भारतातील शक्तीपूजन आणि गजलक्ष्मी
- September 29, 2017
- By Shantanu Paranjape
- 0 Comments
पूर्वप्रकाशित- सामना- उत्सव पुरवणी दिनांक २४ सप्टेंबर २०१७
सध्या सर्वत्र नवरात्रीची धामधूम सुरु
आहे. पुढचे काही दिवस अनेक जण आपापल्या आराध्य देवींची पूजा अर्चा करण्यात व्यस्त
असतील. काही जणांची देवी दुर्गा असेल तर काही जणांची लक्ष्मी परंतु
यामागे भक्तीभाव हा सारखाच असतो. हे नऊ दिवस स्त्रीशक्तीचा जागर संपूर्ण भारत देश
घालणार एवढ मात्र खरे. भारतात शक्तीची उपासना करणे ही काही नवी गोष्ट नाही तर
त्यामागे ऐतिहासिक महत्त्व सुद्धा आहे. या लेखाद्वारे प्राचीन भारतात होणाऱ्या
शक्तीच्या उपासनेचे महत्त्व आपण जाणून घेऊ.
संपूर्ण जगात केल्या जाणाऱ्या प्राचीन
उपासनेत शक्तीच्या उपासनेला फार महत्त्व आहे. कदाचित आपल्या आयुष्यात असणाऱ्या
स्त्रीच्या महत्वामुळे ही उपासना केली जात असावी. भारतात किंवा भारताबाहेर अनेक
ठिकाणी त्यात प्रामुख्याने बलुचिस्तान असो किंवा इराण असो, सिरिया, इजिप्त असो या
सर्व ठिकाणी आज भारतात ज्या शक्तीप्रतिमा म्हणून ओळखल्या जातात तशाप्रकारच्या अनेक
मूर्ती सापडल्या. यावरून हे कळून येते की या उपासनेचे धागेदोरे किती दूरवर पसरलेले
होते. भारतात सुद्धा जे उत्खनन झाले त्यात ज्या मूर्ती सापडल्या त्यांचा काळ हा
इसवीसन पूर्व २५०० इतका मागे नेता येतो. यावरून शक्तीपूजा ही संकल्पना किती जुनी
गोष्ट आहे हे आपल्याला लक्षात येते. अर्थात यातील बऱ्याच मूर्ती या मातीच्या
होत्या आणि निरनिराळ्या स्वरूपातील होत्या. परंतु ज्या मूर्ती सापडल्या त्यांवरून
एकंदर त्यांची वर्गवारी करता येते. या मूर्तींवरून दिसून येते की प्राचीन काळात
शक्तीपूजा ही तीन रूपात केली जात असे. एक म्हणजे दिगंबर रूप म्हणजेच संपूर्ण नग्न,
दुसरे म्हणजे बाळांसह (हे ही बहुधा नग्नरूप असायचे) आणि तिसरे म्हणजे
स्त्रीचे शरीर परंतु चेहरा हा मनुष्याचा नसून त्या जागी एखादे फूल किंवा प्राण्या-पक्ष्याचे
तोंड.
प्राचीन काळात होत असणाऱ्या हा
शक्तीपूजेचा प्रभाव आपल्याला अनेक ठिकाणी दिसून येतो. त्यात प्रामुख्याने दिसून
येतो तो विविध प्रकारच्या नाण्यांवर. भारतात आढळलेल्या अनेक प्राचीन नाण्यांवर लक्ष्मीची
रूपे दिसून येतात. त्यांना लक्ष्मी, गजलक्ष्मी अशा नावांनी ओळखले जातात.
महाराष्ट्रात सुद्धा भटकंती करताना गजलक्ष्मी हा शिल्पप्रकार बऱ्याच ठिकाणी आढळून
येतो. बऱ्याच नाण्यांवर आपल्याला पार्वती स्वरूपात ही देवी आढळून येते. कुठे कुठे
हीला ननैया असे म्हणाले जाते. या ननैयाला चंद्राची मुलगी, देवांची अधिदेवी, तसेच
स्वर्ग पृथ्वीला अलोकीत करणारी तसेच युद्ध, शस्त्र, राजदंड आणि प्रेम यांची
अधिष्ठात्री देवी समजतात. मित्र राजांच्या काही नाण्यांवर कमळावर उभी असलेली देवी
दिसून येते.
यासर्वांमध्ये ज्या शक्तीची मोठ्या
प्रमाणावर आराधना केली जाते ती म्हणजे लक्ष्मीदेवी. आज सर्वसामान्यपणे हिला आपण
लक्ष्मी म्हणतो किंवा गजलक्ष्मी असा शब्दप्रयोग वापरतो. परंतु प्राचीन काळात ‘पद्मा’
किंवा ‘श्री’ ही नावे गजलक्ष्मीसाठी वापरली जात असत. आज अंक ठिकाणी जेव्हा आपण भटकायला
जातो तेव्हा आपल्याला ही गजलक्ष्मी दिसून येते. दोन्ही बाजूला हत्ती आणि मध्ये
देवीची प्रतिमा असे याचे स्वरूप असते. असे मानतात की हे हत्ती देवीला स्नान घालत
आहेत. येथे लक्ष्मीला पृथ्वीचे रूप तर हत्तींना मेघांचे रूप मानले जाते. अशाप्रकारे
धरणीला मेघांनी घातलेले स्नान हे पावसाचे सूचक आहे तसेच ऐश्वर्य, संपन्नता यांची
ही निशाणी आहे. अर्थात हा एक समज आहे परंतु कदाचित या समजामुळेच भारतीयांमध्ये
लक्ष्मीला मानाचे स्थान आहे आणि जिथे जिथे लक्ष्मी निवास करते तिथे तिथे ऐश्वर्य
आणि संपन्नता टिकून राहते असे म्हणतात. अनेक ठिकाणी ही लक्ष्मी कमळ आणि बाळ घेऊन
बसलेली दिसून येते. तर कधी उजव्या हातात मद्याचा पेला आणि डाव्या हातात कमळ घेऊन
बसलेली दिसून येते. तसेच अनेक ठिकाणी ती कुबेरासह दाखवलेली दिसून येते. बऱ्याच
ठिकाणी आढळणाऱ्या सप्तमातृकांमध्ये लक्ष्मीचा समावेश केलेला आपणास दिसून येतो. आर्य
आणि राक्षस अशा दोघांमध्येही तिला मानाचे स्थान होते. याचे उदाहरण मध्ये रामायणात
रावणाचे जे पुष्पक विमान होते त्यावर गजलक्ष्मीचे चिन्ह होते. भरहूत आणि सांची
येथील बौद्धस्तूप, तसेच उडीसातील खंडगिरीच्या जैनगुंफा येथे अनेक कलाकृती लक्ष्मीची
शिल्पे काढून सजवल्या आहेत. यांवरून असे कळून येते की प्राचीन भारतात ज्या तीन
प्रकारच्या कला आढळून यायच्या प्रामुख्याने बौद्ध, ब्राह्मणी किंवा जैन या तीनही कलांमध्ये
लक्ष्मीचा आदर केलेला आपल्याला दिसून येतो.
याशिवाय भारतात अजून एक देवीचे रूप आढळून
येते ते म्हणजे वसुंधरा. बऱ्याच विद्वानांच्या मते वसुंधरा हे लक्ष्मीचेच रूप आहे.
दोन मासे हातात घेऊन उभी असलेली एक देवी शुंग आणि कुषाण
काळात प्रसिद्ध होती परंतु नंतरच्या काळात या देवीचे अस्तित्व जाणवतच नाही हे
विशेष. याशिवाय
भारतातील शक्तीपूजेत सप्तमातृकांचे स्थान मोठे महत्वाचे आहे. त्याबद्दलची माहिती
ही आपण पुढे घेऊच!!
अशी ही प्राचीन
भारतातील शक्तीपूजा..!! प्राचीन भारतात असलेले स्त्रीचे समाजातील प्रमुख स्थान
यातून दिसून येते.
संदर्भ
– भारतीय मूर्तीशास्त्र – नि. पु. जोशी
सर्व फोटो- इंटरनेट
© 2017, Shantanu Paranjape
0 comments