रायगड किल्ल्याची प्रभावळ भाग - १

  • January 03, 2019
  • By Shantanu Paranjape
  • 2 Comments

प्रभावळ! आपण अनेकांनी हा शब्द ऐकला असेल कदाचित! सोप्या शब्दात प्रभावळ (किल्ल्याच्या बाबतीत) म्हणजे एखाद्या महत्वाच्या किल्ल्याभोवती त्या किल्ल्याच्या संरक्षणार्थ काही मुद्दाम बांधण्यात आलेली किल्ल्यांची साखळी. अशी साखळी उभारण्याचा मुख्य उद्देश हाच असतो की मुख्य किल्ल्याला कोणताही धोका निर्माण होऊ नये व युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास प्रभावळीतील जे किल्ले आहेत त्यांवरील माणसे येऊन हा हल्ला आधीच थोपवू शकतील किंवा शत्रूसैन्य आल्याची आगाऊ कल्पना मुख्य किल्ल्यावर देऊ शकतील.

रायगड किल्ल्याला अशीच एक मोठी प्रभावळ आहे. रायगडचे वर्णन सभासद करतो, “राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चखोट, चौतर्फी गडाचे कडे तासिल्याप्रमाणे, दीड गाव उंच, पर्जन्याकाळी कुडीयांवर गवत उगवत नाही आणि धोंडा तर ताशीव एकच आहे. दौलताबाद हा पृथ्वीवरील चखोट गड खरा, परंतु तो उंचीने थोडका, दौलाताबाद्चे दशगुणी गड उंच असे देखोन (महाराज) संतुष्ट जाहले आणि बोलिले तख्तास गड हाच करावा.” रायगड किल्ल्यास स्वराज्याची राजधानी म्हणून निवड करण्याचे ठरले तेव्हा त्याची सुरक्षा करण्यासाठी त्याच्या आजूबाजूला असलेले किल्ले बळकट करण्यात आले. लिंगाणा, कोकणदिवा, सोनगड, चांभारगड, मंगळगड, पन्हाळघर, चंद्रगड, पाचाड कोट अशा किल्ल्यांची साखळी रायगड किल्ल्याभोवती उभी राहिली. पूर्व दिशेला असणारा बेलाग सह्याद्री आणि पश्चिमेला हे प्रभावळीतील किल्ले आणि सिंधूसागर यांमुळे रायगड किल्ला प्रचंड भक्कम झाला. तर या लेखात आपण रायगडाच्या याच सवंगड्यांबाबत माहिती घेणार आहोत.

Raigad Fort - Takmak Tok

1. लिंगाणा- रायलिंग पठारावरून याचे रौद्र रूप खरे दिसून येते. या अनगड किल्ल्यावर होते ती कैदी ठेवण्याची जागा. घसरडा मार्ग, बेलाग पणा आणि दोराशिवाय चढणे केवळ अशक्यच अशा या किल्ल्यावर घोर अपराध केलेल्या लोकांना ठेवण्यात येत असे. तिथून कुणी पळण्याचा प्रयत्न जरी केला तरी त्याचा मृत्यू हा ठरलेलाच असे. असा हा लिंगाणा रायगडसाठी टेहेळणीचे ठिकाण आणि तुरुंग अशा दोन्ही प्रकारच्या जबाबदाऱ्या पार पाडत होता. रायगडाची जीवनकथा या पुस्तकात लिंगाण्यावर असणाऱ्या कैद्यांबाबत माहिती मिळते. लिंगाण्यावर जे कारागृह होते त्यात एका वेळी ५० कैदी राहण्याची व्यवस्था होती असे म्हणतात. पुढे १८१८ मध्ये रायगड नंतर लिंगाणा सुद्धा इंग्रजांच्या ताब्यात गेला. सद्यस्थितीला लिंगाण्यावर त्याला किल्ला म्हणावे असे अवशेष फारसे शिल्लक नाहीत. काही पाण्याची टाकी आणि एक मोठी गुहा हे वगळता लिंगाण्याचे ‘किल्ला’ म्हणून असलेले विशेषण कधीच दूर गेले आहे. (नुकतेच संशोधकांनी पाने गावाकडून येणाऱ्या मार्गावर काही पायऱ्यांचे अवशेष आणि जोत्याचे अवशेष शोधून काढले आहेत)

Lingana Fort - Source (www.google.com)


2. कोकणदिवा- पुण्याकडून दुर्गदुर्गेश्वर रायगडला जायला अनेक घाटवाटा आहेत. त्या विविध जुन्या घाटवाटांवर  जर ठेवायला आणि दुर्गदुर्गेश्वर रायगडावर कडा पहारा ठेवायला शिवाजी महाराजांनी छोट्यामोठ्या उपदुर्गांची साखळी निर्माण केली आणि रायगडला अभेदय असे कवच निर्माण केले. याच घाटवाटेवर असणारा छोटासा कोकणदिवा नावाचा किल्ला अजून सुद्धा दुर्गदुर्गेश्वर रायगडावर आणि कावळ्या या ऐतिहासिक घाटावर लक्ष ठेवून आहे. तसे पहिले तर कोकणदिवा हा किल्ला नाही परंतु एखाद्या मुख्य किल्याभोवती असणाऱ्या उपदुर्गांच्या साखळीत शोभून दिसेल असे टेहळणीचे हे ठिकाण आहे परंतू आजही अभ्यासकांमध्ये याबाबत आजही मतभेद आहेत कि हा किल्ला आहे कि टेहळणी नाके आहे.

कोकणदिव्याचा ज्ञात इतिहास तसा फार नाही परंतु इथे असणाऱ्या कावल्या बावल्याच्या खिंडीला मात्र इतिहासात फार महत्त्व आहे. ‘घाटाकडून कोकणात निघालेला शहाबुद्दीनखान कावळ्या घाटातून उतरणार होता. तो खाली आला की थेट रायगडवाडी पासून छत्री निजामपूर, पाणे, दापोली पर्यंत वेढा पक्का करणार होता. हे सारं गोदाजी जगताप आणि नाईक यांना कळाले. त्यांनी त्यातला धोका ओळखला. हे दोघे मर्द मावळे याच कावल्या-बावल्या खिंडीच्या मध्ये उभे राहिले त्यांच्या अंगात बारा रेड्यांचे बळ संचारले होते. याच चार हातानी त्यांनी शहाबुद्दीन खानाचे जवळपास ३०० सैनिक कापून काढले आणि मोघल पळत सुटले’ अश्या या ऐतिहासिक खिंडीच्यावर हा कोकणदिवा आपले अभेद्य आणि उग्र रूप दाखवत उभा ठाकला आहे. 

Kokandiva Fort. Source (www.google.com)

3. सोनगड- सोनगड हा किल्ला तसा भटक्या लोकांमध्ये सुद्धा अपरिचित असणारा किल्ला. महाड पासून अवघ्या ५ किमी अंतरावर असणारा हा किल्ला गेली कित्येक वर्ष महाड, रायगड, सावित्री खोरे अशा मोठ्या भूभागावर नजर ठेऊन आहे. या किल्ल्याचा उल्लेख अगदी फेरीश्त्याने सुद्धा केला आहे. त्यामुळे आजघडीला या किल्ल्याला किमान सहाशे वर्ष पूर्ण झाली असे घटकाभर म्हणायला हरकत नाही. सोनगडाचा वापर हा शिवकाळात कैदी ठेवण्यासाठी होत असे आणि याचा उल्लेख आपल्याला इंग्लिश रेकॉर्ड्स मध्ये मिळून जातो. या गोष्टीला भौतिक पुरावा कोणता असे विचारल्यास, सोनगडावरील उभी असलेली एकुलती एक वस्तू हे होय. या वास्तूशिवाय या किल्ल्यावर सांगण्याजोगे असे कोणतेही अवशेष शिल्लक नाहीत हे मात्र खेदाने सांगावे लागते. 

सोनगडावरून अजुनाजुला नजर टाकली तर पश्चिमेकडे सावित्रीचे पात्र दिसते तर दक्षिणेला प्रतापगड आणि कशेडी घाटाच्या रांगा दिसतात. समोरच महाड जवळचा चांभारगड दिसतो. नंतर तसेच सरळ पूर्वेकडे आलो तर महाबळेश्वरचे पठार, रायरेश्वरचा भाग, वरंध घाट आणि कावळ्या किल्ला हे चांगल्या हवेत दिसू शकतात मात्र त्यासाठी भूगोलाचा थोडाफार अभ्यास असावा. अजून थोडा डावीकडे सरकलो की ओळख पटते!! दुर्गराज राजगड! सोनगड वरून राजगड दिसू शकतो यावर आपला पहिले विश्वासच बसत नाही. राजगडची निवड राजधानी म्हणून का योग्य होती याचा खुलासा आपल्याला इथे होतो! एखद्या किल्ल्यावरून किती भूप्रदेश दिसावा याचे उदाहरण म्हणजे सोनगड वरून दिसणारा राजगड! डोंगराआड लपलेला तोरणा सुद्धा दर्शन देऊन जातो. अजून डावीकडे सरकल्यावर पोट्ल्याचा डोंगर अन दुर्गदुर्गेश्वर रायगड नजरेस पडतात. अजस्त्र पडलेल्या अजगरासारखा पसरला रायगड अगदी देखणा दिसतो. सोनगड वरून रायगड फारच वेगळा दिसतो! हवा छान असली तर नगारखाना आणि वाडेश्वराचे मंदीर सुद्धा सहज नजरेस पडते. अजून उजव्या बाजूला आले तर कोकणदिवा आणि त्याच्या आजूबाजूचा प्रदेश नजरेस पडतो. इतका विस्तीर्ण भूप्रदेश येथून दिसत असल्याने हा किल्ला टेहाळणीसाठी वापरला जात असल्याची खात्री पटली. 

Songad in a dense Jungle

Rajgad as seen from Songad

  भाग दोन येथे वाचा!!

(फिरस्ती महाराष्ट्राची आयोजित भिगवण पक्षी निरीक्षण सहल १९ जानेवारी रोजी आयोजित केली आहे. इच्छुकांनी ७०२०४०२४४६ या क्रमांकावर संपर्क साधावा)

ब्लॉगवरील काही इतर लेख - 


You Might Also Like

2 comments

$(document).ready(function(){ $('#mscontent').css('opacity','0'); });