबाने पेशवेपदी चढला असा गोड गैरसमज लोकांमध्ये पसरला आहे. म्हणजे शाहू महाराजांना माणसांची पारख नव्हती असा अप्रत्यक्ष आरोप केला जातो?!! मुळातच माणसांची पारख कशी करावी हे छत्रपती शिवाजी राजांनी दाखवून दिले होते आणि तोच वारसा पुढे शाहू राजांनी चालवला!! बाळाजी यांचे पद हे सर्वस्वी त्यांची विद्वत्ता आणि त्यांच्या अंगी असणारे असामान्य गुण यांमुळे मिळाले आहे कारण स्वराज्यात केवळ हुशारी आणि राष्ट्राबद्दल असणारी निष्ठा या दोनच गोष्टी महत्वाच्या होत्या.
   केवळ आडनाव भट म्हणून हा माणूस भिक्षुकी करत होता असाही एक गैरसमज असतो! हसू का नको तेच कळत नाही. उलट मी म्हणेन भट या शब्दाचा अर्थ वीरपुरुष असा होतो आणि बाळाजीच्या घराण्याने हे सार्थ करून दाखवले. बाळाजीचे पूर्वज हे हरिहरेश्वर आणि श्रीवर्धन या दोन गावाचे देशमुख. राजवाडे यांच्या मते ही देशमुखी त्यांच्याकडे इसविसन १४७८ मध्ये आली असावी. म्हणजे शिवाजीराजांच्या पूर्वी!! हे भट घराणे कोकणात नामांकित होते यात शंका नाही.  शिवाजी महाराजांच्या काळात अनेक ब्राह्मण घराणी घाटावर आली आणि संभाजी महाराजांच्या काळात आपल्या पराक्रमाने, हुशारीने आणी राज्यनिष्ठेने मोठ्या पदावर पोहोचली. यामुळे इतर सरदारांच्या मनात मत्सर होणे साहजिकच आहे.
  बाळाजीचा भाऊ जानोजी याला सिद्दीने पोत्यात बांधून समुद्रात टाकले आणि त्या भीतीने बाळाजी घाटावर आला हा जो खोटा प्रचार सगळे जण करतात याला उत्तर म्हणून एका पत्राचा संदर्भ इथे द्यायला आवडेल. हे पत्र साक्षात जानोजीच्याच हाताचे आहे. ही नोंद त्रंबकचे तीर्थोपाध्य यांच्या दप्तरातील आहे. तसेच ब्रह्मेंद्रस्वामी यांच्यामुळे बाळाजी पेशवेपदी चढला हा सुद्धा गोड गैरसमज आहे कारण १६९९ साली तो सरसुभेदार असल्याची सुद्धा नोंद आहे. ही दोन्ही पत्रे बेहरे यांच्या ‘पहिले बाजीराव पेशवे यांच्या पुस्तकात छापली आहेत 

 आत ही पत्रे वाचून तुम्ही म्हणाल की हा बाळाजी आणि तो बाळाजी वेगळे असू शकतात की. बाळाजी विश्वनाथ सुभेदार यांनी पुणे प्रांती केलेला जगथापांचा निवडा १७२२ मध्ये बाजीरावांकडे आला असता त्यानी बाळाजींचा उल्लेख हा तीर्थरूप असा केलेला आहे त्यामुळे पात्रातले बाळाजी कोण हा वादच मिटून जातो. (संदर्भ- पहिले बाजीराव पेशवे- ना.क.बेहरे)
बरं, कोणताही माणूस हा लगेच सरसुभेदार होत नाही. तर त्यासाठी काही वर्षांची मेहनत असते आणि राजनिष्ठा असते आणि त्या राजनिष्ठेचं बक्षीस म्हणून पेशवे पद मिळालं तर त्यात चुकलं काय? बरं, देशमुख, सभासद, मुख्य लेखाधिकारी सेनाकर्ते अशी अनेक पदे बाळाजीना मिळालेली तत्कालीन पत्रांमध्ये दिसून येतात याचा अर्थ मिळालेले पेशवे पद हे नशीबाचा भाग नसून केवळ हुशारी आणि राजनिष्ठा यांच्यामुळेच मिळाले असे कळून येते. हा माणूस पायरी पायरीने वर चढला आणि १७१३ मध्ये त्याला पेशवेपदाची वस्त्रे मिळाली. शाहू महाराजांची सुटका १७०९ मध्ये झाली आणि ताराराणी आणि शाहू यांच्यातील वादात बाळाजी यांनी शाहू महाराजांची साथ शेवटपर्यंत सोडली नाही. त्यामुळेच की काय शाहूंचा विश्वास बाळाजी यांनी संपादित केला.

बाळाजीशी असलेल्या मत्सराचे उत्तम उदाहरण म्हणजे चंद्रसेन जाधवराव! अत्यंत पराक्रमी! पण त्याचा पराक्रम निष्फळ ठरतो तो द्रोहामुळे! शाहू महाराजांकडून सेनापती पदाची वस्त्रे घेऊन हा शिवाजीराजे यांना लिहितो,
   

अशा पात्रांना ताराराणी यांचे उत्तर सुद्धा आलेले आपल्याला दिसून येते. यावरून चंद्रसेन जाधवराव हे दोन्ही बाजूंना संधान बांधून होते हे कळून येते. जाधवरावांनी अनेक मराठा सरदार शाहूंच्या गोटातून फोडण्याचा प्रयत्न चालू ठेवला होता आणि त्यावेळी बाळाजीने शाहू महाराजांना साथ दिली त्यामुळे बाळाजीवर महाराजांचा विश्वास अधिक बसला. पुढे चंद्रासेनाने बाळाजीचा पाठलाग चालू केला पण बाळाजी शिताफीने निसटत पुढे शाहू राजांकडे गेला. जाधवराव पुढे शाहू राजांना लिहितात की, “स्वामीनी बाळाजीस माझ्या स्वाधीन करावे. त्यास आश्रयदिल्यास आम्हास महाराजांचे पाय सुटतील” परंतु शाहू राजांनी बाळाजीस तर दिलेच नाही उलट हैबतराव निंबाळकर यांस चंद्रसेनवर पाठवले आणि हैबतरावांनी चंद्रासेनाचा जेऊर इथे पराभव केला. त्यानंतर चंद्रसेन उघडपणे ताराराणीना जाऊन मिळाला व पुढे निजामाची नोकरी पत्करली.     

याशिवाय इतर अनेक घटना मध्ये घडतात पण त्यांचा उल्लेख इथे केल्यास लेखाचा नुसता आकार वाढत जाईल, त्यामुळे बाळाजीवरील विस्तृत लेख हा नंतर लिहेनच. बाळाजी सरसुभेदार असताना
 ‘श्री उमाकांत पदांभोज भजनाप्त समुन्न्ते 
बाळाजी विश्वनाथस्य मुद्रा विजयातेतरा’ 
 असा शिक्का लावायचा पण पुढे पेशवे पद मिळाल्यानंतर, 
‘श्री शाहुनरपति हर्षनिधान 
बाळाजी विश्वनाथ मुख्य प्रधान’ 
असा शिक्का वापरायला लागला. या शिक्क्यावरून आपल्या लक्षात येते की पेशवे पद किती महत्वाचे होते ते कारण मोरोपंत पिंगळे हे जेव्हा मुख्य प्रधान असताना सुद्धा असाच शिक्का वापरायचे,    श्रीशिवनरपति हर्षनिधान, '
मोरो त्रिमल मुख्य प्रधान’ 
यावरून बाळाजी विश्वनाथचे कर्तुत्व किती मोठे होते हेच सिद्ध होते.    

संदर्भ- १. पहिले बाजीराव पेशवे- नारायण केशव बेहेरे 
      २. मराठी रियासत
      
____________________________________________________________________________

मला सोशल मिडीयावर फॉलो करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. 

इन्स्टाग्राम - Paranjape_shantanu
फिरस्ती महाराष्ट्राची - Firasti_mh


You Might Also Like

0 comments

$(document).ready(function(){ $('#mscontent').css('opacity','0'); });