बऱ्याच वेळेला आपण किल्ल्यांवर फिरायला जातो
तेव्हा अनेक प्रकारची शिल्पे पाहतो. काही प्रवेशद्वारांवर तर काही वाड्याच्या
भिंतींवर काही भिंतींवरील चित्रांवर तर काही नाण्यांवर! यातील बहुतांश शिल्पे
विविध प्राण्यांची असतात किंवा पक्ष्यांची असतात.! इतिहासाच्या पुस्तकात या शिल्पांबद्दल
फारशी माहिते सापडत नाही पण थोडेशी शोधाशोध केली असताना बरेच काही सापडून येते. शरभ,
हत्ती, व्याल, व्याघ्र इत्यादी शिल्पांसोबत एक वैशिष्ट्यपूर्ण शिल्प आढळून येते ते
म्हणजे दोन तोंडाच्या पक्ष्याचे. मनुष्याचे किंवा पक्ष्याचे एक धड पण दोन तोंडे
आणि दोन पंख असणाऱ्या या पौराणिक पक्ष्याला गंडभेरुंड असे म्हणतात. गंडभेरुंड हे
नाव मात्र नवव्या शतकाच्या आधी आढळत नाही. त्यापूर्वी या पक्ष्याला भारुंड, भेरुंड
किंवा भोरंड या नावाने ओळखले जात असे.
पौराणिक यासाठी म्हणले की भारतातील बहुतांश
पुराणांमध्ये याचा उल्लेख आढळून येतो. भरत मुनींनी लिहिलेल्या ‘भरतकोश:’ या ग्रंथात
गंडभेरुंडचा उल्लेख येतो तो असा,
गंडभेरुंड: देशीताल:
गंडभेरुंड तालोय गजाभ्यांमुपरिस्थल:
लक्ष्मण: हस्त:
कपितथहस्तयोरर्मिलात्स्वास्तिकेनैव संभवेत
गंडभेरुंड संज्ञाके विनियोगस्तु तत्र च गौरीमतम
याशिवाय ऋग्वेदात, अथर्ववेदात, मुंडक व श्वेताश्वेतर
या पक्ष्याचा उल्लेख आल्याचे आपणास आढळून येते. लहानपणी वाचलेल्या पंचतंत्र,
सिंहासन बत्तीशी किंवा हितोपदेश यांसारख्या बोधपर गोष्टींमध्ये दोन तोंडाच्या
पक्ष्याचा उल्लेख येतो मात्र तो केवळ कथेत. मात्र यातील बहुतांश कथा या लोककथा
होत्या आणि त्या प्राचीन कालापासून चालत आल्या होत्या पण त्यांचे अस्तित्व आपल्याला
नाकारता येत नाही. यातून एक कळून येते की या ग्रंथांच्या आधी सुद्धा दोन
तोंडांच्या पक्ष्याला महत्व असणार. अर्थात प्रत्यक्षात हा पक्षी होता का नाही
याबद्दल माहिती नाही परंतु दंतकथा किंवा शिल्पे यांवरून त्याचे अस्तित्व दिसून
येते.
गंडभेरुंड
या शब्दाची उत्पत्ती जर आपण पाहायला गेलो तर या शब्दाचा किंवा शिल्पाचा वापर
कर्नाटक प्रांतात जास्त केलेला आढळून येतो. कानडी भाषेत गंड या शब्दाचा अर्थ वीर किंवा
योद्धा असा आहे तर भेरुंड या शब्दाचा अर्थ द्विमुख असणारा पक्षी किंवा भयंकर पक्षी
असा होतो. जैन साहित्यात सुद्धा या पक्ष्याला भारुंड असे नाव दिलेले आहे. या
साहित्यातील वर्णन जर आपण पहिले तर या पक्ष्याला तीन पाय असल्याचे वाचनात येते
परंतु कोणत्याही शिल्पांमध्ये तीन पाय दिसत नाही हे विशेष. भेरुंड हा शब्द कदाचित
भारुंड याशब्दाचा अपभ्रंश असावा, भा(बा) म्हणजे दोन आणि रुंड म्हणजे मुख. तर हे
दोन शब्द मिळून भारुंड असा शब्द झाल्याचे नाकारता येत नाही. अशा रीतीने गंडभेरुंड
हा शब्द तयार झाला असेल अर्थात हे सर्व तर्क आहेत आणि याला ठोस पुरावा काही नाही
परंतु पुराणात येणारे दाखले किंवा वेगवेगळ्या राजसत्तांनी केलेला उल्लेख यांवरून
इतके लक्षात येते की गंडभेरुंड हा पक्षी ताकदीचे आणि शौर्याचे प्रतिक मानला जाई
आणि त्याचा संदर्भ बऱ्याच जणांनी विष्णूचे वाहन असणाऱ्या गरुडाशी जोडलेला
आहे.
दंतकथा:
प्रत्येक गोष्टीला एखादी दंतकथा ही असतेच
किंबहुना दंतकथेशिवाय एखादी गोष्ट अभ्यासण्यात सुद्धा मजा नाही. गंडभेरुंडच्या
बाबतीत अशी दंतकथा सांगीतली जाते की, भगवान विष्णू यांनी नृसिंहाचा अवतार घेऊन हिरण्यकशपुचा
वध केला. नरसिंह अवतार हा सिंहाचे तोंड आणि मनुष्याचे शरीर घेऊन बनलेला असल्याने
तो अधिक शक्तीशाली होता त्यामुळे त्याने या शक्तीचा दुरुपयोग करून सर्व जगाचा
संहार करायचे असे ठरवले. हे पाहून शंकराने शरभाचे रूप घेऊन नरसिंहाचा वध केला
म्हणून विष्णूने शरभापेक्षा ताकदवान असलेल्या गंडभेरुंड म्हणजे दोन तोंडाच्या
गरुडाचे रूप घेऊन शरभाचा पराभव केला. अशी ती कथा.
या कथेला पुरावा शून्य, त्यामुळे
कथा ही कथेसारखीच मानून सोडून द्यावी. पण यातून एक कळत की गंडभेरुंड आणि शरभ हे
एकमेकांचे वैरी दाखवले आहेत त्यामुळेच की काय महाराष्ट्रातील बहुतांश किल्ल्यांवर
आढळणाऱ्या गंडभेरुंडच्या शिल्पांमध्ये शरभ हा नक्की असतो. एकतर गंडभेरुंड हा शरभाचा
पराभव करताना दाखवला जातो किंवा शरभाने गंडभेरुंडचा पराभव केलेला दिसून येतो. या ऐकीव
कथेवरूनच गंडभेरुंडची कल्पना आलेली असावी कारण प्रामुख्याने महाराष्ट्रात अशा कथांना
शिल्प स्वरूपात दाखवणे हे पूर्वीपासून चालत आलेले आहे. अगदी उदाहरण द्यायचे झाले तर
पुण्यातील त्रिशुंड गणेश मंदिरातील शंकराच्या लिंगोद्भव रूपाचे शिल्प. त्यामुळे
गंडभेरुंड आणि शरभ यांच्यातील युद्धाला तरी वर सांगितलेल्या पौराणिक कथेचा आधार
असावा.
पुढील माहिती आपण भाग २ मध्ये पाहू
© 2020, Shantanu Paranjape
____________________________________________________________________________
मला सोशल मिडीयावर फॉलो करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
इन्स्टाग्राम - Paranjape_shantanu
फिरस्ती महाराष्ट्राची - Firasti_mh
0 comments