अशी
अनगड नावे असलेले हे देव. यांच्यामागे फार मोठा इतिहास नसतो किंवा यांच्याकडे
मुद्दाम लक्ष द्यावे असेही काही नसते! परंतु यांच्यावर त्या त्या भागात
राहण्याऱ्या लोकांची भक्ती खूप. असाच एक देव म्हणजे मुंजाबा! अशा या मुंजाबाचे पुण्यात
दोन बोळ आहेत. एक म्हणजे ‘पत्र्या मारुती’ मंदिराच्या समोरच्या बाजूला आणि दुसरा
म्हणजे ‘सूर्या सह्याद्री हॉस्पिटल’ येथे असणारा!
खुप
जणांना वाटेल की मुंजाबा हा एखादा वीर वगैरे होता की काय! पण तसे काही नाही. पिंपळाचे
झाड लावून त्याखाली अश्वत्थ नारायणाची म्हणजे वामनअवतार घेतलेल्या विष्णूची
स्थापना करतात आणि या देवतेस मुंजाबा असे म्हणतात. या जवळ असलेल्या पिंपळाच्या पारास
मुंजाबाचा पार असे म्हणतात. बऱ्याच घराण्यात अशी चाल आहे की घरातील ज्येष्ठ मुलाची
मुंज होण्याआधी मुंजाबाची स्थापना करतात. पण मुंज होण्याअगोदरच तिथे पिंपळ लावून
वाढवलेला असतो आणि मुंज झाली की त्याभोवती पार बांधला जातो. कुणबी लोकं या मुंजाबाला
पुत्रप्राप्तीसाठी आधी नवस बोलतात आणि मुलगा झाल्यास मुंजाबाची स्थापना करतात. हा
मुंजाबा नवसाला पावतो असे म्हणतात.
![]() |
मुंजाबाचा बोळ देऊळ |
१३४७/१,
कसबा पेठ, पुणे अशी पाटी असलेले कसबा पेठेतील हे मुंजाबाचे मंदीर. या मंदिराची
स्थापना १९५२ मध्ये करण्यात आली. सूर्या सह्याद्री हॉस्पिटलच्या इथेच हे मंदीर
आहे. मंदिरात मुंजाबाची तांदळाच्या आकाराची शेंदूर फासलेली अशी साधारण एक-दीड फूट
उंचीची मूर्ती नजरेस पडते. या मूर्तीला दोन सुबक असे डोळे काढलेले असून वर अष्टगंध
लावलेले दिसून येते. खाली छानपणे वस्त्र नेसलेले असून डोक्यावर मुकुट आहे. या
मुंजाबाची दररोज पुजा केली जाते.
![]() |
आत बसवलेला मुंजाबा |
या
मुंजाबा मंदिराच्या आवारातच काही विरगळ ठेवलेले दिसून येतात. असे म्हणतात की
शेजारील इमारतीचे जेव्हा बांधकाम झाले तेव्हा खोदलेल्या खड्ड्यातून ते बाहेर काढले
गेले व त्यांची स्थापना इथे केली गेली. आज या वीरगळांना शेंदूर फसलेले दिसून
येतात. हे विरगळ, ‘गणपती विरगळ’ या प्रकारात मोडतात. याबद्दल सविस्तर लिहेनच.
![]() |
देवळाच्या आवारात असलेले वीरगळ |
![]() |
वीरगळावर असलेला गणपती |
इतिहास
हा असाही असतो हेच आपल्याला या छोट्या छोट्यागोष्टीतून लक्षात येतो. तर कुठे गेलात
तर तिथे मुंजाबाचा बोळ आहे का हे बघायला विसरू नका!
संदर्भ- पुणे नगर संशोधन वृत्त, भारत इतिहास संशोधक मंडळ
मुलांच्या परीक्षा संपल्या आणि शाळांना सुट्टी
लागली. सगळीकडे आता plans चालू आहेत की नेमके भटकायला जायचे तरी कुठे? तर हे
सुट्टीचे दोन महिने मस्त पैकी घालवता येतील अशी अनेक ठिकाणे आपल्या महाराष्ट्रात
आहेत. त्यामुळे थोडी अभ्यासपूर्ण भटकंती केली तर? उन्हाळ्यातील भटकंतीसाठी
आपल्याकडे अनेक उपलब्ध पर्याय आहेत जसे की किल्ले, लेणी, जुनी मंदिरे आणि
अभयारण्ये. प्रत्येकाचे एक स्वतःचे वैशिष्ट्य आहे.
किल्ले- खरे तर उन्हाळी
भटकंतीमध्ये गड-किल्ले शक्यतो टाळावेत कारण उन्हाचा त्रास आणि पाण्याची कमतरता. पण
वाटेवर गर्द झाडी असणारे वासोटा, कर्नाळा, अवचितगड यांसारखे किल्ले जरूर करावेत.
म्हणजे ट्रेक पण होईल आणि करवंद इत्यादी रानमेव्याची मजा सुद्धा लुटता येईल.
![]() |
करवंदांचा रानमेवा (photo Courtesy- Google) |
![]() |
कर्नाळा किल्ला |
लेणी-
उन्हाळ्यात भटकंतीचा एक उत्तम पर्याय म्हणजे लेणी. सह्याद्रीच्या कातळाला
सौंदर्याचा मुलामा चढवला तो या कातळात कोरलेल्या लेण्यांनी. प्राचीन इतिहासाचा
ठेवा जपत ही आजही उभी आहेत. अजिंठा-वेरूळ, कार्ला यांच्यासारख्या प्रसिद्ध
लेण्यांबरोबर येलघोल, गोमाशी, शिरवळ यांच्यासारखी निसर्गाच्या रम्य अधिवासात
असलेली लेणी सुद्धा आवर्जून पहावीत. या भटकंतीचा फायदा असा की प्राचीन ठेवा
पाहायला मिळतोच पण बाहेरील गरम वातावरणात आत असलेला थंडावा सुखावून जातो.
![]() |
बेडसे लेणी |
![]() |
औरंगाबाद लेणी |
मंदिरे- महाराष्ट्र हा मंदिरांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो तो केवळ या प्रांतात असणाऱ्या विविध प्राचीन मंदिरांमुळेच. सर्वसामान्य लोकांमध्ये ओळखली जाणारी हेमाडपंथी शैलीमधील मंदिरे असोत किंवा शिलाहारकालीन, चालुक्यकालीन मंदिरे असोत. ही सर्व तीर्थस्थाने भक्तीरसासोबतच शिल्पकलेचा अजोड नमुना म्हणून ओळखली जातात. मूर्तींच्या चेहऱ्यावरील बोलके भाव, मुर्तीवरील आभूषणे, पुराणातील गोष्टी इत्यादी गोष्टी अगदी बारकाईने कोरलेल्या दिसतात. महाराष्ट्रात असणारी गोंदेश्वर, खिद्रापूर, अंबरनाथ, भुलेश्वर येथील मंदिरे म्हणजे तर एक अनमोल ठेवाच आहे. या ही तीर्थस्थाने पाहण्यासाठी काही विशेष कष्ट सुद्धा घ्यावे लागत नाहीत त्यामुळे अगदी सहकुटुंब अशी ट्रीप होऊ शकते.
![]() |
वाघेश्वर मंदिर, वाघेश्वर |
![]() |
बहादूरगडचे भग्न मंदिर |
अभयारण्य- ताडोबा अभयारण्यात मोकळा फिरणारा जंगलाचा राजा वाघ कुणाला आवडत नाही. मे महिन्याच्या सुमारास रानातील पाणीसाठा संपल्याने हे सर्व प्राणी-पक्षी पाणवठ्याजवळ येतात आणि त्यांचे मस्तपैकी दर्शन आपल्याला होते. ताडोबा, मेळघाट, फणसाड इत्यादी अभयारण्यात अनेक हौशी पर्यटक आवर्जून भेट देतात. जंगल अनुभवायचे असेल तर एका तरी अभयारण्याची भटकंती मस्ट.
![]() |
हरिश्चंद्र गड -कळसुबाई अभयारण्य |
![]() |
कर्नाळा अभयारण्य |
____________________________________________________________________________
मला सोशल मिडीयावर फॉलो करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
इन्स्टाग्राम - Paranjape_shantanu
फिरस्ती महाराष्ट्राची - Firasti_mh