Skip to main content

अष्टप्रधान मंडळ

आपल्याला लहान असताना बरेच वेळा शिकवले जाते की शिवरायांची राज्यकारभाराची पद्धत ही प्रधान पद्धत होती आणि ते काही अंशी बरोबर सुद्धा आहे. शिवाजी राजांनी ही पद्धत मुसलमान शासकांकडून घेतली हे उघड आहे कारण पेशवा, मुजुमदार,वाकनीस,सुरनीस,डबीर इत्यादी अधिकाऱ्यांची नावे मुघल प्रशासनात बऱ्याच वेळेला येतात. हीच नावे राजांनी राज्यव्यवहारकोशात संस्कृत भाषेत देताना प्रधान, अमात्य,मंत्री,सचिव,सुमंत इत्यादी नावे दिली. पण येथे मुद्दा हा निराळाच आहे आणि तो म्हणजे नावाप्रमाणे खरोखर आठ प्रधान होते का??

आता तुम्ही म्हणाल की काहीही लिहितोस राव तू! नावात तर अष्ट आहे त्यामुळे प्रधानांची संख्या सुद्धा आठ असणार हे उघड आहे. माझेही मत सुद्धा पूर्वी तसेच होते पण काही पत्रांमध्ये येणारा उल्लेख जरासा वेगळा येतो! अष्टप्रधान म्हणजे आठ प्रधान हे विधान विविध ऐतिहासिक पत्रांच्या सहाय्याने खोटे ठरते आणि दिसून येते की ही संख्या आठ पेक्षा जास्त असावी. ही पत्रे ‘काव्येइतिहाससंग्रह’ या मासिकात तर  ‘काव्येइतिहाससंग्रहात प्रसिद्ध झालेले ऐतिहासिक पत्रे यादी वगैरे लेख’ या पुस्तकामध्ये छापली आहेत. 

यातील प्रथम पत्र आहे ते म्हणजे खेम सावंत याने लखमसावंत यांस २१/०६/१६७३ रोजी लिहिलेले. या पत्रात अष्टप्रधान मंडळाची कार्ये इत्यादी बद्दल माहिती दिलेली दिसून येते. पत्राचा मजकूर खालीलप्रमाणे –

श्री
कानूजाबता राज्याभिषेक शके १ आनंद नाम संवत्सरे ज्येष्ठ वद्य १३ त्रयोदशी भोमवासरे.

मुख्य प्रधान यांनी सर्व राजकार्य करावे. राजपत्रावर शिक्का करावा. सेना घेऊन युद्धप्रसंग व स्वारी करावी व तालुका ताबिनात स्वाधीन होईल त्याचा बंदोबस्त करून आज्ञेत वर्तावे. सर्व सरदार सेना [यांनी] याजबरोबर जावे. त्याणी सर्वांसमवेत चालावे. येणेप्रमाणे. मोर्तब. कलम १.

अमात्य यांनी सर्व राज्यातील जमाखर्च चौकशी करून दप्तरदार, फडणीस यांचे स्वाधीन असावे. लिहिणे चौकशीने आकारावे. फडणीसी, चिटणिसी पत्रांवर निशाण करावे. युद्धप्रसंग करावे. तालुका जतन करून आज्ञेत चालावे. मोर्तब. कलम १.

सचिव यांनी राजपत्रे शोध करून अधिक उणे अक्षर मजकूर शुद्ध करावा. युद्धप्रसंग करून तालुका स्वाधीन होईल तो रक्षून आज्ञेत वर्तावे. राजपत्रांवर चिन्ह संमत करावे. मोर्तब. कलम १.

मंत्री यांनी सर्व मंत्रविचार राज्यकारणे यांतील सावधतेने विचार करावे. आमंत्रण वाकनिसी त्यांच्या स्वाधीन. तालुका जतन करून युदधादी प्रसंग करावे. राजपत्रांवर संमत चिन्ह करावे. मोर्तब. कलम १.

चिटणीस यांनी सर्वराज्यातील राजपत्रे लिहावी. राजकारणपत्रे उत्तरे लिहावी. सनदा, दानपत्रेवगैरे महाली हुकुमी यांचा जाबता फडणीसी अलहिदा त्याप्रमाणे लिहावी. हातरोखे नाजूकपत्रे यांच्यावर मोर्तब अथवा खास दस्तक मात्र. वरकडांचा दाखलाचिन्ह नाही. चिटणीसांनीच करावे. मोर्तब. कलम १.

किल्ले, कोट, ठाणी, जंजिरे येथील कायदे करून दिले त्याप्रमाणे हवालदार, सुभेदार , कारखानीस, सबनीस, सरनोबत, तटसरनोबत लोक यांचे जाबते करून दिल्हे त्याप्रमाणे सावधतेने स्थळे रक्षावीत. तगिरी बदली हुजुरून व्हावी. बेजमी नेमणूक तालुकेदार यांच्याकडे दरवाजा, किल्ल्यावर हवालदार यांचा हुकुम, शिक्के त्यांच्या नावाचे, कारखानिसी, सबनीसी, जाबता अलहिदा असे. मोर्तब. कलम १.

आठरा कारखान्यांचे अधिकारी यांनी खाजगीचे अधिकारी यांच्या इतल्यात चालून दफ्तरी हिशेब गुजरावे. मोर्तब. कलम १.

आबदारखाना चिटणीस यांच्याकडे सरफखाना सुद्धा अधिकार सांगितला. मजालसी विडे, अत्तरगुलाब व हारतुरे, फळफळावळ खूषबई खरेदी, जमाखर्च यांनी करून हिशेब दफ्तरी गुजरावा. मोर्तब. कलम १.
पागा जुमलेदार, सरदार यांनी कैद करून दिली त्याप्रमाणे चालून सेनापती व प्रधान यांच्या समागमे कामकाजे करावी. मोर्तब. कलम १.

सेनापती यांनी सर्व सैन्य संरक्षण करून युद्धप्रसंग स्वारी करावी. तालुका स्वाधीन होईल तो रक्षून हिशेब रुजू करून आज्ञेत वर्तावे. फौजेच्या लोकांशी बोलणे बोलावे. सर्व फौजेचे सरदार यांनी त्याजबरोबर चालावे. मोर्तब. कलम १.

पंडीतराव यांनी सर्व धर्माधिकार, धर्म अधर्म पाहून शिक्षा करावी. शिष्टांचे सत्कार करावे. आचार, व्यवहार, प्रायश्चित पत्रे होतील त्याजवर संमत चिन्ह करावे. दानप्रसंग, शांति, अनुष्ठान तत्काळ करावे. मोर्तब. कलम १.
न्यायाधीश यांनी सर्व राज्यांतील न्याय, अन्याय मनास आणून बहुत धर्मे करून न्याय करावे. न्यायाची निवडपत्रे यांजवर संमती चिन्ह करावे. मोर्तब. कलम १.

सुमंत यांनी परराज्यातील विचार करावा. त्यांचे वकील येतील, त्यांचे सत्कार करावे. युद्धादी प्रसंग करावेत. राजपत्रांवर चिन्ह संमत करावे. मोर्तब. कलम १.

फौजेचे सबनीस,बक्षी यांनी सर्व फौजेची हजेरी चौकशी करावी. यादी करून समजवावे. रोजमुरा वाटणे, सत्कार करावा. युद्धादी प्रसंग करावा. मोर्तब. कलम १.

सेनाधुरंदर यांनी बिनी करावी, आघाडीस जावे फडफर्मास करावी, लूट करणे, मना करणे, चौकशी ताकीद, त्यांजकडे, पुढे असून सेना रक्षण करावी. मोर्तब. कलम १.

सुभे मामले तालुकेदार यांस त्यांजकडे जे नेमले त्यानी ते जाबत्या प्रमाणे चालावे. हुजूरचे दरखदार चिटणीस, फडणीस, मुजुमदार यांच्या इतल्याने चालून हिशेब गुजरावे. मोर्तब. कलम १.

*बारा महलचे अधिकारी यांनी आपापले काम दुरुस्त राखून हिशेब आकारून दफ्तरात गुजरावे. मोर्तब. कलम १.

दरुणी महालाचे कामकाज दिवाण नेमून दिले त्याणी सर्व पाहून करावे. चिटणीस, फडणीस यांनी आपापले दरखाचे कागद लिहावे. त्यांजवर निशाणचिन्ह दिवाणानी करून त्यांस समजून मोर्तब समक्ष करावे. मोर्तब. कलम १.

पोतनीस यांनी पोते जमाखर्च लिहिणे करावे. नजरपेशकशी जमा करावी. पोतदार यांनी पारख करावी. मोर्तब. कलम १.

अष्टप्रधान यांजकडे पेटे व तालुके व स्वारीस जाणे त्यांस दरखदार सर्व हुजुरच्या नावे, त्यांच्या दाख्ल्यानी पत्रव्यवहार करावा. स्वारीस जावे त्यांस मुतालिक करून दिल्हे त्याणी सर्व व्यवहार चालवावा. हुजूर राहावे. कलम १ मोर्तब.
एकूण कलमे वीस मोर्तब.

बारा महाल:- पोते-कोठी-पागा-दरजी-टंकसाल-सौदागिरी-इमारत-हवेली-पालखी-थट्टी-चौबिना-शेरी महाल)

आता वरील पत्रात मुख्य प्रधान, अमात्य, सचीव, सेनापती, पंडीतराव, न्यायाधीश, मंत्री, चिटणीस, सुमंत, बक्षी, सेनाधुरंदर अशी अकरा नावे दिसून येतात. यातील बहुतांश लोकांना इतर कामे आणि वेळेप्रसंगी युद्ध अशी कामाची वाटणी केलेली दिसून येते. परंतु या पत्राच्या शेवटी अष्टप्रधान असा उल्लेख केलेला दिसून येतो. तो कदाचित संख्यावाचक नसावा असेच या पत्रावरून कळून येते तर तो समूहवाचक असावा. यापत्राव्यतिरिक्त दुसरे शिवकालीन पत्र सापडत नाही जे या तर्कास बळकटी देईल.    

पत्रे यादी वगैरे याच पुस्तकातील दहावे पत्र हे संभाजी राजांच्या (कोल्हापूर) वेळेस इ.स. १७१७ मध्ये लिहिलेले आहे. या पत्रात प्रधानांची यादी दिसून येते. यात पंत प्रधान, सेनापती, पंत अमात्य, पंत सचीव, पंत सुमंत, पंत मंत्री, पंडीतराव, न्यायाधीश, पंत रायाज्ञा अशी ९ नावे दिसून येतात. 


श्री. उदय कुलकर्णी यांच्या फेसबुक पेज वरून साभार (https://goo.gl/Ghy7Ek)


याव्यतिरिक्त शाहू महाराजांचे अष्ट प्रधान जे होते त्यांचे सुद्धा एक पत्र  उपलब्ध आहे आणि त्यात आठ नवे येतात. ती  म्हणजे धनाजी जाधवराव, नारोराम शेणवी, बहिरोपंत पिंगळे, आनंदराव, आबू राव, होनाजी अनंत, नारोशंकर, मुद्गल भट अशी टी नावे आहेत. अर्थात हा उल्लेख बाळाजी भट  पेशवे होण्याच्या आधीचा आहे हे सांगयला नको !                              


हा उल्लेख माझ्या आठपेक्षा जास्त प्रधान असलेल्या तर्काला  छेद देतो हे मात्र खरे! 

 

Comments

Popular posts from this blog

‘शिवाजी न होता तो सुन्नत होती सबकी’

या टायटल ने पोस्ट टाकायला एक मोठे कारण आहे, मागे फेसबुकवर भुलेश्वर येथील भंगलेल्या मूर्तीची पोस्ट टाकली होती आणि त्यावर अनेक विद्वानांनी चर्चा केली आणि बऱ्याच लोकांचे असे मत बनले की हा विध्वंस धार्मिक नसून राजकीय होता. त्यासाठी त्यानी ‘औरंगजेबाची’ काही फर्माने देण्याचे आश्वासन सुद्धा दिले. (अर्थात अजून पर्यंत ती काही मिळाली नाहीत). पण औरंगजेब नक्की कोण होता किंवा तो किती धर्माभिमानी होता हे वाचायची उत्सुकता लागली होती. सर जदुनाथ सरकार यांच्यापेक्षा औरंगजेबाचा अभ्यास कुणी केला असेल असे मला वाटत नाही त्यामुळे त्याचेच पुस्तक मी वाचायला सुरुवात केली. त्यांच्याच पुस्तकातील काही वाक्य इथे देतो आहे. माझा काही शिवाजी राजांवर वगैरे अभ्यास काही नाही किंवा मला मराठी, हिंदी, इंग्रजी सोडून कोणतीही भाषा वाचता येत नाही पण सर जदुनाथ सरकार यांच्या औरंगजेबाच्या अभ्यासावर शंका घेण्याचे सामर्थ्य मजपाशी नाही त्यामुळे जशी वाक्ये आहेत तशीच देतो. ती वाचून सर्वांनी काय ते समजून जावे –
“त्याने हिंदू धर्माची शिकवण सांगणारे जे अनेक संप्रदाय होते ते मोडून टाकले. हिंदूंच्या पूजेची जी देवस्थाने होती त्यांचा त्याने …

शिवाजी राजांचा मृत्यू कसा झाला?

रायगडाने अनेक सुखद आणि दुखद क्षण अनुभवले. त्यापैकीच एक म्हणजे छत्रपती शिवाजी राजांचे आकस्मिक निधन! १६७४ ला राज्याभिषेक झाल्यानंतर कुणाला वाटले पण नसेल की अवघ्या ६ वर्षात हा महान राजा हे जग सोडून जाईल म्हणून पण नियतीचा फेरा कुणास चुकतो का!३ एप्रिल १६८०, चैत्र पौर्णिमा,शालिवाहन नृप शके १६०२ या दिवशी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहणारा माझा राजा निधन पावला! त्यानंतर हा लढा पुढे संभाजी महाराज, मग राजाराम महाराज, ताराराणी, शाहू महाराज आणि नंतर पेशवे असा सर्वांनी यशस्वीपणे चालवला आणि थोरल्या राजांनी पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न पूर्ण करून त्याचे रूपांतर विशाल मराठा साम्राज्यात केले.
केवळ ५० वर्षे आयुष्य लाभलेला हा राजा अचानक मरण कसा पावला हा संशोधनाचा भाग आहे. काही म्हणतात थकव्यामुळे आजार होऊन ज्वर झाला, तर काही म्हणतात गुडघे रोगाने मरण पावला तर काही जण अष्टप्रधान मंडळातील लोकांवरच विष पाजल्याचा आरोप करतात. तर यामागे कोणते सत्य आहे हे ऐतिहासिक पुरावे पहिले की कळून येते. यातील काही पुरावे हे अगदी समकालीन आहेत, काही उत्तरकालीन आहेत, काही बखरी मधले आहेत, काही आपल्या लोकांनी लिहिलेले आहेत तर काही …

रणमर्द बाजीप्रभू देशपांडे

अनेक वेळा बाजीप्रभू कोण होते आणि त्यांचे कार्य काय असे अनेक प्रश्न 'इतिहासाचे पुनर्लेखन’ करणारी अनेक मंडळी करत असतात. अर्थात हे सर्व प्रश्न निराधार आहेत हे उपलब्ध पुराव्यानिशी सिद्ध झाले आहेच परंतु ही समाजकंटक मंडळीं या पुर्याव्याना जुमानत नाहीत! असो काही का असेना परंतु बाजीप्रभू  हे नाव इतिहासात मात्र प्रचंड गाजले आणि एखाद्या नरव्याघ्र्याप्रमाणे या मावळ्याने पराक्रम करून आपला देह ठेवला! याच शूर सेनानीला नमन करण्यासाठी हा लेखप्रपंच!!
बाजीप्रभू देशपांडे या व्यक्तिमत्वाबद्दल फारसे पुरावे उपलब्ध नसले तरी ‘प्रभूरत्नमाला’ या ग्रंथात त्यांचा थोडाफार इतिहास दिला आहे तो असा, “बाजीप्रभूंचा जन्म हा भार्गव गोत्रात झाला. ते भोर पासून ३ मैलांवर असलेल्या सिंध गावी जन्मले. त्यांचे आडनाव प्रधान असे होते. तेराव्या शतकात मुसलमान लोकांनी मांडवगडचे हिंदू साम्राज्य खालसा केल्यामुळे जी काही प्रभू घराणी दक्षिणेत उतरली त्यात ‘रघुनाथ देवराव प्रधान’ हे होते. पुढे दक्षिणेतील राजांकडून व बहामनी राजांकडून जी वतने व अधिकार मिळाले त्या हुद्द्यावरून मिळालेली प्रधान, देशपांडे, चिटणवीस, गडकरी, कुलकर्णी अशी उपनावे प…