रायगड किल्ल्याची प्रभावळ भाग - 2

  • January 15, 2019
  • By Shantanu Paranjape
  • 0 Comments

भाग एक वरून पुढे


मागील भागात आपण लिंगाणा, कोकणदिवा आणि सोनगड या तीन किल्ल्यांची माहिती घेतली आता या भागात रायगड किल्ल्याच्या प्रभावळीतील इतर किल्ले पाहू. 

   ४. चांभारगड- प्रभावळीतील यापुढचा किल्ला म्हणजे चांभारगड. महाड शहराच्या अगदी जवळ असलेले याचे स्थान बघता हा किल्ला या शहराच्या संरक्षणासाठी बांधण्यात आला असावा हे लगेच कळून येते. किल्ल्यावरील इतिहास फारसा ज्ञात नाही परंतु किल्ल्यावर असणारे पाण्याच्या टाक्याचे अवशेष तसेच काही पडीक तटबंदी याचे इतिहासातील अस्तित्व दाखवून देतात. या किल्ल्यावरून सुद्धा विस्तीर्ण भूभाग दिसून शकतो. महाड या शहराचे प्राचीनत्व पाहता या किल्ल्याची बांधणी सुद्धा शिवपूर्वकालीन असावी असे वाटते.
   
Chambhargad (Photo - Balraj Mudliyar)

५. 
मानगड- मानगड हा किल्ला तसा रायगड पासून बऱ्यापैकी लांब असला तरी रायगडच्या दुर्गप्रभावळीमध्ये याचा समावेश होतो हे उल्लेखनीय. माणगाव जवळील निजामपूर पासून अवघ्या काही अंतरावर हा किल्ला वसला आहे. निजामपूर- पाचाड या मार्गावरील मशीदवाडी या गावातून गडावर जाण्यासाठी वाट आहे.  गड तसा छोटा असला तरी अनेक अवशेष गडावर शिल्लक आहेत. ताम्हिणी घाटातून रायगड कडे येणाऱ्या मार्गावर नजर ठेवण्यासाठी याची निर्मिती करण्यात आली असावी हे लगेच कळून येते आणि त्यामुळेच याचा समावेश रायगड किल्ल्याच्या प्रभावळीमध्ये होतो. 
Mangad (Photo Source Google)

Mangad (Photo Source Google)

६. पन्हाळघर-  कोल्हापूरनजीक असणाऱ्या पन्हाळ्याचे नाव अनेकांनी ऐकले असेल पण हा पन्हाळघर काय प्रकार? असा प्रश्न बऱ्याच वाचकांच्या मनात आला असेल. अर्थात तसे होणे स्वाभाविक आहे कारण इतिहासात या किल्ल्याचा उल्लेख कुठे सापडतच नाही. मग हा किल्ला कसा काय सापडला? तर याचे संपूर्ण श्रेय जाते ते दुर्गअभ्यासक डॉ. सचिन जोशी यांच्याकडे. २००६ मध्ये अथक परिश्रम आणि पायपीट करून, आंतरजालावरील नकाशांच्या सहाय्याने या अवलिया माणसाने या किल्ल्याचा शोध लावला आणि रायगडाच्या प्रभावळीच्या रत्नहारामध्ये अजून एक रत्न सामील झाले. मानगड ते सोनगड हे अंतर तसे बरेच आहे आणि त्यामुळे या दोन किल्ल्यांमध्ये एखादा किल्ला असला पाहिजे अशा सुपीक विचारातून या किल्ल्याचा शोध लागला असेच म्हणता येईल. महाड आणि माणगाव यांच्यामध्ये असणाऱ्या लोणेरे गावातून पुढे पाच किमी अंतरावर पन्हाळघर हा छोटेखानी किल्ला आहे. सध्या या किल्ल्यावर थोडीफार तटबंदी सोडली तर कोणतेही अवशेष शिल्लक नाहीत. नाही म्हणायला चार-पाच पाण्याची टाकी आहेत एवढेच काय ते अस्तित्व. एकंदर आजूबाजूच्या प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याची बांधणी झाली असावी असे वाटते. 


Panhalghar (Photo - Kiran Kharade)

७. मंगळगड/कांगोरी- शिवाजी महाराजांनी जेव्हा जावळीचा प्रदेश स्वराज्यात आणला तेव्हा रायरीसोबत कांगोरी सुद्धा जिंकून घेतला. पुढे रायरीचा झाला रायगड ज्याला राजधानीचा दर्जा मिळाला आणि कांगोरीचा झाला मानगड ज्याला रायगडाच्या प्रभावळीमध्ये मानाचे स्थान मिळाले. महाड-भोर रस्त्यावरून किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या पिंपळवाडी या गावात गाडीरस्त्याने पोहोचता येते. गडमाथा बर्यापैकी मोठा आहे तसेच किल्ल्यावरील अवशेष जरी पडझड झाली असली तरी त्याचे अस्तित्व दाखवण्यासाठी पुरेसे आहेत. उंचीने छोट्या असलेल्या या किल्ल्यावरून बर्यापैकी परिसर नजरेच्या टप्प्यात येतो. 

Mangalgad (Photo Credit)

  ८. कावळ्या किल्ला – वरंध घाटाच्या अगदी तोंडावर असणारा हा किल्ला रायगडची प्रभावळ पूर्ण करतो. प्रभावळीतील हा आठवा किल्ला असल्याने बा रायगडाचे अष्टप्रधान मंडळ इथे पूर्ण होते असे म्हणावयास हरकत नाही. वरंध घाटावरून खाली कोकणात उतरणाऱ्या वाटेवर नजर ठेवण्यासाठी म्हणून या किल्ल्याची उभारणी करण्यात आली. सद्यस्थितीला हा किल्ला घाटमार्गावरून अगदीच जवळ आहे त्यामुळे याचे भ्रमण करणे हे तसे सोयीचे झाले आहे. काही पडलेले बुरुज आणि पाण्याची टाकी अशा अवस्थेत या किल्ल्याची पुढील वाटचाल सुरु आहे.
  
Kavlya Fort (Photo Credit)


  याप्रकारे रायगड किल्ल्याच्या प्रभावळीमध्ये असणाऱ्या या आठ किल्ल्यांची माहिती आपण पहिली. यातील काही किल्ले हे राजांनी जिंकून घेतले आणि त्यांची डागडूजी केली तर काही किल्ल्यांची पुन्हा नव्याने बांधणी करण्यात आली. रायगड किल्ला जरी बुलंद असला तरी तो राजधानीचा किल्ला असल्याने त्याच्यावर कोकणातील बाजूने थेट आक्रमण होऊ नये म्हणून त्याच्याभोवती छोट्या छोट्या किल्ल्यांची साखळी उभारण्याची कल्पना ही डोकेबाजच म्हणावी लागेल. पूर्वेकडे राजगड, तोरणा हे मजबूत किल्ले असल्याने तिकडून फारसा धोका नसला तरी त्याही बाजूला कोकणदिवा, लिंगाणा, कावळ्या यांच्यासारखे किल्ले दिसतातच. महाराष्ट्राचा मुकुटमणी असलेले छत्रपती शिवराय, त्यांची बुलंद राजधानी रायगड आणि त्या राजधानीचे अष्टप्रधान मंडळ म्हणून शोभणारे असे हे आठ किल्ले पहिले की शिवकालीन अजोड दुर्गस्थापत्याची प्रचिती आल्याशिवाय रहात नाही.       ब्लॉगवरील काही इतर लेख - © 2018, Shantanu Paranjape

You Might Also Like

0 comments

$(document).ready(function(){ $('#mscontent').css('opacity','0'); });