महाराष्ट्रातील आगळे वेगळी गणपती

 • November 13, 2018
 • By Shantanu Paranjape
 • 5 Comments

पूर्वप्रकाशित सकाळ साप्ताहिक गणपती विशेषांक दिनांक १९/०८/२०१७ - इथे पहा  


    महाराष्ट्रात गणेशाचे पूजन ही तशी जुनीच परंपरा!! अनेक वर्षांपासून या आपल्या लाडक्या देवतेची पूजा महाराष्ट्रातील सर्व भाविक करत आले आहेत. गावाच्या वेशीवर असणारा हा देव! साधारण तिसऱ्या किंवा चौथ्या शतकात याचा समावेश इतर देवतांच्या मांदियाळीमध्ये झाला असावा हा कयास! त्यामुळे जुने ओबडधोबड रूप सोडून याला मोठे कान, सोंड असे आत्ताचे रुपडे सुद्धा याच कालावधीत मिळाले असावे. भारतात लिहिलेल्या वेगवेगळ्या पुराणात तर याला इतके महत्त्व मिळाले की या देवतेला पुढे अग्रपुजेचा मान मिळाला. ‘प्रथम तुला वंदितो’ करीत महाराष्ट्रातील अबाल-वृद्ध याची मनोभावे सेवा करत आले आहेत.

   महाराष्ट्रातील गणपतींचे मला विचाराल तर मी दोन प्रकारात वर्गीकरण करेन!! एक म्हणजे प्रसिद्ध असलेले आणि दुसरे म्हणजे अतिशय वेगळे रूप असणारे परंतु फारसे प्रसिद्ध नसलेले. प्रसिद्ध गणपतींमध्ये मग अष्टविनायक, मुंबईतील सिद्धिविनायक असे गणपती येतील तर दुसऱ्या प्रकारात भुलेश्वरचा स्त्रीरूपातील गणपती किंवा भोरगिरी येथील गणेश मुर्ती, त्रिशुंड गणपती असे अनेक येतील. तर या लेखात आपण अशाच काही अप्रसिद्ध गणपतींची माहिती घेणार आहोत. या गणपतींची रूपे अनेक आहेत. कधी स्त्रीरूपात तर कधी सहा हात असलेला पण भक्तीभाव मात्र सगळीकडे सारखेच!! चला तर मग करूया सफर काही आगळ्या वेगळ्या गणपतींची-
१.भुलेश्वरची वैनायकी-

पुण्यापासून काही अंतरावर असणारे भुलेश्वर हे प्राचीन शिवालय तसे बऱ्यापैकी नावाजलेले. अगदी गर्दीने ओसंडून वाहत नसले तर नजरेत भरावी इतकी गर्दी याठिकाणी वर्षातले बाराही महिने असते. आलेले बरेसचे पर्यटक हे मंदिरातील भग्न मूर्तीसोबत फोटो काढण्यात धन्यता मानतात. पण फार थोडे लोकं हे संपूर्ण मंदीर हे चिकित्सक नजरेने बघतात. याच मंदिरात आहे एक आगळी वेगळी मूर्ती आणि ती म्हणजे स्त्रीरूपातील गणपतीची. याला सर्वसामान्यपणे वैनायकी असेही म्हणतात. ‘वैनायकी’ हे नाव ऐकून अनेकांना वैनायकी चतुर्थी जरूर आठवली असेल.

मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावर चालू लागले की गाभाऱ्याच्या बाहेरच्या बाजूला अगदी समोरच वर पाहिले असता या मूर्तीचे दर्शन घडते. तीन मातृकांच्या समुहात स्त्रीरूपातील गणपतीचा समावेश केलेला आपल्याला आढळून येतो. प्राचीन वाङ्मयात चौसष्ट योगिनींच्या यादीत या गणेशाचा ‘वैनायकी’ असा केलेला आढळतो. तसेच या देवतेस ‘विनायकी, लंबोदरी, गणेश्वरी अशा नावांनीसुद्धा संबोधले जाते. वेरूळच्या कैलास लेण्यात सुद्धा अशा प्रकारचे शिल्प आढळते. भुलेश्वर येथील वैनायकी ही शिल्पे पद्मासनात बसलेली असून सालंकृत आहे तसेच खाली मूषक सुद्धा आहे. एका प्राचीन ग्रंथात हिचा उल्लेख शक्तीगणपती असा सुद्धा केला गेला आहे. अंबेजोगाई येथील मंदिरात सुद्धा अशा प्रकारची वैनायकी दिसून येते. महाराष्ट्रात ज्या सात मातृका प्रसिद्ध आहेत त्यात वैनायकीचा समावेश गणपतीची शक्तीदेवता म्हणून केला गेला आहे. तर ही एक वेगळी मुर्ती पाहण्यासाठी भुलेश्वरची भेट अगदी मस्ट ठरते.
जायचे कसे- पुणे-हडपसर-यवत-भुलेश्वर हे अंतर साधारणपणे ५५ किमी आहे. तसेच पुण्याहून सासवडमार्गे सुद्धा एक रस्ता भुलेश्वर येथे जातो. गाडी थेट मंदिराजवळ जाते.२. त्रिशुंड गणपती-
नावातच सारे काही असणारा हा गणपती पुण्यातील सोमवारपेठेसारख्या भर वस्तीत वसला आहे. त्री म्हणजे तीन आणि शुंड म्हणजे सोंड. तीन सोंडा असलेला गणपती तो त्रिशुंड गणपती इतका साधा सरळ अर्थ. त्रिशुंड गणपतीचे मंदीर हा पेशवाईतील सुंदर वास्तुकलेचा नमुना तर आहेच परंतु या मंदिरातील गणेशाची ही मूर्ती आणि तिचे भाव तर आवर्जून पाहण्यासारखे आहेत.
मंदिराच्या गाभाऱ्यात असलेली गणेश मूर्ती अत्यंत सुंदर आहे ह्या मूर्तीचे वैशिष्ट्य  म्हणजे या गणेशमूर्तीला एक मुख, तीन सोंडा, सहा हात आणि मोरावर आरूढ असलेली हि सुंदर मूर्ती नेत्रदीपक आहे. हि मूर्ती संपूर्ण शेंदुर्चर्चीत आहे  या मूर्तीमध्ये शेजारी रिद्धी देखील बसलेली दाखवली आहे. या गणेशमूर्तीला तीन सोंडा दाखवल्या असून एक सोंड हि मोदकपात्रास स्पर्श करताना दिसते, दुसरी सोंड हि पोटावर रुळताना दिसते तिसरी सोंड हि  रिद्धीच्या हनुवटीवर आहे असे आपल्याला दिसून येते. या सुबक गणेशमूर्तीस सहा हात असून वरच्या बाजूच्या डाव्या हातात परशु धरलेला आपल्याला दिसतो, खालच्या उजव्या हाताकडे पाहिले असता मोदकपात्र धरलेले आपल्या पहावयास मिळते, मधल्या उजव्या हातामध्ये शूल बघायला मिळते, वरच्या उजव्या हातामध्ये अंकुश बघायला मिळतो, मधल्या डाव्या हातामध्ये पाश बघायला मिळतो, तसेच खालचा डाव्या हाताने डाव्या बाजूच्या मांडीवर बसलेल्या रिद्धीला आधार दिलेला आपल्याला पहावयास मिळतो. अशी हि सुंदर गणेशमूर्ती अगदी पाहवत राहावी अशीच आहे.
जायचे कसे- पुण्यातील सोमवार पेठेत नागेश्वर मंदिराशेजारीच हे मंदीर आहे.३. पर्वत उर्फ हडसर किल्यावरील देखणी गणेश मूर्ती-
जुन्नर हे नाव घेतले कि पहिले नाव समोर येते ते शिवनेरी किल्याचे आणि शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानाचे. या शिवनेरी किल्याच्या प्रभावळीमध्ये अनेक जीवधन, चावंड, हडसर, निमगिरी यांसारखे  बलाढ्य किल्ले उभारले गेले. यातील हडसर हा किल्ला शिवनेरी किल्यापासून अगदी जवळ असणारा परंतु अतिशय भक्कम किल्ला. ट्रेकर लोकांच्या आवडत्या अशा या किल्ल्यावर जे शंकराचे मंदिर आहे त्या मंदिराच्या डाव्या बाजूच्या कोपऱ्यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण गणपतीचे शिल्प बघायला मिळते. चतुर्भुज असलेली हि मूर्ती देखणी आहे. या मूर्तीच्या डाव्या वरच्या हातामध्ये परशु आणि उजव्या हातामध्ये देखील परशु बघायला मिळतो तसेच डावा हात हा डाव्या मांडीवर ठेवलेला आढळतो आणि उजव्या हातातील मोदक सोंडेने खाताना आपल्याला दिसते या मूर्तीचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या मूर्तीच्या चारही हात, पाय, आणि मुकुटावर माळांची नक्षी आपल्याला बघावयास मिळते. तसेच डोक्यावर नागाचा फणा देखील कोरण्यात आलेला आपल्याला बघायला मिळतो.

जायचे कसे- पुणे-जुन्नर-हडसर हे अंतर साधारणपणे १३० किमी आहे. मुंबईवरून येणारे पर्यटक हे माळशेज घाट मार्गे जुन्नर येथे येऊ शकतात.


४. कर्जत जवळील कडावगावचा ' दिगंबर सिद्धीविनायक'-

कर्जत तालुका हा रायगड जिल्ह्यातील निसर्गरम्य परिसर. हा परिसर आजही हिरवाईने नटलेला आहे. एका बाजूला अगदीच हाकेच्या अंतरावर मुंबई सारखे महानगर तर एका बाजूला अगदी सख्खे शेजारी असलेले ' शेखरू ' खारी साठी आणि बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक प्रसिद्ध असलेले भीमाशंकर. याच तालुक्यामध्ये एक गणेशाचे सुंदर मंदीर आहे आणि ते म्हणजे कडावगावचा ' दिगंबर सिद्धीविनायक'. मंदिराचे आवार अत्यंत मोठा असून मंदिरामध्ये फारशी वर्दळ नसते.

मंदिराच्या द्वारात ' जय-विजय ' सारखे दोन गणपती आपल्याला पहायला मिळतात अत्यंत सुबकरित्या हे गणपती दरवाजाच्या दोन्ही बाजूस कोरलेले आहेत. मंदिराच्या गाभाऱ्यात गेल्यावर आपल्याला गणेशाची सुंदर आणि सुबक पाषाणमूर्ती पहावयास मिळते. ही गणेशमूर्ती बरीच मोठी असून साधारणपणे ३.५ ते ४ फुट इतकी उंची असावी. ही पाषाणातील गणेशमूर्ती ' एकदंतं शूर्पकर्णकम ध्यायेत सिद्धीविनायकमं ' अश्या श्लोकात वर्णन केल्याप्रमाणे आहे म्हणजेच हे दिगंबर गणेशमूर्ती यज्ञोपवितधारी आणि  दिगंबर रूपामध्ये आहे. हे मंदीरसुद्धा फारसे प्रकाशझोतात नसल्याने स्थानिक सोडल्यास फारशी वर्दळ याठिकाणी नसते.

जायचे कसे- पुणे-लोणावळा-खोपोली-कर्जत हे अंतर साधारणपणे १०० किमी असावे. मुंबई येथून तर कर्जत येथे जाण्यासाठी थेट लोकल सेवा आहे.५. वीरगळावरील गणपती किंवा गणेश वीरगळ-

तुम्ही कदाचित हे वाचून म्हणाल की वर तर ठिकाणांची माहिती देत असताना अचानक विरगळ कुठून आला मधेच. वीरगळ या शब्दाचा सोपा अर्थ म्हणजे युद्धात वीरगती प्राप्त झालेल्या वीराचे स्मारक. या स्मारकावर त्या योद्ध्याच्या उपास्य देवतेचे शिल्प कोरण्यात येते. महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी ही देवता प्रामुख्याने महादेव असते पण काही काही ठिकाणी इथे गणपती सुद्धा आढळून येतो. गणेशाचे हे रूप अगदी वेगळे म्हणावे असेच आहे. पुण्यात बाळोबा मुंजा बोळ, नागेश्वर मंदीर, पुण्येश्वर मंदीर तसेच अमृतेश्वर मंदीर समूह या ठिकाणी अशा प्रकारचे गणपती कोरलेले आढळून येतात. पैकी नागेश्वर आणि अमृतेश्वर येथील गणपती हे स्मारकशिला म्हणावी अशाप्रकारच्या स्तंभांवर कोरलेले आहेत तर पुण्येश्वर व बाळोबा मुंजा बोळ येथील गणपती हे एका विरगळ वर कोरलेले दिसून येतात. खरे सांगायचे तर ही ठिकाणे सामन्यांच्या स्मरणात देखील राहणार नाहीत परंतु महाराष्ट्रात गणपतीचे महत्त्व कालानुरूप कसे वाढत गेले हे सांगणारी ही उदाहरणे निश्चितपणे आहेत.  महाराष्ट्रात याव्यतिरिक्त अनेक ठिकाणी विविध प्रकारचे गणपती आढळून येतात. मग तो आव्हाणेचा निद्रीस्त गणपती असेल किंवा गणपती गडद लेण्यांमधील असेल, हरिश्चंद्रगडावरील तांत्रिक गणपती असेल किंवा लेण्याद्रीमधील ओबडधोबड गणपती असेल. यासर्व मूर्तींच्या ठिकाणी भक्तीभाव मात्र सारखाच. पण हल्लीच्या देवस्थानांमधील ओसंडून वाहणारी गर्दी पहिली की मग वाटते की आपण या देवाला मोकळा श्वास सुद्धा घेऊ देत नाही तर तो आशीर्वाद तरी मोकळेपणाने देईल का!? मग अशावेळी अशा अनगड आणि तुलनेने कमी प्रसिद्ध ठिकाणे असलेले देव जास्त आवडायला लागतात. देव आणि भक्त यांच्यामध्ये एक आंतरिक संवाद असतो तो केवळ अशाच ठिकाणी होऊ शकतो. त्यामुळे मनाच्या शांततेसाठी तरी किमान गर्दी टाळून हे आगळे वेगळे गणपती पाहण्यासाठी नक्की भेट द्यावी!!


___________________________________________________________________

एका महत्वाच्या तसेच अनेकांच्या मनात कुतूहल असलेल्या विषयाबद्दल व्याख्यान आयोजित केले आहे. तोफांच्याबद्दल नवीन माहिती ऐकायला मिळेल ही खात्री बाळगा. खालच्या फोटोमध्ये नंबर दिला आहे त्यावर मेसेज करून जागा बुक करा कारण जागा मर्यादित आहेत. You Might Also Like

5 comments

 1. महाराष्ट्रातील आगळे वेगळी गणपती -> આગલો વેગલો ગણપતિ

  ReplyDelete
 2. फारच अभ्यासपूर्ण.

  ReplyDelete
 3. कडावचया गणपतीला किती वेळा गेलेआहे पण ही माहिती नवीन.खूप छान नवीन माहिती. धन्यवाद 🙏

  ReplyDelete
 4. Very well written ..especially last paragraph👌👍

  ReplyDelete

$(document).ready(function(){ $('#mscontent').css('opacity','0'); });