तानाजीरावांनी सिंहगड कसा जिंकला?

 • December 30, 2019
 • By Shantanu Paranjape
 • 8 Comments

तानाजी चित्रपट १० जानेवारीला येऊ घातला आहे. नेहमीप्रमाणे एखाद्या पात्राला 'larger than life' दाखवण्याचा सिनेमावाल्यांचा प्रयत्न हा या चित्रपटाच्या ट्रेलर मधून दिसून येतच आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने जरी तानाजीरावांची माहिती संपूर्ण भारताला होणार असली तरी तानाजीरावांनी सिंहगड कसा जिंकून घेतला ही माहिती या निमित्ताने घेणे महत्वाचे ठरेल. त्यासाठीच या ब्लॉगचा प्रपंच. 

सिंहगडाच्या लढाईमध्ये दोन महत्वाची पात्रे आहेत. एक म्हणजे सुभेदार तानाजी मालुसरे आणि दुसरे म्हणजे मुघलांचा सरदार उदयभान राठोड. अर्थातच तानाजी रावांच्या सोबतच शेलार मामा आणि भाऊ सुर्याजी मालुसरे हे होतेच. 

लढाईची पार्श्वभूमी काय होती? 

पुरंदरचा जो तह झाला त्यात शिवाजी महाराजांना जवळपास २३ किल्ले मुघलांना द्यावे लागले. त्यात सिंहगड हा किल्ला प्रमुख होता. पुढे राजांची सुटका झाल्यावर झाल्यानंतर महाराजांनी मुघलांच्कयाडे दिलेले किल्ले परत मिळवण्याचा सपाटा लावला. सिंहगड हे लष्करी दृष्टीने महत्वाचे ठिकाण होते. महाराजांच्या दृष्टीने सिंहगड मुघलांच्यकडे असणे म्हणजे धोक्याचे लक्षण होते कारण इथून राजधानी राजगड अगदीच जवळ होता. मुघलांनी किल्ल्याचा उत्तम प्रकारे बंदोबस्त केला होता व  किल्याचे नेतृत्व उदयभान राठोड या राजपूत सरदाराकडे दिले होते. 

सिंहगड - 

लढाईची समकालीन वर्णने पाहण्याआधी सिंहगडाची थोडक्यात माहिती घेऊ. सिंहगड हा किल्ला पुण्यापासून साधारण २० किमी अंतरावर आहे. किल्ल्याचे मूळ नाव हे कोंढाणा. या गडाचा सर्वात प्राचीन उल्लेख हा शाह-नामा-ए-हिंद नावाच्या फारसी महाकाव्यात आला आहे. या काव्याचा काळ हा साधारण इसवीसन १३५० हा आहे. महम्मद तुघलकाने हा किल्ला नागनायक नावाच्या कोळ्याच्या ताब्यातून जिंकून घेतला असा उलेख आढळतो. अहमदनगरच्या निजामशाही कारकिर्दीतील कोंढाण्याचे उल्लेख इ.१४८२, १५५३, १५५४ व १५६९ च्या आसपासचे आहेत.  पुढे आदिलशाही काळात दादोजी कोंडदेव हे गडाचे सुभेदार होते असा उल्लेख आढळतो आणि नंतरचा इतिहास मग शिवकाळातला आहे. सिंहगडचा इतिहास वाचायचा असेल तर इतिहास संशोधक ग. ह. खरे यांनी लिहिलेले सिंहगड हे पुस्तक जरूर वाचावे. 


A watercolour painting of Pune as seen from the confluence of the Mula and Mutha rivers in the late 1700s, by British artist Henry Salt

तानाजीने गड कसा जिंकला?

समकालीन कागदपत्रे किंवा समकालीन नोंदी पहिल्या तर जेधे शकावली आणि शिवापूरकर देशपांडे अशा दोन साधनांमध्ये या लढाईचा उल्लेख आला आहे. 'तानाजी मालुसरे यांच्याबरोबर जेध्यांच्याकडील मावळे लोक निवड करून दिले होते. तानाजी सुभेदार होता. तो व  कोंढाणा किल्ल्याचा किल्लेदार उदेभान दोघेही मारले गेले आणि ४ फेब्रुवारी १६७० रोजी गड ताब्यात आला' इतकाच उल्लेख आढळतो. 

पुढे सभासद बखरीमध्ये या लढाईचे जास्त वर्णन आढळते. सभासद हा महाराजांच्या समकालीन असला तरी बखर ही महाराजांच्या नंतर लिहिली आहे. 

सभासद बखरीमध्ये येणारे वर्णन हे खालीलप्रमाणे - 

"पुढे २७ गड मोगलांना दिले ते मागती घ्यावे ही तजवीज केली. मोरोपंत पेशवे, निळोपंत मुजुमदार व अनाजीपंत सुरनीस यांसी सांगितले की 'तुम्ही राजकारण करून यत्न करून किले घ्यावेत'. आपण राजीयानी मावळे लोकांस सांगितले की 'गड घेणे'. त्यावरून तानाजी मालुसरा म्हणून हजारी मावळीयांचा होता त्याने कबुल केले की, 'कोंडाणा गड आपण घेतो' असे काबुल करून वस्त्रे, विडे घेऊन गडाचे यत्नास ५०० माणूस घेऊन गडाखाली  गेला आणि दोघे बरे, मर्दाने निवडून रात्री गडाच्या कड्यावर चढविले. जैसे वानर चालून जातात त्याप्रमाणे कड्यावर चालून गेले आणि कडा चढून गडावर जाऊन तेथून माळ लावून वरकड लोकंदेखील तानाजी मालुसरा चढून गडावरी तीनशे माणूस गेले. गडावरी उदेभान राजपूत. त्यास कळले की, गनिमाचे लोक आले. ही खबर कळून कुल राजपूत कंबरकस्ता होऊन, हाती तलवार घेऊन, हिलाल चंद्रज्योती लावून बाराशे माणूस, तोफजी, व तिरंदाज, बरचीवाले, पटाईत, आडहत्यारी ढाला चढवून आले. तेव्हा मावळे लोकांनी श्रीमहादेव! असे स्मरण करून नीट फौजेवर राजपुतांचे चालोन गेले. मोठे युद्ध एक प्रहर झाले. पाचशे राजपूत ठार झाले. चाळीस-पन्नास मावळे ठार झाले. उदेभान किल्लेदार खाशा त्याशी व तानाजी मालुसरा यांशी गाठ पडली. दोघे मोठे योद्धे, महशूर, एक एकावर पडले. तानाजीचे डाव्या हाताची ढाल तुटली. दुसरी ढाल समयास आली नाही. मग तानाजीने आपले डावे हाताची ढाल करून त्याजवर वोढ घेऊन, दोघे महरागास पेटले. दोघे ठार झाले. मग सूर्याजी मालुसरा , याने हिंमत धरून, कुल लोक सावरून उरले राजपूत मारिले. किल्ला काबीज केला आणि गडावर पागेचे खण होते त्यास आग लावली. त्याचा उजेड राजांनी राजगडावरून पाहिला आणि बोलले की 'गड घेतला फत्ते झाली'! दुसरे दिवशी जासूद वर्तमाना घेऊन आला की "तानाजी मालुसरा यांनी मोठे युद्ध केले. उदेभान किल्लेदार यास ठार  मारिले आणि तानाजी मालुसरा ही पडला". असे म्हणताच राजे म्हणू लागले की "एक गड आला, परंतु एक गड गेला!"           

याच प्रकारची माहिती ही चिटणीस बखर, शेडगावकर बखर व चित्रगुप्त बखरीत आली आहे. ती विस्तार भयास्तव येथे देत नाही. 

त्याकाळातले राजपूत सरदार कसे दिसायचे यासाठीचे हे चित्र. हे चित्र मिर्झा राजा जयसिंग यांचे आहे. यावरून एकदंर राजपुतांच्या पोशाखाची माहिती मिळेल. (उजवीकडचे जयसिंग आहेत)

आता जनमानसात जी रुळलेली कथा आहे ज्यात घोरपडीचे वर्णन आहे तसेच आधी लग्न कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे ही घटना जी आहे ती तुळशीदासने लिहिलेल्या पोवाड्यात आहे. तो पोवाडा आपण इथे वाचू शकता. या पोवाड्यात 'गेट' हा इंग्रजी शब्द आला आहे. एकंदर भाषेवरूनसुद्धा तो शिवकालीन पोवाडा वाटत नाही. त्यामुळे उत्तर पेशवाईमध्ये कधीतरी हा पोवाडा रचला असावा असे वाटते. याच पोवाड्यात असलेले उल्लेख हे खाली दिले आहेत.

तर सिंहगडच्या लढाईबद्दल हे असे वर्णन कागदपत्रात आढळते. यशवंती घोरपडीची वगैरे वर्णने अगदी रंजक वाटत असली तरी इतिहासअभ्यासताना तो कागदपत्रे वाचूनच केला पाहिजे अन्यथा इथल्या इतिहासाबद्दल  गैरसमाज पसरत राहतील आणि त्यातून मूळ पराक्रमाचा इतिहास हा मागे पडेल.

A Local History of Poona And Its Battlefields:- Col. L.W. Shakespear, Macmillan and Co. Limited, 1916.


सिंहगडची लढाई ही स्वराज्यातील महत्वाची लढाई मानली जाते याचे कारण म्हणजे मोक्याच्या जागी असलेला सिंहगड महाराजांना परत मिळाला परंतु तानाजीसारखा जीवाभावाचा मित्र राजानी गमावला. समकालीन कागदपत्रात असलेले उल्लेख आपण वरती पाहिले परंतु या किल्ल्याच्या बाबतीत काही उत्तरकालीन लिखाणामुळे गैरसमज पसरले आहेत. त्यातील काही हे खालीप्रमाणे - 

 • तानाजी आपल्या मुलाचे लग्नाचे आमंत्रण शिवाजी महाराजांना देण्यास गेले असताना. शिवाजी महाराजांनी सिंहगडा ताब्यात घेण्याचा विचार सांगितला. परंतु तानाजीच्या घरी लग्न असल्याने शिवाजी महाराज बेत बदलणार होते. तानाजीने स्वतःहून प्रेरित होऊन शिवाजींना या लढाईचे नेतृत्व त्याला देण्यास सांगितले. तानाजी जिवंत असेपर्यंत शिवाजींना या मोहिमेवर जाण्याची गरज नाही. तानाजीने पहिले कोंढाण्याची मोहिम फत्ते करायची मगच मुलाचे लग्न करायचे. आधी लगीन कोंढाण्याचे, मगच रायबाचे असे तानाजीचे उद्गगार प्रसिद्ध आहे.
 • तानाजीने कडा चढण्यासाठी एका यशवंती नावाच्या घोरपडीला दोर लावला व तिला कडा वर चढून जाण्यास सांगितले व या दोराचा वापर करून मावळे कडा चढून गेले.
 • गड मराठ्यांच्या हातात पडल्यानंतर मावळ्यांनी किल्यावर मोठा जाळ करून राजगडावर शिवाजी महाराजांना किल्ला जिंकल्याचा संकेत पाठवला. शिवाजी महाराजांना जेव्हा कळले की तानाजी मालुसरे या युद्धात कामी आला तेव्हा महाराजांना याचे अतिव दु:ख झाले. व त्याच्या तोंडातून वाक्य बाहेर पडले गड आला पण सिंह गेला. व त्यानंतर या गडाचे नाव कोंढाणावरून सिंहगड असे बदलले.

तानाजीरावांनी सिंहगड घेतल्यानंतर अगदी संभाजी राजांची हत्या होईपर्यंत हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता. उत्तरकालीन पोवाडे जरी सोडले तरी तानाजीरावांनी शौर्य आणि निष्ठा यांचे दर्शन घडवीत स्वराज्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले ही गोष्ट नाकारता येत नाही. चित्रपट बघायला जाल तेव्हा तानाजीरावांचे हे बलिदान लक्षात ठेवा आणि किल्ला कसा जिंकला हे सुद्धा लक्षात ठेवा. बाकी चित्रपट काय किंवा मालिका काय, ही केवळ मनोरंजनाची साधने आहेत. यातून खरा इतिहास सांगितला जात नाही. त्यातून किती घ्यायचं आणि किती सोडायचे हे आपण ठरवले पाहिजे. बाकी आपण सुद्न्य आहातच.

तानाजी चित्रपटाचे पोस्टर

लेखासाठी वापरलेले संदर्भ -

१. सिंहगड- श्री. ग. ह. खरे
२. सभासद बखर
३. चिटणीस बखर
४. तुळशीदास पोवाडा
५. A Local History of Poona And Its Battlefields:- Col. L.W. Shakespear, Macmillan and Co. Limited, 1916.

© 2019, Shantanu Paranjape

_____________________________________________________________________________________

नक्की वाचा - 

विमानांचा शोध लागल्यावर त्या गड किल्ल्यांचे महत्व संपलेले असले तरी इतिहासाच्या दृष्टीने ती आपली स्मारके आहेत आणि त्यांची जपणूक करणे हे अत्यंत महत्वाचे आहे. जपणूक करण्याआधी त्यांचा इतिहास समजून घेणे हे आवश्यक आहे. त्यांचे प्रयोजन काय हे विविध ऐतिहासिक साधनांच्यामधून आपल्याला समजून येते. मात्र ही साधने सर्वांनाच वाचणे शक्य होत नाही त्यामुळेच आम्ही आमच्या संस्थेच्या वतीने घेऊन आलो आहोत ५ दिवसांचा दुर्ग ऑनलाईन दुर्अगभ्यास वर्ग. 

हा दुर्ग अभ्यास वर्ग घेणार आहेत डॉ. सचिन जोशी. सचिन जोशी यांनी महाराष्ट्रातील किल्ल्यांवर PHD केली आहे तसेच त्यांनी काही अंधारात असलेल्या किल्ल्यांचा शोध सुद्धा लावलेला आहे. त्यामुळे त्यांच्या नजरेतून किल्ले समजून घेणे हे महाराष्ट्रातील इतिहासप्रेमींच्यासाठी पर्वणीच आहे. हा अभ्यास वर्ग दिनांक १० ऑगस्ट ते १४ ऑगस्ट असा होईल. याची वेळ संध्याकाळी ७.३० ते ९ अशी असेल. यात तुम्हाला जोशी सरांना प्रश्न देखील विचारता येतील. यासाठीचे शुल्क हे रुपये ५०० आहे

इच्छुक असलेल्या सर्वांनी ८७९३१६१०२८ किंवा ७०२०४०२४४६ या क्रमांकावर Whats app वर संपर्क करावा आणि आपली सीट लवकरात लवकरत बुक करावी. कारण जागा या मर्यादित आहेत आणि अशा संधी पुन्हा पुन्हा येत नाहीत आणि हो जे नाव नोंदणी करतील त्यांच्यासाठी आमच्या इतिहासाच्या शाळेची एक महिन्याची मेम्बरशीप मोफत आहे.  

You Might Also Like

8 comments

 1. माझा पोवाडयाच्या बाबतीत प्रश्न आहे.

  शाहिर तुळशीदास यांनी हा पोवाडा त्याकाळात रचल्याचे म्हटले आहे. पोवाड्याच्या शेवटच्या ओळी वाचल्यावर तसे लक्षात येईल.
  मग तो नंतर कधी रचला गेला हे कसे कशावरुन म्हणता येईल. (पोवड्यात ठिकठिकाणी अतिशयोक्ती जरुर आहे. तो भाग वेगळा.)

  ReplyDelete
 2. धन्यवाद. तुमचं लेखन मी नेहमी वाचते.

  ReplyDelete
 3. अगदी साजेशी अशी माहिती सिंहगड किल्ल्याबद्दल दिल्याबद्दल धन्यवाद अशीच माहिती अद्ययावत करत राहा

  ReplyDelete
 4. माझा प्रश्न असा की तानाजीराव मालुसरे गेले त्यानंतर त्यांचा देह हा नक्की कुठे नेवून अग्नी देण्यात आला? कारण वेल्हे तालुक्यामधील मढे घाट ह्या ठिकाणचे नाव तानाजीरावांचे देह (मढे) तेथून कोकणात बहुदा त्यांच्या मूळ गाव असावे तिकडे तेथे नेल्यावरून पडले आहे असे समज आहेत. तर ही गोष्ट खरी आहे का?

  ReplyDelete
 5. फार छान आणि उद्बोधक माहिती दिली आहे....धन्यवाद !!!

  ReplyDelete
 6. उदेभान राजपूत पूर्वी होता तो मुस्लिम झाला होता तसेच त्याने एक सती जाणारी राजपूत श्री उचलून आणली होती त्याच्याच शिपायात त्या बद्दल रोष होता त्यांनी त्याला मदत केली नाही

  ReplyDelete
  Replies
  1. स्त्री असे वाचावे

   Delete

$(document).ready(function(){ $('#mscontent').css('opacity','0'); });