सिंहगड व्हॅली- पक्ष्यांचे नंदनवन (Sinhagad Valley)


verditer flycatcher


महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अभयारण्ये आहेत. काही पक्ष्यांसाठी प्रसिद्ध तर काही इतर अन्य वन्य जीवांसाठी पण अशी अनेक ठिकाणे आहेत जी अभयारण्ये नसून सुद्धा तिथे मोठ्या प्रमाणावर जैवविविधता आढळते. यातील एक ठिकाण म्हणजे सिंहगडाची दरी. बहुतांश लोकं याला सिंहगड व्हॅली या नावाने सुद्धा संबोधतात. जवळपास हिवाळ्यातील प्रत्येक रविवारी इथे पक्षी निरीक्षक आणि छायाचित्रण करण्यासाठी लोकांची वर्दळ असते. सह्याद्रीच्या प्रमुख अशा भुलेश्वर रांगेत वसलेला सिंहगड, त्याचे ऐतिहासिक महत्व यांमुळे सिंहगडावर जाण्यासाठी अनेक लोकं गर्दी करतात पण इथे आढळणाऱ्या पक्ष्यांची दखल घेण्यासाठी मात्र मोजकेच थोडे लोकं फिरकतात. अर्थात सरकारी यंत्रणांमध्ये असणारी उदासीनता, इथे आढळणाऱ्या जैवविविधतेचे व्यवस्थित प्रकारे डॉक्यूमेंटेशन न करणे ही महत्वाची कारणे.


red throated flycatcher


सिंहगड व्हॅली ही किल्ल्याच्या दोन्ही बाजूला आहे पण गर्दी मात्र आतकरवाडीमध्येच होते. इथे जाणे अत्यंत सोपे आहे, सिंहगड किल्ला चढायची सुरुवात होण्यापूर्वीच डावीकडे जो रस्ता जातो तिथपासूनच व्हॅलीची सुरुवात होते. पावसाळ्यात आढळणारी विविध फुले, हिवाळ्यातील स्थलांतरीत पक्षी आणि विविध फुलपाखरे ही इथली वैशिष्ट्ये. पावसाळा सुरु झाला की इथले झरे वाहू लागतात आणि अशा काळात जर तुम्ही गेलात तर तुम्हाला दिसतील सुगरणीची घरटी.

अरे खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला
देखा पिल्लासाठी तिनं झोका झाडाले टांगला

ती घरटी बघताना हे गीत सतत कानात घुमत असते. खोप्यातून हळूच बाहेर डोकावणारी ती सुगरण, तिचा पिवळा टोपीवाला नर हे बघण्यात वेळ कसा जातो तेच कळत नाही.  

हिवाळा सुरु झाला की इथे बाहेरून येणाऱ्या पक्ष्यांची लगबग सुरु होते. भारताच्या किंवा जगाच्या इतर भागातून येणाऱ्या पक्ष्यांना तिकडची कडक थंडी सहन होत नाही त्यामुळे इतक्या किलोमीटरचा प्रवास करून सिंहगडाच्या पायथ्याशी ४-५ महिन्यांसाठी आपला संसार थाटतात. पक्षी आल्याची बातमी आली रे आली की सर्व पक्षीछायाचित्रकार त्या पक्ष्यांचे फोटो मिळवण्यासाठी धडपड करतात. स्वर्गीय नर्तक (Indian Paradise Flycatcher) या लांब शेपटीवाल्या सुंदर पक्ष्याची छबी टिपण्यासाठी काय ती धडपड. पण तुम्हाला सांगतो, आयुष्यात एकदा तरी तो पक्षी बघा. निसर्गाची सुंदरता काय असते ते तुम्हाला कळेल. मोरकंठी (Verditer Flycatcher), नीलवर्णी (Ultramarine Flycatcher), राखी डोक्याचा पिवळा माशिमार (Grey headed canary flycatcher), लाल छातीचा तांबुला (Red throated Flycatcher) इत्यादी पक्ष्यांसाठी सिंहगड व्हॅली खूप प्रसिद्ध आहे.


crested lark

सह्याद्रीतील इतर सदाहरित जंगलांप्रमाणे सिंहगडचे जंगल सुद्धा सदाहरित वृक्षांचे आहे. साग, आंबा, चिंच, हिरडा, बेहडा, खैर इत्यादी झाडे इथे आढळतात. फुलांची आणि फुलपाखरांची तर गणतीच नाही. व्हॅलीमध्य आत शिरले की एक ओढा लागतो. हिवाळ्यात केवळ याच ओढ्यात पाणी आढळते त्यामुळे, सकाळी पाणी पिण्यास हे सर्व पक्षी हमखास पणे येतातच. त्यामुळे विनासायास या पक्ष्यांचे फोटो काढता येतात. गरुड किंवा घुबडे पहायची असतील तर मात्र जंगलामध्ये आत शिरावे लागेल. अर्थात ही जागा ट्रीप काढण्यासाठी मुळीच नाही. त्यामुळे तिथे जाऊन धांगडधिंगा करायचा असेल तर मुळीच जाऊ नका. पण पक्ष्यांची दुनिया पहायची असेल किंवा एखादा दिवस निसर्गाच्या सानिद्ध्यात घालवायचा असेल तर व्हॅलीसारखी जागा नाही. फक्त सोबत माहीतगार माणूस हवा जो या पक्ष्यांची नावे सांगू शकेल. त्यामुळे सिंहगड किल्ला, व्हॅली आणि येता येता पुण्याचा समुद्र अशी ओळख असलेले खडकवासला धरण येथे मिळणारी गरमागरम भजी असा बेत आखल्यास एक रविवार नक्कीच सार्थकी लागेल.



सिंहगड व्हॅलीमध्ये आढळणाऱ्या काही प्रमुख पक्ष्यांची नावे:

क्रमांक
इंग्रजी नाव
मराठी नाव
क्रमांक
इंग्रजी नाव
मराठी नाव
१.
Indian Paradise Flycatcher
स्वर्गीय नर्तक
२१
Spotted Owlet
ठिपकेदार पिंगळा
२.
Black Naped monarch
नीलमणी
२२
Scoops Owl
डुडुळा
Verditer flycatcher
नीलांग
२३
Grey-bellied Cuckoo
कारुण्य कोकीळा
Grey headed canary flycatcher
राखी डोक्याचा पिवळा माशिमार
२४
Common wood shrike
रानखाटीक
Red breasted flycatcher
तांबुला
२५
Rufous Treepie
टकाचोर
Taiga Flycatcher
लाल छातीचा तांबुला
२६
Crested Treeswift
शेंडी पाकोळी
Ultramarine Flycatcher
नीलसागर
२७
Yellow Wagtail
पिवळा धोबी
Tickell’s Blue Flycatcher
निलीमा
२८
Forest Wagtail
रान धोबी
Serpent eagle
सर्पगरुड
२९
Tree Pipit
वृक्ष तिरचिमणी
१०
Booted Eagle
सुतुंग
३०
Jungle bush quail
लावरी
११
Bonelli's Eagle
नराच
३१
Wryneck
मानमोडी
१२
Crested hawk eagle
तुरेबाज व्याध
३२
Crested Bunting
युवराज
१३
Plum Headed Parakeet
तोईपोपट
३३
White-Bellied Drongo
पांढरपोट्या कोतवाल
१४
Red Avadavat
लाल मुनिया
३४
Greenish Warbler
हिरवट पर्णी वटवट्या
१५
Blackbird
कस्तुरी
३५
Puff-throated Babbler
ठिपकेवाला पहाडी सातभाई
१६
Blue rock Thrush
निळा कस्तूर
३६
Tawny-bellied Babbler
लालटोपी सातभाई
१७
Malbar Whistling Thrush
पर्वत कस्तुर
३७
scimitar babbler
तलवारचोच सातभाई
१८
Orange Headed Thrush
रानकस्तूर
३८
White-cheeked Barbet
कुर्टुक
१९
Green Footed Pigeon
हरियल
३९
White-rumped Munia
पांढर्‍या पाठीची मनोली
२०
Jungle Prinia
रानवटवट्या
४०
Oriental Honey Buzzard
मोहोळ घार

(ही यादी परिपूर्ण नाही. इथे आणखी भरपूर पक्षी आढळतात मात्र विस्तारभयास्तव सर्व पक्ष्यांची नावे येथे देणे शक्य नाही)

जायचे कसे-
पुणे-खडकवासला-खानापूर-आतकरवाडी असे साधारण २०-२५ किमी अंतर.

जेवणाची सोय-
खानापूर येथे जेवणाची सोय होऊ शकेल तसेच सिंहगड किल्ल्यावर मिळणाऱ्या भजीची चव काही निराळीच.

विशेष टीप-

डिसेंबर-जानेवारी हा उत्तम कालावधी.



Read my Birds of Maharashtra post Here..


© 2017, Shantanu Paranjape

You Might Also Like

0 comments

$(document).ready(function(){ $('#mscontent').css('opacity','0'); });