सातवाहन राजघराण्याचा इतिहास- भाग १

  • November 13, 2018
  • By Shantanu Paranjape
  • 0 Comments

प्रसिद्ध नाणेघाट
Photo Courtesy-  http://www.misalpav.com/node/19215

सातवाहन मालिकेमधला हा तिसरा लेख! आधीच्या लेखांना उत्तम प्रतिसाद दिलात त्याबद्दल सर्व वाचकांचे मनापासून आभार!! तर तिसरा लेख हा राजघराण्याविषयी असणार हे आधीच ठरलेले असल्याने लिहिणे हे भागच आहे. असो! तर सातवाहन घराण्याविषयी आपल्याला अनेक साधनांमध्ये मिळते आणि ती साधने कोणती हे आपण मागच्या लेखात पहिलेच. या लेखात राजघराणे कसे होते ते पाहण्यासाठी हल नावाच्या सातवाहन राजाने लिहिलेल्या गाथा सप्तशती या ग्रंथाचा आधार घेऊ. मग पुढे जमल्यास नाण्यांमधून किंवा शिलालेखांमधून कळणारे राजघराणे असा विषय घेता येईल.

सातवाहन घराणे हे महाराष्ट्रातले पहिले ज्ञात राजघराणे आणि ज्यांचा साम्राज्यविस्तार प्रचंड झाला आणि सुमारे ४०० वर्षे यांचे दायित्व कायम राहिले असे पराक्रमी व थोर म्हणता येईल. व्यापारास दिलेले उत्तेजन असो, धार्मिक सहिष्णुता असो किंवा राजकीय पटलावर केलेल्या चाली असोत, यांचे कर्तुत्व सगळीकडे उजळलेले दिसून येते. आपण पहिल्या लेखात पहिले की पुराणात यांचा उल्लेख हा आंध्रभृत्य असा येतो आणि त्याचा नेमका अर्थ काय हे सुद्धा पहिले. त्यामुळे उगाच त्यावर वेळ न घालवता आपण मूळ विषयाकडे जाऊ!!


नाणेघाटातील भलामोठा लेख

नाणेघाटातील भलामोठा लेख
Photo Credits- Google Images
सातवाहन राजघराण्याबद्दल आपल्याला माहिती मिळते ती नाणेघाटामधील नागनिका/नायनिकेचा लेख, पुराणे, इतर लेण्यांमधील शिलालेख, हल गाथासप्तशती, सातवाहनकालीन नाणी आणि पुराणे. या सर्वांमध्ये सुद्धा अनेक मतभिन्नता आहे. मुळात या प्रकरणाची सुरुवात इथून होते की याला सातवाहन हे नाव का पडले? महाराष्ट्रात प्रत्येक गोष्टीला दंतकथा आहे आणि हे सुद्धा याला अपवाद नाही. याबाबत अनेक विद्वानांनी आपापले डोके चालवून मत मांडले आहे आणि त्या सर्व मतांचे संकलन मिराशी यांनी आपल्या पुस्तकात अगदी सविस्तर दिले आहे. त्यातील काही उल्लेख हे फक्त मी इथे मांडतो आणि ते उल्लेख कुठून आले याचे नाव.

  ü  त्या वंशातील राजांनी इतर राजांना वाहने दिली होती किंवा इतर राजांनी या वंशाला वाहने दिली होती.
  ü  ते सूर्याचे उपासक होते कारण सूर्याच्या रथाला सात घोडे असतात म्हणून सातवाहन
  ü  सात नावाचा एक यक्ष होता. तो आपणापासून झालेल्या एका ऋषीकन्येच्या मुलाला सिंहाचे रूप धारण करून पाठीवर बसवून     नेत असे म्हणून सातवाहन- ‘कथासरीत्सागरा’

अशा प्रकारची अनेक मते आढळतात अर्थात त्यांना संदर्भाचा काडीचाही आधार नाही त्यामुळे सातवाहन हे नाव का पडले वगैरे याच्यात वेळ घालवण्यात काही अर्थ नाही. आपण लक्षात इतकेच ठेवले पाहिजे की यांच्यानंतर या वंशाला सातवाहन हे नाव मिळाले व पुढ त्याचे शालिवाहन असे झाले.
वाशिष्ठीपुत्र सातकर्णी याचे नाणे
Reference- www.indianetzone.comसातवाहन हे कोणत्या जातीचे होते?

मुळात हे सांगण्यामागे त्यांची जात काढण्याचा अजिबात हेतू नाही. कारण हल्लीच्या वातावरणावरून तसा समज अनेक जण करून घेतील. नाशिक मधील लेणी क्रमांक ३ मध्ये व्हरांड्यााच्या मागील भिंतीवर दरवाज्याच्या वरील बाजूस असणाऱ्या लेखात याचा उल्लेख आढळतो. या या लेखामध्ये गौतमीपुत्र सातकर्णी याच्याबद्दल वर्णन आलेले आहे. या लेखातील सातव्या ओळीवरून आपल्याला गौतमीपुत्र सातकर्णी याचे कूळ कळते. ‘एककुसस एकधनुधरस एकसूरस एकबम्हणस राम’ याचा अर्थ ‘असामान्य नियन्ता, अप्रतिम धनुर्धर, अद्वितीय योद्धा, अनुपम ब्राह्मण होता. हा संपूर्ण लेख मिराशी यांनी आपल्या पुस्तकात छापला आहे. या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजे की समाजात बंडाळी माजलेली असताना या वंशाने हातात तलवार घेतलेली दिसते आणि त्याचेच अनुकरण पुढे अनेक वर्षांनी मराठ्यांच्या इतिहासात झाले. असो! पण त्याकाळचा ब्राह्मण समाज हा तितका कर्मठ नव्हता हे त्यानी दुसऱ्या जातीतील केलेल्या विवाहांवरून स्पष्ट होते. नागनिका तसेच महाक्षत्रप रुद्रदमन याची कन्या या काही ब्राह्मण नव्हत्या.  

मातृसत्ताक सातवाहन?

आजकाल हा प्रचार खूप ठिकाणी केला जातो की सातवाहन हे मातृसत्ताक होते कारण त्यांनी त्यांच्या नावाच्या आधी गौतमीपुत्र किंवा वशिष्ठीपुत्र वगैरे लावले. तर इथे लक्षात घेतले पाहिजे की ही पद्धत भारतात अनेक ठिकाणी दिसून येते, अगदी उदाहरण घ्यायचे झाले तर ‘देवकीपुत्र कृष्ण’ किंवा सांची येथील मोगलीपुत, कोसिकीपुत त्यामुळे अधिक पुरावे मिळाल्याशिवाय आपण सातवाहन हे मातृसत्ताक होते असा अर्थ लावणे चुकीचे आहे. मात्र हे नक्की आहे की त्या काळात स्त्रीयांना समाजात मानाचे स्थान होते आणि हे नाणेघाटात कोरलेल्या नायनिकेच्या लेखावरून किंवा बलश्रीच्या नाशिक येथील लेखातून दिसून येते.


सिमुको सातवाहनो


सातवाहन कुळातील पहिला राजा कोण असा आपल्याला नेहमी प्रश्न पडतो. या कुळाचा संस्थापक कुणीतरी सातवाहन नावाचा माणूस असणार हे नक्की पण पुढे नावाचे आडनाव कसे झाले याचे उत्तर नाही मिळत. या सातवाहन राजाने सिमुक सातवाहन राजा होण्याच्या आधी स्वतंत्र होऊन आपल्या नावाची नाणी पाडली असे म्हणतात. ही नाणी औरंगाबाद, नेवासे या ठिकाणी मिळाली आहेत. 

Roaring lion standing left facing yupa (sacrificial altar), with Brahmi legend 'Siri Satavahanasa' above and 3-arched hill belowRef: www.vcoins.com

त्यामुळे सिमुक सातवाहन हा सातवाहन घराण्याचा मूळ कर्ता नक्कीच ठरत नाही. सातवाहन याच्या नंतर पुढे कधीतरी हा सिमुक गादीवर आला असावा असे वाटते. याचा उल्लेख नाणेघाटात असणाऱ्या नायनिकेच्या लेखात येतो. नाणेघाटात या सर्व राजांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत आणि त्याच्या खाली त्यांची नावे दिलेली आहेत. तिथे याचा उल्लेख ‘सिमुक सातवाहनो’ असा आलेला आहे. या राजाने खुप मोठा पराक्रम गाजवला हे नाणेघाटातील लेखावरून कळून येते. नायनिका ही एका शूर, वीर व अजिंक्य राजाची स्नुषा होती असे वर्णन नाणेघाटात आलेले आहे. या लेखाचा बराच भाग हा उडाला आहे, तो जर मिळाला असता तर कदाचित या सिमुकाबद्दल अधिक माहिती मिळू शकली असती. पुराणात सुद्धा याच सिमुकापासून वंशावळ सुरु झाल्याचे दिसून येते. सिमुकानंतर काही वेळ श्री सातकर्णी मोठा होईपर्यंत सिमुकाचा भाऊ कृष्ण याने सत्ता सांभाळली होती. या कृष्णाचा उल्लेख हा नाशिकच्या लेण्यात आढळतो तो म्हणजे ‘सातवाहनकुले कन्हे राजिनि’. सातवाहन कुळात कृष्ण नावाचा राजा राज्य करत असताना समण नावाच्या एका माणसाने हे लेणे कोरले असा त्याचा अर्थ.


तर इथून झाली सातवाहन नावाच्या एका अध्यायाला सुरुवात. याच्या पुढील भागात मी उरलेल्या इतर राजांची माहिती देण्याचा प्रयत्न करेन. पण त्याधी थोडी तुमच्या डोक्याला चालना देण्यासाठी म्हणून सातवाहन कुळातील राजांची वंशावळ देतो आहे. ही वंशावळ मिराशी यांच्या पुस्तकातील आहे तसेच श्री. जोगळेकर यांनी त्यांच्या पुस्तकात दिलेली वंशावळ सुद्धा सोबत देत आहे. 
  1. हे फोटो श्री जोगळेकर यांच्या गाथा सप्तशती या पुस्तकातील आहेत. त्यांनी प्रत्येक राजाचे सुंदर विश्लेषण केले आहे


१.      2. ही वंशावळ ही मिराशी यांनी त्यांच्या ‘सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप यांचा इतिहास व कोरीव       लेख’ या  पुस्तकात दिली आहे. 


You Might Also Like

0 comments

$(document).ready(function(){ $('#mscontent').css('opacity','0'); });