वीरगळांवरील समरप्रसंग भाग - २ आणि गोवर्धन वीरगळ

 • January 15, 2019
 • By Shantanu Paranjape
 • 3 Commentsमागील लेखात आपण पायदळ युद्धप्रसंग आणि घोडेस्वरांच्या युद्धाच्या प्रसंगांबद्दल माहिती घेतली. आता या लेखात आपण प्राण्यांशी लढताना आलेल्या मृत्यूनंतर बांधलेले स्मारक आणि गाईंचे संरक्षण करताना आलेल्या मृत्त्युनंतर बांधलेल्या वीरगळांची माहिती घेऊ..१.       प्राण्यांशी युद्ध – हा जरा रंजक विषय ठरू शकतो. त्याकाळात माणूस नाही म्हणल तरी हिंस्त्र प्राण्यांना भीत असे. सह्याद्रीच्या जंगलांमध्ये वाघ, बिबटे यांचा वावर मोठ्या प्रमाणावर असे त्यामुळे अनेक वेळा समोरासमोर उभे ठाकण्याचे प्रसंग येत असत. अशा वेळेला एक तर पळून जाणे किंवा हातातील अवजाराने वीरता दाखवून दोन हात करणे हेच दोन उपाय शिल्लक असत. त्यामुळे ज्यानी शूरता दाखवून दोन हात केले आणि त्या हल्ल्यात मरण पावले त्यांचे स्मारक उभारण्याची प्रथा सुरु झाली. यात वीर हा वाघाबरोबर किंवा तत्सम प्राण्याबरोबर हातघाईचे युद्ध करताना दाखवले जातो.२. गो-रक्षण वीरगळ – याच्या नावावरूनच लक्षात येते की गाईंचे रक्षण करताना एखादा वीर मरण पावला असेल तर त्याचे स्मरण म्हणून त्याचे स्मारक उभारले जाते अशा वीरगळांना गो-रक्षण वीरगळ असे सुद्धा काही जण म्हणतात. राष्ट्रकूट काळात महाराष्ट्रात जरा भरभराटीचे दिवस येण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे साहजिकच शेती आणि शेतीला पूरक असणारी सर्व इतर कामे सुद्धा वाढण्यास लागली होती. यातील बरीच गावे ही दुग्धव्यवसाय करीत असत आणि त्यांना मिळणारे उत्पन्न हे संपूर्णपणे त्या व्यवसायातून मिळत असे त्यामुळे त्या गावांची अर्थव्यवस्था ही दुग्धव्यवसायावर आधारीत होती असे म्हणले तर काही चूक नाही. त्याकाळी अनेक धनगर हे या व्यवसायामुळे श्रीमंत झाले होते त्यामुळे साहजिकच चोरांपासून आपल्या गो- धनाचे संरक्षण करणे हे क्रमप्राप्त होते आणि ते करण्यासाठी कदाचित त्यानी सैन्याची मदत सुद्धा घेतली असण्याची शक्यता आहे किंवा त्यावेळेच्या राजाने सुद्धा हे संरक्षण पुरवल्याची शक्यता नाकारता येत नाही. मग बऱ्याच वेळेला अशा गो-धनावर चोरांचा किंवा परराज्यातील लोकांचा हल्ला झाल्यावर ते वाचवण्यासाठी धारातीर्ती पडलेल्या वीरांचे स्मारक उभारण्यास सुरुवात झाली. यात वीरगळातील वरील दोन्हे भाग सारखेच असतात पण खालच्या भागात एका बाजूला गो-धन, मध्ये लढणारा वीर आणि पलीकडे शत्रूचे सैनिक असे चित्रण केले जाऊ लागले.


  असे हे गो-रक्षण वीरगळ महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये आढळून येतात. अगदी उदाहरणे द्यायची झाली तर चोराची आळंदी, गुळुंचे, भदे, म्हसवड, पंढरपूर इत्यादी गावात गो-रक्षण वीरगळ मोठ्या प्रमाणावर आढळतात. यावरून हे दिसून येते की या सर्व गावांमध्ये गो-धनाचे प्रमाण अधिक होते आणि साहजिकच त्या गावाची सर्व अर्थव्यवस्था ही त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून चालत असे.

    पंढरपूर आणि गो-रक्षण वीरगळ यांचा फारच जवळचा संबंध म्हणावा लागेल. आत्ता वारकरी संप्रदाय आणि उभा महाराष्ट्र विठ्ठलाला जरी ‘मायबाप’ म्हणून पूजत असला तरी पूर्वीच्या काळी त्याचे काम हे गाईंचे रक्षण करणे हे होते असे दिसते. याचा संदर्भ म्हणजे ‘Memorial Stones’ या गुंथर यांनी लिहिलेल्या पुस्तकातील हे वाक्य. “My lady, this hero died in the cause of (defending) cows. His name is Vithalu. In his name this hero stone was erected. “. याला संदर्भ म्हणून व्ही. बी. कोलते यांच्या लीलाचरित्र या पुस्तकाचा देण्यात आला आहे. याशिवाय गुंथर पुढे असेही म्हणतो की, “सध्या जिथे संत चोखामेळा यांची समाधी आहे तिथे यादवकाळातील वीरगळ सापडला, हा वीरगळ जेथे सापडला ती जागा शं. गो. तुळपुळे यांच्या मते श्री विठ्ठलाचे समाधी स्थान असावे. अनेक संशोधकांच्या मते विठ्ठल हा एक गवळी असून तो कर्नाटकातून महाराष्ट्रात आला आणि पंढरपुरात राहिला. काही संशोधक असे मानतात की हा विठ्ठल, दक्खन मध्ये धनगर समाजाकडून पूजल्या जाणाऱ्या ‘भैरोबा’ या देवेतेचा भाऊ असावा. अर्थात आपल्याला यात खोलात जाण्याची गरज नाही पण यावरून असे कळून येते की गो-रक्षण वीरगळाची परंपरा ही किती जुनी आहे आणि एखादी गोष्ट कोरून ठेवण्यामागे फार मोठा इतिहास असू शकतो हे यावरून लक्षात येते.      या लेखात सुद्धा आपण केवळ दोन प्रकारच्या समरप्रसंगांची माहिती घेतली आता पुढील लेखात     प्रसिद्ध असलेल्या नौकायुद्धाच्या प्रसंगांची माहिती घेऊ.
  


© 2018, Shantanu Paranjape

You Might Also Like

3 comments

 1. It's new information for me and it's great that you are sharing on this platform. Thanks a lot.

  ReplyDelete
 2. Dhaval Ramtirthkar4 December 2019 at 22:56

  खूप छान

  ReplyDelete

$(document).ready(function(){ $('#mscontent').css('opacity','0'); });