शाहू महाराजांनी नानासाहेब पेशवे यांना पेशवेपदावरून दूरू केले होते!!

  • August 01, 2020
  • By Shantanu Paranjape
  • 0 Commentsबाजीराव साहेब गेल्यानंतर शाहू महाराजांनी पेशवे पदाची धुरा त्यांचा मुलगा बाळाजी बाजीराव याच्याकडे सोपवली. बाळाजी बाजीराव म्हणजेच नानासाहेब पूर्वी पेशव्यांचे मुतालिक म्हणून सातारा दरबारी होतेच त्यामुळे त्यांना राजकारण कशाशी खातात याची चांगलीच माहिती होती. परंतु नानासाहेब यांना पेशवे पद दिल्यामुळे दरबारात त्यांच्या शत्रूंनी त्यांचे कान फुकाण्यास सुरुवात केलीच होती. अर्थात शाहू राजांचा विश्वास नानासाहेब यांच्यावर असल्याने त्यांनी याकडे दुर्लक्ष केले परंतु बऱ्याच वेळा असे केले गेल्याने नानासाहेब खरेच आपल्या आज्ञेत आहेत का नाही याची परीक्षा घेण्याचे शाहू महाराजांनी ठरवले. 

नानासाहेबाना निरोप पाठवला की दहा हजार फौज घेऊन लगेच भेटीस येणे. नानासाहेबांनी त्याप्रमाणे करताच जवळ आल्यावर शाहू महाराजांनी दुसरा निरोप पाठवला आणि त्यात म्हणले की इतक्या फौजेचे काय प्रयोजन? तेव्हा नानासाहेबांनी दहा कोस अंतरावर आपली सर्व फौज ठेऊन फक्त ५ लोकांना घेऊन राजांच्या भेटीस निघाले. आपण येत आहोत याची माहिती देण्यासाठी एकास पुढे धाडले. हे राजांना कळताच राजे शिकारीला म्हणून गेले व मासे पकडण्यासाठी म्हणून गळ टाकून बसले. नानासाहेबांना हे कळताच त्यांची आपला मोर्चा तिकडे वळवला आणि राजांच्या मागे जाऊन उभे राहिले. चोपदार लोकांनी पेशव्यांना मुजरे केले ते राजांनी पाहिले परंतु राजांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि एक प्रहर नानासाहेब पेशव्यांच्याकडे पाहिले सुद्धा नाही. प्रहर झाल्यानंतर शाहू राजाना वाटले नानासाहेब निघून गेले असतील परंतु मागे वळून पाहिले तर नानासाहेब तसेच उभे होते. राजांनी मग सर्वाना विडे दिले आणि तिथून काहीही न बोलता ते निघून गेले व नानासाहेबांना डेर्यात जाण्यास सांगितले.काही काळानंतर सातार्‍यात आल्यावर नानासाहेब पेशवे दरबारात गेले असता महाराज काही न बोलता सिंहासनावरून उठून जोडे घालून थेट उठून वाड्याच्या रोखाने चालू लागले. मध्यावरच शाहूराजांनी जोडे काढून ठेवले आणि ते तसेच पुढे निघाले. जवळपास खिजमादगार कोणीही नव्हते. नानासाहेब मागून हे सारे पाहत होतेच. त्यांनी महाराजांचे ते जोडे स्वतःच्या हाताने उचलले आणि दिवाणखान्यात घेऊन गेले. शाहू महाराज हे सारे पाहत होतेच. नानासाहेबांच्या या कृत्यामुळे राजाना समाधान वाटले आणि नानासाहेबांशी कामकाजाच्या चार गोष्टी करून त्यांना निरोप दिला. 
  
काही दिवस गेले आणि अचानक नानासाहेब पेशवे पाच-सात हजार घोडेस्वारांनिशी एका मोहीमेवरून थेट सातार्‍यात आले. आणि त्याचवेळी, शाहूराजांनी चिटणीसांना बोलवून “प्रधान यांस चिठी लिहावी जे, तुमचे प्रधानपद दूर केले आहे. तरी शिक्के कटार व जरीपटका हुजुरे पाठविले यांजबरोबर जामदारखान्यात दाखल करणे” अशी आज्ञा केली ! नानासाहेबांचा मुक्काम वेण्णा नदीच्या काठावर होता. चिटणीसांनी राजाज्ञेबरहुकूम नानासाहेबांकडे चिठ्ठी देऊन दोन खिजमदगार पाठवले. ते हुजुरे नानासाहेबांपाशी आले आणि ती चिठ्ठी जशीच्या तशी पेशव्यांना दिली. नानासाहेबांनी चिठ्ठी वाचली. खिजमदगारांना वाटले आता नानासाहेब आता चिडूनचिठ्ठी फाडून फेकूनच देतील. पण प्रधानपंतांनी मात्र चिठ्ठी वाचून झाल्यावर त्या चिठ्ठीला चक्क मुजरा केला, आणि तसेच आत उठून जाअऊन शिक्के-कट्यार आणि जरिपटका त्या हुजुर्‍यांच्या हवाली केला. आता नानासाहेब अधिकृतरीत्या पेशवे नव्हते ! त्यांनी आपली एक राहुटी आपल्या खाजगी नोकरांसह लष्करापासून दूर उभारली आणि शाहू महाराजांना चिठ्ठी लिहीली की, “आपली आज्ञा झाली तेव्हाच आपल्या पायांपाशी सेवएस येणार होतो पण सोबत हा प्रधानकीचा सरंजाम आहे, तो सगळा कोणाकडे सोपवावा याची आज्ञा व्हावी, म्हणजे तो सारा सरंजाम, कारखाने आणि फौज सोपवून नंतर पायांपाशी येतो” ! हाच निरोप तोंडी सांगणयाकरीता नानासाहेबांनी सेवकांनाही बजावले. ते हुजुरे शिक्के-कट्यार आणि जरीपटका घेऊन महाराजांपाशी आले. महाराजांनी ते जामदारखान्यात जमा कारवून हुजुर्‍यांकरवी नानासाहेबांना पुन्हा निरोप पाठवला की, “तो सारा सरंजाम ताब्यात घेण्यास सरकारातून कारकून येतील तोवर तेथेच रहावे”.अशातच दहा दिवस लोटले. महाराजांनी नानासाहेबांना पेशवेपदावरून दूर केले ही बातमी हळूहळू सगळीकडे पसरली. नानासाहेबांच्या विश्वासातल्या पुरंदरे, सचिव वगैरे लोकांनी व मुत्सद्द्यांनी शाहू महाराजांना विनवले की, “पंतप्रधानांकडून अशी काय आगळीक घडली की त्यांना दूर करावे?” यावर शाहूमहाराज म्हणाले, “त्यांच्याकडे प्रधानपद ठेवायचे नाही, ते पूर्वीप्रमाणे पिंगळ्यांनाच द्यायचे आहे”. यावर मुत्सद्द्यांचे म्हणणे पडले की मग निर्णय लवकर घ्यावा, हिंदुस्थानात ही बातमी पसरली तर शत्रू या गोष्टीचा फायदा घेईल नक्कीच ! इकडे दहा दिवस नानासाहेब आपल्या खासगत माणसांनिशी राहुटीत आज्ञेची वाट बघत होते. अखेरीस त्यांनी मंत्री आणि चिटणीस यांच्याकरवी शाहूराजांकडे विनंती केली की, “मी लष्कराच्याबाहेर राहिलो आहे. येथे वेळ घालवण्यापेक्षा मला आपल्या चरणांशी येऊन सेवा करण्याची आज्ञा व्हावी”. यावर शाहूराजांनी विचारले की इथे येण्यासाठी नजर काय कराल, नजराणा काय द्याल ? यावर नानासाहेबांनी उत्तर दिले की, “मी एकटा आहे, सरंजाम सरकारातच जमा केलेला आहे. घर वगैरे सगळं जे आहे ते सरकारातच जमा आहे”. यावर शाहूराजांनी काहीही प्रत्युत्तर केले नाही.

एके दिवशी शाहूराजांनी निरोप पाठवून नानासाहेबांना भेटीस बोलावणे पाठवले. नानासाहेब त्यांना पेशवेपदावरून दूर केल्याने आता चिडले असतील आणि भेटीला आल्यानंतर ते आपल्याशी बोलणार नाही वगैरे शाहूमहाराजांच्या मनात आले असावे. नानासाहेब केवळ एक सैनिक घेऊन येऊन उभे राहीले आणि शाहूराजांना मुजरा करून म्हणाले, “मी आपला सर्वस्वी अपराधी आहे. पायांपाशी  कोणतीही सेवा सांगावी, नि:संकोच करीन, पण या पायांपासून दूर करू नये”. हे ऐकताच शाहूराजांना प्रचंड आनंद झाला आणि खात्री पटली, की हे एकनिष्ठ सेवक खरे, यांच्यापासून आपल्या आणि राज्याच्या सेवेत कधिही अंतर पडायचे नाही ! आणि म्हणून महाराजांनी लगेच चिटणीसांकरवी महाराजांनी प्रधानकीची वस्त्रे, शिक्के-कट्यार आणि जरिपटका आणवून पुन्हा पेशवेपद बहाल केले. नानासाहेबांनी कृतज्ञतेने शाहूराजांच्या पायावर मस्तक ठेवले, तेव्हा त्यांना हाताने धरून उठवत शाहू महाराज भर दरबारात कौतुकाने म्हणाले, “तुमची निष्ठा कशी आहे हे पाहिले ! तुम्ही बाजीरावांचे पुत्र आणि बाळाजी विश्वनाथ यांचे नातू खरंच शोभता ! तुमची सेवा आणि निष्ठा पाहून खुप खुप आनंद होत आहे” आणि महाराजांनी भर दरबारात नानासाहेबांचा यथोचित सन्मान केला !

संदर्भ: मल्हार रामराव कृत थोरल्या शाहू महाराजांची बखर

_____________________________________________________________________________________

नक्की वाचा - 

विमानांचा शोध लागल्यावर त्या गड किल्ल्यांचे महत्व संपलेले असले तरी इतिहासाच्या दृष्टीने ती आपली स्मारके आहेत आणि त्यांची जपणूक करणे हे अत्यंत महत्वाचे आहे. जपणूक करण्याआधी त्यांचा इतिहास समजून घेणे हे आवश्यक आहे. त्यांचे प्रयोजन काय हे विविध ऐतिहासिक साधनांच्यामधून आपल्याला समजून येते. मात्र ही साधने सर्वांनाच वाचणे शक्य होत नाही त्यामुळेच आम्ही आमच्या संस्थेच्या वतीने घेऊन आलो आहोत ५ दिवसांचा दुर्ग ऑनलाईन दुर्अगभ्यास वर्ग. 

हा दुर्ग अभ्यास वर्ग घेणार आहेत डॉ. सचिन जोशी. सचिन जोशी यांनी महाराष्ट्रातील किल्ल्यांवर PHD केली आहे तसेच त्यांनी काही अंधारात असलेल्या किल्ल्यांचा शोध सुद्धा लावलेला आहे. त्यामुळे त्यांच्या नजरेतून किल्ले समजून घेणे हे महाराष्ट्रातील इतिहासप्रेमींच्यासाठी पर्वणीच आहे. हा अभ्यास वर्ग दिनांक १० ऑगस्ट ते १४ ऑगस्ट असा होईल. याची वेळ संध्याकाळी ७.३० ते ९ अशी असेल. यात तुम्हाला जोशी सरांना प्रश्न देखील विचारता येतील. यासाठीचे शुल्क हे रुपये ५०० आहे

इच्छुक असलेल्या सर्वांनी ८७९३१६१०२८ किंवा ७०२०४०२४४६ या क्रमांकावर Whats app वर संपर्क करावा आणि आपली सीट लवकरात लवकरत बुक करावी. कारण जागा या मर्यादित आहेत आणि अशा संधी पुन्हा पुन्हा येत नाहीत आणि हो जे नाव नोंदणी करतील त्यांच्यासाठी आमच्या इतिहासाच्या शाळेची एक महिन्याची मेम्बरशीप मोफत आहे.  


© 2020, Shantanu Paranjape

You Might Also Like

0 comments

$(document).ready(function(){ $('#mscontent').css('opacity','0'); });