नक्की काय मिळते तुम्हाला?

  • December 27, 2019
  • By Shantanu Paranjape
  • 2 Commentsअनेक वेळा विचारण्यात आलेला प्रश्न!!

नक्की काय मिळते तुम्हाला ट्रेक करून, सह्याद्रीत उनाडक्या करून, डोंगरांवर धडपडून!! 

खरे सांगू तर नाही कळले अजून सुद्धा! कदाचित काहीतरी मिळायला हवे म्हणून सह्याद्रीमध्ये कधी फिरलोच नाही. सोमवार ते शनिवार लागणारा ऑक्सिजन मात्र एका दिवसात मिळतो हे खरे. 

पावसाळ्यातला रायगड
भटकायला सुरुवात केली तेव्हा सुरुवातीची भटकंती अगदीच निरर्थक होती आणि इतर अनेक लोकांच्या प्रमाणे लोहगड विसापूर पासून सुरुवात केली. नंतर भारत इतिहास संशोधक मंडळ नामक एका संस्थेत गेलो आणि चांगल्या अर्थाने वाट लागली. प्रत्येक दगडात काहीतरी दिसायला लागले. प्रत्येक बुरुजांच्या मधून झाडल्या गेलेल्या बंदुकीच्या गोळ्या दिसायला लागल्या. किल्ल्याभोवती सैन्याचा वेढा पडलेला दिसायला लागला. माळ लावून सरसर चढून येणारे मावळे दिसायला लागले आणि भटकंतीची दिशाच बदलली. अरे या किल्ल्यावर काहीच नाही पासून अरे केवढ आहे इथे असा एकंदर प्रवास बदलला.

सौंदर्यशिल्प गोंदेश्वर
सुरुवातीला नेहमी वाटायचे की अरे राजस्थान मधले किल्ले आणि इथले किल्ले!! किती करंटे आपण! करंटे आहोत यात वाद नाहीच पण इथल्या पडलेल्या दगडांमध्येच आपल्या पूर्वजांच्या शौर्याचा इतिहास आहे हे जेव्हा समजले तेव्हा मात्र पडक्या दगडालासुद्धा नीट बघायला लागलो. महाराष्ट्र किती समृद्ध आहे हे तेव्हा कळले. गड किल्ले यांच्यासोबतच मंदिरे आणि लेणी यांची आवड ही केव्हा लागली हे समजलेच नाही. प्राणी, पक्षी, फुलपाखरे ही सुद्धा सोबतीला होतेच. भटकंतीची दिशाच बदलून गेली एकदम.. रविवारी लोळायचे ही संकल्पना केव्हाच हवेत विरली. आता तर सोमवार आला की पुढच्या रविवारची आठवण येते. कुठे जाणार, काय बघणार, कोण माणसे भेटणार, काय अनुभव येणार याच्या उत्सुकतेमध्येच आठवडा जातो.

खिद्रापूरचा स्वर्गमंडप
भटकंतीमधुन काय मिळाले तर सर्वात महत्वाचे म्हणजे जीवाभावाची माणसे मिळाली. सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर मनसोक्त खेळण्याची संधी मिळाली. धडपडलो तरी सावरण्याची ताकद सह्याद्रीने दिली. इथल्या इतिहासाने प्रेरणा मिळाली. इथल्या निसर्गापुढे आपण किती खुजे आहोत याची जाणीव होऊन अंगातला जो काही मी पणा होता तो कमी झाला. मुख्य म्हणजे माणूस म्हणून समृद्ध होण्याची संधी मिळाली. त्यामुळे आता कुणी कुत्सितपणे कधी विचारलेच की भटकून काय मिळाले तर मी सांगतो की तुला नाही कळणार!! स्वताच्या कोशात गुरफटून गेलेल्या अळीला फुलपाखरू होण्याचे सुख काय असते हे कसे कळणार!! त्यासाठी काळ जावा लागतो. सुदैवाने माझा तो काळ पटकन गेला तो कायम फुलपाखरू म्हणून उडण्यासाठीच!!   

सप्टेंबर महिन्यात फुलणारे कास
(सर्व फोटो आंतरजाल)
© 2019, Shantanu Paranjape

____________________________________________________________________________

मला सोशल मिडीयावर फॉलो करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. 

इन्स्टाग्राम - Paranjape_shantanu
फिरस्ती महाराष्ट्राची - Firasti_mh

You Might Also Like

2 comments

$(document).ready(function(){ $('#mscontent').css('opacity','0'); });