रामचंद्र अमात्यांच्या आज्ञापात्रातील दुर्गविचार - २

पहिल्या भागात आपण महाराष्ट्रातील दुर्गांचे प्रयोजन काय होते याची माहिती घेतली. या भागात आपण आज्ञापत्रात दुर्गांच्या बद्दल बारकाईने ज्या सूचना केल्या आहेत त्यांची माहिती घेऊ. 

शिवाजी महाराज जेव्हा सर्व प्रथम रायगडाची पाहणी करण्यास गेले तेव्हा त्यांचे उद्गार हे सभासद बखरीत नमूद केलेले आहेत. बखरीतील वर्णन असे, "राजा खासा जाऊन पाहाता,गड बहुत चखोट. कडे तासिल्याप्रमाणे दीड गाव उंच. पर्जन्यकाळी कडि-यावर गवतही उगवत नाही. पाखरू बसू म्हणेल तर जागा नाही. तक्तास जागा हाच गड करावा." यात केवळ भौगोलिक गोष्ट कशी असावी किंवा गड संरक्षणाच्या दृष्टीने कसा असावा याबद्दलचे विचार समजून येतात परंतु आज्ञापत्रात याबद्दल आणखीन खोलात जाऊन विचार केलेला दिसून येतो. गड नेमका कुठे बांधावा हे सांगताना अमात्य म्हणतात, 

"राज्यसंरक्षणाचे मुख्य कारण ते किल्ले .देशोदेशी स्थळे पाहून  किल्ले बांधावे. किल्ल्यासमीप दुसरा डोंगर असू नये. असला तर सुरुंग लावून गडाच्या आहारी आणावा. असाध्य असला तर मोकळा न सोडता तोसुद्धा बांधोन मजबूत करावा."

थोडक्यात काय तर जवळ जवळ डोंगर असले तर एक तर दोन्ही ठिकाणी किल्ले बांधा किंवा दुसरा डोंगर हा सुरुंग लाऊन चढण्यास अवघड असा करून टाकावा. याच मुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आपल्याला जोडकिल्ले दिसून येतात. लोहगड-विसापूर, श्रीवर्धन-मनरंजन ही त्यांची उदाहरणे. गडाचे रक्षण करण्यासाठी महत्वाचे म्हणजे त्यांचा दरवाजा, येण्याजाण्याचा मार्ग आणि गडाखाली असणाऱ्या पहाऱ्याच्या चौक्या. 

अमात्य म्हणतात, "गडास येण्याजाण्यास जे मार्ग असतील ते सुगम नसावे. सुगम असले तर ते तोडून त्यावर झाडे वाढवून परके फौजेस जाता कठीण ऐसे करावेत. गडाची राखण म्हणजे कमरग्याची (डोंगराचा  मध्यभाग) प्रयत्ने वाढवावी. एक काठी तेही तोडू न द्यावी.  बलकुबलीस( युद्धप्रसंगी अथवा कठीण प्रसंग आल्यास) त्या झाडीमध्ये हशम-बंदुकी घालाव्या कारणे जागा असो द्यावे. गडाभोवती नेहमी मेटे असो द्यावीत. घेऱ्याभोवती  ( गडाच्या थेट पायथ्यालगत येणारा प्रदेश)  गस्त सतत करीत जावी. गडास दरवाजे बांधावे ते खालील मारा चुकवून. गडास एक दरवाजा हा थोरला ऐब (दोष) आहे. गड पाहून दोन तीन दरवाजे तैश्याच चोरदिंड्या कराव्यात. हमेशा पाहिजे तितक्या  दिंड्या ठेवून वरकड (बाकीच्या ) चिणाव्यात."यांची जर उदाहरणे पाहण्याचे ठरवले तर शिवनेरी किंवा लोहगड सारख्या किल्ल्यांवर अनेक दरवाजांची साखळी केलेली आपल्याला दिसून येते किंवा गडावर जाण्याच्या मार्ग हा अनेक ठिकाणी तटबंदी उजव्या किंवा डाव्या ठिकाणी ठेऊन बांधलेला दिसून येतो. उदाहरण द्यायचे तोरणा, कोरीगड. दरवाजे हे थेट न बांधता शत्रूला दिसणार नाहीत अशा वक्राकार रेषेत बांधले गेले. काही जण याला गोमुखी बांधणी सुद्धा म्हणतात. अशा प्रकारे गड आपल्याला नैसर्गिक रित्या संरक्षित ठिकाणी बांधलेला दिसतोच परंतु जिथे जिथे शक्य असे तिथे अशा प्रकारचे उपाय करून तो अधिक बळकट केलेला दिसून येतो. जेणेकरून शत्रूला गड जिंकण्यास अगदी अवघड व्हावे. आता सर्व किल्ले काही राजांनी बांधलेले नाहीत परंतु जे किल्ले महाराजांनी बांधले आहेत त्या सर्व किल्ल्यांवर अशा प्रकारचे उपाय केलेले आढळून येतात. जे किल्ले राजांनी जिंकून घेतले तिथे नंतर अनेक प्रकारे डागडूजी करून किल्ला मजबूत केलेला आढळून येतो. 
या मालिकेच्या तिसऱ्या भागात आपण बघूया गडाविषयीचे इतर काही महत्वाचे मुद्दे तसेच गडावर कोण कोणते अधिकारी नेमले जात असत तसेच राजांच्या काळात गडावर किती खर्च करण्यात आला. 

विमानांचा शोध लागल्यावर त्या गड किल्ल्यांचे महत्व संपलेले असले तरी इतिहासाच्या दृष्टीने ती आपली स्मारके आहेत आणि त्यांची जपणूक करणे हे अत्यंत महत्वाचे आहे. जपणूक करण्याआधी त्यांचा इतिहास समजून घेणे हे आवश्यक आहे. त्यांचे प्रयोजन काय हे विविध ऐतिहासिक साधनांच्यामधून आपल्याला समजून येते. मात्र ही साधने सर्वांनाच वाचणे शक्य होत नाही त्यामुळेच आम्ही आमच्या संस्थेच्या वतीने घेऊन आलो आहोत ५ दिवसांचा दुर्ग ऑनलाईन दुर्अगभ्यास वर्ग. 

हा दुर्ग अभ्यास वर्ग घेणार आहेत डॉ. सचिन जोशी. सचिन जोशी यांनी महाराष्ट्रातील किल्ल्यांवर PHD केली आहे तसेच त्यांनी काही अंधारात असलेल्या किल्ल्यांचा शोध सुद्धा लावलेला आहे. त्यामुळे त्यांच्या नजरेतून किल्ले समजून घेणे हे महाराष्ट्रातील इतिहासप्रेमींच्यासाठी पर्वणीच आहे. हा अभ्यास वर्ग दिनांक १० ऑगस्ट ते १४ ऑगस्ट असा होईल. याची वेळ संध्याकाळी ७.३० ते ९ अशी असेल. यात तुम्हाला जोशी सरांना प्रश्न देखील विचारता येतील. यासाठीचे शुल्क हे रुपये ५०० आहे. 

इच्छुक असलेल्या सर्वांनी ८७९३१६१०२८ किंवा ७०२०४०२४४६ या क्रमांकावर Whats app वर संपर्क करावा आणि आपली सीट लवकरात लवकरत बुक करावी. कारण जागा या मर्यादित आहेत आणि अशा संधी पुन्हा पुन्हा येत नाहीत आणि हो जे नाव नोंदणी करतील त्यांच्यासाठी आमच्या इतिहासाच्या शाळेची एक महिन्याची मेम्बरशीप मोफत आहे.  


© 2020, Shantanu Paranjape

You Might Also Like

1 comments

$(document).ready(function(){ $('#mscontent').css('opacity','0'); });