पत्र किल्ल्यांना (रायगड भाग-2) {A letter to Raigad}
- November 20, 2015
- By Shantanu Paranjape
- 0 Comments
मिळालेला प्रतिसाद
आणि काही मित्रांचा आग्रह यामुळे इतर ब्लॉग सोडून आधी दुसरा भाग लिहायला घेतला,
तसेच त्या बिचाऱ्या दुर्गदुर्गेश्वरालाही ताटकळत ठेवणे बरोबर नाही... तेव्हा पत्र
रायगडाला भाग २------
प्रिय रायगड यांस,
सुरुवात कुठून करू हेच कळत नाहीये.. कालच परीक्षा
संपली आणि गेले ३० दिवस मनात अडवून ठेवलेल्या भावनांना आज पन्हाळी लागली.. तुला
आधी लिहिलेले पत्र लोकांनी पण वाचलं आणि त्यांना ते खूप आवडलं, तुलाही आवडलं असेल अशी
अपेक्षा करतो आणि पुढच्या व शेवटच्या भागाला सुरुवात करतो..(शेवटचा म्हणजे
सध्यापुरता शेवटचा, पुढे बोलणं होईलच)
तर मागच्या पत्रात मी बाजारपेठेपर्यंत
आलेलो, ती प्रचंड बाजारपेठ बघून पुढे निघालो आणि आमचा मोर्चा वळाला तो जगदीश्वर
मंदिराकडे.. वाटेत एका ठिकाणी थांबवून ताईने आम्हाला दूरवर स्पष्ट पणे दिसणारे
राजगड आणि तोरणा दाखवले.. त्यांना लांबूनच हात केला आणि बरं का!! तसाच हात तुला
सुद्धा केला होता, जेव्हा मी राजगड आणि तोरण्यावर गेलो होतो..पण तु नेहमीप्रमाणे
busy!!!!
थोड्याच
वेळात आम्ही मंदिराजवळ येवून पोहोचलो. साध्या बांधणीचं ते शिवमंदिर मनाला प्रचंड
भावलं. जरा हाश-हुश करीत त्या मंडपात बसलो.. खालचा दगड प्रचंड गार होता, बाहेर
एवढं उकडत असून आत मध्ये तु एसी कसा लावलास याचंच आश्चर्य वाटलं.(एसी म्हणजे हवा
गार करणारं यंत्र, हे हल्लीच्या या नवीन युगातलं फॅड आहे. पण मित्रा या मंदिरातील
गारव्याला तोड नाही)
एक एक करून आत मध्ये जावून दर्शन घेवून आलो.
मी सर्वात शेवटी गेलो कारण जे सुख तुला मिळालं ते मला अनुभवायचं होतं. जवळजवळ १०
मिनिटे एकटा बसलेलो गाभाऱ्यात.. कोणतं सुख विचारतोस? तर त्या शिवालयात बसून मला
ऐकायचे होते ते महाराजांच्या तोंडून निघालेले ओम नमः शिवाय चे बोल.. ऐकायला नाही
आले काही पण ती शांतता मनाला सुखावून गेली.. मंदिराबाहेर पडलो तेच दिवसाचा पूर्ण थकवा
घालवून आणि पुन्हा तुझ्यावर बागडण्यासाठी मन तयार झाले.. हो कारण तुझ्यावर नुसतं
चालायचं तरी अंगात ताकद हवी..
तसं मंदिराचं आवार देखील खूप मोठं आहे रे.
नंतर आम्ही मागेच असलेल्या शिवरायांच्या समाधी जवळ गेलो.. थोडसं विचित्र वाटत
होतं, पण तु जेवढा धीराने त्या प्रसंगाला सामोरा गेलास ते आठवलं आणि मन अभिमानाने
भरून आलं, एवढ्यासाठीच की त्या महान पुरुषाने केलेल्या पराक्रमाची मला निदान
थोडीशी जाण आहे.. अक्षरशः लोटांगण घालून नमस्कार केला कारण माझ्यासाठी तो देवच
होता आणि तु त्या देवाचे घर.. थोडीशी माती उचलून घेतली तिथली, नंतर काळाच्या ओघात
ती गेली हे खरं. पुन्हा येईन तेव्हा नक्की घेईन. त्या समाधीपासून दूर जावसं वाटतच
नव्हते, जसे इतर लोकांसाठी काशी किंवा पंढरपूर तीर्थक्षेत्र आहे ना तसे माझ्यासाठी
तु आहेस.
जरा जास्तच emotional, sorry भावनिक झालो का
रे!! असो!! तर, समाधीच्या मागेच असलेल्या वाघ्या कुत्र्याच्या समाधीचे सुद्धा
दर्शन घेतले.. इतिहाससंशोधकांमध्ये मतभेद असतील नसतील माहिती नाही पण याच
वाघ्याच्या असंख्य कथा ऐकून बालपण गेलंय हे मात्र विसरता येत नाही. समाधीच्या
मागेच एक रस्ता खाली उतरत होता. तो रस्ता भवानी टोकाकडे जातो.. तुला ३ वेळा भेट
दिली पण भवानी टोकाचा योग काय तो आला नाही कधी, प्रदक्षिणेच्या वेळेस खालून पाहिलं
पण वर चढण्यासाठी वाघाचच काळीज हवं.. आता येईन तो खास भवानी टोक आणि हिरकणी
कड्यासाठी!! वर मी वाटेला रस्ता म्हणालो, कारण एकंच, इतर किल्ल्यांपेक्षा तुझं
भाग्य जरा जास्त असल्याने आणि तुझ्या योग्यतेमुळे महाराजांनी इथे राजधानी वसवली.
आता राजधानीमधल्या वाटा म्हणजे रस्तेच असणार की!! इतके प्रशस्त आणि व्यवस्थित!!
क्या बात है हिरोजी!! खरंतर तुला नटवण्यात त्या महान स्थापत्याचा खूपच जास्त वाटा
होता, उगाच नाही, “सेवेसी तत्पर हिरोजी इंदुलकर!!”
खूप वेळ होवून गेली होती, आणि अजून बरंच काही
पहायचे होते.. येताना डाव्याबाजूला हात करून आम्हाला वाघ दरवाज्याची दिशा दाखवली..
तुझे हे आणखीन एक वैशिष्ट्य!! वाघ दरवाजा!! तोही बघायचा राहीलाच रे! तुला
प्रदक्षिणा घालताना (आता मंदिर म्हणाल्यावर प्रदक्षिणा येतेच की, २ झाल्यात आता
तिसरी पण होईल लवकरच). तर प्रदक्षिणेच्या वेळी खालून थोडसं अस्पष्ट दर्शन झाले
होते वाघ दरवाज्याचे.. मुळात म्हणजे जिथे तो दरवाजा आहे तिथून खाली उतरायची वाटच
नाही आहे.. तर त्या राजाराम महाराजांना कुठून दिसली देव जाणे.. त्या वाटेने खाली
उतरायचे धाडस दाखवणाऱ्या राजाराम यांना मनोमन दंडवत. पुन्हा एकदा कौतुक तुझे!!
दुर्गमता हे तर तुझे दुसरे नावच आहे!!
खालीच पोटल्याचे डोंगर दिसत होते, या एका
मातीच्या ढेकळाने तुझा घात केला, पण यात तुझा दोष नाही, तो टोपीकर इंग्रज हुशार
निघाला थोडासा. आता आमची पलटण नगारखाना आणि राजदरबार बघायला निघाली.. ६ जून १६७४,
कदाचित भारतवर्षातला एक महान दिवस आणि तो दिवस बघायचं भाग्य तुला लाभलं. धूम धूम
धा धिन धूम, अजूनही तो नगाऱ्याचा दुमदुमणारा आवाज, बेंबीच्या देठापासून वाजवलेल्या
आणि कान गुंजत जाणाऱ्या त्या तुताऱ्या, खणखणीत शब्दात निघालेले ते वैदिक बोल,
सगळ्या नद्यांचा तो खळखळणारा आवाज, सारेच काही अद्भुत आणि महाराजांची ती तेजोमय
अशी मूर्ती.. ३५० वर्षांपूर्वीचा प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला.. आणि डोळे उघडले
तर समोर कधीही पराजित न झालेले आणि अखंड झुंज देत राहणारे सिंहासन दिसले आणि एवढे
कष्ट केल्याचे सार्थक झाले..
खरंच
रे लेका, एखाद्याचे भाग्य किती चांगले असावे रे.. आम्हाला फक्त इतिहासात वाचायला
मिळाला हा प्रसंग आणि शाळेत असताना तर इतका थोडक्यात सांगितला की काही विचारू
नकोस.. डोळे फिरत होते माझे त्या राजसभेत आणि अंदाज बांधत होतो की कोण कुठे बसत
असेल आणि नेमका प्रसंग काय घडला असेल.. इतक्यात थोडीफार कुजबुज ऐकू आली, भानावर आलो
आणि मागे पहिले, कुणीच नव्हते.. परत कुणीतरी कुजबुजले पण माझ्या जवळपास पण कुणी
नव्हतं. आणि थोड्याच वेळात एक अप्रतिम विज्ञानाचा आणि बुद्धिमत्तेचा पुरावा देणारा
विषय कळला की या सभागृहात कुठेही आणि कितीही हळू आवाजात कुजबुजले तरी ते
सिंहासनापाशी ऐकू येते.. ध्वनिचमत्काराचे कोडे!!!!! मुजरा केला त्या हिंदवी
स्वराज्याला अगदी त्रिवार लवून( कुठे शिकलो म्हणतोस का?? अरे, एका नाटकात काम केलं
होतं पहिली मध्ये असताना. तेव्हा पहिल्यांदा केला होता तो आजवर करत आलो आहे)
जवळच नगारखाना होता, तोही झटपट पाहून घेतला..
एवढा उंच नगारखाना पहिल्यांदाच पहिला.. आता जवळपास बऱ्यापैकी पाहून झालं होतं
म्हणून सदर आणि राजवाड्याचे ठिकाण पाहण्यास निघालो.. काहींचे नुसते अवशेष तर काही
अजूनही तितक्याच ताठ मानेने उभे होते.. तिथला एक एक दगड महाराजांचे नाव घेवूनच
घडला होता आणि अजून पुढे अनेक वर्ष तसाच ताठ मानेने उभा राहणार होता याबद्दल मला काही
संशय नव्ह्ता.. एका सरळ रस्त्याने निघालो आणि पायऱ्या उतरून खाली उतरलो तर समोरच
तुझी एक सर्वात सुंदर वस्तू उभी होती..
एखाद्या सुंदरीच्या गालावर तीळ शोभून दिसावा
असे डौलाने उभे असणारे ते मनोरे आणि मनोऱ्याना असणारे ते झरोके, खाली दिसणारा
गंगासागर आणि समोर सखा सह्याद्री.,. रायगडला कणखर बनवणाऱ्या हिरोजींचे मन कदाचित
एका कवीचे असावे. केवळ राजघराण्यातील स्त्रियांसाठी मनोरंजन करण्यासाठी उभारलेली
वास्तू इतकी सुंदर!!! सध्या मात्र २-३ मजलेच शिल्लक आहेत.. काय करणार म्हणा ३ दिवस
सतत जळत होतास तु, आणि बाकीचे काळाच्या ओघात गेले..
दिवस कसा गेला कळलाच नाही.. तुझ्याशी
गप्पागोष्टी करायला खूपच मजा आली. आणि तु देखील अर्थात आम्हाला सहन केलस त्याबद्दल
तुझे आभार बर का!! अरे हो, सांगूनच गेलं बघ.. तुझ्यावर अजून एक लोकप्रिय वस्तू आहे..
ती म्हणजे देशमुखांचे हॉटेल.. कदाचित येणाऱ्या पर्यटकांचे आवडते ठिकाण असेल ते
पण.. असो! निघायची वेळ झाली होती..पाय हटत नव्हते पण निघण भाग होते, सुर्यनारायण
पण दिवसभर काम करून थकले होते आणि एकदाचे ६ कधी वाजतायेत आणि मी घरी कधी जातोय असे
वाटत असेल त्यांनापण!! काय करणार घरी बायका मुलं वाट पाहत असतील.. असो!! हळू हळू खाली उतरलो तेव्हा साधारण ६.३०
झालेले, अंधार गडद होत होता आणि दूर केशरी रंगांची उधळण चालु होती..
जड मनाने, जड पावलांनी आणि एकंदरच पायपिटीने जड
झालेल्या शरीराने त्या लाल डब्यात चढलो.. मुद्दाम मागच्या सीट वर बसलो कारण जाता
जाता तुझी ती काळी गडद आकृती पहायची होती.. तु दिसेनासा होईपर्यंत पाहत बसलेलो,
नंतर डोळा कधी लागला काही कळलंच नाही....
बापरे!! बरंच मोठं झालं रे, तर एकंदर अशी
तुझी आणि माझी पहिली भेट झाली. त्यानंतर २ वेळा पुन्हा तुला भेट देवून गेलो.. पण
तुझ्यात काय जादू आहे कळतच नाही, कितीही वेळा आलं तरी मन काही भरतच नाही.. म्हणून
हा पत्र बित्र लिहायचा उद्देश.. तेवढंच जरा communication, नाहीतर हल्ली whats app
मधून वेळ कुठे मिळतो रे आम्हाला!! आणि तु नाहीस त्याच्यावर नाहीतर सगळ्या
किल्ल्यांचा group काढला असता आणि आधीच कळवलं असता कधी येणार आहोत ते! असो!!
आवरत घेतो आता, तुझ्यावर एक कविता सुद्धा केली
आहे.. पाठवेन कधीतरी नंतर! सगळं एकाच दिवशी केलं तर नंतर काय बोलणार ना! चल, भेटू
कधीतरी नंतर, सध्यापुरते अच्छा!!
तुझा मित्र,
ता.क.-
सांगण्यासारखं असं काही नाहे आहे, परवाच फ्रान्स नावाच्या देशात अतिरेकी हल्ला झाला.. पण हे हल्ली चालूच असतं, लोकांना
सहन करायची सवय झाली आहे..
0 comments