वीरगळांवरील समरप्रसंग

 • January 15, 2019
 • By Shantanu Paranjape
 • 4 Commentsवीरगळांवर लिहिलेल्या मागच्या लेखात आपण वीराच्या स्वर्गारोहणाचा अर्थ पाहिला तर आजच्या लेखात आपण वीरगळावर कोरलेल्या समरप्रसंगांची माहिती घेऊ. मुळात वीरगळ कोरण्यामागची संकल्पना ही धारातीर्थी पडलेल्या वीराचे स्मरण करण्यासाठी आहे त्यामुळे वीरांची लढाई हा वीरगळावरील अविभाज्य घटक. असे वीरगळ कमीच की ज्यांवर लढाई किंवा त्याप्रकारचे शिल्प नसेल. वीरगळावरील या तिसऱ्या भागात मग अनेक प्रकारची युद्धे दाखवली जात असत. कधी तलवारीने लढण्याचा प्रसंग, तर कधी हातात तीर कामठा घेऊन असलेला वीर. कधी गोरक्षणार्थ धारातीर्थी पडलेला वीर तर कधी हिंस्त्र पशुसोबत दोन हात करताना मृत्युमुखी पडलेला वीर. महाराष्ट्रातील वीरगळावर असे अनेक प्रसंग कोरलेले आपल्याला दिसून येतात. काही काही वीरगळांवर वीर घोड्यावर बसवलेले दाखवले आहेत तर काही वीरगळांवर पायदळाचे युद्ध दाखवले आहे. बोरीवली येथील एकसर येथील वीरगळावर तर चक्क आरमारी युद्ध दाखवले आहे. या सर्व शिल्पांमधून आपल्याला त्या काळातील एकंदर सामरिक सज्जता दिसून येते तसेच युद्ध कशा प्रकारे लढले जात असे हे सुद्धा कळून येते इतकेच काय तर त्याकाळातील सैनिकांचे निरनिराळे पोशाख आपल्याला सामाजिक जीवनाची सुद्धा माहिती देऊन जातात. महाराष्ट्रातील वीरगळांवर युद्ध प्रसंग येण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे शिलाहार आणि यादव यांच्यात चाललेले युद्ध. प्रबळ यादवांनी विभागलेल्या शिलाहार राजसत्तेचा पराभव करून आपले राज्य महाराष्ट्रात प्रस्थापित केले. त्या दरम्यान झालेल्या अनेक युद्धांमध्ये अनेक जण धारातीर्थी पडले त्यामुळे साहजिक सर्वात जास्त वीरगळ हे त्याकाळात उभारले गेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपण आता वर दिलेले लढण्याचे प्रसंग दोन तीन भागात मिळून एक एक करून थोडक्यात पाहू.१.       पायदळाचे युद्ध- वीरगळांवर पायदळाच्या युद्धात अनेक प्रकारचे वैविध्य आढळून येते. अनेक ठिकाणी दोनच वीर दाखवले जातात तर काही ठिकाणी ४-५ वीरांचा समूह दाखवला जातो. बऱ्याच वेळेला या वीरांच्या हातात तलवार असते आणि तर बऱ्याच वेळेला धनुष्यबाण. घेऊन वीर दोन-तीन वीरांशी लढलेला दाखवला जातो. यात अशी अनेक क्रमांतरणे आणि संयोजाने केली जाऊ शकतात आणि तशी ती आपल्याला पाहायला सुद्धा मिळतात. हे झाले महाराष्ट्रातील वीरगळांबाबत पण कर्नाटकात जे विरगळ आहेत त्यांवर तर संपूर्ण युद्ध प्रसंग कोरलेला असतो ते शिल्प पट शिलालेखयुक्त तर असतातच पण युद्धातील अनेक छोट्या छोट्या बाबी त्यात दाखवलेल्या असतात हे विशेष. अर्थात कर्नाटकात आढळणारे वीरगळ हा विषय खूप मोठा आहे त्यामुळे त्यात खोलात नको जायला.तुम्ही जर काळजीपूर्वक पाहिले तर त्याकाळात असणाऱ्या वीरांच्या वेशभूषा आपल्याला सहज कळून येतात. अनेक ठिकाणी असलेल्या वीरगळांवर एका बाजूच्या वीरांवर मराठा लोकांसारखी पगडी दिसून येते तर समोरच्या बाजूस असणाऱ्या वीरांच्या डोक्यावर कधी कफनी तर कधी चेहऱ्यावर चक्क दाढी दिसून येते. उत्तरेकडून आलेली मुसलमान लोकांची टोळधाड आणि त्यात मरण पावलेल्या हिंदू लोकांचे हे स्मारक अगदी सहज कळून येते. ज्या भागात मोठ्या प्रमाणावर युद्धे झाली अशा ठिकाणी व आजूबाजूच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात वीरगळ दिसून येतात. काही ठिकाणी असणाऱ्या वीरगळांवर स्त्रिया सुद्धा दोन हात करताना दाखवलेल्या दिसून येतात. आपले दुर्दैव इतकेच की या स्मराकांवर मरण पावलेल्या वीरांची नावे नाहीत अन्यथा फार मोठा इतिहास हाती लागला असता. रायगड जिल्ह्यातील एका वीरगळावर तर चक्क दहा तोंडाचा रावण कोरलेला दिसून येतो.  २.       घोडेस्वारांचे युद्ध – वीरगळांवर आढळणाऱ्या वीरांमध्ये घोड्यावर बसलेल्या वीरांचे सुद्धा शिल्प कोरलेले दिसून येते. बऱ्याच वेळेला हा घोडेस्वार एकटा २-३ वीरांशी झुंझत असलेला दाखवला जातो तर बऱ्याच वेळेला दोन घोडेस्वरांमधील झुंज दाखवली जाते. यात मग ढाल-तलवार तर कधी धनुष्यबाण घेऊन वीर लढताना दिसून येतात. अनेक वेळेला दोन वीर हे एकमेकांवर भाल्याने हल्ला करत आहेत असे दृश्य दिसून येते. यांवर दाखवण्यात आलेले घोडे सुद्धा अगदी व्यवस्थित कोरलेले दिसून येतात. माझ्यामते हे शिवकाळ किंवा त्यापूर्वीच्या काळातील असावेत असे वाटते. कर्नाटकात असणाऱ्या वीरगळांवर हत्तीसुद्धा दाखवण्यात आले आहेत.तर हे होते वर दिलेल्या पाच प्रसंगांपैकी दोन महत्वाचे प्रसंग. अर्थात जागेच्या अभावामुळे प्रत्येक प्रसंग थोडक्यात लिहायला लागला याची खंत आहेच. असो!! पुढच्या भागात आपण हिंस्त्र पशूंशी लढताना झालेला मृत्यू आणि गो संरक्षणार्थ झालेल्या मृत्यूचे स्मरण करण्यासाठी उभारलेल्या वीरगळांची माहिती घेऊ!!(टीप - सर्व फोटो हे विविध ठिकाणी असलेल्या विरगळांचे आहेत त्यामुळे स्थळ लिहिले नाही. यातील काही फोटो हे माझ्या मित्रांनी काढलेले आहेत)

© 2018, Shantanu Paranjape

____________________________________________________________________________

मला सोशल मिडीयावर फॉलो करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. 

इन्स्टाग्राम - Paranjape_shantanu
फिरस्ती महाराष्ट्राची - Firasti_mh

You Might Also Like

4 comments

 1. फारच छान...सुटसुटीत माहिती...हा विषय जितका अफाट आहे...त्या तुलनेत त्यांच्या अधिक अभ्यास होण्याची आवश्यकता आहे...

  ReplyDelete
 2. एक वीरगळ बाणेर (पुणे) गावात पण आहे

  ReplyDelete
 3. Dhaval Ramtirthkar4 December 2019 at 22:53

  मस्त माहिती

  ReplyDelete

$(document).ready(function(){ $('#mscontent').css('opacity','0'); });