पुण्यातील सदाशिव पेठेचा इतिहास...
ही पेठ सदाशिवराव भाऊ यांच्या स्मरणार्थ वसवण्यात आली. पूर्वी इथे नायगाव नावाचे एक खेडे होते. सण 1769 च्या सुमारास आप्पाजी मुंढे यांनी माधवरावांच्या सांगण्यावरून येथे वसाहत निर्माण केली. सुरुवातीची 7 वर्षे येथे जकात माफ होती. ही जकात किमती वस्तूंवर माफ असल्याने व्यापारी, सावकार, सरदार यांनी याचा फायदा घेतला आणि पेठेत आपले वाडे बांधले.  सन 1765 मध्ये येथे फक्त 87 घरे होती व सन 1818 मध्ये हीच संख्या 752 पर्यंत जाऊन पोहोचली.

पुण्यातील अलका टॉकीज चौकाचा एक जुना फोटो

पेठेत पाणी पुरवठा करण्याचे काम नाना फडणीस यांनी पार पाडले. आंबेगाव येथून नळाद्वारे पाणी आणून ते पेठेतील हौदात सोडले. त्यावेळी या योजनेला सुमारे 8 हजार रुपये इतका खर्च आला होता. सदाशिव पेठेचा विस्तार हा पुढे मोठ्या प्रमाणावर झाला. विश्रामबागवाडा, सेनापती गोखले यांचा वाडा तसे गद्रे सावकारांची बाग ही याच पेठेतली. गद्रे सावकारांच्या बागेच्या परिसरातच खुन्या मुरलीधराचे मंदिर आहे. सदाशिव पेठेत तब्बल 32 मंदिरे आहेत. मंदिरांच्या संख्येत या पेठेचा क्रमांक हा कसबा आणि शुक्रवार यांच्या खालोखाल लागतो. उपाशी विठोबा, पासोड्या मारुती, चिमण्या गणपती, डुल्या मारुती ही काही देवतांची अजब नावे सुद्धा याच पेठेतली.. मराठ्यांच्या इतिहासात मोठ्या प्रमाणावर भर घालणारी संस्था म्हणजे भारत इतिहास संशोधक मंडळ. ही संस्था सुद्धा याच पेठेत आहे याचा सदाशिव पेठकरांना अभिमान असला पाहिजे.

संदर्भ - पुण्याचे पेशवे, अ. रा. कुलकर्णी

- शंतनु परांजपे

फोटो - ब्रिटिश लायब्रेरी यांच्या सौजन्याने.. (पुण्यातील पेठेचा प्रातिनिधीक फोटो आहे)


© 2020, Shantanu Paranjape

You Might Also Like

0 comments

$(document).ready(function(){ $('#mscontent').css('opacity','0'); });