छोटेखानी भटकंती भाग २ - एका युगपुरुषाची प्रदक्षिणा (किल्ले रायगड) Fort Raigad

  • January 19, 2019
  • By Shantanu Paranjape
  • 3 Comments

रायगड!!!!! स्वराज्याची अभिषिक्त राजधानी! जंगली श्वापदे सुद्धा जायला घाबरतील इतके दाट जंगल आणि आसमंताला सुद्धा लाजवेल अशी उंची लाभलेला रायगड!! महाराष्ट्रातील तमाम ट्रेकर जनतेचे श्रद्धास्थान असलेला रायगड!! एकवेळ विशेषणे कमी पडतील पण रायगडाचे वर्णन करता येणार नाही! सह्याद्रीरूपी मंदिराचा हा जणू काही गाभाराच. अशा या रायगडाला प्रदक्षिणा मारण्याचे पुण्य काही वेगळेच. प्रदक्षिणा मारताना हे जंगल एक वेगळाच अनुभव देऊन जाते! इथली प्रचंड शांतता, मधूनच घुमणारी पक्ष्याची सुरेल शीळ, पूर्वेला दिसत असणारे सह्यकडे, उजवीकडे अंगावर येणारे टकमक टोक आणि रायगडाचे सर्व बाजूने होणारे दर्शन!

Raigad Fort
Image Credit - www.google.com

महाड मधील युथ क्लब महाड नावाची एक संस्था गेली २५ वर्षे सातत्याने राज्यस्तरीय प्रदक्षिणेचे आयोजन करते तेव्हाच काय ते इथे जाता येते. अन्यथा या जंगलात शिरणे म्हणजे अवघडच!! “येता जावळी, जाता गोवली” हे चंद्ररावाचे वाक्य कानात ठेवूनच आपण चित दरवाजाच्या इथून खाली रायगडवाडी कडे जाणाऱ्या रस्त्यावरून प्रदक्षिणेला आरंभ करतो. सुरुवातीला हा मार्ग शेताडीमधून जातो. सकाळच्या कोवळ्या उन्हात कोकणदिवा अगदी चमकत असतो. वरच्या बाजूला घाटावर राजगड आणि तोरण्याचे टोक दिसत असते.. एकंदरच सुरुवात झकास झालेली असते. मजल दरमजल करत आपण थोड्या झाडी मध्ये शिरायला लागतो. एक तीन ते चार किमी चालून झाले की रायनाकाचे स्मारक लागते. ही आपली पहिल्या विश्रांतीची जागा!! स्मारकाबद्दल माहिती देणारा फलक येथे युथ क्लब महाड यांनी लावलेला आहे!!
 
हा रायनाक म्हणजे विठ्ठल यशवंत पोतनीसांच्या सैन्यातील नाईक होय. या विठ्ठल यशवंत आणि माधवराव पेशवे यांचे सख्य नव्हते. शाहू महाराजांकडून या पोतनीसांना रायगड, पाचाडचा कोट आणि महाड परिसराची जहागीरी मिळाली होती. पुढे पेशव्यांनी यांना आज्ञा केली की किल्ला त्यांच्या ताब्यात देऊन हाताखाली कारभार करावा. पुढे माधवरावांचे निधन झाले व काही वर्षानी नारायणरावांनी रायगड मोहीम हाती घेतेली तेव्हा पोतनीस आणि पेशवे यांच्यात युद्धाचा प्रसंग झाला. त्यात रायनाकने मोठा पराक्रम गाजवला. पुढे पेशव्यांच्या ताब्यात गेल्यावर याचा टकमक टोकावरून कडेलोट केला. पुढे पोतनीसांच्या वारसदारांनी या वीराचे स्मारक अगदी टकमक टोकाच्या खालीच बांधले.
  
Takmak Tok
Takmak Tok  by Purushottam Pawar

रायनाकला वंदन करून आपण पुढे निघतो. वाटेत दिसणारी जैवविविधता यांचा आस्वाद घेत आणि रायगडाची विविध रूपे पाहत आपण दाट जंगलात शिरत असतो इतक्यात वाघोली खिंड आली रे अशी कुणी तरी आरोळी देतं. वाघोली खिंड हा या प्रदक्षिणेतील महत्वाचा टप्पा. हा पार केला की प्रदक्षिणा झालीच म्हणून समजा. खडा आणि भरपूर चढ ही या खिंडीची खासियत. वर जाईपर्यंत अगदी थकायला होते. जवळपास ७० डिग्री असणारा हा चढ अगदी अंत बघतो. वाघोली खिंड चढल्यावर विश्रांती ही अगदी मस्टचं. त्या चिंचोळ्या जागेत वाऱ्याशिवाय बसताना घामानी अगदी अंघोळ होते. आता इथून पुढे उतार चालू होतो.

उतारावर कारवीच्या झाडांशिवाय दुसरा आधार काहीच नसतो. त्यामुळे त्या बारक्या पण अतिशय घट्ट अश्या कारवीच्या रोपांना उतरतच आपण खाली उतरतो आणि पुढच्या वाटेला लागलेलो असतो. वाघोली खिंडीनंतरचा रस्ता तसा सुसह्य आहे. बरासचा रस्ता हा जंगलामधून जातो!! बरेसचे चालल्यावर डावीकडे पोट्ल्याचे डोंगर लागतात. हेच ते डोंगर जिथून इंग्रजांनी रायगडावर तोफगोळ्यांचा मारा केला होता आणि रायगड शरण आला होता. रायगडाच्या अभेद्य संरक्षणाला हे पडलेलं भगदाड असे म्हणायला हरकत नाही. अजून थोडेसे चालल्यावर उजव्या बाजूला वाघ दरवाजा दिसतो.

Karvi Flower
Karvi Flower

इतिहासात याच वाघ दरवाज्याने राजाराम महाराजांनी पलायन केल्याचे जेव्हा आपण वाचतो तेव्हा त्या राजांना मनातून सलाम ठोकतो. तो कडा उतरायला केवळ अशक्य आहे. खाली येण्यासाठी बकरीची वाट आहे असे ऐकले आहे. पण खालून तर नुसता सरळसोट कातळ यापेक्षा काहीच दिसत नाही. इथून दोन ते तीन किमी चालल्यावर आपला जंगलाचा पट्टा संपतो आणि यापुढे आता थकवणारा भाग येतो तो म्हणजे डांबरी रस्ता. अजून तीन ते चार किमीचे अंतर बाकी असते. आधीच चौदा-पंधरा किमी चालून झालेले असते आणि दुपारचे साधारण दीड वाजलेले असतात. त्यामुळे उरलेले अंतर हे कोकणातले दुपारचे कडक उन सहन करत पार पडायचे असते. पण एकंदर हवाहवासा असा हा अनुभव. रायगड हा देव आणि देवाला प्रदक्षिणा मारण्याचे पुण्य आयुष्यात एकदा तरी पदरी पडावे असेच आहे.जायचे कसे-

जाणारा रस्ता हा चित दरवाज्यापासून खाली उतरतो. त्यामुळे अगदीच जायचे असेल तर पावसाळा सोडून जावे. शक्यतो जानेवारी-फेब्रुवारी हा महिना उत्तम. प्रदक्षिणा ही सकाळी लवकर चालू करावी, अन्यथा जंगलात चुकण्याचा चान्स वाढेल. त्यासाठी महाड stand वरून सकाळी ४.३० ची बोरीवली-सांदोशी गाडी आहे जी आपल्याला पाचाड गावात नेऊन सोडते.

जायचे कसे-
रायगड येथे जाण्यासाठी पुणे-भोर-महाड-पाचाड असा मार्ग आहे किंवा पुणे-ताम्हिणी-माणगाव-महाड असा सुद्धा रस्ता आहे. दोन्ही मार्ग सोयीस्कर आहेत. पुणे ते पाचाड हे अंतर १३० किमी आहे आणि मुंबई ते पाचाड हे अंतर साधारणपणे १७० किमी आहे.

जेवणाची सोय:-
पाचाड तसेच रायगड पायथा मध्ये जेवणाची उत्तम सोय होते.

पिण्याच्या पाण्याची सोय -
पिण्याचे पाणी सोबत नेलेले जास्त चांगले. वाटेत काहीही मिळत नाही.

विशेष टीप-
पावसाळ्यात जाणे टाळावे कारण रस्ता सापडत नाही. शक्यतो वाटाड्या सोबत घ्यावा.© 2018, Shantanu Paranjape

You Might Also Like

3 comments

$(document).ready(function(){ $('#mscontent').css('opacity','0'); });