मुंजाबाचा बोळ


अशी अनगड नावे असलेले हे देव. यांच्यामागे फार मोठा इतिहास नसतो किंवा यांच्याकडे मुद्दाम लक्ष द्यावे असेही काही नसते! परंतु यांच्यावर त्या त्या भागात राहण्याऱ्या लोकांची भक्ती खूप. असाच एक देव म्हणजे मुंजाबा! अशा या मुंजाबाचे पुण्यात दोन बोळ आहेत. एक म्हणजे ‘पत्र्या मारुती’ मंदिराच्या समोरच्या बाजूला आणि दुसरा म्हणजे ‘सूर्या सह्याद्री हॉस्पिटल’ येथे असणारा!

खुप जणांना वाटेल की मुंजाबा हा एखादा वीर वगैरे होता की काय! पण तसे काही नाही. पिंपळाचे झाड लावून त्याखाली अश्वत्थ नारायणाची म्हणजे वामनअवतार घेतलेल्या विष्णूची स्थापना करतात आणि या देवतेस मुंजाबा असे म्हणतात. या जवळ असलेल्या पिंपळाच्या पारास मुंजाबाचा पार असे म्हणतात. बऱ्याच घराण्यात अशी चाल आहे की घरातील ज्येष्ठ मुलाची मुंज होण्याआधी मुंजाबाची स्थापना करतात. पण मुंज होण्याअगोदरच तिथे पिंपळ लावून वाढवलेला असतो आणि मुंज झाली की त्याभोवती पार बांधला जातो. कुणबी लोकं या मुंजाबाला पुत्रप्राप्तीसाठी आधी नवस बोलतात आणि मुलगा झाल्यास मुंजाबाची स्थापना करतात. हा मुंजाबा नवसाला पावतो असे म्हणतात.

मुंजाबाचा बोळ  देऊळ 
१३४७/१, कसबा पेठ, पुणे अशी पाटी असलेले कसबा पेठेतील हे मुंजाबाचे मंदीर. या मंदिराची स्थापना १९५२ मध्ये करण्यात आली. सूर्या सह्याद्री हॉस्पिटलच्या इथेच हे मंदीर आहे. मंदिरात मुंजाबाची तांदळाच्या आकाराची शेंदूर फासलेली अशी साधारण एक-दीड फूट उंचीची मूर्ती नजरेस पडते. या मूर्तीला दोन सुबक असे डोळे काढलेले असून वर अष्टगंध लावलेले दिसून येते. खाली छानपणे वस्त्र नेसलेले असून डोक्यावर मुकुट आहे. या मुंजाबाची दररोज पुजा केली जाते.
आत बसवलेला मुंजाबा 
या मुंजाबा मंदिराच्या आवारातच काही विरगळ ठेवलेले दिसून येतात. असे म्हणतात की शेजारील इमारतीचे जेव्हा बांधकाम झाले तेव्हा खोदलेल्या खड्ड्यातून ते बाहेर काढले गेले व त्यांची स्थापना इथे केली गेली. आज या वीरगळांना शेंदूर फसलेले दिसून येतात. हे विरगळ, ‘गणपती विरगळ’ या प्रकारात मोडतात. याबद्दल सविस्तर लिहेनच.
देवळाच्या आवारात असलेले वीरगळ 
वीरगळावर असलेला गणपती  इतिहास हा असाही असतो हेच आपल्याला या छोट्या छोट्यागोष्टीतून लक्षात येतो. तर कुठे गेलात तर तिथे मुंजाबाचा बोळ आहे का हे बघायला विसरू नका!  

संदर्भ- पुणे नगर संशोधन वृत्त, भारत इतिहास संशोधक मंडळ 

You Might Also Like

0 comments

$(document).ready(function(){ $('#mscontent').css('opacity','0'); });