त्रिशुंड गणेश मंदीर - सुंदर शिल्पकलेचा नमुना

  • August 30, 2016
  • By Shantanu Paranjape
  • 0 Comments
   मागे एकदा पाताळेश्वर मंदिरावर लेख लिहिला होता आणि बऱ्याच जणांनी मला मेसेज करून सांगितले की आम्ही पुण्यात राहून अजून पर्यंत इथे गेलोच नव्हतो पण तुझा ब्लॉग वाचून जाऊन बघून आलो. पुण्यामध्ये अशा अनेक वास्तू आहेत, मंदिरे आहेत की ज्यांचा अभिमान पुणेकरांना वाटला पाहिजे आणि त्या ऐतिहासिक स्थळांची जोपासना झाली पाहिजे. पण हे सर्व करण्याआधी आपल्याला ती स्थळे माहिती पाहिजेत आणि आपण ती जाऊन पहिली पाहिजेत. अशाच एका सुंदर मंदिराची माहिती देण्यासाठी या लेखाचा प्रपंच!!
   
   जाण्यासाठी फडके हौदावरून पुढे सरळ जावे आणि सिद्धेश्वर चौक लागला की डावीकडे वळावे. किंवा फडके हौदाच्या इथे कुणालाही विचारले म्हणजे ते सांगतील. आजमितीला हे मंदीर  सोमवार पेठे मध्ये भर वस्तीत अंगाखांद्यावर कोरीव शिल्पांचे दागिने खेळवत भक्कमपणे उभे असलेले पण काहीसे दुर्लक्षित असलेले असे हे त्रिशुंड गणेश मंदीर. खरं तर इतके दिवस मलाही असे भव्य मंदीर येथे आहे याची कल्पना नव्हती. पण असाच एक लेख वाचून नुकताच तेथे जाऊन आलो आणि थक्क झालो. १७व्या शतकाच्या उत्तरार्धात हे मंदीर कोरलेले आहे. म्हणजे २५० वर्ष झाली तरी हे मंदीर डौलात उभे आहे. या मंदिरालाचहुबाजूनी इमारतींनी वेढलेले असल्यामुळे चटकन दिसत नाही. पण इतर इमारतींपेक्षा नक्कीच उठून दिसते. खरं तर अशा प्रकारचे कोरीव काम आपणास शिवाच्या मंदिरात पाहायला मिळते.
   
   इंदूर जवळ असलेल्या धामपूर या गावातील संपन्न गोसावी भीमगीरजी यांनी इसवी सन १७५४ मध्ये या मंदिराचे बांधकाम केले. संपूर्ण दगडात बांधल्या गेलेल्या या मंदिराचे जोते हे पुरुषभर असून याचे दार पूर्वाभिमुख आहे. राजस्थानी, माळवा यांसारख्या वास्तुशैलींचा या मंदिरच्या उभारणी साठी वापर केला गेला. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या बाजूला दोन्ही बाजूस द्वारपाल आहे. द्वारपालांच्या बाजूच्या खांबांवर सुरेख अशा घंटा कोरलेल्या आहेत. प्रवेशद्वारावरील गणेश पट्टीवर सुबक गणेशाची मूर्ती कोरलेली आहे. या पट्टीच्या शेजारीच गजलक्ष्मीचे सुंदर शिल्प मनाला भुरळ घालते. गजलक्ष्मी च्या वरच्या बाजूला शेषशायी विष्णू पहुडलेला आपल्याला दिसतो. त्याच्या भोवती असणाऱ्या महीरपीवर माकड, पोपट यांसारखी शिल्पे कोरून कारागीराने त्याची कल्पकता दाखवली आहे. त्या शिल्पांच्या वरती दशावतार आणि यक्ष किन्नर सुद्धा बघायला मिळतात.

   
   प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला आपणास वैशिष्ट्यपूर्ण शिल्प बघायला मिळतात. या शिल्पांमधून आपल्याला तत्कालीन राजकीय परिस्थितीचे दर्शन होते. हातात बंदुका घेतलेले ३ सैनिक आणि मध्ये साखळदंडाने जखडलेला गेंडा असे हे शिल्प आहे. प्लासीच्या युद्धानंतर १७५७ मध्ये इंग्रजांनी बंगाल आणि आसाम या प्रदेशांवर आपली सत्ता स्थापन केली आणि आता उरलेल्या हिंदुस्तानात सुद्धा इंग्रज आपले पाय रोवणार असा इशारा सुद्धा या शिल्पांतून मिळतो. आसामचा प्रदेश आपल्या वर्चस्वाखाली खाली आणला हे दर्शविण्यासाठी एकशिंगी गेंड्याला साखळदंडाने बांधताना दाखवणे यातून तत्कालीन कारागीर कल्पक असावेत हे दिसून येते (आणि काही कारागीर आसाम ला जाऊन आले आहेत हे सुद्धा चटकन कळते). अशाच पद्धतीचे शिल्प उजव्या बाजूस सुद्धा कोरलेले आहे. दोन्ही शिल्पपटांच्या खालच्या बाजूला एकमेकांशी झुंज देणारे हत्ती कोरलेले दिसतात. हे हत्ती म्हणजे महाराष्ट्रातील मराठी सत्तेचे प्रतिक होय. माझ्यामते मराठी सत्ता आपापसाथ झुंझत आहेत असेच यातून कारागिराला सांगायचे असेल असे वाटते. इंग्रज सैनिक आणि त्यांच्या बंदुका अगदी हुबेहूब कोरल्या आहेत.      प्रवेशद्वारातून आत गेलो असताना एक प्रकारची शांतता आपणास मोहून टाकते. येथून गर्भगृहाच्या प्रवेशद्वारातून प्रवेश करताना उजवीकडे आणि डावीकडे आपल्याला पहारेदार कोरलेले दिसतात. तसेच प्रवेशद्वारावर सुबक असे कोरीव काम केलेले दिसते. येथून आपण आत शिरल्यावर दिसते ती गाभाऱ्यातील सुंदर अशी गणेश मूर्ती. एक मुख, तीन सोंडा, सहा हात आणि मयुरावर आरूढ झालेली अशी ही मूर्ती पाहताना मन अगदी मोहून जाते. मूर्ती शेजारी खालती रिद्धी देखील बसलेली आपल्याला दिसते. तीन सोंडेपैकी एक सोंड मोदकपात्रास स्पर्श करताना, दुसरी उदरावर तर तिसरी रिद्धीच्या हनुवटीला स्पर्श करताना आपल्याला दिसते. या गणेशमूर्तीच्या मागे आपल्याला गणेशयंत्र सुद्धा पाहायला मिळते. तसेच शेषशायी विष्णुमूर्ती सुद्धा येथे आपल्याला दिसते.  या मंदिराचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या मूर्ती खाली असलेले तळघर. या तळघरात श्री दत्तगुरू गोसावी यांची समाधी आहे. या तळघरात जिवंत झरा असल्याने येथे वर्षभर पाणी असते. दर वर्षी गुरुपौर्णिमेला हे तळघर भाविकांसाठी खुले करण्यात येते.   

   गर्भगृहाच्या आतमध्ये समोर वरती तीन शिलालेख कोरलेले आहेत. त्यापैकी २ हे संस्कृत मध्ये आहेत तर एक हा फारसी भाषेत आहे. या शिलालेखांचे वाचन पुढीलप्रमाणे –

१) सर्वात डावीकडील शिलालेख-
पुण्यनगरी पुरी
II श्री गणेशाय नमः II श्री II
II सरस्वत्यै नमः II श्री गुरु II
II दक्षीणामुर्तये नमः II स II
II वत १८०१ तथा नृपशालि I
II वाहन शके १६७६ भावाना
II म संवत्सरे मार्गशीर्ष शुक्ल
II सौम्यावासरे शुभवेला II
II यां अस्य स्थाने श्रीमहका
II ल रामेश्वर प्रतिष्ठीत सु II
II तिष्ठीतमस्तु II श्री देवदत्त II
II इह स्छान शुभं भवतु श्रीरस्तु


अर्थ- विक्रम संवताच्या १८०१ किंवा शालिवाहन शकाच्या १६७६ वर्षी भावनाम संवत्सरातील    मार्गशीर्ष शुद्ध या दिवशी सौम्य वारी (बुधवार, दिनांक २० नोव्हेंबर १७५४) श्री देवदत्त याने श्री महेश्वराची या मंदिरात स्थापना केली. (श्री खरे यांच्यामते ‘चैत्रादी विक्रम संवत १८११ [संवत १८०१ नाही] व शक १६७६ हे एकमेकांशी जुळत असून शकाच्या पद्धतीने भावनाम संवत्सर पडतो.)

२) मधल्या चौकटीवरील शिलालेख-   

II श्री गुरुदेव II
II दत्त II
II श्री गणेशाय नमः महेशा II
II त्रापारो देव महिम्नो नाप II
II रा स्तुतिः II अघोरात्रापारो II
II मंत्रो नास्ति तत्वं गुरोः परं II
IIजयति मंगला I काली भद्र
II काळी कपालिनी II दुर्गा
II क्षमा शिव धात्री स्वाहा
II स्वधा नमोस्तु ते II सर्व मंग
II ल मांगल्ये शिवे सर्वार्थसा
II धके II शरण्ये त्र्यंबके गौ
II री नारायणी नमोस्तु ते II
II यत्र योगेश्वरः कृत्सनो यत्र पा
II र्थो धनुर्धरः II तत्र श्रीर्विजयो
II भूतिर्धृवा नी नीतिर्मतिर्मम II


३) सर्वात उजवीकडचा शिलालेख-  हिंदु मंदिरात क्वचितच सापडणारा फारसी भाषेतील शिलालेख म्हणून याला महत्व आहे. शिलालेखातील मजकूर खालील प्रमाणे

१) ई मकान गुरुदेवदत्त
२) फुकरा फी तारीख हफ्तुम
३) शहर जुकअद रोज चहार शब्देह
४) सनह ११६७ तश्मीर नमूद शुद.

अर्थ- हे घर फकीर गुरुदेव दत्त यांचे असून तारीख ७ माहे जिल्काद ११६७ (११७६ – हिजरी) (म्हणजेच २६ ऑगस्ट , १७५४ बुधवार) या दिवशी बांधून पूर्ण झाले.

( सर्व शिलालेखांचे संदर्भ- मराठी-संस्कृत शिलालेखांच्या विश्वात – श्री. महेश तेंडूलकर)
    त्रिशुंड मंदिराच्या गाभाऱ्याच्या भागात आपणास काही कोरीव काम आपणास पाहायला मिळत नाही. मात्र मंदिरच्या बाहेरून जर आपण प्रदक्षिणा घालायला गेलो तर काही मूर्ती आपली वाट पाहत असतात. डावीकडील बाजूने गेलो असताना असलेल्या पहिल्या देवकोष्ठ्यात एक सुंदर नटराजाची मूर्ती कोरलेली दिसते. त्या मुर्तीवरच पक्षी आणि फुलं यांनी सजवलेली सुंदर चौकट आपणास दिसून येते. मंदिराच्या मागच्या बाजूला असलेल्या देवकोष्ठ्यात एक आगळेवेगळे शिल्प आपणास पाहायला मिळते, ते म्हणजे शिवाची लिंगोद्भव प्रतिमा. सहसा कुठे न आढळणाऱ्या या शिल्पावर वरच्या दिशेने उडणारा हंस दाखविला आहे. केवळ शाळुंका असलेले हे शिल्प असून खाली मुसंडी मारणारा वराह व शिवलिंगावर छत्री धरणारा नाग अशा प्रतिमा कोरलेल्या आहेत. एका पुराणातील कथेवर हे शिल्प कोरलेले आहे. जेव्हा ब्रह्मा आणि विष्णू यांच्यात श्रेष्ठ कोण यासंबंधी वाद झाला असताना. भगवान शंकरांनी एक अग्निस्तंभ तयार करून त्याचा आदि व अंत या दोघांना शोधण्यास सांगितले. तेव्हा श्री ब्रह्म यांनी हंसाचे रूप घेऊन स्तंभाच्या अंताचा शोध केला तर विष्णुने वराह रूप धारण करून पाताळात आदी शोधण्याचा प्रयत्न केला. जेव्हा दोघानांही यश आले नाही तेव्हा भगवान शंकराने, “दोघेही आपल्या परीने श्रेष्ठ आहात” असे सांगून आपले लिंगोद्भव रूप प्रकट केले. शिल्पकाराने या कथेचा खुबीने वापर करून हे शिल्प कोरले आहे. प्रदक्षिणा करत पुढे गेल्यावर तिसऱ्या देवकोष्ठ्यात चतुर्भुज भैरवाची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. एकंदर शंकराच्या मंदिराप्रमाणे असेलेल्या या मंदिरात पुढे गणेशाची स्थापना झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.त्रिशुंड मंदिराच्याखाली एक तळघर सुद्धा आहे जे फक्त गुरु पौर्णिमेच्या दिवशी भाविकांसाठी उघडले जाते. अर्थात जे पुण्यात राहत नाहीत त्यांना हे पाहणे शक्य होत नाही म्हणून त्यांच्यासाठी या तळघराचे  फोटो देत आहे. जवळ जवळ वर असलेल्या मंदिराएवढेच या तळ घराचे क्षेत्र फळ  आहे. तळघराच्या शेवटी गोसावींची समाधी सुद्धा आहे. या तळघराचा वापर पूर्वी इथे शिकायला असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय म्हणून होत असे. या तळघरातून शनिवार वाड्याला जाण्यासाठी एक भुयार आहे असा इथल्या लोकांचा समज आहे, मात्र आज मितीला तो रस्ता  बंद केला आहे. तळ घराला जाण्यासाठी दोन दरवाजे आहेत. एक म्हणजे मंदिराच्या मुख्य दरवाज्याइथे उजव्या बाजूला असणाऱ्या दरवाज्यातून आणि दुसरा म्हणजे गाभाऱ्यातून. गाभाऱ्यातून जाणाऱ्या रस्त्याने अगदी कसरत करतच  जावे लागते त्यामुळे हा रस्ता  लोकांसाठी बंद असतो. आज मितीला तळघरात दिवे वगैरे बसवून उजेड केला आहे त्यामुळे जाणे सोयीस्कर होते. जमिनीच्या खाली असून सुद्धा इथे गुदमरायला होत नाही हे विशेष.

छताला टांगलेल्या कड्या  दिसतात. त्यांचा उपयोग हा पूर्वी इथे राहणारे गोसावी उलटे टांगून धुरी घेण्यासाठी करत असत. तळघरातून एक रस्ता हा एका विहिरी कडे जातो मात्र तो मार्ग सुद्धा सध्या बंद आहे. पूर्वी इथे राहणाऱ्या लोकांच्या पाण्याची सोय त्या विहिरीच्या पाण्यातून होत असे. तळघरात पाण्याचा एक जिवंत झरा असल्याने वर्षभर इथे गुढघ्या एवढे पाणी असते. सध्या या मंदिराच्या संवर्धनाचे काम हाती घेण्यात आल्या मुळे  तळघरातून विहिरीकडे जाणाऱ्या रस्त्याचा दरवाजा उघड झाला आहे.  या तळघरा विषयी अजून विस्तृत माहिती उपलब्ध आहे ती  जसा वेळ मिळेल तशी लिहीत जाईनच.

तळघर 


तळ घरातून समाधी कडे जाणारा मार्ग 
गोसावींची समाधी 
बंद केलेला भुयारी रस्ता 
एखादे लेणं वाटावे असे हे मंदिराचे बांधकाम हे मनाला भूरळ टाकते. पुण्याच्या भर वस्तीत असे काही असेल याची कल्पना सुद्धा कधी आपल्याला येत नाही. एक सुंदर कलाकुसरीने नटलेले मंदीर पाहिल्याचे समाधान घेऊन आपण परतीच्या वाटेला लागलेले असतो ते मनात भक्तीभाव ठेऊनच.

You Might Also Like

0 comments

$(document).ready(function(){ $('#mscontent').css('opacity','0'); });