सातवाहनांच्या इतिहासाची साधने

मागच्या लेखात आपण सातवाहन आणि आंध्र यांच्याबद्दल थोडीफार चर्चा केली आणि लेख संपवताना मी म्हणालो की पुढच्या भागात राजघराण्याविषयी लिहेन. पण हे सर्व लिहिण्याआधी सातवाहनांच्या इतिहासाची साधने कोणती याचा अभ्यास करणे फार महत्वाचे आहे. कारण त्या शिवाय आपल्याला सातवाहन कळणार नाहीत आणि मग या राजाचा संदर्भ कुठून आला वगैरे प्रश्न उपलब्ध होतील. जी अत्यल्प साधने आपल्याकडे आज उपलब्ध आहेत त्याचा अभ्यास करून मग सातवाहन यांच्याविषयी काही तर्क आपण मांडू शकतो.

सातवाहनांच्या इतिहासाची साधने जर आपण पाहायला गेलो तर त्यात मुख्यत्वे, लेण्यांमध्ये असणारे ब्राह्मी लिपीतील शिलालेख, विविध सातवाहन राजांची आढळणारी नाणी, हल सातवाहन राजाने लिहिलेली गाथा सप्तशती आणि विविध पुराणातील सातवाहन राजांचा उल्लेख एवढीच काय ती माहिती आपल्याकडे उपलब्ध होते. अर्थात पुराणात पण कालावधीनुसार बदल होत गेले त्यामुळे पुराणे किती ग्राह्य धरणार हा प्रश्न राहतोच पण तो मुद्दा तात्पुरता आपण बाजूला ठेवू
.

लेण्यांमधील ब्राह्मी शिलालेख-

कार्ले लेण्यांमधील शिलालेख 
ब्राह्मी लिपी आणि तिच्या उगमाबद्दल बोलायचे झाले तर तो वेगळा विषय होईल त्यामुळे विस्तारभयास्तव या लेखात बोलणे टाळतो. तुमच्या माहितीसाठी म्हणून सोबत ब्राह्मी मधील अक्षरे कशी वाचावीत याचा एक जुजबी तक्ता देत आहे. अर्थात संपूर्ण भाषा येण्यासाठी याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. त्यामुळे हा तक्ता केवळ मदत म्हणून वापरावा.
महाराष्ट्रात असंख्य लेणी आहेत. काही बौद्ध धर्मीय आहेत, काही हिंदू आहेत तर काही जैन. या लेण्यांमध्ये भरपूर शिलालेख कोरलेले आहेत. यातील बहुतांश लेख हे बौधधर्मीयांचे आहेत. समाजातील सर्व घटकांचे लेख यात कोरलेले आपल्याला दिसून येतात. तर हे लेख कुठे आढळतात? त्यांचे स्थान कुठे असते?- हे लेख लेण्यांमधील प्रवेशद्वारावर, आतील तसेच बाहेरील भिंतींवर, स्तुपांवर, पाण्याच्या टाक्यांवर दिसून येतात. हे लेख प्रामुख्याने दानाविषयी आहेत परंतु काही लेख जसे की नाणेघाटातील नायनिका हिचा लेख किंवा पांडवलेण्यातील बलश्रीचा लेख हे सातवाहन राजघराण्याची माहिती देतात. बौध लेखांच्या मानाने हिंदू लेख आणि जैन लेख यांची संख्या फारच कमी आहे.

Brahmi Alphabets
Ref: Google images

या लेखाची लिपी ही ब्राह्मी असून, भाषा ही प्राकृत आहे. या लेखांमधील काही लेख हे अगदीच लहान म्हणजे एक-दोन ओळींचे आहेत तर काही लेख हे खूपच मोठे म्हणजे अगदी १०-११ ओळींचे सुद्धा आहेत. उदाहरण घ्यायचे झाले तर नाणेघाट तसेच पांडवलेण्यांतील शिलालेख. आता या लेखाचे स्वरूप कसे असते?- यातील काही लेख हे राजवंशीयांचे असतात तर काही लेख हे सामान्य लोकांचे असतात. राजघराण्यातील लोकांच्या लेखात सुरुवातीला ओम, स्वस्ति, नंतर राजाची स्तुती, पराक्रमाचे वर्णन आणि नंतर तो लेख कोरला जाण्याचे कारण हे नमूद केलेले असते. अर्थात हे सर्व ठिकाणी असेल असे नाही. सामान्य लोकांच्या लेखात, कधीतरी कालगणना, राजाचे नाव हे दिसून येते. पण मुख्यत्वे दिलेले दान आणि कुणी दिले हेच दिसून येते.

सातवाहन कालीन लेख हा खूप मोठा विषय आहे त्यामुळे इथे नुसती ओळख करून देऊन मी तो सोडत आहे. परंतु अधिक अभ्यास करणाऱ्यांनी डॉ. मंजिरी भालेराव यांचे डायमंड पब्लिकेशनने प्रकाशित केलेले ‘महाराष्ट्राच्या इतिहासाचे साक्षीदार’ हे पुस्तक जरूर वाचावे. त्यात त्यांनी लेख या विषयावर अतिशय सुंदर लिहिले आहे तसे विविध लेण्यांमधील लेखाचे लिप्यंतर सुद्धा दिले आहे.

सातवाहनकालीन नाणी-

Roaring lion standing left facing yupa (sacrificial altar), with Brahmi legend 'Siri Satavahanasa' above and 3-arched hill belowRef: www.vcoins.com

सातवाहन यायच्या आधी सुद्धा महाराष्ट्रात प्रिंटची नाणी होती. पण सातवाहन राजांनी आपल्या नावाची नाणी पडली. या राजांची तांब्याची नाणी औरंगाबाद, हैद्राबाद वगैरे ठिकाणी सापडली आहेत तर शिशाची नाणी नेवासे, कोंडापूर या ठिकाणी सापडली आहेत. तसेच चांदीचा मुखवटा असणारी नाणी सुद्धा सापडली आहेत. यात प्रत्येक राजाचे नाणे वेगळे असे आहे. प्रत्येक राजाचा लेख वेगळा तसेच त्यावरील कोरलेल्या आकृत्या वेगळ्या. खाली विविध सातवाहन राजांच्या नाण्यावरील लेख देत आहे.

  ü सिमुक सातवाहन राजा- या राजाच्या नाण्यात उजवीकडे सोंड करून असलेला हत्ती दिसून येतो तर त्याच्या मागे सिरी सादवाह असा लेख कोरलेला आढळून येतो. तर काही नाण्यात उजवीकडे उभा असलेला वृषभ, त्याच्या पाठीवर तीन टेकड्यांचा पर्वत आणि त्याच्या सभोवताली ‘रञो सिरी सातवाहनस’ असा लेख दिसून येतो. या नाण्याच्या मागील बाजूस डावीकडे एक चिन्ह, उजवीकडे एक वृक्ष व टेकड्या व नदी कोरली दिसून येते. 
  ü  प्रथम सातकर्णी- याच्या नाण्यावर ‘रञो सिरी सातकणिस’ किंवा ‘रञो सिरी-सातकंणि’  असा लेख कोरलेला दिसून येतो.
  ü  गौतमीपुत्र सातकर्णी- ‘रञो गोतमीपुतस सिरी सातकणिस’ असा कोरलेला लेख. 
  ü  वशिष्ठीपुत्र पुळूमावी- ‘रञो वशिष्ठीपुतस सिवसिरी पुळूमावीस’ असा कोरलेला लेख.
  ü  स्कंद सातकर्णी- ‘सिरी खद सातकणिस’ असा लेख.
  ü  वशिष्ठीपुत्र स्कंद सातकर्णी- ‘रञो वशिष्ठीपुतस सिरी खद (सातकणिस)’  असा लेख.
  ü  यज्ञ सातकर्णी- ‘रञो सिरी यञ [सातकणिस] असा लेख
  ü  विजय सातकर्णी- ‘[ज] य सातकणिस’ हा लेख.
  ü  वशिष्ठीपुत्र चंद्रस्वाती- ‘रञो वासिठीपुतस सिरीचदसातिस’ असा लेख.

Elephant with raised trunk standing right, with Brahmi legend Rano 'Siri Kubha Sataka(nisa)' above Reverse: 4-orbed 'Ujjain' symbol
 Ref: www.vcoins.com

अशी असंख्य राजांची नाणी महाराष्ट्र, तसेच आंध्र मधील विविध भागात सापडली आहेत. सर्वांचा उल्लेख करणे इथे शक्य नाही. अभ्यासकांनी श्री. मिराशी यांचे ‘सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप यांचा इतिहास व कोरीव लेख’ हे पुस्तक जरूर वाचावे’.

गाथा सप्तशती- 

तिसरे महत्वाचे साधन ठरते ते हल नावाच्या सातवाहन राजाने संपूर्ण भारतातून सुमारे एक कोटी गाथा गोळा करून सुमारे सातशे गाथांचा गाथा सप्तशती हा ग्रंथ लिहिला. खालील श्लोकातून हे स्पष्ट होते.

सत्तसआइं कइवच्छेलेण कोडीअ मज्झआरम्मि।
हालणे विरइआइं सालंकारणं गहाणं॥

बाणाने आपल्या ‘हर्षचरित’ च्या सुरुवातीला या गाथेची स्तुती केली आहे. तो म्हणतो,

अविनाशनमग्राम्यकरोत् सातवाहनः ।
विशुद्धजातिभी: कोश रत्नैरीव सुभाषितैः ॥

गाथासप्तशती हा ग्रंथ म्हणजे अनेक गाथांचे संपादन आहे. यात विविध राजांच्या पदरी कवींच्या गाथा आहेत तसेच अनेक लेखकांनी लिहिलेल्या गाथा आहे. या गाथांचा अभ्यास करताना तत्कालीन समाजजीवन कसे होते याची उत्तम माहिती मिळते. बहुतांश गाथा या प्रेमगीत स्वरूपाच्या आहेत परंतु एकंदर कुटुंबव्यवस्था कशी होती याचा अभ्यास करताना हा ग्रंथ महत्वाचा ठरतो. श्री. सदाशिव जोगळेकर यांनी या ग्रंथाचे मराठी भाषांतर करून तो प्रथम प्रकाशित केला तो ‘गाथा सप्तशती’ या नावानेच’
पुराणे- याशिवाय नंतरच्या काळात लिहिलेल्या विविध पुराणात सुद्धा सातवाहन राजांचा उल्लेख आला. मागच्या लेखात आपण संख्येत कशी विसंगती होती ते पाहिलंच. अर्थात ही सर्व पुराणे नंतरच्या काळात असल्याने त्यात बदल होत गेले आणि त्यांचे प्राथमिक संदर्भाचे महत्व तितकेसे राहिले नाही. परंतु शिलालेख, नाणी यांच्या जोडीला अभ्यास म्हणून मत्स्य, भागवत, विष्णू या सर्व पुराणांचा अभ्यास जरूर करावा.तर ही होती ‘सातवाहनांच्या इतिहासाची साधने’. मध्ययुगीन काळातील इतिहास जसा सहज आढळतो तशी सातवाहन कालीन साधने आढळत नाहीत. ती खूप कष्ट घेऊन शोधावी लागतात, प्रत्येक साधनांचे अन्वयार्थ लावून नीट मांडणी करावी लागते. तेव्हा कुठे सातवाहन कळायला लागतात. पण एकदा का याची गोडी लागली की याच्या सारखा दुसरा विषय नाही. असो!! तूर्तास याच्या अभ्यासाची जबाबदारी तुमच्यावर टाकून रजा घेतो. पुढील लेखात सातवाहन राजांविषयीच्या माहितीसोबत पुन्हा भेटू. 


You Might Also Like

0 comments

$(document).ready(function(){ $('#mscontent').css('opacity','0'); });