
आज शिवजयंती..! महाराष्ट्राचाच काय तर उभ्या भारताच्या आनंदाचा दिवस. अल्लाउद्दीन खिलजीच्या आक्रमणानंतर दक्षिण भारत सुद्धा मुसलमानी आक्रमणात वेढला गेला तो पुढची ३५० वर्ष जवळपास. या सर्व वर्षांच्या कालखंडात महाराष्ट्राने असंख्य अत्याचार भोगले. धर्मस्थाने भ्रष्ठ झाली, आया बहिणींची अब्रू लुटली गेली, हिंदू जनतेला जबरदस्तीने बाटवण्यात आले, असंख्य लोकांची हत्या करण्यात आली. मुघल, बहामनी, आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही अशा सर्व शाह्यानी इथे अक्षरशः थैमान घातले. समर्थ रामदास यांनी या सर्व प्रसंगाचे वर्णन आपल्या 'अस्मानी सुलतानी' या काव्यात केले आहे.
समर्थ लिहितात,
कितीयेक ग्रामे चि ते वोस जाली।पिके सर्व धान्यें च नाना बुडाली।कितीयेक धाडिवरी धाडी येती। द्वया सैन्यकाचेनी संव्हार होती।।२।।
किती पंथ देशात ते नासले हो।कितीयेक पंथात ते मारिले हो।कितीयेक पंथात ते लुटीले हो। किती दांडगी ते बहु कुटीले हो।।६।।
किती गुज्रिणी ब्राह्मणी भ्रष्टविल्या।किती शांमुखी जाहाजी फाकवील्या।कितीयेक देशांतरी त्या विकील्या।किती सुंदरा हाल होवोनि मेल्या।।९।।
हे सर्व हाल होत असताना एकाही माणसाला इथे चीड आली नाही हे या महाराष्ट्राचे दुर्दैव. इथले सर्व पाटील, देशमुख, वतनदार आपल्या आपल्या वतनाची जपणूक करण्यात व्यस्त होते त्यामुळे इथल्या रयतेची कुणाला पर्वा. अशा सर्व धामधुमीतच राजांचा जन्म झाला.
शिवाजी राजांनी स्वराज्य पुढे स्थापन केले वगैरे या सर्वांची चर्चा येथे करणार नाही कारण तो इतिहास सर्वाना ज्ञात आहे परंतु ज्या एका मनुष्याला हे सुचले ते इतरांना का सुचले नाही हा विचार येथे करण्याजोगा आहे. कधी कधी असे वाटते की विष्णूचा जो शेवटचा अवतार होणार होता कल्की तो म्हणजे आपले महाराजच नाहीत ना इतके या माणसाचे कर्तुत्व आहे. अर्थात त्यांना दैवत्व वगैरे बहाल करण्याचा काही हेतू नाही परंतु ५० वर्षांच्या आयुष्यात शिवाजी या नावाचे उभ्या महाराष्ट्रात महाराष्ट्राला पडलेले ते एक स्वप्न होते. इथल्या सर्व आया बहिणीनी देवाला बोललेले नवस एकट्या राजांनी पूर्ण केले.
१८ पगड समाजाला एकत्र आणणे, इथल्या सह्याद्रीलाच आपला पाठीराखा बनवणे, भ्रष्ट झालेली धर्मस्थाने पुन्हा प्रस्थापित करणे, बाटून मुसलमान झालेल्या आपल्या प्रिय लोकांना पुन्हाः हिंदूधर्मात घेऊन येणे, स्थापन केलेल्या स्वराज्याचा विस्तार करणे अशी सर्व कामे राजांनी केली. शिवाजी राजांच्या कार्यकर्तुत्वाचा आढावा दोन व्यक्तींनी त्यांच्या पश्चात घेतला आहे. तो म्हणजे समर्थ रामदास स्वामी आणि दुसरे म्हणजे शिवाजी राजांचे पुत्र संभाजी महाराज. या दोन व्यक्तींनी राजांना जवळून पाहिले होते त्यामुळे त्यांचे म्हणणे खरे धरायला हरकत नाही.
समर्थ रामदासस्वामी महाराजांच्या बद्दल लिहितात,
शिवराजास आठवावें । जीवित्व तृणवत् मानावें।
इहपरलोकी रहावें। कीतीर्रूपे ॥१५॥
शिवरायांचे आठवावे रूप । शिवरायांचा आठवावा प्रताप ॥
शिवरायाचा आठवावा साक्षेप । भूमंडळीं ॥१६॥
शिवरायांचे कैसें चालणें । शिवरायाचें कैसें बोलणे॥
शिवरायचे सलगी देणें । कैसे असें ॥१७॥
सकळ सुखांचा त्याग । करून साधिजे तो योग ॥
राज्यसाधनाची लगबग । कैसी असे ॥१८॥
त्याहूनि करावे विशेष । तरीच म्हणावे पुरुष ॥
या उपरी विशेष । काय लिहावें ॥१९॥
समर्थांनी हे जरी संभाजी राजांचा उद्देशून लिहिले असले तरी आज आपल्या सर्वाना हे लागू होते. आज आपण असे वागतो का याचे मूल्यमापन करणे गरजेचे आहे.

दुसरे उदाहरण म्हणजे संभाजी राजानी शिवाजी महाराजांचे केलेले वर्णन. संभाजी महाराज म्हणतात,
"सर्व देवालयांचे रक्षण करण्यासाठी ज्याने जीव तृणासमान क्षुद्र मानला, क्षात्रधुरंधर, ज्याने शर्थीने पराक्रम केला, शत्रुच्या अडवणुकीला शर्थीने तोंड देवून सर्व म्लेंच्छांना धराशायी केले. अगणित देवालयांची स्थापना करून ज्याने शंकराला प्रसन्न करून घेतले आणि त्याचा प्रसाद संपादन केला, निजामशाही अंमल सुरू झाल्यापाठोपाठ आलेल्या दुष्काळामुळे प्रजा व्याकुळ झाली असता तत्काळ उपाययोजना केली, चमकत्या विजेप्रमाणे (तरवार चालवून) ज्यांनी ताम्र आणि तुर्क यांना जर्जर करून सोडले. कलंकी(कल्की) अवताराप्रमाणे पराक्रम करून ज्याने आत्मीयतेने स्ववंशीयांना उच्चस्थानी बसवले, छत्र धारण केले, माहुलीगडाला वेढा पडलेला असताना प्रचंड उत्साहाने शत्रू घालवून स्वामिधर्माचे पालन केले. बाका प्रसंग ओळखून ज्याने योग्य पावले टाकून पराक्रम केला, गोंधळलेल्या आदिलशहाने दिलेल्या ऐश्वर्याने जो शोभू लागला. हिंदूधर्माचा ज्याने जीर्णोध्दार केला, ज्याच्या धाडसाने केलेला पराक्रम जो म्लेंच्छांच्या विनाशाला कारणीभूत झाला" (संभाजी राजानी बाकरेशास्त्रीना दिलेले संस्कृत दानपत्र)
सभासद बखरीमध्ये कृष्णाजी अनंत सभासद महाराजांच्याबद्दल लिहिताना म्हणतो,
स्वधर्माची स्थापना हे शिवाजी राजांची केले सर्वात मोठे काम. देवगिरीच्या यादवांचे साम्राज्य बुडाल्यावर हिंदू धर्मास जी उतरती कळा लागली होती. शिवाजी राजानी केवळ ही उतरती कळा थांबवली नाही तर पुन्हा एकदा मानाचे स्थान प्राप्त करून दिले.
"राजा साक्षात् केवळ अवतारीच जन्मास येऊन पराक्रम केला. नर्मदेपासून रामेश्वरपर्यंत द्वाही फिरली. देश काबीज केला. अदलशाही, कुतुबशाही, निजामशाही, मोंगलाई ह्या चारी पातशाह्या व समुद्रातील बेवीस पादशाह असे जेर जप्त करून, नवेच राज्य साधून मराठा पातशाहा सिंहासनाधीश छत्रपती जाहाला. प्रतिइच्छा मरण पावून कैलासास गेला. ये जातीचा कोणी मागे जाहाला नाही. पुढे होणार नाही. असे वर्तमान महाराजांचे जाहाले. कळले पाहिजे"
स्वधर्माची स्थापना हे शिवाजी राजांची केले सर्वात मोठे काम. देवगिरीच्या यादवांचे साम्राज्य बुडाल्यावर हिंदू धर्मास जी उतरती कळा लागली होती. शिवाजी राजानी केवळ ही उतरती कळा थांबवली नाही तर पुन्हा एकदा मानाचे स्थान प्राप्त करून दिले.
आजच्या घडीला महाराजांच्याकडून शिकण्यासारखे काही असेल तर ते म्हणजे स्वधर्माविषयीचा अभिमान, सामान्य लोकांसोबत केली जाणारी वागणूक आणि देशासाठीचे उत्कट प्रेम.. हे सर्व जमले की मग जोरजोरात होर्न वाजवून फिरावे लागणार नाही.

© २०२०, Shantanu Paranjape
____________________________________________________________________________
मला सोशल मिडीयावर फॉलो करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
इन्स्टाग्राम - Paranjape_shantanu
फिरस्ती महाराष्ट्राची - Firasti_mh