कारतलब खानाला आदेश सुटला!! “जाओ, उत्तर कोकण जीत के आओ!”. त्याकाळी उत्तर कोकण म्हणजे कल्याण,भिवंडी हा भाग येत असे (म्हणजे अजूनही तोच येतो पण आता त्या भागाला कोकण म्हणावयाला मन तयार होत नाही). खानची स्वारी निघाली. इकडे महाराजांना ही खबर आधीच येवून पोहोचली होती की खान निघणार आणि तो कुरवंडे घाट मार्गे उंबर खिंडीतूनच जाणार.. महाराज हे ऐकून मोट्ठ्याने हसले असावेत!! बरा सापडला!!
उंबर खिंड!! आंबा
नदीचा घळीमुळे झालेला चिंचोळा भाग आणि कुरवंडे घाट तर दुर्गम भागातच मोडणारा!! बरा
सापडला, आता खानाला उतरूदे खिंडीतून.. महाराजांच्या आज्ञा सुटल्या, “खिंडीत मोर्चे
बांधा” आणि एवढं बोलून स्वतः जातीने उंबर खिंडी मध्ये डेरेदाखल झाले.. किर्र जंगल,
दुपारच्या उन्हात सुद्धा समोरची व्यक्ती दिसणार नाही इतकी झाडी.. खानाला पकडायला परफेक्ट
जागा!!
इकडे खान पुण्याहून
निघाला. तळेगाव वगैरे करत लोहगड विसापूर किल्ल्यांजवळून गेला. काहीच प्रतिकार नाही
वरून. खानाला वाटलं घाबरले बहुतेक! आणि आज्ञा दिली चलो उंबर खिंड!! बरंच लवाजमा
घेवून खान कुरवंडे घाटाच्या दिशेने निघाला. सोबत जड जवाहीर, दास दासी, अनेक सरदार
आणि भरपूर सैन्य. त्याच्या बरोबर रायबागन नावाची राजपूत घराण्यातील शूर स्त्री
सुद्धा होती. कुरवंडे घाटाच्या माथ्यावर आल्यावर खानाचे धाबे दणाणले!! हा घाट
उतरायचा?? इथे येवून चूक तर नाही ना केली??!! नानाविविध शंकेने ग्रासलेल्या खानाने
अन त्याच्या सैन्याने घाट उतरण्यास सुरुवात केली. आधीच झालेली बेकार अवस्था आणि
त्यात आजूबाजूचे जंगल यातच खानाचे सैन्य ढेपाळले.. घाटाच्या अर्ध्या भागापर्यंत
कसे बसे येवून पोहोचले.
आता अजून अर्धेच
राहिला होते. अन इतक्यात जोरदार आरोळी आली!! हर हर महादेव!! अन खानच्या छातीत धस्स
झाले!! या खुदा, भास तर होत नाहीत ना? अन इतक्यातच चहू बाजूंनी सपासप बाण यायला
लागले आणि पाहता पाहता खानाचे सैन्य खाली कोसळाला सुरुवात झाली.. खानाला कळेना की
नक्की होतंय काय! घोषणा ऐकू येते आहे, बाण पण येत आहेत पण मराठे कुठे दिसत नाहीत..
खानाला काही कळेनासे झाले, इतक्यात आधीच गोंधळलेल्या मुघालांवर मराठ्यांनी
चहुबाजूंनी चालून जात आक्रमण केली आणि खानाचे सैन्य पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे
कोसळू लागले. हे असंच चालु राहिले तर आपलं काही खरं नाही हे रायबागन ला जाणवले आणि
त्या हुशार बाईने खानाला शिवाजी ला शरण जाण्याचा सल्ला दिल्ला.. “अगर खुद को बचाना
है तो सिवा को शरण जा वरना खुदा के पास जायेगा!”.
खानाला सुद्धा ते
पटले आणि त्याने रायबागनलाच आपला वकील म्हणून महाराजांकडे पाठवले. महाराज पांढऱ्या
शुभ्र घोड्यावर बसले होते.. जवळ जाताच रायबागन ने महाराजांसमोर नजराणा ठेवला आणि
आम्हाला जिवंत परत जावू द्यावे अशी विनंती केली.. महाराजांनी सुद्धा नुसत्या
कपड्यानिशी जाण्याचा प्रस्ताव मान्य करत लुटीचे समान ताब्यात घ्यायला सांगितले..
पण जाता जाता रायबागन चा वीर स्त्री म्हणून सन्मान करायला ते विसरले नाहीत. उंबर
खिंडीमध्ये जाताना हा सारा इतिहास डोळ्यासमोरून सरकत जातो!!
कुरवंडे घाटाकडे
जाण्यासाठी जाणारा रस्ता हा लोणावळ्यातील रायवूड जवळून जातो. कुरवंडे गावात
जाण्यासाठी जीप्स असतात मात्र त्यांचा काही नेम नाही. स्वताची गाडी असली तर उत्तम
अन्यथा पायगाडीशिवाय किंवा लिफ्ट मागण्याशिवाय पर्याय नाही. लोणावळा ते कुरवंडे हे
अंतर ६-७ किमी असेल, त्यामुळे लोणावळ्याच्या थंड हवेतून चालताना सुद्धा दम लागत
नाही. कुरवंडेगाव तसं बऱ्यापैकी मोठं आहे. जवळच्याच डोंगरावर असणारे शिवमंदिर
पाहण्यासारखे आहे. कुरवंडे गावापासून भुशी डॅम अगदी हाकेच्या अंतरावर आहे.
त्यामुळेवर्षा सहलीचा आनंद घ्यायचा असल्यास, भुशीडॅम पेक्षा हा मार्ग स्विकारावा.
गावातून नागफणी
पर्यंत सरळ रस्ता गेलेला आहे आणि नागफणी पासून थोड्याच अंतरावर तो थांबला आहे. मजल
दरमजल करत आपण नागफणीच्या मागच्या बाजूला पोहोचतो. याबाजुनी पण नागफणी वर जायला
रस्ता आहे. त्यामुळे ज्यांना ३ तासाचा ट्रेक करायचा नाही त्यांच्यासाठी हा मार्ग
छान आहे. साधारण अर्ध्या तासात वर आपण पोहोचतो आणि वरून जो नजारा मिळतो तो केवळ
अवर्णनीय. खाली दिसणारा मुंबई-पुणे हा घाटरस्ता, समोर दिसणारे राजमाचीचे दोन
डोंगर. यांचे नजारे डोळ्याचे पारणे फेडतो.
घाट उतरण्यास जेव्हा
आपण सुरुवात करतो तेव्हा लगेच ध्यानात येते की खानाने इकडे येवून काय चूक केली ते.
खरं तर घाट तसा छोटाच आहे पण त्याची दुर्गमता खानच्या पराभवास कारणीभूत
ठरली.. सध्या गेल गॅस कंपनीच्या पाईप लाईनमुळे
घाटाची वाट लगेच कळून येते. घाट उतरताना मध्ये झाडी झाडोरा म्हणावा तसा फार नाही. पण
रस्ता अगदीच मळलेला आणि उतरण्यास सोपा आहे. पावसाळ्यात तर हा घाट म्हणजे स्वर्गच
असतो. दोन्ही बाजूंनी कोसळणारे धबाबा धबधबे आणि धुक्याची दुलई!!
साधारण कुरवंडे
पासून २ तासात आपण चावणीया घाटाच्या पायथ्याशी असणाऱ्या गावात येऊन पोहोचतो.चावणी
हा शब्द कदाचित छावणी या शब्दावरून आला असावा असे वाटते. चावणी गावात जाण्यासाठी अंबा
नदीचे पात्र ओलांडावे लागते. उन्हाळ्यात कोरडी असणारी ही नदी पावसाळ्यात भरून वाहत
असते तेव्हा रिवर क्रॉसिंगचा मस्त अनुभव घेता येतो. इथून उंबर खिंड साधारण ३ किमी
वर आहे आणि साधारण कोणतेही वाहन जायला मिळत नाही त्यामुळे पायपिटीशिवाय पर्याय
नसतो.
उंबर खिंडीची आपली
कल्पना आणि प्रत्यक्षातली खिंड यात बरीच तफावत आहे. सध्या तरी याठिकाणी त्या
वीरांच्या शौर्याची कथा सांगणारे स्मारक उभारले आहे. नदीच्या बरोबर मध्यात उभारलेल्या
स्मारकाच्या जवळ पावसाळा नसताना जाता येते. दोन तलवारी आणि ढाल असे त्या स्मारकाचे
स्वरूप आहे. याठिकाणाला ऐतिहासिक तसेच भौगोलिक महत्व सुद्धा आहे. चावणी ते
पाली-खोपोली रस्ता हे अंतर जायला मात्र गाडी शोधावी लागते कारण पुन्हा ७-८ किमी
चालण्याची ताकद आपल्यात नसते. मागे वळून पाहिल्यावर दिसणारा कुरवंडे घाट, डाव्या
हाताला असणारे ड्युक्स नोज, तसेच उजव्या हाताला वर पोटात काही गुहा असणारा ‘गारमाळ’
डोंगर आपल्याला पुन्हा परत यायचे आमंत्रण देतच असतात.
जायचे कसे:
पुणे-लोणावळा-कुरवंडे-चावणी-
खोपोली-पाली रस्ता-खोपोली-पुणे इतका साधा सोपा मार्ग आहे. पण जर घाट उतरणार असाल
तर मात्र स्वताची गाडी न नेलेलं चांगलं. पण घाट उतरून परत चढायची ताकद असेल तर
गाडीने जाऊ शकता. पुणे ते कुरवंडे हे अंतर ७० किमी आहे.
जेवणाची सोय-
वर कुरवंडे गावात
हॉटेल मध्ये नाश्ता मिळू शकतो, जेवणाची खात्री नाही पण नेहमीप्रमाणे सोबत आपले
आपले खाणे घेऊन जावे. चावणी गावात जेवणाची सोय नाही.
पिण्याच्या पाण्याची
सोय-
पावसाळ्यात गेल्यास
ओढ्यातील पाणी पिता येऊ शकते परंतु उन्हाळ्यात काहीही पाणी नाही.
विशेष टीप-
चावणी गावातून
खोपोली-पाली रस्त्यावर जाण्यासाठी सोय नाही त्यामुळे एखादी गाडी चावणी येथे
बोलावल्यास उत्तम.
© 2018, Shantanu Paranjape