समर्थरामदासांनी छत्रपती संभाजीराजांना कोणता उपदेश केला?

  • February 10, 2020
  • By Shantanu Paranjape
  • 2 Comments

छत्रपती संभाजी महाराज यांचे चित्र

समर्थ रामदास हे सतराव्या शतकातील एक महत्वाचे व्यक्तिमत्व. महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर हिंदू धर्माची ज्योत पेटवत ठेवून त्यांनी शिवाजी राजांच्या स्वराज्य स्थापनेच्या संकल्पाला थोडसा का होईना पण आधार दिला. ठीकठिकाणी मठ उभारून समर्थ्यांच्या मनात असलेला महाराष्ट्रधर्म त्यानी लोकाना सांगितला. दासबोधासारखा ग्रंथ लिहून त्यांनी समाजाला घडवण्याचे काम केले. इस्लामी आक्रमकांच्यामुळे त्रासलेल्या रयतेचे वर्णन तर त्यांनी केलेच परंतु लोकांच्या मनात प्रतिकाराची भावना उमटण्यासाठी हनुमानासारख्या शक्तीच्या देवतेची स्थापना जागोजागी केली. शिवछत्रपती यांना पूरक असणारे कार्य समर्थ रामदासांनी केले. परंतु आपण त्यांना गुरु-शिष्य वादात अडकवले आणि सामर्थ्यांच्या इतर कार्यावर डोळेझाक केली.

सन १६८० मध्ये शिवाजी राजांचा मृत्यू झाला आणि संभाजी महाराज गादीवर आले तेच मुळी अष्टप्रधान मंडळातील मंत्र्यांचा रोष पत्करून. त्यामुळे संभाजी महाराजांची सुरुवातीची दोन वर्षे ही स्वतःला गादीवर टिकवण्यात गेली. अशातच कवी कलुषाच्या संगतेने त्यांनी त्यांच्या विरुद्ध जाऊन अष्टप्रधान मंडळातील लोकांना शिक्षा केल्या. संभाजी महाराज हे अत्यंत पराक्रमी असे होते परंतु ते उग्रप्रकृतीचे होते. शिवाजी महाराजांच्यासारखी सौम्यता तसेच सर्वाना जवळ धरून ठेवण्याची वृती संभाजी महाराजांच्याकडे फारशी नव्हती. परंतु पराक्रमाच्या बाबतीत ते कदाचित शिवाजी महाराजांच्यापेक्षा काकणभर सरसच असतील आणि त्यांनी ते पुढे सिद्ध सुद्धा करून दाखवले. 

समर्थ रामदास यांचे चित्र
संभाजी महाराज आणि रामदास स्वामी यांच्यात संबंध होते हे दाखवणारी आपल्याकडे बरीच पत्रे उपलब्ध आहेत. इथे सुद्धा गुरु होते का नाही हा वाद आपण बाजूला ठेवला तरी रामदास स्वामी हे त्यावेळी वयाने तसेच अनुभवाने ज्येष्ठ होते त्यामुळे रामदास स्वामीनी सन १६८० आणि ते सन १६८२ या दोन वर्षाच्या काळात घडलेल्या घडामोडी जवळून पाहिल्या होत्या त्यामुळे त्यांनी संभाजी राजांना उपदेश करणारे एक अत्यंत सुंदर असे पत्र लिहिले. अर्थात हा उपदेश त्यांनी अधिकाराने ज्येष्ठ असल्यामुळेच केला तसेच संभाजी राजांवर जिजाबाई आणि शिवाजी राजांचे संस्कार होते त्यामुळे संभाजी महाराज हे रामदासस्वामीना मानत असले तर त्यात नवल असे काहीच नाही. हा उपदेश अत्यंत वाचण्यासारखा असा आहे. 

यात राज्य कसे करावे हे रामदास यांनी संभाजी महाराजांना सांगितले आहे.

शिवरायांचे आठवावे स्वरूप| शिवरायांचा आठवावा साक्षेप| शिवरायांचा आठवावा प्रताप| भुमंडळी      शिवरायांचे कैसे चालणे| शिवरायांचे कैसे बोलणे| शिवरायांची सलगी देणे| कैसे असे|

यांसारख्या कडव्यातून तर रामदास स्वामी संभाजी महाराजांना आपल्या पित्याप्रमाणे वागायचा सल्ला देतात आणि राज्यसाधना करा असे सांगतात. खर तर हे पत्र आजच्या राजकारणी लोकांना सुद्धा तितकेच लागू होईल असे वाटते.  

समर्थ रामदास लिहितात, 


अखंड सावधान असावे| दुश्चित कदापि नसावे| तजविजा करीत बसावे| एकांत स्थळी||१||

काही उग्रस्थिती सांडावी| काही सौम्यता धरावी| चिंता लागावी परावी अंतर्यामी||२||

मागील अपराध क्षमावे| कारभारी हाती धरावे| सुखी करुनि सोडावे| कामाकडे||३||

पाटवणी तुंब निघेना| तरी मग पाणी चालेना| तैसे सज्जनांच्या मना| कळले पाहिजे||४||

जनांचा प्रवाहों चालिला| म्हणजे कार्यभाग आटोपला| जन ठायी ठायी तुंबला| म्हाणिजे खोटे||५||

श्रेष्ठी जे जे मेळविले| त्यासाठी भांडत बैसले| मग जाणावे फावले| गलीमासी||६||

ऐसे सहसा करू नये| दोघे भांडता तिसय्रासी जाए| धीर धरून महत्कार्य| समजून करावे||७||

आधीच पडला धस्ती| म्हणजे कार्यभाग होय नास्ती| याकारणे समस्ती| बुद्धि शोधावी||८||

राजी राखता जग| मग कार्यभागाची लगबग| ऐसे जाणोनिया सांग | समाधान राखावे||९||

सकळ लोक एक करावे| गलीम निपटुन काढावे| ऐसे करीता कीर्ति धावे| दिगंतरी||१०||

आधी गाजवावे तडाके| मग भूमंडळ धाके| ऐसे न होता धक्के| राज्यास होती||११||

समय प्रसंग वोळखावा| राग निपटुन काढावा| आला तरी कळो नेदावा| जनांमध्ये||१२||

राज्यामध्ये सकळ लोक| सलगी देवून करावे सेवक| लोकांचे मनामध्ये धाक| उपजोचि नये||१३||

बहुत लोक मेळवावे| एक विचारे भरावे| कष्टे करोनी घसरावे| म्लेंच्छांवरी||१४||

आहे तितुके जाताना करावे| पुढे आणिक मेळवावे| महाराष्ट्र राज्य करावे |जिकडे तिकडे||१५||

लोकी हिम्मत धरावी| शर्तीची तरवार करावी| चढ़ती वाढती पदवी| पावाल येणे||१६||

शिवरायास आठवावे| जीवित्व तृणवत मानावे| इहलोकी परलोकी राहावे| कीर्तीरुपे||१७||

शिवरायांचे आठवावे स्वरूप| शिवरायांचा आठवावा साक्षेप| शिवरायांचा आठवावा प्रताप| भुमंडळी||१८||

शिवरायांचे कैसे चालणे| शिवरायांचे कैसे बोलणे| शिवरायांची सलगी देणे| कैसे असे||१९||

सकळ सुखांचा त्याग| करुनी साधिजे तो योग| राज्यसाधनाची लगबग| ऐसी असे||२०||

त्याहुनी करावे विशेष| तरीच म्हणावे पुरूष| या उपरी आता विशेष| काय लिहावे||२१|धन्य धन्य ते शिवराय, धन्य धन्य ते रामदास स्वामी!!
जय जय रघुवीर समर्थ


____________________________________________________________________________

मला सोशल मिडीयावर फॉलो करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. 

इन्स्टाग्राम - Paranjape_shantanu
फिरस्ती महाराष्ट्राची - Firasti_mh

You Might Also Like

2 comments

  1. श्रेष्ठ काव्य.प्रत्यक्ष छत्रपती यांना योग्य वेळी लिहायला मोठे धैर्य लागते. दुसऱ्या कोणी असे लिहिले नाही.म्हणजे रामदास व छत्रपती यांचे जवळचे संबंध होते. धन्यवाद. शेअरिंग

    ReplyDelete

$(document).ready(function(){ $('#mscontent').css('opacity','0'); });