पेशवेकालीन मैदानी खेळ - 2

भाग एक इथे वाचा  - भाग १ वरून

कुस्ती या खेळाबाबत पेशवाईतील आणखी एक रंजक वर्णन असणारे पत्र आढळते. हे पत्र ऐतिहासिक लेखसंग्रह भाग ८ मध्ये पृष्ठ क्रमांक ४१५९ वर छापलेले आहे. यात पत्र लिहिणारा म्हणतो, श्रीमंतांच्या वाडयांत पंचमांस जेठी यांच्या लढाया जाहल्या. कर्नाटकांतून पेशजी तीन जेठी आले होते. अडीच महिने रतीब खाऊन बनून गेले. काल कुस्ती झाली. त्यास तिघा जेठयांपैकीं दोघे जेठी यांस येथील शहरांतील तालमेच्या आखाडयांतील गडयांनी चीत केलें एकास मखवा गौळी यानें व एकास कल्ल्या गौळी यानें याप्रमाणें दोघांनी दोघांस चीत केले. एक जेटी कर्नाटकाचा त्याची व आबाजी सुतार यांची कुस्ती जाली. आबाजीस त्यानें चीत केलें. आणखी तालमीचे आखाडयांतील गडयागडयांच्या कुस्त्या जाहल्या. आणखी कर्नाटकाचे पहिलवानास रतीब दिला आहे. मासपक्ष जाहल्यावर आणखी लढाई होईल. या याव्यतिरिक्त थोरल्या माधवराव पेशव्यांनासुद्धा कुस्तीचा भयंकर नाद होता. ते आपल्या आईला लिहिलेल्या एका पत्रात लिहितात, वडिलीं तुह्यांजवळ आज्ञा केली कीं, तालीम न करणे म्हणून वारंवार तुम्हांजवळ आज्ञा झाली. त्यास मला वडिलांचे आज्ञेपेक्षा तालीम अधिक कीं काय? तालीम सोडिली. नमस्कार मात्र घालीत असतो.”


माधवराव पेशवे

   मराठाकाळात तसेच पेशवाईमध्ये कुस्ती खेळणाऱ्या पहिलवानास बक्षिसे दिली जात असत. त्याकाळात पुरुषांबरोबरच स्त्रियांनीसुद्धा ही कला आत्मसात केली होती. मेजर ब्राउटन आपल्या एका पत्रात लिहितो, Great men in India takes pride in having the best wrestlers in their service who are permitted to make use of their horses, elephants etc. Whenever they please nay, to such pitch is this passion for gymnastic exhibition carried, that the act is sometimes practised by women, who study to make their bodies hardy and their flesh firm by following prescribed requirements and go about challenging wrestlers in the different villages through which they pass to try a fall. These amazons sometimes attain to such a degree of proficiency, it is rare for the most experienced of their male opponents to over-throw them. The best wrestlers often decline to engage in these contests from the fear incurring the disgrace of being worsted by women. या उल्लेखावरून असे दिसते की त्याकाळी पुरुष आणि स्त्रियांचे कुस्तीचे सामने लावले जात असत आणि अनेक नावाजलेले मल्ल हे सामने खेळावयास घाबरत असत की न जाणो स्त्रीच्या हातून पराभव झाला तर तोंड दाखवायला जागा राहणार नाही.


हे झाले कुस्ती या खेळाचे काही लिखित उल्लेख. मात्र स्थापत्यशास्त्रात सुद्धा अनेक ठिकाणी दोन मल्ल कुस्ती खेळत आहेत असे दाखवलेले आपल्याला आढळून येते. पेशवेकालीन अनेक मंदिरांमध्ये अशा प्रकारची शिल्पे आपल्याला आढळून येतात. उदाहरण द्यायचे झाले तर मग सासवड येथील चांगावटेश्वर मंदिर किंवा अजिंक्यतारा किल्ला अशा ठिकाणी ही शिल्पे आढळून येतात. ही शिल्पे म्हणजे तत्कालीन सामाजिक जीवनाचे एक प्रतिबिंबच आहेत असे मानायला हरकत नाही. मंदिरातील शिल्पे ही जर एखादी घटना प्रसिद्ध असेल किंवा नेहमीची असेल तरच कोरली जात असावीत असे दिसते. म्हणजे थोडक्यात सांगायचे झाले तर अनेक ठिकाणी रवीने ताक घुसळणाऱ्या स्त्रीचे शिल्प दिसून येते. तर ही अगदी नित्यनियमाने केली जाणारी गोष्ट आहे. त्यामुळे तिचा समावेश मंदिरातील शिल्पात केला आहे. त्याचप्रमाणे पेशवेकालीन महाराष्ट्रात कुस्तीचे सामने ही नेहमीचीच गोष्ट झालेली 
असावी आणि त्यामुल्र त्याचा अंतर्भाव हा मंदिरांमधील शिल्पांमध्ये केला गेला असावा असे वाटते.  १.       वज्रमुठी

कुस्ती व्यतिरिक्त पेशवेकालीन महाराष्ट्रात आणखी एक खेळ प्रसिद्ध होता तो म्हणजे वज्रमुठी. यात मुष्टीयुद्ध आणि मल्लयुद्ध यांचे मिश्रण असे. म्हणजे आजच्या भाषेत सांगायचे झाले तर कदाचित किक बॉक्सिंग सारखा प्रकार हा असू शकतो. हा खेळ श्रीमंत लोक आणि राजघराण्यातील लोक यांच्या मनोरंजनासाठी म्हणून खासकरून खेळला जात असे. या खेळाचे इंग्रजांना सुद्धा आकर्षण होते. मेजर प्राईस नावाच्या एका इंग्रज अधिकाऱ्याने एक ठिकाणी या खेळाचे वर्णन केले आहे. तो लिहितो, “या खेळाडूंच्याविषयी आणि या खेळाविषयी मला असे म्हणावेसे वाटते की, या खेळासाठी नेहमी एक वर्तुळ आकार ७ फूट खोल खाणीत. त्याच्या बाजू जमिनीशी काटकोनात असत व त्याचा परीघ साधारण ३० फूट असे. हौदाच्या तळाशी माती असे. जेठी, लंगोट हे तोकडे वस्त्र सोडल्यास जवळजवळ नग्न असत. त्याच्या हातांच्या बोटात नखांचा आकार दिलेले शिंगांपासून तयार केलेल्या मुठी असत. या क्रीडा प्रकारात कुस्ती व वज्रमुठी या दोघांचाही अंतर्भाव असे. या खेळाडूंना योग्यप्रकारे व काळजीपूर्वक प्रशिक्षण दिलेले दिसून येते. पेशवे हे दृश्य पाहून अतिशय आनंदित झालेले दिसले. शिवाय मुष्टीयोद्धे पेशव्यांचा उल्लेख दख्खन का बादशहा असा पुकारा देऊन मुजरा करत असत त्यावेळी ते बेहद्द खुश होत असत.”

सवाई माधवरावांना हे खेळ अतिशय आवडत असे. त्याच्याकाळात गोविंद जेठी, मीना जेठी व तिम्मा जेठी हे दसऱ्याच्या पोषाखाचे मानकरी होते. या तिघांना अनुक्रमे १५०, १४७ व ९९ रुपये इतक्या किमतीची वस्त्रे प्रदान केली होती. वज्रमुठी हा खेळ अतिशय चुरशीचा असून समोरच्याकडून कितीही मार खायला लागला असेल तरी यातून सहजासहजी माघार घेता येत नसे. याचे कारण म्हणजे सवाई माधव रावांच्या रोजनिशीत एक उल्लेख आहे. त्यात असे लिहिले आहे की, “शिंदे, पोरगे यांच्या वज्रमुठीच्या लढाया लावतात. एखादा थकून पडला तथापि ढालाईताकडून सोडगे मारवावेत. बळेच उभे करून पुन्हा लढवावे. नाकातून तोंडातून रक्त आले तथापि सोडू देत नाही. दोन चार मुले दुखण्यास पडली आहेत.“या दोन खेळांच्या व्यतिरिक्त घोडेस्वारी, तलवारबाजी, पट्टा चालवणे, मलखांब इत्यादी मैदानी खेळसुद्धा महाराष्ट्रात पेशवेकाळात खेळले जात असत. मात्र कुस्ती तसेच वज्रमुठी या खेळांना राजाश्रय मिळाल्याने त्यांना विशेष महत्त्व आले होते इतकेच.     

© 2018, Shantanu Paranjape

_____________________________________________________________________________________

नक्की वाचा - 

विमानांचा शोध लागल्यावर त्या गड किल्ल्यांचे महत्व संपलेले असले तरी इतिहासाच्या दृष्टीने ती आपली स्मारके आहेत आणि त्यांची जपणूक करणे हे अत्यंत महत्वाचे आहे. जपणूक करण्याआधी त्यांचा इतिहास समजून घेणे हे आवश्यक आहे. त्यांचे प्रयोजन काय हे विविध ऐतिहासिक साधनांच्यामधून आपल्याला समजून येते. मात्र ही साधने सर्वांनाच वाचणे शक्य होत नाही त्यामुळेच आम्ही आमच्या संस्थेच्या वतीने घेऊन आलो आहोत ५ दिवसांचा दुर्ग ऑनलाईन दुर्अगभ्यास वर्ग. 

हा दुर्ग अभ्यास वर्ग घेणार आहेत डॉ. सचिन जोशी. सचिन जोशी यांनी महाराष्ट्रातील किल्ल्यांवर PHD केली आहे तसेच त्यांनी काही अंधारात असलेल्या किल्ल्यांचा शोध सुद्धा लावलेला आहे. त्यामुळे त्यांच्या नजरेतून किल्ले समजून घेणे हे महाराष्ट्रातील इतिहासप्रेमींच्यासाठी पर्वणीच आहे. हा अभ्यास वर्ग दिनांक १० ऑगस्ट ते १४ ऑगस्ट असा होईल. याची वेळ संध्याकाळी ७.३० ते ९ अशी असेल. यात तुम्हाला जोशी सरांना प्रश्न देखील विचारता येतील. यासाठीचे शुल्क हे रुपये ५०० आहे

इच्छुक असलेल्या सर्वांनी ८७९३१६१०२८ किंवा ७०२०४०२४४६ या क्रमांकावर Whats app वर संपर्क करावा आणि आपली सीट लवकरात लवकरत बुक करावी. कारण जागा या मर्यादित आहेत आणि अशा संधी पुन्हा पुन्हा येत नाहीत आणि हो जे नाव नोंदणी करतील त्यांच्यासाठी आमच्या इतिहासाच्या शाळेची एक महिन्याची मेम्बरशीप मोफत आहे.  

You Might Also Like

2 comments

$(document).ready(function(){ $('#mscontent').css('opacity','0'); });