वीरगळांवरील नौकायुद्ध

  • January 15, 2019
  • By Shantanu Paranjape
  • 1 Comments

मागील दोन लेखांमध्ये आपण वीरगळावर कोरलेल्या समरप्रसंगांबाबत माहिती घेतली. ते चार प्रसंग कोरलेले वीरगळ महाराष्ट्रात ठिकठीकाणी आढळतात. त्यामुळे अशा प्रकारच्या वीरगळांमध्ये फारसे नावीन्य आढळून येत नाही. किंबहुना भारतात जे वीरगळ आढळले आहे त्यात सुद्धा अनेक ठिकाणी ही जमिनीवरचीच युद्धे दाखवण्यात आली आहेत. पण गोव्यामधील पुरातनशास्त्रविभागाच्या संग्रहालयात ठेवलेला वीरगळ किंवा बोरीवलीमधील एकसर येथील वीरगळ, यांवर नौका युद्धाचा प्रसंग कोरलेला आहे. गोवा येथील वीरगळ हा कदंबांच्या काळातील म्हणजे १०व्या शतकातील तर एकसर येथील वीरगळ हा ११व्या शतकातील मानला जातो. तसेच यानंतर गुजरात मध्ये साधारण अठराव्या शतकातला एक वीरगळ आढळला आहे ज्यावर याप्रकारचा प्रसंग कोरला आहे. असे आत्तापर्यंत ज्ञात तीन ते चार वीरगळ आपल्याला मिळाले आहेत. त्यातील एकसर येथील वीरगळासंबंधी माहिती आपण आज घेणार आहोत.
भारतात आरमार किंवा होडी उभारणे ही संकल्पना काही नवीन नाही. प्राचीन काळात व्यापारासाठी या होड्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर होत होता. अगदी सातवाहन काळात सुद्धा उत्तर कोकण किनारपट्टीवर अनेक बंदरे उदयास आली होती. साहजिक शत्रूराष्ट्रे तसेच समुद्री चाचे यांच्या भितीमुळे का होईना परंतु संरक्षणासाठी आरमाराची उभारणी करण्यात येत होती. त्यातून पुढे मग दोन राजांच्या आरमारामध्ये युद्धप्रसंग उद्भवत असावेत. अर्थात अगदी प्राचीन काळाचे पुरावे आपल्याकडे उपलब्ध नाहीत किंवा असले तरी फारसे संशोधन त्या विषयात झाले नाही परंतु साधारण पाचव्या शतकानंतर आपल्याला लेखांच्या स्वरूपात नाविक युद्धाचे पुरावे आपल्याला मिळायला सुरुवात होते.एकसर येथील वीरगळ –

हा वीरगळ बोरीवली जवळील एकसर या गावात आहे. तिथे एकूण ६ वीरगळ आपल्याला दिसून येतात त्यापैकी दोन वीरगळांवर नेहमीप्रमाणे जमीनीवरील युद्ध कोरले आहे तर इतर चार वीरगळांवर नौकायुद्धाचा प्रसंग कोरला आहे. त्यातील एका वीरगळावर एक शिलालेख सुद्धा आहे परंतु तो अगदीच पुसट झाल्याने त्यावर नक्की काय लिहिलंय याचा अंदाज येत नाही. हे दोन्ही वीरगळ हे कोकणच्या आणि पर्यायाने महाराष्ट्राच्या इतिहासाच्या दृष्टीने फार महत्वाचे आहेत. या वीरगळांबाबत दोन प्रवाद इतिहास अभ्यासकांमध्ये आहेत. एक म्हणजे भोजदेव राजाने कोकणावर विजय मिळवला (इसवी सन १०२०) आणि जमीन एका ब्राह्मणाला दान दिली त्याकाळाचे आहेत तर काही अभ्यासक असे म्हणतात की हे वीरगळ शिलाहार काळात उभारले गेले असल्याची शक्यता आहे. कझेन्स नावाचा एक संशोधक होऊन गेला. त्याच्या म्हणण्यानुसार शेवटचा शिलाहार राजा व देवगिरीचा महादेव यादव यांच्यात इसवीसन १२६५ मध्ये यांच्या चतुरंग दलात जे युद्ध झाले त्याचे हे चित्रण आहे. याचा उल्लेख हा हेमाद्री पंडीत याने लिहिलेल्या ‘चतुर्वर्ग चिंतामणी’ या ग्रंथात येते. हेमाद्री म्हणतो की, ‘ शिलाहार राजा सोमेश्वर याला जलमरण आले. कदाचित महादेव राजाच्या क्रोधयुक्त अग्नीपेक्षा समुद्रात बुडून मरणे सोमेश्वरला जास्त योय वाटले असावे”.

एकसर येथील विरगळ

एकसर येथील वीरगळ बघायला गेले तर दिसून येते की काही वीरगळांवर हातघाईची लढाई आहे. तर काही वीरगळांवर नौका आहेत. या नौका वल्ह वापरून पुढे नेल्या जात हे लगेच कळून येते. येथे नौकांवरूनच लढाई चालू असलेली दिसते. कदाचित भाले किंवा बाणांनी लढत असावेत. परंतु यावरून हे लक्षात यायला मदत होते की त्याकाळातील नौदल युद्धे कशा प्रकारची होत असत आणि यातून कळून येते की समुद्रावर वचक ठेवण्याची मानसिकता कोणत्या प्रकारची होती ते. गोवा येथे असलेला वीरगळ सुद्धा थोड्या फार फरकाने असाच आहे. त्यामुळे त्याची माहिती देणे विस्तारभयास्तव शक्य नाही.

एकसर येथील विरगळ

आत्तापर्यंत सापडलेले नाविक युद्धाचे वीरगळ हे फक्त महाराष्ट्रात आणि गोव्यात सापडलेले आहेत. अर्थात अजून तितके संशोधन झाले नाही त्यामुळे आपल्याला कळून येत नाही की नाविक युद्ध हे फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित होते तेव्हाच्या काळात की इतर भारतात सुद्धा अशी युद्ध होत असावीत? शिवाय हा प्रश्न अजूनही अनुत्तरीतच राहतो की प्राचीन काळात नौदल किती पुढारलेले होते. अर्थात सातवाहन काळात बंदरे वगैरे होती परंतु सागरी लढाई वगैरे झाल्याचे उल्लेख कुठे लेखात मिळत नाहीत. त्यामुळे अनेक संभ्रम निर्माण होतात हे खरे. अर्थात जे आहे तेही थोडके नसे!!  

  

संदर्भ- Memorial Stones of India by Mr. Gunther आणि महाराष्ट्रातील वीरगळ- श्री. सदाशिव टेटविलकर
  
____________________________________________________________________________

मला सोशल मिडीयावर फॉलो करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. 

इन्स्टाग्राम - Paranjape_shantanu
फिरस्ती महाराष्ट्राची - Firasti_mh

       

© 2018, Shantanu Paranjape

You Might Also Like

1 comments

  1. Dhaval Ramtirthkar4 December 2019 at 23:18

    अप्रतिम माहिती

    ReplyDelete

$(document).ready(function(){ $('#mscontent').css('opacity','0'); });