छोटेखानी भटकंती भाग १ - औरंगाबादची नहर-ए-पाणचक्की

  • January 18, 2019
  • By Shantanu Paranjape
  • 0 Comments

आजपासून ब्लॉगवर छोटेखानी भटकंती हे सदर चालू करतो आहे. यात सर्व कुटुंबीयांना घेऊन जाता येईल अशा एक प्रेक्षणीय स्थळाची अगदी नेमकी माहिती अगदी थोडक्यात देता येईल अशा स्वरूपात लिहिण्याचा मानस आहे. अनेक वाचकांनी मेसेज करून कळवले की लेख थोडे छोटे करता आले तर करावेत कारण वाचायला फारसा वेळ मिळत नाही. त्यामुळे ५ ते १० minutees मध्ये वाचता येईल असे लेख अधून मधून लिहित जा! त्यामुळेच हा प्रपंच..

तलाव

प्राचीन काळातील काही गोष्टी आपल्याला अगदी चक्रावून टाकतात. आपल्या पूर्वजांकडे विज्ञानाचे प्रचंड ज्ञान होते आणि त्याचा उपयोग ते रोजच्या व्यवहारातील गोष्टी पार पाडण्यासाठी करत असत याचा प्रत्यय आपल्याला जागोजाग येत असतोच. असाच एक प्रयोग औरंगाबाद शहरात असलेल्या पाणचक्की मध्ये केला आहे.

सुमारे चारशे वर्षांपूर्वी मलिक अंबर या महान सेनापतीने औरंगाबादमध्ये नहरींच्या माध्यमातून पाणी आणले आणि शहराला पाणी पुरवले. त्या योजनेला 'नहर-ए-अंबरी' असे म्हणत असत. त्यांनतर त्यानंतर १७व्या शतकाच्या उत्तरार्धात 'नहर-ए-पाणचक्की'ची बांधणी करण्यात आली. फिरत्या पाण्यात प्रचंड उर्जा असते आणि त्यातून दगडी जाते सुद्धा फिरवले जाऊ शकते ही अभिनव कल्पना त्याकाळातील अभियंत्याच्या डोक्यात आली. नहर-ए-पाणचक्कीचा उपयोग हा प्रामुख्याने दळणाचे जाते फिरवण्यासाठी केला जात असे आणि त्यातून धान्य दळण्यात येत असे.

जाते

जाते

असे म्हणतात की बाबा शहा मुसाफिर यांनी हे बांधकाम दोन वर्षात पूर्ण केले. या पाणचक्कीसाठी सुमारे चार मैलांवरून नहरीच्या माध्यमातून पाणी आणण्यात आले आहे. हे पाणी सायफन पद्धतीने भिंतीवर नेण्यात येते व तेथून जाते फिरविण्यासाठी आवश्यक असलेले पाणी तेवढे खापराच्या पाइपद्वारे वळवण्यात येवून उरलेले पाणी खाली असलेल्या हौदात पडते.

पुर्वीच्या काळी ही पाणचक्की हा यात्रेकरूंचा थांबा असे. तिथे त्यांच्या भोजनाची व राहण्याची व्यवस्था केली जात असे.  मक्का, मदिना यांच्या यात्रेबरोबरच बंगाल, ओडिशा, आणि हैदराबादकडे जाणारे यात्रेकरू पाणचक्कीत थांबत असत. त्यांच्या निवास, भोजनाची व्यवस्था पाणचक्कीत करण्यात येत असे. दगडी जात्यावर तयार करण्यात आलेले पीठ त्यासाठी वापरले जात होते. असे म्हणतात की या पाणचक्कीच्या इथे मोठे ग्रंथालय होते आणि अनेक विद्यार्थी इथे अभ्यास करण्यासाठी येत असत. त्यामुळे या जागेला बरेच महत्व प्राप्त झाले होते. अभियांत्रिकीचा अविष्कार आणि पाण्याचे व्यवस्थापन कसे करावे याचा एक उत्कृष्ठ नमुना म्हणून या पाणचक्कीकडे पाहिले जाते. ही पाणचक्की पाहण्यासाठी देशी विदेशीचे पर्यटक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात.

पाणचक्की परिसर

पाणचक्कीची नहर आजही काही अंशी सुस्थितीत आहे. उन्हाळ्यात या नहरीचे पाणी बंद होते. पावसाळा सुरू झाल्यानंतर नहरीतून पाणी वाहू लागते. त्यामुळे पाणचक्कीत पाणी येते. पाणचक्की पाहण्यासाठी देशी-परदेशी पर्यटक मोठ्या संख्येने येतात. दरवर्षी राज्यभरातून अनेक शाळांच्या सहली पाणचक्की पाहण्यासाठी येतात. त्यामुळे उन्हाळ्यात पंपाद्वारे पाणचक्कीच्या भिंतीवर पाणी चढविण्यात येते. सध्या महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाकडे पाणचक्कीची व्यवस्था आहे.

© 2018, Shantanu Paranjape

You Might Also Like

0 comments

$(document).ready(function(){ $('#mscontent').css('opacity','0'); });