नाव बघून तुम्हाला प्रश्न पडला असेल की
शिवकाळातले किल्ले सोडून हा मुलगा एकदम देवगिरीकडे कसा वळला! खरं तर माझं मलाच
आश्चर्य वाटतंय पण याला २ गोष्टी कारणीभूत आहेत
१. नुकतीच देवगिरीला
दिलेली भेट आणि २. मती गुंगवून टाकणारा इतिहास.
असो! जास्त बडबड नको,
प्रिय /आदरणीय देवगिरी,
आदरणीय म्हणण्याचं कारण म्हणजे तसा तू
सर्व किल्ल्यांच्या आजोबांच्या वयाचा आहेस. आणि
तुझा इतिहास इतका मोठा आहे की अरे तुरे करायला मन धजावत नाही. पण तरी मी तुला ए
अशीच हक मारणारे. तुझी आठवण यायचं कारण म्हणजे, आत्ताच तुझी
झालेली भेट. इतर पर्यटकांप्रमाणे कैलास लेणं , घृष्णेश्वर
पाहून हिंदू साम्राज्याची राजधानी पाहण्यासाठी निघालो. आणि येताना औट्रम घाटातून
तुझ ते रांगड रूप पाहून प्रेमातच पडलो आणि कधी एकदा गाडी तिथे पोहोचतेय असे झाले.
देवगिरी!!! अवघ्या
गिरीचा देव! १२ व्या शतकातील यादवांचे साम्राज्य असलेल्या तुला खरे वैभव लाभले ते
विजयनगर साम्राज्यातच. हिंदू साम्राज्याची राजधानी म्हणून तुझा नेहमीच उल्लेख ऐकला
होता आणि आज मी समोर उभा होतो तो तुला जाणून घेण्यासाठी, समजून
घेण्यासाठी. मोहम्मद तुघलकाकडे तू गेल्यापासून तुझी रयाच गेली आणि देवगिरीचा झाला 'दौलताबाद' अन तिथेच सारी वाट लागली. लोक तुला
पाहायला येतात आणि कौतुक करतात ते त्या चांदमिनारचं! बर तो चांदमिनार का चारमिनार
हेच अजून लोकांना माहिती नाही आहे आणि आपल्यासोबत आलेल्या लहान मुलांना कोणता तरी
मिनार असे सांगत असतात.
आहे मात्र छान! किल्ल्यावर जाताना वाटेतल्या
प्रत्येक झरोक्यातून त्याचे छान दर्शन होते. अरे हो! आधी एक भारत मातेचे मंदीर पण
लागले बघ! प्रशस्त पटांगण आणि बरोबर समोर असणारी भारत माता! मला त्याबद्दल फार
काही माहिती नाही पण कदाचित ते भारतातील एकमेव मंदीर असावे. माकडांनी नुसता उच्छाद
मांडला होता तिथे. मंदिरासमोर उजव्या आणि डाव्या बाजूला खांबांची अखंड रांग होती.
त्याचेही प्रयोजन मला काही कळले नाही.
मंदीर पाहून झाल्यावर आमचा मोर्चा मुख्य
किल्ल्याकडे वळला! इतका वेळ आम्ही भुईकोट भागातच हिंडत होतो म्हणजे! धन्य आहे रे
बाबा तुझी! गडाचा मुख्य दरवाजा महाकाय आणि प्रचंड मजबूत आहे रे! दरवाज्यातून
उजव्या बाजूला वळल्यावर चढण सुरु होते, आणि नंतर थोड्यावेळातच येतं ते तुझा सर्वात
मोठं हत्यार म्हणजे तुझ्या भोवती असणारा खंदक!! आत्ता फारच थोडे पाणी होते पण
तुझ्या भरभराटीच्या कळत नक्कीच त्यात भरपूर पाणी आणि मगरी-सुसरी असणार!
खंदक पार करून जेव्हा आत शिरलो तेव्हा समोर आले ते तुझे सर्वात मोठे वैशिष्ट्य. अंधारी!! नाव पण भयंकर दिले आहे! शत्रूला फसवण्यासाठी केलेली विशेष सोय! इतके दिवस फक्त पुस्तके आणि मित्रांकडून ऐकल होतं पण आज अनुभवणार होतो! इतर लोकांसाठी बाजूने जिना आहे पण आम्ही मोबाईल flash मदतीने आत शिरलो. आणि तुला अजिंक्य का म्हणतात याचा प्रत्यय आला. संपूर्ण कातळात कोरलेला तो मार्ग इतका अंधारी होता की दोन पावलांवरचे दिसत नव्हते. त्यामुळे एकमेकांना सावरत पुढे जायला लागत होते. थोडं वर चढल्यानंतर खरी कसोटी आली, ३ ठिकाणी ३ रस्ते फुटलेले होते!
अर्थात सध्या तिथे कोणत्या रस्त्याने जायचे हे लगेच कळून येते पण त्याकाळी मात्र अवघड असेल!! फितुरी नसती तर विजयनगरचे साम्राज्य अजिंक्य राहिले असते आणि कदाचित भारताचा इतिहास बदलला असता! पण इतिहासात परंतु वगैरेला जागा नसते! असो! वर जायचा रस्ता धरून पुन्हा त्या अंधाऱ्या मार्गाने वर चढलो. आणि पुन्हा दोन तीन मार्ग फुटलेले दिसले. पण बाहेर जायचा रस्ता व्यवस्थित दिसत असल्याने आम्ही सहजपणे बाहेर पडलो. बाहेर पडल्यावर थोडेसे माचीसारखे बांधकाम होते आणि पुन्हा वर जाण्यासाठी रस्ता!
अजून बरेच वर चढायचे होते. खालून
वाटतोस तितका उंचीने लहान नाहीस रे! एवढा छोटा किल्ला चढायला कितीसा वेळ लागणार
असा आनंद मनात ठेवून पाऊण तास झाला तरी तुझ्या अर्ध्या भागापर्यंतच येवून पोहोचलो.
तो महाल तर अजून बराच म्हणजे बराच दूर होता! इतकं चढून आल्यावर शत्रूची काय लढायची
अवस्था राहात असेल देव आणि पर्यायाने देवगिरी म्हणजे तूच जाणे! वर जायच्या पायऱ्या
पुन्हा बांधून काढल्या असल्यामुळे जरा व्यवस्थित दिसत होत्या. सुरुवातीच्या
पायऱ्या जरा उंच आहेत त्यामुळे चढायला चांगलाच दम लागतो, मग मात्र जरा सपाट
पायऱ्या आहेत!
काही पायऱ्या चढून गेल्यानंतर
विघ्नहर्त्या गणेशाचे एक मंदीर लागते! मूर्ती अतिशय सुबक आहे, तिला पाहताच या
इस्लामी राजवटीत हा ढेरपोट्या गणपती इथे राहिलाच कसा असा मला प्रश्न पडला! त्याचे
दर्शन घेवून आम्ही पुढे निघालो, आणि थोड्याच वेळात आम्ही तुझ्या सर्वोच्च भागात
येवून पोहोचलो. आणि समोर तो महाल उर्फ तीन दरवाजा दिसला! तिथून खाली नजर टाकताना
तुझे ते अवाढव्य रूप डोळ्यात साठवण्याचा प्रयत्न करत होतो!
दूरवर चांदमिनार एका छोट्या काडीप्रमाणे भासत
होता! डाव्या अंगाला औट्रम घाटातून जाणाऱ्या वाहनांची गर्दी दिसत होती. दूरवर
डोंगराच्या पायथ्याशी काही बांधकामाचे अवशेष पुढच्या भेटीसाठी खुणावत होते..
समोरचे डोंगर तुझ्याकडे इर्षेने पहात असल्याचा मला भास झाला. कदाचित त्यांना तुझा
हेवा वाटत असावा!
तिथून हळू नये असे वाटत असताना,
आमच्या रिक्षावाल्याचा फोन आला आणि वेळेचे गणित लक्षात घेता खाली उतरायला सुरुवात
केली. पुन्हा एकदा त्या अंधारी मार्गाने अर्धे खाली आलो आणि उरलेले अर्धे अंतर
मात्र आत्ता बांधलेल्या सिमेंटच्या जिन्याने उतरलो! समोरच एका बुरुजावर मेंढा तोफ
ठेवलेली होती! त्या वैशिष्ट्यपूर्ण तोफेला पाहण्यासाठी मुद्दाम १५ मिनिटे खर्ची
घातली आणि पुन्हा परतीच्या प्रवासाला मार्गस्थ झालो ते परत येण्याचे आश्वासन देवूनच!
आणि हो तुला सांगायचेच राहिले! त्यानंतर आम्ही औरंगाबाद शहर आणि दुसऱ्या
दिवशी अजिंठा लेणी सुद्धा फिरलो! त्याबद्दल कधीतरी लिहेन आणि तुला सुद्धा पाठवेन!
तोपर्यंत असाच पर्यटकांच्या गर्दीत राहून इतिहास सांभाळत राहा म्हणजे झाले!
तुझाच,
0 comments