पेशवेकालीन मैदानी खेळ - 1

पेशवे काळात आजूबाजूच्या राजकीय आणि भौगोलिक स्थितीमुळे खेळ खेळण्याला चांगलेच महत्त्व आले होते. हे खेळ प्रामुख्याने मर्दानी असत. या खेळांचा उपयोग शरीर सुदृढ करण्यासाठी होत असे. अर्थात सारीपाट सारखे काही बैठे खेळ सुद्धा होते परंतु मुलगा तरुण झाल्यावर त्याची भरती सैन्यात होत असल्याने मर्दानी खेळ खेळण्यावर सर्वांचा भर असे. घोड्यावर बसने, भालाफेक करणे, दांडपट्टा फिरवणे, मल्लखांब इत्यादि खेळांना त्याकाळात महत्त्व प्राप्त झाले होते. राज्यकर्त्यानी सुद्धा या खेळांना प्रोत्साहन दिल्याने या खेळांचा विकास मोठ्या प्रमाणावर झाला. या खेळांचे योगे सर्वसामन्यांचे मनोरंजन सुद्धा होऊ लागल्याने अधिकाधिक व्यक्ति या खेळ खेळण्यास लागल्या. या लेखात आपण पेशवे काळात प्रचलीत असणाऱ्या मैदानी खेळांची माहिती घेऊ.१.  कुस्ती – महाराष्ट्रात आजही प्रसिद्ध असणाऱ्या आणि आज जागतिक स्तरावर जाऊन पोहोचलेल्या या खेळाची मुळे ही इथे महाराष्ट्रातील मातीत घट्ट रुजलेली आहेत. या खेळाचा उदय जरी प्राचीन काळात झालेला असला तरी महाराष्ट्रात याचा प्रसार मराठा काळात तसेच पेशवाईच्या दरम्यान झाला. सैन्यात असलेल्या अनेकांना याची आवड होती त्यामुळे युद्धावर असताना जिथे मुक्कामाची जागा येईल तिकडे आखाडा उभारून कुस्तीचे डाव रंगले जात असत. बाळाजी विश्वनाथ, थोरले बाजीराव तसेच चिमाजी अप्पा यांना मैदानी खेळांची भयंकर आवड होती असे दिसते. त्यानी आपल्याकडे जसे कलाकारांना पदरी ठेवले होते तसेच कुस्ती खेळणाऱ्या जेठीना अर्थात पहेलवान लोकांना सुद्धा आपल्या पदरी ठेवले होते. त्यांना कुस्ती खेळण्यासाठी म्हणून काही तनखा सुद्धा देत असत. अशा प्रकारची पत्रे सुद्धा उपलब्ध झाली आहेत. दुसरा बाजीराव हा तर त्याच्या कुस्ती प्रेमासाठी प्रसिद्ध होताच. सन १८१८ पेशवाई संपल्यानंतर दुसऱ्या बाजीरावाला इंग्रजांनी ब्रह्मावर्त येथे पाठवले पण तिकडे गेल्यानंतर सुद्धा बाजीरावाची ही आवड कायम राहिली. त्याच्या पदरी बाळंभट्ट नावाचा एक कुस्तीगिर होता. त्याने एकदा लखनौचा नवाब वजीद अल्लीशाह याच्याकडून आलेल्या एका प्रसिद्ध कुस्ती पहिलवानाचा पराभव केला होता. याच्यासोबत बाजीरावावाकडे छोटा हरी, बडा हरी असे दोन पहिलवान सुद्धा पदरी होते.

पेशवाईत पहिलवानांना सरकारी तिजोरीमधून पगार सुद्धा दिला जात असे. २५ सप्टेंबर १७३४ रोजीच्या एका नोंदीत दोन पहिलवानाना मिळून महिना १३ रुपये पगार दिल्याचा उल्लेख आहे. त्यापैकी एकाला ६ रुपये तर दुसऱ्याला ७ रुपये इतका पगार होता. ६/७ रुपये पगार हा त्या काळात बराच होता त्यामुळे त्याकाळातील कुस्तीचे असणारे महत्त्व दिसून येते. पण कुस्तीगीराला दिलेला पगार हा प्रत्येकाच्या योग्यतेनुसार दिला जात असे हे एक रुपयाच्या फरकावरून दिसून येते. कुस्तीला महिना तनखा तसेच उत्तम खुराक दिला जात असल्याने अनेक गरीब सामान्य कुटुंबातील मुले याकडे वळली होती. यामध्ये ब्राह्मण तसेच मराठा कुटुंबातील सुद्धा अनेक जण होते.

खर्ड्याच्या स्वारीच्या लढाईतून जेव्हा विजयी वीर पुण्यात परत आले तेव्हा त्याचे वर्णन करताना शाहीर म्हणतो,

पाहून पूर्वापार शिरस्ते | भवानीपेठेपासून रस्ते |
दीपोत्सव शोबती दुरस्ते | शृंगारून गज तुरंग बरस्ते |
शहरामाजी पदार्थ सस्ते | पहिलवान आणि जेठी मस्ते |
खुराक त्यांना बदाम पिस्ते | सदा जिलबीत चालती ||

ब्राउटन नावाचा एक इंग्रज सन १८०९ मध्ये दौलतराव शिंदे यांच्याबरोबर फिरत होता. तो आपल्या एका पत्रात मराठ्यांच्या कुस्तीविषयी असणाऱ्या प्रेमाचे वर्णन करताना एका पत्रात लिहितो की, “सर्व हिंदुस्तानातील लोकांना तालमीचे किंवा कसरतीचे अगदी वेडच आहे म्हटले तरी चालेल. आखाड्यात त्यांचे काही नियम आणि समारंभ ठरलेल असतात आणि ते अत्यंत कसोशीने पाळले जातात. खडक नसलेली मऊ मातीची अशी ऐसपैस जागा, शक्य झाली तर झाडाच्या सावलीत शोधून, ती खणून त्यातला खडानखडा वेचून काढून ती भुसभुशीत करण्यात येते. अशा जागेला ते आखाडा म्हणतात. ते तो फार पवित्र मानतात. त्याच्याजवळ जोडा आणून देत नाहीत. त्याच्या एक टोकास मातीचा ओटा तयार केला जातो. तालमीत येणाऱ्या प्रत्येक त्या ओट्याला मुजरा करून मुठभर माती वाहावयाची असते. तालमीत येणाऱ्या सर्व तालमीबाजांमध्ये जो विशेष सरस लढाऊ पठठा असेल त्यास मोसमापुरता आखाड्याचा ‘खलिप’ नेमण्यात येत असे. ‘खलिप’ म्हणजे व्यवस्थापक आणि शिक्षक.त्याने आखाड्याची झाडलोट करणे, कुस्ती वगैरे खेळ शिकवणे ही कामे करायची असत. आखाड्यातील प्रत्येकाचा लंगोट कसलेला असतो आणि विशिष्ट जातीची पांढरी माती अंगाला फसलेली असते. पहिला व्यायामाचा प्रकार म्हणजे दंड आणि दुसरा म्हणजे कुस्ती. हिंदुस्तानातले लोक या कलेत अत्यंत प्रवीण आहेत. कुस्तीत अर्थात निव्वळ शक्तीपेक्षा कौशल्यावर जास्त भर असतो.“ या पत्रातून आपल्याला कुस्ती या खेळाबद्दलची अत्यंत महत्वाची माहिती मिळते.

किल्ले अजिंक्यतारा येथील शिल्प

नानासाहेबांच्या काळातसुद्धा कुस्तीला बरेच महत्त्व होते. अनेक वेळा कुस्तीचे सामने लोकांचे मनोरंजन म्हणून सुद्धा होत असत आणि त्यात उत्तम कामगिरी केल्यास मोठी बक्षिसी पेशव्यांकडून तसेच छत्रपती यांच्याकडून सुद्धा मिळत असे. नानासाहेब पेशवे यांच्याकडे एक आनंदराव नावाचा पहिलवान होता. एके दिवशी शाहू छत्रपती यांच्याकडे काही कुस्ती खेळणारे जेठी आव्हान घेऊन आले तेव्हा या जेठीचे सामने नानासाहेबांनी आनंदरावाशी लावावेत असे सुचवले. त्या सामन्यात आनंदरावाने त्या जेठीन चारीमुंड्या चीत केले त्यामुळे छत्रपती शाहू महाराज खुश झाले आणि त्यांनी त्या आनंदरावास मोठे इनाम दिले. जसे शाहू महाराज इनाम देत असत त्याचप्रमाणे पेशव्यांनी सुद्धा या पहिलवानाना बक्षिसे दिल्याचे उल्लेख उपलब्ध आहेत. सन १७५४ मध्ये लच्छा व कन्हैय्या या दोन जेठीना कुस्ती केल्याबद्दल २५ रुपये बक्षिसी व त्याच वर्षी आणखी एका जेठीला बक्षिसी दिल्याचे उल्लेख आढळून येतात. अनेक वेळा जर दोन्ही पहिलवान तुल्यबळ असतील आणि बराच वेळ झाल्यानंतर सुद्धा जर कुस्तीच्या डावाचा निकाल लागत नसेल तर दोन्ही पहिलवानांना बिदागी दिली जात असे. सवाई माधवरावांच्या वेळेस एकदा असाच एक कुस्तीचा डाव बरोबरीत सुटला होता. त्यावेळेस त्या दोन्ही पहिलवानांना बक्षिसी दिली गेली होती.

शाहू महाराज
राघोबा दादा यांना सुद्धा कुस्तीचा भयंकर नाद होता. त्यानी आपल्या भावास म्हणजे जनार्दन बाजीराव यांस पत्र लिहून कळवले होते की, “महमदहुसेन आणि ढोल्याची झोंबी लावावी. आज नाना पासी मी बोललो की, महमदहुसेन पाडील. त्यास तीर्थरूप राजश्री भाउस सांगून झोंबी लावून कोण पडतो, कसे होते ते सविस्तर लिहावे. सत्वर झोंबी लावावी. तीर्थरूपास कागद वाचून दाखवून कसे होते ते लिहिणे हे आशीर्वाद.” या पत्रातून राघोबा दादांना सुद्धा कुस्तीची किती आवड होती हे दिसून येते आणि इतकेच नाही तर त्याकाळात कुस्तीच्या सामन्यात कोण जिंकणार यावर पैज लावली जात असल्याचे सुद्धा दिसून येते. आता वरील पत्रच जर आपण घेतले तर यात महमदहुसेन कुस्ती जिंकेल असे राघोबा दादा लिहून पाठवतात.  

पुढील माहिती दुसऱ्या भागात पाहू.
भाग २

© 2019, Shantanu Paranjape

____________________________________________________________________________

मला सोशल मिडीयावर फॉलो करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. 

इन्स्टाग्राम - Paranjape_shantanu
फिरस्ती महाराष्ट्राची - Firasti_mh

You Might Also Like

0 comments

$(document).ready(function(){ $('#mscontent').css('opacity','0'); });