प्रिय गडकोट (पत्र किल्ल्यांना)- A letter to all forts!!

  • January 03, 2017
  • By Shantanu Paranjape
  • 0 Comments


प्रिय गडकोट,

खूप दिवसांनी पत्र लिहायला बसलोय खरं पण बोलण्याइतके सुद्धा खूप आहे त्यामुळे आजचे पत्र हे तुम्हा सर्व किल्ल्यांना!! तुमच्यापर्यंत पोहोचेपर्यंत वेळ लागेल खरा पण माझा पण नाईलाज आहे!! घटनाच अशा काही घडल्या आहेत की तुम्हाला कळवल्या वाचून राहवलं नाही आणि तडक लिहायला बसलो!

इतके दिवस मी काय किंवा आणखीन माझ्यासारखे ट्रेकर काय, तुम्हाला इतिहासाचे एक महत्वाचे साधन म्हणून बघत होतो. दर रविवारी यायचे, कष्ट करून वर चढायचे आणि मग दिवसभर तुमच्या अंगा खांद्यावर मनसोक्त हिंडायचे ते सुद्धा शिवरायांच्या इतिहासाची उजळणी करतच!! वाटेत एखादा पक्षी किंवा फुलपाखरे दिसले की सुरु व्हायचा तो निसर्गाचा तास!! आजवर तुम्हाला दिलेल्या प्रत्येक भेटीने काहीतरी नवीन शिकवले आणि तुमच्यामुळेच मनातले लहान मुल कायम राहिले!! पावसाळ्यात वाटेत एखाद्या डबक्यात जोरात उडी मारून ते पाणी बाकीच्यांच्या अंगावर उडवायचा खोडकरपणा सुद्धा तुमच्यामुळेच घडायचा!! पण दुर्दैवाने आता मात्र तसे घडत नाही हो!!

त्यादिवशी हरिश्चंद्रासारखा युगपुरुष पण माझ्याजवळ ढसाढसा रडला हो!! कोकणकड्यावर बसून त्याचे ते अनुभव ऐकत मन विषण्ण झाले!! सांगत होता, “१०-१२ जण आली होती, चांगली तुझ्याच वयाची. वाटलं, नेहमीसारखे येतील सूर्यास्त बघतील आणि जातील झोपायला!! पण कसले काय!! ते काय ते उपकरण आणलेलं त्यानी ज्यातून मोठा मोठा आवाज यायला लागला आणि माझ्यावर अलगद झोपलेलं जंगल जागे झाले बघ!! मी सुद्धा म्हातारा, माझी जी झोप उडाली ती नंतर लागलीच नाही बघ! मी काहीच करू शकलो नाही पण तुमच्यातल्याच काही जणांनी दम भरला आणि मग गप्प झाले खरे! पण दारूच्या बाटल्या आणि सिगारचा धूर मात्र काही कमी झाला नाही. सारे वातावरण प्रदूषित झाले.” त्यादिवशी माझ्याकडे द्यायला काहीच उत्तर नव्हते! पण मी तरी काय करणार?? अफाट लोकसंख्येमधला मी एक क्षुद्र जीव!!

पूर्वीच्या काळी असलेली ट्रेकिंगची व्याख्या आणि आत्ता असणारी व्याख्या यात खूप अंतर झालं आहे हो! तुम्हाला सुद्धा जाणवले असेल!! कुठे ५-६ जणांची टोळकी येऊन गड मनसोक्त फिरून जायची आणि कुठे आता ४०-५० लोकांचा ग्रुप येतो आणि आरडाओरडा करून जातो!! पैसे मिळवण्याच्या नावाखाली, तुमची मात्र उपेक्षा होते याच्याकडे फारसे कुणी लक्ष देत नाही!! कशाला देतील म्हणा??! पडलेल्या दगडांना ती अशी काय किंमत?? किंवा एखादा पक्षी नाहीसा झाला एखाद्या भागातून तर यांना काय फरक पडणार आहे? सह्याद्रीमधले गड किल्ले म्हणजे आपलीच जागा असा गैरसमज यांचा झाला असल्याने तुम्हाला त्याचा त्रास सहन करावा लागतो याचे वाईट वाटते! लोकांनी फेमस केलेल्या किल्ल्यांवर गर्दी वाढते म्हणून वेगळ्या ठिकाणी जाणारे आम्ही शुद्ध मनाने येऊन ठिकाणांचे ब्लॉग लिहितो जेणेकरून ती माहिती लोकांपर्यंत पोहोचेल! पण कदाचित त्या ठिकाणी जाणारी वाईट प्रवृतीची लोकं पाहून भटकंतीवर ब्लॉग लिहिणे सुद्धा बंद करावे की काय असेच वाटते!!

तानाजीच्या पराक्रमाच्या खुणा अभिमानाने अंगावर मिरवत असलेला सिंहगड आज जेव्हा किल्ला न म्हणता पिकनिक स्पॉट म्हणला जातो तिथेच संपतं हो सगळं! एकवीरादेवीच्या दर्शनाला जाणारे भाविक त्या कार्ला लेण्यांच्या सौंदर्याचे कौतुक सुद्धा करत नाहीत तेव्हा खरंच वाईट वाटते!! असो! ज्याची त्याची भक्ती म्हणा!! इतकेच काय! सप्टेंबर महिन्यात कास पठारावर धावणारे, तिथल्या जेव्हा फुलांचा चुराडा करतात तेव्हा तुम्हाला काय वाटत असेल त्याची कल्पना सुद्धा करवत नाही!! त्या सर्व लोकांमुळेच तिथली फुलं कंटाळून दुसरीकडे निघून गेली आहेत! जी गत फुलांची तीच गत ताडोबाच्या वाघांची!! तुमचा कदाचित संबंध येत नसेल फारसा म्हणून सांगतो, आता तर ताडोबात वाघ ही जीपला चिकटून जातात म्हणे!! राजाला राजासारखेच पहायचे असते हेच लोकांना कळत नाही! अशी अनेक उदाहरणे आहेत बघा!!    

व्यथा तरी किती मांडायच्या?? अहो अशी उदाहारणे द्यायची जर ठरवले तर एक वही भरेल आख्खी!! तुम्ही म्हणाल की चांगल्या गोष्टी घडतायेत की नाही? नक्कीच घडतायेत!! अनेक नवीन इतिहास अभ्यासक पुढे येत आहेत जे प्राचीन काळापासून ते मध्ययुगीन काळापर्यंतचा अभ्यास करत आहेत आणि लोकांपर्यंत पोहोचवत आहेत! दुर्गसंवर्धनासाठी अनेक संस्था कार्य करत आहेत! पण यांची संख्या ही अजूनही कमी आहे!! वाईट वृती या अमिबा सारख्या वाढत चालल्या आहेत! आता तुम्हीच काहीतरी मार्ग दाखवाल हीच आशा आहे!

गप्पा तर खूप मारायच्या होत्या पण तूर्तास इथेच थांबतो!! पुन्हा नक्की लिहेनच!! आणि लवकर लिहेन!! तोपर्यंत तुमचे आशिर्वाद असेच पाठीशी ठेवा!!

                                                                                
तुमचा,
                                                                                
शंतनु


ता.क.- राकट देशा, कणखर देशा दगडांच्या देशा म्हणणारे, पुन्हा एकदा मरण पावले आणि या           मृत्यूने त्यांना अधिक वेदना झाल्या असतील बघ!      
  


सह्याद्री मध्ये फिरताना ही काळजी घ्याच   

You Might Also Like

0 comments

$(document).ready(function(){ $('#mscontent').css('opacity','0'); });