घाशीराम कोतवाल कोण होता?


घाशीराम कोतवालाचे नाव महाराष्ट्रात गाजले ते श्री. विजय तेंडूलकर यांनी लिहिलेल्या नाटकामुळे. अर्थात नाटक सिनेमा आणि मालिका ही काही इतिहासाची साधने नाहीत परंतु या समाज माध्यमांचा पगडा सामान्य जनतेवर बसत असल्याने त्यात दाखवले जाते ते सर्व खरे असा विश्वासअशी एकंदर भावना जनमाणसात तयार होते. अर्थात नाटकात काय दाखवले किंवा काय नाही याबद्दल हा लेख नाही परंतु घाशीराम कोण होता व कोतवाल म्हणून त्यानी कोणती कामगिरी बजावली हे सांगण्यासाठी या लेखाचा प्रपंच.   

नाटकातील प्रसंग

घाशीराम सावळादास हा मुळचा औरंगाबादचा. पुण्यात पेशवे आपला कारभार बघत होते त्यावेळी अनेक कुटुंबे आपले नशीब गाजवायला शहरात आली तसेच घाशीराम सुद्धा आला. पुण्यात आल्यावर घाशीरामची ओळख ही नाना फडणीस यांच्याशी झाली. घाशीरामाचे पुणे दरबाराकडे येणे होते तसेच त्याने त्या दरबाराच्या दुसऱ्या एका सावकाराचा हवाला घेतला होता. नाना फडणीस यांच्याशी घाशीरामाची चांगली ओळख झाली होती. त्यामुळे सन १७७७ साली घाशीरामाला कोतवालीची वस्त्रे मिळाली व सन १७८२ मध्ये कोतवालीवर त्याची कायमस्वरूपी नेमणूक झाली. ‘शहराच्या पेठा, पुरे व कसबे येथील किरकोळ कजिया, पेठेचे कमाविसदार यांनीं मनास आणावा; मातबर कजिया असल्यास कोतवालीकडे मनास आणून हलकी गुन्हेगारी घेत जाणें. रस्त्याचा गल्लीचा व घरचा कजिया लागेल त्याचा इनसाफ कोतवालानें करावा.' ही कामे कोतवाल या पदावर असणारी व्यक्ती करत असे. कोतवाल म्हणजे सध्याचा महापौर. घाशीरामची कोतवाल पदी नियुक्ती करताना २० कलमी करार त्याच्याशी केला गेला. या २० कलमात घाशीरामाने करावयाच्या कामाचा उल्लेख केला आहे. 

कोतवाली पदी नेमणूक करताना घाशीरामाला पेशव्यानी पुढील आज्ञा दिल्या होत्या. 

१. कोतवालाच्या कार्यालयातील कारकून व शिपाई यांना कामावरून कमी करण्याआधी पांडुरंग कृष्ण सरअमीन या वरिष्ठ अधिकाऱ्याची परवानगी घ्यावी. 
२. नारायण व शनिवारात मनुष्यवस्ती खूप वाढली आहे त्यामुळे त्या भागात दोन नवीन पेठा वास्वव्यात. 
३. शहरातील निरनिराळ्या भागातील गुप्त बातम्या पेशव्यांच्या कानावर रोज घालाव्यात. 
४. शहरातील चोऱ्यावर नीट लक्ष ठेवून गुन्हेगारास त्वरीत शासन करावे. 
५. विवाहित बायकांना वेश्याव्यवसाय करायला परवानगी देऊ नये.

घाशीराम कोतवालाचा वाडा

घाशीरामाने कारभार हातात घेण्याआधी पुण्यात चार चौक्या होत्या, घाशीरामाने नारायण व शनिवार पेठेत दोन नवीन चौक्या बसवल्या. घाशीरामाच्या हाताखालीं तीन अधिकारी असून त्यांच्याकडे कोतवालींतील तीन खातीं सोपविलीं होतीं. मुजुमदाराकडे दस्तैबज, अर्ज वगैरे लिहिण्याचें काम असे. दुस-याकडे कागदापत्रें सांभाळण्याचें काम असे आणि तिसरा जमाबंदीचा अधिकारी असे. तिघांचा पगार मिळून वर्षाला ६४० रू. खर्ची पडत. 

घाशीराम कोतवाल झाल्यावर पुण्यातील पोलीस ठाण्यांची संख्या ६ झाली. नवीन चौक्या व वाढलेला कारभार यांच्यामुळे या पोलीस चौक्यांचे उत्पन्न सुद्धा वाढले. सन १७९० च्या आसपास या पोलीस ठाण्यांचे उत्पन्न जवळपास २७ हजारांच्या आसपास गेले होते. 

खालील पद्धतीने हे उत्पन्न जमा होत असे - 

नजर - माल मिळकत सज्त्रानाच्या ताब्यांत आल्या बद्दलची सरकारास द्यावी लागे ती.
कमावीस.
घरविक्रीकर कर.
पाट दाम  (पाट लावण्यावर कर).
गवयांकडून फी.
दंड.
बेवारसी मालमत्ता.
जुगाराबद्दल दंड.
वजनें, मापें, कापड इत्यादिंवर सरकारी छाप मारण्याची फी.

घाशीरामाच्या काळात सन १७९१ सालीं पुण्यांत दंडाला पात्र असे फक्त २३४ गुन्हे होते. यावरून घाशीरामाचा कारभार किती चोख होता याची कल्पना येते. या गुन्ह्यात सरकारच्या परवानगीशिवाय वेश्या होणें, परवानगीशिवाय बकरी मारणें; बेवारसी प्रेताची वाट लावणें; स्वत ची जात चोरणें, कुंटिणपणा करणें, वेश्या करण्याकरितां मुली विकत घेणें, एक नवरा जिवंत असतांना दुसरा करणें, बायकोला काडी मोडून दिल्यानंतर तिला घेऊन राहणें, कोळयांनां चाकरीस ठेवणें अशा गुन्ह्यांचा प्रामुख्याने समावेश होता. 

घाशीरामाचा अंत 

घाशीरामाचा अंत ज्या पद्धतीने झाला ती गोष्ट अत्यंत दुर्दैवी आहे. त्या हकीकतीचा सारांश असा, "१७९१ च्या ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस श्रावणमासाची दक्षिणा आटोपल्यानंतर पस्तीस द्रावीडी ब्राम्हण घाशीरामाच्या बागेंत गेले; तेथें त्यांनीं माळयाच्या परवानगीशिवाय कांहीं कणसें तोडिलीं. त्यावरून तंटा होऊन माळी घाशीरामाकडे आला व त्याला त्यानें सांगितलें कीं कित्येक चोर व कोमटी यांनीं बागेंत दंगा केला. तेव्हां कोतवालानें २५ प्यादे पाठवून  ब्राम्हणांनां पकडून स्वत:च्या  (भवानी पेठेंतील) वाडयांत भुयारांत त्यांना कोंडलें. रविवारची रात्र सोमवार दिवस रात्र व मंगळवार दिवसपर्यंत ते तेथें होते. मानाजी फांकडयास ही गोष्ट कळल्यावर त्यानें जबरीनें कुलूप तोडून ब्राम्हण बाहेर काढिले. त्यांत १८ ब्राम्हण मेले होते;  तीन बाहेर काढल्यावर मेले;  तेव्हां हें वर्तमान मानाजीनें पेशव्यांनां कळविलें. त्यांनीं नानांना सांगितल्यावरून त्यांनी घाशीरामास विचारिलें. त्यानें ते कोमटी चोर होते असें उत्तर दिल्यावरून नानांनी मुडदे जाळण्यास परवानगी दिली. परंतु मानाजी मुडदे उचलूं देईना. तेव्हां नानांनीं घाशीरामास चौकींत बसवून चौकशी चालविली. इतक्यांत हजार तैलंगी ब्राम्हण नानांच्या वाडयापुढें येऊन दंगा करूं लागले. न्यायाधीश अय्याशास्त्री हे वाडयांत जात असतां त्यांची शालजोडी व पागोटें ब्राम्हणांनीं फाडलें व मारामारी केली. शास्त्रीबुवांनी चौकशी करून घाशीरामास देहांतशासन शिक्षा दिली. तेव्हां मंगळवारीं रात्रीं त्याची धिंड काढली व बुधवारीं सायंकाळी भवानी पेठेच्या पलीकडे त्याला नेऊन सोडला. तेथें वरील द्रवीड ब्राम्हणांनीं ‘दगड उचलून मस्तकावर घालून (त्यास) जीवें मारला" या हकीकतीचा उल्लेख चार्ल्स मॅलेट नावाचा ब्रिटीश अधिकारी सुद्धा आपल्या पुस्तकात करतो.

घाशीरामाच्या एकंदर घटनेवरून आपल्याकडे नाना फडणीस यांना अनेकदा दोष देण्यात येतो. मुळात नाटक आणि इतिहास यांच्यातील फरक जेव्हा महाराष्ट्रातील सुज्ञ जनतेला समजेल तेव्हा आपल्याइथे इतिहासाला चांगले दिवस येतील असे म्हणायला हरकत नाही.

नाना फडणीस आणि सवाई माधवराव

संदर्भ - 

१. पुणे नगरसंस्था शताब्दी ग्रंथ लेखक डॉ. मा. प.मंगुडकर प्रकाशक पुणे महानगरपालिका १९६०. 
२. इतिहाससंग्रह ऐ. गोष्टी, भा.; २
३. खरे-ऐ.ले.संग्रह.भा.९
४. PRC vol.2 Poona Affairs (Malets Embassy) 1786-1797 - G.S.Sardesai , 1936. Pg. 211. 
५. नाना फडनवीसांचे चरित्र - वा.वा.खरे. 
६. सातारकर महाराज व पेशवे यांची रोजनिशी’ मधील सवाई माधवराव विभाग ३
      

© 2020, Shantanu Paranjape

You Might Also Like

4 comments

  1. कजिया म्हणजे काय??

    ReplyDelete
  2. घाशीरामच्या कार्यशैलीबद्दल आपण काही लिहिले नाही. घाशीराम आणि नाना फडणवीस यांच्या संबंधाबद्दल पण आपण काही मत मांडले नाही. घाशीराम हा जुलमी, क्रूर असा कोतवाल होता, त्याच्या अत्याचारांनी जनता त्रस्त झाली होती. मानाजी फाकडे या नावाजलेल्या सरदारांने जेव्हा घाशीरामचे कृत्य लक्षात आले तेव्हा त्या कोंडलेल्या ब्राह्मणांची सुटका केली (बहुतेक सर्व मरण पावलेले होते), नानाने घाशीरामची बाजू सावरून घेऊन त्याला दोषमुक्त केले होते. पण सरदार मानाजी फाकडे यांनी या प्रकरणात कठोर भूमिका घेऊन पेशव्यास स्वतंत्र चौकशी करावयाला लावून योग्य निवाडा करावयास भाग पाडले आणि घाशीरामला योग्य शिक्षा होऊन त्याचे पारिपत्य झाले.

    ReplyDelete

$(document).ready(function(){ $('#mscontent').css('opacity','0'); });