शिवशाहीच्या इतिहासाची काही संस्कृत साधने

  • January 21, 2019
  • By Shantanu Paranjape
  • 0 Comments

शिवशाहीच्या इतिहासाचा अभ्यास करताना अनेक भाषांमधील साधने उपयोगी ठरतात. यात मग मराठी, संस्कृत, फारसी, इंग्रजी, फ्रेंच अशा भाषांचा समावेश होतो. त्यातली संस्कृत भाषेतील साधने बऱ्याच वेळा समकालीन असल्याने महत्वाची ठरतात आणि इतिहास अभ्यासताना त्यांचा जास्त उपयोग केला जातो. या लेखात आपण बघणार आहोत शिवशाहीच्या इतिहासाचा अभ्यास करण्यास उपयोगी पडणारी काही संस्कृत साधने. 

Chhatrapati ShivajiRaje Bhosale Portrait In Rijks Museum (Source www.google.com)१. राधामाधवविलासचम्पू - 

हा काव्यग्रंथ कवी जयराम पिंडे यांनी लिहिलेला आहे. यातील बरेसचे लिखाण हे शहाजी महाराजांच्या कारकिर्दीत झाले असून त्याचे संपादन हे व्यंकोजी राजांच्या काळात करण्यात आले आहे. या ग्रंथात शहाजी राजांच्या अनेक स्वाऱ्यांचा समावेश केला गेला आहे. भोसले हे मुळचे रजपूत हा उल्लेख सुद्धा येथेच मिळतो. हा ग्रंथ इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी शोधून काढला आणि तो १९२२ मध्ये प्रकाशित केला. 

२. शिवभारत - 

हा काव्यमय ग्रंथ कवींद्र परमानंद यांनी लिहिलेला असून शिवाजी राजांच्या आयुष्याचा अभ्यास करण्यासाठी एक महत्वाचे साधन ठरतो. परमानंद हा मुळचा नेवासे या गावचा रहिवासी. या ग्रंथात एकूण ३२ अध्याय आहेत. यात परमानंद हा शिवाजी महाराजांना अवतारी पुरुष मानतो. ग्रंथ हा समकालीन असल्याने यातील घटनांवर विश्वास ठेवता येतो. ग्रंथात अलंकारिक भाषा ही अनेक ठिकाणी वापरलेली दिसून येते. 

३. अनुपुराण - 

हा ग्रंथ परमानंदाच्या मुलाने व नातवाने लिहिला असे मानण्यात येते. हे काव्य १९५२ मध्ये प्रकाशित करण्यात आले. या ग्रंथात शहाजी राजांपासून संभाजी राजांच्या पर्यंतचा इतिहास देण्यात आला आहे. वा. सी. बेंद्रे यांनी आपला संभाजी राजांवरील ग्रंथ याच अनुपुराणातून संदर्भ घेऊन लिहिला आहे. 

४. राज्यव्यवहार कोष - 

या ग्रंथाची रचना धुंडीराज लक्ष्मण व्यास याने केली आहे. अनेक फारसी शब्द पूर्वी राज्यकारभारात वापरले जात होते. या शब्दांना पर्यायी मराठी शब्द म्हणून शिवाजी राजांनी हा ग्रंथ करवून घेतला आणि राज्यकारभारात मराठीचा उपयोग पुन्हा करण्यात येऊ लागला. 

५. पर्णालपर्वतग्रहणाख्यान - 

या ग्रंथाची रचना कवी जयराम पिंड्ये यांनी केली आहे. हा ग्रंथ स. म. दिवेकर यांनी शोधून प्रकाशित केला आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी राजांच्या कारकिर्दीत झालेल्या पन्हाळ्याच्या वेढ्याचे वर्णन करण्यात आले आहे. यात ५ अध्यात व ३५० श्लोक आहेत. नुकतेच या ग्रंथाचे पुनःप्रकाशन करण्यात आले आहे. 

६. राजारामचरितम  - 

या ग्रंथाची काव्यरचना कवी केशव पंडित याने केली आहे. हा ग्रंथ इतिहास संशोधक वा. सी. बेंद्रे यांनी शोधून काढला आणि १९३१ मध्ये तो प्रसिद्ध केला. या ग्रंथात राजाराम महाराजांच्या जिंजी प्रवासाचा तपशील देण्यात आला आहे. 

७. शिवराज्याभिषेककल्पतरू - 

हा काव्यग्रंथ कवी अनिरुद्ध याने लिहिला आहे. यात एकूण २३४ श्लोक आहेत. या ग्रंथात निश्चलपुरी गोसावी आणि गोविंद यांच्यातील काव्यमय संवाद लिहिला असून, शिवाजी राजांच्या दुसऱ्या राज्याभिषेकाची माहिती मिळते. शिवाजी महाराज वैदिक नसून शुद्र आहेत आणि त्यांचा राज्याभिषेक हा तांत्रिक पद्धतीने झाला पाहिजे हे निश्चलपुरी या ग्रंथात ठासून सांगतो. 


आणखीन काही संस्कृत ग्रंथ, तसेच संस्कृत भाषेत लिहिलेली पत्रे यातून आपल्याला शिवशाहीच्या इतिहासाची माहिती मिळते. यापुढील लेखात आपण शिवशाहीच्या इतिहासाची काही मराठी साधने पाहू.


© 2018, Shantanu Paranjape

____________________________________________________________________________

मला सोशल मिडीयावर फॉलो करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. 

इन्स्टाग्राम - Paranjape_shantanu
फिरस्ती महाराष्ट्राची - Firasti_mh

You Might Also Like

0 comments

$(document).ready(function(){ $('#mscontent').css('opacity','0'); });