इतिहासाची स्मृतीशिल्पे - विरगळ

  • January 04, 2019
  • By Shantanu Paranjape
  • 1 Comments

Eksar (Borivali) Hero Stone

आपल्या महाराष्ट्राला अतिशय संपन्न असा इतिहास लाभला आहे. सातवाहनांपासून, वाकाटक, शिलाहार, यादव, यांपासून अगदी मराठा साम्राज्यापर्यंत या महाराष्ट्राने अनेक स्थित्यंतरे पाहिली. या दरम्यानच्या काळात अनेक परकीय आक्रमकांनी महाराष्ट्रावर आक्रमण केले आणि इथल्या मातीतील वीरांनी प्रसंगी आपल्या प्राणांचे बलिदान देऊन ही भूमी परकीय आक्रमकांपासून वेळोवेळी स्वतंत्र केली आणि पेशवाईच्या काळात तर पुढे साऱ्या भारताचे रक्षण करण्याचे उत्तरदायित्व या महाराष्ट्राकडे आले.

महाराष्ट्राचा हा सारा इतिहास हा इथे फिरस्ती करताना वारंवार वेगवेगळ्या स्वरूपात दिसून येतो!! कधी बुलंद किल्ले, कधी सह्याद्रीत कोरलेली विस्मयकारक लेणी तर कधी अजोड स्थापत्य शास्त्राचा नमुना असलेली विविध मंदिरे! या सर्वांमधून थोडीशी वेगळी असणारी पण इथल्या पराक्रमाचा इतिहास सांगणारी काही कोरीव शिल्पे आज आपले अस्तित्व दाखवत ऊन- पावसात वर्षानोवर्षे उभी आहेत! महाराष्ट्रात याच शिल्पांना विरगळ असे संबोधले जाते. तर इंग्रजी भाषेत यांना ‘Hero Stones’ असे म्हणतात.

Herostones at Bhairi temple, Ratnagiri

विरगळ विषयी जाणून घेण्यासाठी आधी आपल्याला या शब्दाची फोड आणि त्याचा उगम समजून घेणे आवश्यक आहे. विरगळाची मुख्य संकल्पना ही कर्नाटकातून आली! कर्नाटकात ‘कल्लू’ हा शब्द ‘दगड’ या अर्थाने वापरला जातो. त्यामुळे तिथल्या ‘वीर-कल्लू’ या शब्दाला महाराष्ट्रात नाव मिळाले ‘विरगळ’. दगड हा शब्द पुल्लिंगी असल्याने, ‘ती’ विरगळ पेक्षा ‘तो’ ‘विरगळ’ असे म्हणणे जास्त योग्य आहे. युद्धभूमीवर अथवा कोणत्याही संग्रामात मरण पावलेल्या माणसाच्या स्मृतीप्रीत्यर्थ उभारलेला कोरीव दगड म्हणजे ‘वीरगळ’ होय. महाराष्ट्रात असे दगड ठिकठीकाणी आढळून येतात. मुख्यत्वे मराठवाडा, पश्चिम व दक्षिण महाराष्ट्र, कोकणातील बरासचा भाग यांमध्ये यांची संख्या मोठ्याप्रमाणावर आहे!महाराष्ट्रात आढळणारे विरगळ हे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. काही विरगळ हे अगदी १५-२० फूट उंचीचे आहेत तर काही केवळ एक शिल्पपट असलेले आहेत. पण सर्वसाधारणपणे हे विरगळ तीन किंवा चार शिल्पपटात विभागले जातात. यापैकी सर्वात खालच्या भागात जेथे तो वीर धारातीर्थी पडला, तेथील युध्दप्रसंग कोरलेला असतो. मग तो प्रसंग मोठ्या लढाईमधील असेल किंवा एखाद्या प्राण्याबरोबर झुंजताना असेल, ढाल-तलवारींनी समोरासमोर लढणारे सैनिक असतील किंवा घोडेस्वारांची लढाई असू शकते. जर का हा वीर गाईंचे रक्षण करताना धारातीर्थी पडला असेल तर त्यात काही गाईंचा समूह सुद्धा दाखवलेला असू शकतो. खालून दुसऱ्या चौकटीत बऱ्याच वेळा अप्सरा या धारातीर्थी पडलेल्या वीराला स्वर्गात नेत आहे असे दृश्य दाखवले जाते. या पटात बहुतांश वेळा वीर हा झोपलेल्या अवस्थेत दाखवलेला आहे. सगळ्यात वर असणाऱ्या पटात वीराच्या उपास्य देवेतेचे चित्रण केलेले आपल्याला दिसून येते मग कधीकधी यात शंकर दिसून येतो किंवा काही वेळा गणपती सुद्धा दिसून येतो!! पण बहुतांश वेळा शंकराची पिंड दाखवलेली असल्याने महाराष्ट्रात त्याकाळी जवळपास सर्वांचे उपास्य दैवत शंकर असावे असेच वाटते. काही वेळा या शिल्पाच्या वर चंद्र आणि सूर्य यांच्या आकृतीसुद्धा कोरलेल्या दिसून येतात. याचा अर्थ असा की या वीराचे स्मरण ‘यावच्चंद्र दिवाकरौ’ म्हणजे जोपर्यंत आकाशात चंद्र आणि सूर्य आहेत तोवर केले जावे!

ही झाली विरगळाची ढोबळ मांडणी. याशिवाय काही वीरगळावर शिलालेख सुद्धा आढळून येतात परंतु महाराष्ट्रात असे विरगळ फार थोडे आहेत. त्याबद्दल पुढील लेखांमध्ये चर्चा होईलच. पण एक मात्र आहे की विरगळ या विषयाचा अभ्यास करायचा असल्यास पायाला सतत भिंगरी हवी आणि नवीन नवीन ठिकाणांवरून वैशिष्ट्यपूर्ण विरगळांची टिपणे काढून जमेल तो इतिहास पुढे आणला पाहिजे. इतिहासाची ही स्मृतीशिल्पे जतन करण्यासाठी प्रयत्न केली पाहिजेत, गावातील लोकांना यांचे महत्त्व पटवून देऊन त्याला शेंदूर न फासण्याबद्दल समजावले पाहिजे, जेणेकरून अभ्यासकांना इतिहासाचा हा ठेवा जसाच्या तश्या स्वरूपात अभ्यासण्यासाठी उपलब्ध होईल आणि त्यातून काही नवीन इतिहास सापडण्याची शक्यता वाढेल!

इतिहासाची स्मृतीशिल्पे भाग - २

© 2018, Shantanu Paranjape

You Might Also Like

1 comments

  1. नवीन माहिती मिळाली. खूप अभ्यासपूर्ण लेखन

    ReplyDelete

$(document).ready(function(){ $('#mscontent').css('opacity','0'); });