शिवाजी राजांचा मृत्यू कसा झाला?

Source- Google
काही दिवसांपूर्वी शिवाजी राजांच्या मृत्यूबद्दल सभासदाचे विचार सांगितले होते आणि त्याचबरोबर एका इंग्रज अधिकाऱ्याचे पत्र सुद्धा दिले होते. परंतु काही जणांनी सभासद बखरीवर शंका घेतली होती की यातील माहिती ही कितपत खरी आहे वगैरे. तर या लेखात इतर काही बखरींमध्ये किंवा पत्रांमध्ये आलेला उल्लेख देत आहे जेणेकरून हे लक्षात येईल की राजांचा मृत्यू हा आजारानेच झाला होता.

·         जेधे शकावली-
“शके १६०२ रौद्र संवछर चैत्र शुध पौर्णिमा शनवारी दोप्रहरां दिवसां रायगडी सिवाजी राजे 
यांनी देह ठेविला
जेधे शकावली ही कान्होजी नाईक जेधे यांच्या वंशजांकडून मिळवून छापण्यात आली. एक विश्वासाचे साधन म्हणून ही शकावली मानली जाते.

·         शिवकालीन पत्रसारसंग्रह खंड २ लेख- २२८६

गोवळकोंड्याहून असे लिहून आले आहे की, शिवाजीराजाला त्याच्या दुसऱ्या बायकोकडून (म्हणजे सोयराबाई यांच्याकडून) विषप्रयोग झाला असावा
ज्या डाग रजिस्टर मधील संदर्भ देऊन विषप्रयोग केला असा आरोप केला जातो तिथे विषप्रयोगाचा उल्लेख जरूर आहे परंतु तो सोयराबाई यांनी केला असा उल्लेख आहे


·         मराठ्यांची बखर- ग्रांड डफ, मराठी अनुवाद डेव्हिड केपन

“यानंतर शिवाजीचा अंतकाळ समीप आला. तो प्रकार असा, शिवाजी रायगडी असतां त्याला गुढघी म्हणून रोग झाला. तो प्रतिदिवशी वृध्धींगत होत चालला. मग त्याच्या योगेकारून मोठा ज्वर झाला. ज्वर आल्यापासून सातव्या दिवशी तो मृत्यू पावला.”


·         श्रीमंत महाराज भोसले (शेडगांवकर) यांची बखर

“शके १६०२रौद्रनाम संवत्सरे फसली सन १०९० राज शके ७ या साली शिवाजी महाराज छत्रपती हे रायगडीच होते.तेथेच महाराज छत्रपती यांस व्यथा ज्वराची जाहाली,ते समई महाराज पुण्यश्लोकी व त्रिकालज्ञानी सर्व जाणते याणी आपला विचार पाहता तो औक्षमर्यादा जाहाली असे जाणोन जवळील अष्टप्रधान व सरकारकून व कारकून व कारभारी व सरदार व हुजरे वगैरे मंडळी यांस बोलावून आणिले.”·         ९१ कलमी बखर (भारतवर्ष)-
“नंतर राजे स्वामीस नवज्वर प्राप्त झाला. शके १६०२ रुद्र नाम संवत्सरे चैत्र शुद्ध १५ दोन प्रहरा, राजेस्वमी कैलासवासी झाले. सावधपणे संस्कार करून हरिदास कीर्तन करीत असता देह ठेवला.”

·         सर जदुनाथ सरकार –

She (soyarabai) did an act which made shivaji give up his life”    

याशिवाय इतर अनेक ठिकाणी राजांच्या मृत्यूबद्दल उल्लेख येतात, ते सागर पाध्ये याने एकत्रित लिहिले आहेत. ते जरूर वाचावेत. एक-दोन ठिकाणचा उल्लेख वगळता इतर सर्व ठिकाणी कोणत्या ना कोणत्या आजाराने मरण पावले असेच दिसून येते. आजाराच्या बाबतीत एकवाक्यता नाही हे मान्य परंतु सारसंग्रह मधील पत्रे वाचली असता असे कळून येते की राजे जिवंत आहेत का नाही याबद्दलच सांशकता होती तर कोणता आजार झाला हे कळण्याचा मार्ग कोणता?

ज्या ठिकाणी विषप्रयोग झाला असा उल्लेख दिसून येतो तिथे मात्र सोयराबाई यांनी विष दिले असेच लिहिलेले आढळते. मग आता जे म्हणत आहेत की विषप्रयोग झाला ते हे मान्य करणार का की विषप्रयोग हा बायकोनेच केला असेल म्हणून?

अजून एक मुद्दा असा येतो तो म्हणजे, संभाजी महाराज जेव्हा राजे झाले तेव्हा त्यांच्या अष्टप्रधान मंडळात जुन्या कारभारी लोकांना जागा दिली होती. आता जर विषप्रयोग हा अष्टप्रधान मंडळातील लोकांनी केला असेल तर मग पुन्हा नेमणूक करण्याची काय गरज? इथे एक लक्षात घेतले पाहिजे की त्यांना जी शिक्षा झाली ती राजाराम महाराज यांना राज्याचे वारस बनवण्याच्या कटामुळे झाली ना की विषप्रयोगासारख्या न घडलेल्या कारणांमुळे.  

सध्याच्या काळात नवीन इतिहास लिहिण्याचे प्रयत्न काही लोकं करत आहेत आणि ते स्वतःच्या सोयीनुसार संदर्भ न देता समाजात काहीबाही पसरवत आहेत. सर्व पुरावे जर आजारामुळे मृत्यू झाला आहे असे सांगत असतील तर मग विषप्रयोगाचा प्रसार करण्याचे मूळ उद्दिष्ट काय? 


You Might Also Like

0 comments

$(document).ready(function(){ $('#mscontent').css('opacity','0'); });