भारतातील गरुडमूर्ती

  • September 05, 2018
  • By Shantanu Paranjape
  • 0 Comments

                  रांंझेमधील गरुड मूर्ती

आजवर उंच आकाशात भरारी मारणारा पक्ष्यांचा राजा असेच गरुडाचे वर्णन सर्वसामन्यांच्या ओळखीचे. संस्कृत मध्ये याला ‘वैनतेय’ वगैरे नाव देऊन चांगला भारदस्त पणा सुद्धा आणला आहे. पक्ष्यांचा राजा याशिवाय भगवान विष्णूचे वाहन म्हणून सुद्धा गरुड हा पक्षी भारतात प्रसिद्ध आहे. गरुडाच्या जन्माची सुद्धा एक छान कथा आपल्या पुराणात सांगीतली आहे. सूर्याचा रंग कोणता या पैजेत नाग लोकांच्या कारस्थानामुळे विनिता हीला नागमाताकद्रू हिचे दास्यत्व पत्करावे लागले. या गुलामीतून सुटण्याची एकच अट आणि ती म्हणजे स्वर्गलोकातून नागांना अमृताचे कुंभ आणून देतील. 

पक्षीकुळात जन्मलेल्या या विनिताचा आणि कश्यप ऋषी यांचा सुपुत्र म्हणजे गरुड. आपली आईज्या नागांच्या दास्यात आहे हे समजल्यामुळे गरुडाचे नागांशी अगदी जन्मापासूनचे वैर होते. परंतु आईला सोडवायचे तर स्वगार्तून अमृतकुंभ आणून देणे गरजेचे होते त्यामुळेगरुडानेस्वर्गावर आक्रमण केले आणि तेव्हा झालेल्या युद्धात इंद्राचा पराभव झाला. नंतर पुढेअशी अशी युक्ती करण्यात आली की गरुडाने तो अमृतकुंभ हा नागांच्या हवाली करावा आणि नागांनी ते अमृतप्राशन करण्याआधीच इंद्राने तो पळवावा. अर्थात या योजनेप्रमाणे सर्व घडून आले आणि गरुडमाता विनितेची सुद्धा सुटका झाली तसेच देवांना त्यांचा अमृतकुंभ परत मिळाला.


गुरुमादाय उड्डीनः इति गरुडः’ म्हणजेच जड वस्तू उचलून उडणारा असा तो गरुड, असे गरुडाचे वर्णन महाभारतात आले आहे. पुढे गरुडाचे विष्णू सोबत सुद्धा युद्ध झाले आणि युद्धानंतर झालेल्या तडजोडीत भगवान विष्णूनी गरुडाला आपल्या ध्वजावर स्थान दिले आणि गरुडाने सुद्धा विष्णूचे वाहन होणे पत्करले.भारतात असणाऱ्या प्राचीन पुराणांमध्ये गरुडाची माहिती सांगणारे संबंध गरुड पुराण आहे.

भारतवर्षात गरुडाला फार मोठे स्थान आहे. अनेक प्राचीन राज्ये आणि त्यांचे राजे हे गरुडाची पूजा करत असत. आजमितीला भारतात गरुडाच्या अनेक मूर्ती आढळून येतात. काही मूर्ती बसलेल्या अवस्थेत आहेत तर काही उभ्या. महाराष्ट्रात वैष्णव परंपरेत तयार केलेल्या गरुडाच्या मूर्ती या दोन हातांच्या असून त्या सदैव हात जोडलेल्या स्थितीत म्हणजेच‘अंजली’ मुद्रेतअसतात. बऱ्याच वेळा काही काही गरुड मूर्तीना चार हात सुद्धा असू शकतात.काही वेळा एक गुडघा टेकवून बसलेल्या स्थितीत तर काही वेळा उभ्या. पुण्यात सोमवार पेठेतील नागेश्वर मंदिरात तर शिवापूर जवळील रांजे गावातील विष्णूच्या मंदिराबाहेर बसलेल्या अवस्थेतील गरुडाची मूर्ती या अत्यंत पाहण्यासारख्या आहेत.गरुडाची उभी मूर्ती देवळात तरी माझ्या पाहण्यात नाही आलेली किंवा आली असेल तरी आज विस्मृतीमध्ये गेली आहे परंतु आमच्या घरच्या देव्हाऱ्यात दोन हात जोडून उभी असलेली गरुडाची मूर्ती आहे आणि तिची नित्यनियमाने पूजा सुद्धा केली जाते.शक्यतो वैष्णव मंदिरात देवाच्या बाजूला उभ्या स्व्ररूपाची गरुड मूर्ती पाहण्यास मिळते.असा हा भारतात असलेला गरुड या पक्ष्याचा प्रवास..


अर्थात वरील पौराणिक कथेवरून गरुडाचा आणि भारतातीलगंडभेरुंडाचा तसा थेट संबंध समजत नसला तरी या दोन पक्ष्यांमध्ये सार्धम्य असावे असे मनोमन वाटते. इ.स. १०३१ मधीलम्हणजेच चालुक्यकाळातील एका शिलालेखात चालुक्यांचा राजा याचानामोल्लेख हा भेरुंड आणि गरुड अशा दोन्ही अर्थाने येतो. हाच काय तो त्यातल्या त्यात जवळ जाणारा पुरावा. भारतातील पुराणामध्ये गरुडाला नेहमी सापावर अंकुश ठेवताना पाहिले गेले आहे किंवा पूजले गेले आहे. पण गंडभेरुंडच्या शिल्पांमध्ये साप कुठेस नजरेस पडत नाही. जरी गंडभेरुंडाची नखे ही गरुडासारखी तीक्ष्ण असली तरी या दोन पक्ष्यांमध्ये खरच साम्य आहे का हा थोडा चर्चेचा मुद्दा होऊ शकतो.

संदर्भ-भारतीय मुर्तीशास्त्र – नि. पु. जोशी

© 2017, Shantanu Paranjape

____________________________________________________________________________

मला सोशल मिडीयावर फॉलो करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. 

इन्स्टाग्राम - Paranjape_shantanu
फिरस्ती महाराष्ट्राची - Firasti_mh

You Might Also Like

0 comments

$(document).ready(function(){ $('#mscontent').css('opacity','0'); });