इतिहासाची स्मृतीशिल्पे – २

  • January 05, 2019
  • By Shantanu Paranjape
  • 0 Comments


Bahadurgad Virgal- Worrior in Palkhi Like Structure

मागील लेखात आपण विरगळ आणि त्याचे एकंदर स्वरूप कसे असते याबद्दल माहिती घेतली. त्यावेळेस विरगळाचे काही भाग असतात असा उल्लेख आपण पाहिला यात, सर्वात खाली युद्धाची घटना मग मध्ये सर्व अप्सरा स्वर्गात घेऊन जात आहेत असे दृश्य आणि सगळ्यात वरती त्या धारातीर्थी पडलेल्या वीराचे जे कोणते उपास्य दैवत असेल त्याची प्रतिमा. उदा. शंकर, गणपती इत्यादी. तर या लेखात आपण त्यातील  पटाचा अर्थ समजून घेऊ!

एखादा वीर मरण पावला की त्याचे स्मारक उभारण्यामागे काय कारण असावे आणि त्यात नेहमी या वीराला अप्सरा स्वर्गात घेऊन का जात असाव्यात हा एक प्रश्न आपल्याला पडू शकतो. तर एक तर त्या वीराचे स्मरण म्हणून ते स्मारक उभारत असावेत आणि दुसरे म्हणजे हे स्मारक पाहून इतर वीरांना त्यातून स्फूर्ती मिळावी हा दुसरा भाग असावा! तर मग ही स्वर्गाची काय भानगड!!? तर याचे उत्तर आपल्याला प्राचीन महाकाव्यांमध्ये मिळून जाते. ‘महाभारतात’ जर रणांगणावर वीर मरण पावला तर त्याचे स्वर्गातले स्थान निश्चित होते असे दिले आहे पुढे भीष्म असे म्हणतात की जेव्हा वीराच्या शरीरातून रक्ताच्या धारा वाहू लागतील तेव्हा तो वीर साऱ्या पापातून मुक्त होऊन त्याला स्वर्गाचे स्थान मिळेल. भीष्म सामान्य माणूस आणि योध्यातला फरक सांगताना म्हणतात की क्षत्रियाचा मृत्त्यू हा कधीही घरात येऊ नये तर क्षत्रीयाचा मृत्यू हा केवळ बाणांनीच झाला पाहिजे. जर वीराने रणांगणावरून पळ काढला नाही तर त्याला पुढे मृत्युनंतर इंद्राच्या बरोबरीचे पद मिळते असा सुद्धा एक समज पूर्वीच्या काळी होता. प्राचीन भारतातीय याच समजाचे दृश्य आपल्याला भारतातील अनेक वीरगळांवर दिसून येते.
संस्कृतसाहित्यामधून आपल्याला मृत्यनंतरच्या जीवनात असलेल्या आनंदाची अनेक वर्णने मिळतात. हीच वर्णने आपण जर वीरगळांकडे नीट पाहिले तर त्यातून सहज लक्षात येतात. असे म्हणतात की वीराला सद्गती मिळाली की स्वर्गातील अनेक अप्सरा त्याच्याशी लग्न करण्याची इच्छा मनात ठेवून त्याच्याजवळ धावून येतात. वीरगळावरील मधल्या शिल्पात जमिनीवर आडवा पडलेला किंवा उभा असलेला वीर आणि त्याच्या भोवती उभ्या असलेल्या साऱ्या अप्सरा हे याच समजाचे प्रतीक आहे. तसाच दुसरा प्रसंग म्हणजे विमानातून वीराला स्वर्गात नेण्याचा. त्याला पुराणातील गोष्टीचा संदर्भ देता येतो तो म्हणजे अंबरीश राजा आणि इंद्र यांच्यात जे युद्ध झाले त्यात अंबरीश राजा जेव्हा मरण पावला तेव्हा त्याने पहिले की त्याचा जो सेनापती होता ‘सुदेव’ तो एका सजवलेल्या विमानात बसून आपल्याहून श्रेष्ठ अशा जगात जात आहे. अर्थात त्यावेळेस विमान होते का नाही हा पुढचा प्रश्न कारण कोणतेही भौतिक पुरावे आपल्याला काही सापडत नाहीत, परंतु पुराणात विमानाचा उल्लेख मात्र जरूर येऊन जातो. माझ्या पाहणीत तरी विमानासदृष्य कोणतीही आकृती पाहण्यात आली नाही परंतु अनेक ठिकाणी आपल्याला पालखी दिसून येते. कदाचित या पालखीलाच ‘विमान’ म्हणून संबोधले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. येथे एक लक्षात घेतले पाहिजे की सर्वच ठिकाणी या अश्या पालख्या आढळून येत नाहीत, इतर ठिकाणी वीर हा उभा किंवा झोपलेल्या अवस्थेत असतो. मग काही विशिष्ट ठिकाणीच पालखी का? कदाचित पालखी दाखवणे म्हणजे त्या वीराला सैन्यात मानाचे स्थान होते असा अर्थ काढला जाऊ शकतो का? मात्र पुराव्यांशिवाय याचे उत्तरही मिळत नाही.भारतात आढळणाऱ्या या सर्व प्राचीन स्मृतीशिल्पांचे जतन करून त्यांची एक सूची तयार केली पाहिजे जेणेकरून कोणती आकृती कोणत्या ठिकाणी असलेल्या वीरगळावर आहे हे पटकन समजू शकेल. कुणीतरी हे काम हाती घ्यायला हवे आहे हे खरे पण कुणी? या प्रश्नाचे उतार अजून मिळाले नाही हे दुर्दैव!!

© 2018, Shantanu Paranjape

You Might Also Like

0 comments

$(document).ready(function(){ $('#mscontent').css('opacity','0'); });